वसुंधरेचा कर्दनकाळ ठरू पहाणारा स्वतःला सुशिक्षित म्हणवणारा मानव !

AbhayVartak
श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

वसुंधरेची म्हणजे आपल्या पृथ्वीची मानवाने कशी अपरिमित हानी केली ?, याविषयीचा एक माहितीपट पहाण्यात आला. वसुंधरेने आधार दिला; म्हणून आपण जगत आहोत आणि आपल्याला मोक्षप्राप्ती करण्यासाठी स्थूलदेह धारण करून साधना करणे शक्य होत आहे. पूर्वी मानव सुसंस्कृत आणि निसर्गाशी अनुकूल असे आचरण करणारा होता. त्याने तिला वसुंधरा म्हटले. तिच्यावर प्रेम केले आणि कृतज्ञतेच्या भावाने वास केला. आजचा आणि कालचा मानव कशा प्रकारे वसुंधरेशी कृतघ्नतेने वागला आणि तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करू लागला ?, हे माहितीपटात पाहून मी स्वतः आतापर्यंत या वसुंधरामातेला कशा प्रकारे त्रास दिला ?, हे आठवून माझ्या डोळ्यांत पाणी तरळले. मी दिलेल्या त्रासासाठी सर्वप्रथम वसुंधरामातेची क्षमायाचना करतो. यापुढील जीवनात तिला माझ्याकडून त्रास होणार नाही, असे वागायचा प्रयत्न करण्याचे वचन देतो. या माहितीपटात सांगितलेली काही महत्त्वाची सूत्रे पुढे दिली आहेत.

१. पाण्याचा भरमसाठ वापर होण्याची कारणे

water-supply-tap१ अ. खेड्यांऐवजी स्मार्ट सिटीकडे धाव घेणे : भविष्यकाळात जगाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. भारत हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणारा पहिला देश असेल. वर्ष २०२५ मध्ये पाणीटंचाई उग्र रूप धारण करील. भारतात गेल्या ५० वर्षांत २ कोटी १० लक्ष विहिरी आणि बोअरवेल खणण्यात आल्या. त्यातील २० टक्के विहिरी सध्या कोरड्या पडल्या आहेत. जगात पाण्याचा वापर पुष्कळ वेगाने वाढत आहे. शहरातील माणूस पाण्याचा राक्षसी वापर करत सुटला आहे. खेड्यातील माणूस दिवसाला प्रतिदिन माणशी १०० ते १५० लिटर पाणी वापरतो, तर लास वेगाससारख्या शहरात प्रतिदिन माणशी ८०० ते १ सहस्र लिटर पाणी लागते. यातूनच आपल्याला स्मार्ट सिटीज् हवीत कि आध्यात्मिक आणि निसर्गावर प्रेम करणारी खेडेगावे हवीत ?, ते ठरवावे लागेल.

 

Satvik_Asatvik_Aahar_banner

१ आ. आहाराच्या सवयी पालटणे : माणसाच्या आहाराचाही पाण्याशी संबंध आहे. ते पुढील उदाहरणातून लक्षात येते. एक किलो बटाट्याचे उत्पादन करण्यासाठी १०० लिटर पाणी लागते, तर १ किलो गायीचे मांस (बीफ) करण्यासाठी १३ सहस्र लिटर पाणी लागते. माणसाने तामसी आहार घेण्याची सवय लावून पृथ्वीला ओरबाडण्याचा प्रयत्न चालूच ठेवला आहे. प्राचीन काळात बहुतांश व्यक्तींचा आहार सात्त्विक होता.

 

२. दिखाऊपणाचा हव्यास आणि अती सुखवस्तू जीवनशैलीची
ओढ यांमुळे प्रदूषणकारी झाडे लावल्याने वने नष्ट होणे

वाढत्या आवश्यकता आणि अती सुखवस्तू जीवनशैलीची ओढ यांमुळे मानवाने निसर्गाचा महत्त्वाचा घटक असणारी वने मनमानी करून तोडणे चालू केले. त्याने पृथ्वीवरची २० टक्के वने अवघ्या ४० वर्षांत नष्ट करून टाकली. आता त्या घनदाट वनांची जागा ओसाड आणि भकास भूमीने घेतली आहे. प्रत्येक वर्षी १ कोटी ३० लक्ष हेक्टर क्षेत्रातील वनेे नष्ट होत आहेत. मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी काही प्रदूषणकारी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केली. यात सोयाबीन, निलगिरी (युकॅलिपटस्) आणि पाम या झाडांचा समावेश होतो. शहरीकरण आणि दिखाऊपणाचा हव्यास यांमुळे ५० वर्षांत कागदाचा वापर ५ पटींनी वाढला. कागद बनवण्यासाठी वापरले जाणारे युकॅलिपटस् हे झाड अल्प काळात वेगाने वाढते. हे झाड एखाद्या राक्षसाप्रमाणे भूमीतील पाणी शोषून घेते. त्यामुळे या झाडाला प्रदूषणकारी झाड असे संबोधले जाते. सोयाबीन हे बीफ आणि पोल्ट्री इंडस्ट्रीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते, तर पाम झाडाचा उपयोग सौंदर्यप्रसाधने (कॉस्मेटीक्स) आणि खाद्यतेल बनवण्यासाठी होतो. ही तीनही झाडे निसर्गाचा समतोल बिघडवतात, असे तज्ञांचे मत आहे.
कीटकनाशकांचा वाढता वापर आणि प्रदूषणाच्या अन्य कारणांमुळे एकूण शेतीयोग्य भूमीपैकी ४० टक्के भूमी शेती करण्यास अयोग्य (नापीक) झाली आहे.

 

३. प्रदूषणकारी वर्तनामुळे पृथ्वीचे
तापमान वेगाने वाढत असून निसर्गाचा समतोल बिघडणे

Global-Warming-21.png-small1मानवाच्या प्रदूषणकारी वर्तनामुळे पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत आहे. मागील १५ वर्षार्ंतील सरासरी तापमान पृथ्वीच्या आतापर्यंतच्या नोंद केलेल्या तापमानात सर्वोच्च आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम म्हणून पृथ्वीच्या उत्तर धृवावरील पृथ्वीला थंड ठेवणारी बर्फाची टोपी वितळू लागली आहे. आतापर्यंत ती ४० टक्के नष्ट झाली आहे. त्यातील ३० टक्के केवळ ३० वर्षांत नष्ट झाली आहे. हे वाचून मानवाला नतद्रष्ट हे विशेषणही थिटे पडेल, अशी स्थिती आहे. हा मानव केवळ मृत्यूदंड देण्याच्याच पात्रतेचा आहे, असे वाटले. बर्फाचे वितळणे याच वेगाने चालू राहिले, तर तज्ञांच्या म्हणण्यानुसार अवघ्या काही वर्षांत समुद्राची पातळी ७ मीटरने वाढेल. जगातील एकूण लोकसंख्येपैकी ७० टक्के लोकसंख्या समुद्रकिनारी रहाते. जगातील पुष्कळ मोठ्या शहरांपैकी ५० शहरे समुद्रकिनार्‍यालगत आहेत. वाढते तापमान आणि प्रदूषण यांमुळे निसर्गाला पूरक जैवजीवन सर्वसामान्य वेगापेक्षा १ सहस्रपट अधिक वेगाने नष्ट होत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी बर्फ-पाणी-बाष्प हे चक्र अबाधित राखणे आवश्यक आहे. मानवाने हे चक्रच मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याचा परिणाम दिसून येत आहे. समुद्राचा नैसर्गिक समतोल राखण्याचे काम त्यातील मासे आणि जैव करतात. मानवाने स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी एकूण मत्स्यजीवनापैकी तीन चतुर्थांश मत्स्यजीवन नष्ट केले. आता केवळ एक चतुर्थांश मासे समुद्रात शेष आहेत.

 

४. शहरीकरण नव्हे, तर अधोगतीकरण !

buildings

वाढते शहरीकरण आणि विकृत जीवनशैली यांमुळे (वातानुकूलित यंत्रे, झगमगाट, दिखाऊपणा, वापरा आणि फेकून द्या, याचे अवास्तव महत्त्व वाढलेली) एकूण नैसर्गिक साधनसंपत्तीपैकी ८० टक्के साधनसंपत्तीचा वापर केवळ २० टक्के लोक करत आहेत. थोडक्यात गर्भश्रीमंत, श्रीमंत, नवश्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय हे या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करत आहेत. शेतकरी आणि गरीब यांना, तसेच खेड्यात रहाणार्‍यांना त्याचे परिणाम मात्र भोगावे लागणार आहेत. या जगातील एकूण धनापैकी अधिकांश धन केवळ २ टक्के लोकांच्या हातात आहे. व्यापारी वृत्तीचे देश गरीब देशांचे कसे शोषण करतात, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आफ्रिका ! नैसर्गिक साधनसंपत्तीतील खनिजतेले आणि द्रव्ये यांनी विपुल असा हा देश आहे; पण जगातील सर्वाधिक दरिद्री तोच देश आहे.

 

५. नैतिक मूल्यांचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबवणे आवश्यक !

पृथ्वीवर एकीकडे ऐषारामी लोक गाड्या धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरत आहेत, तर दुसरीकडे दूषित पाणी प्यायल्यामुळे प्रतिदिन ५ सहस्र लोकांचा मृत्यू होत आहे. सध्या पृथ्वीवरील १० कोटी लोक दूषित पाणी पीत आहेत. मानवाच्या अशा अविवेकी वागण्यामुळे लवकरच पृथ्वीवरील १० कोटी लोक भुकेने टाहो फोडतील. जगभरातील प्रगत देश संरक्षणावर वारेमाप व्यय करत आहेत. नैतिक मानवी मूल्यांचा वेगाने र्‍हास होत आहे, हे सुशिक्षित लोक मान्यच करत नाहीत. त्यांना सुसंस्कारित होणे, म्हणजे बुरसटलेले होणे, असे वाटते. हेच विज्ञानयुगाचे फलित आहे. वर्ष २०५० मध्ये पृथ्वीवरील २० कोटी लोक भुकेलेले, असाध्य रोगाने ग्रासलेले, थोडक्यात निसर्ग निर्वासित असतील. आपल्या सुंदर अशा वसुंधरेची आपणच हानी अशी केली. तीसुद्धा सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित म्हणवणार्‍या मानवाने ! जे आपल्या पूर्वजांना कळले, ते आम्हा सुशिक्षित तरुणांना कळलेच नाही. स्वार्थामुळे आमची अवस्था मनमान्यासारखी झाली. आता केवळ फांदी तुटायचा अवकाश आहे. चेन्नईमध्ये पूर आल्यावर पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था यांनी आपापल्या परीने त्याचे वृत्तांकन अन् साहाय्य करण्याचा प्रयत्न केला. पुढे काय ?, याचा विचार कुणीच केला नाही. या अविवेकाचा कहर होऊन मानव हिंसक बनत आहे. अणुबाँबचा वापर कधी कोण करेल ?, या शक्यतेचा विचारच केलेला नाही.

 

६. विवेकाचा वापर करून उपाययोजना करणारे काही देश

यातील आशेचा किरण काही ठिकाणी जाणवत आहे. कोरिया या देशाने देशातील ७० टक्के कागद पुनर्वापरात आणण्यात यश मिळवले आहे. जर्मनी, नेदरलँड, भारत असे काही देश सौर आणि पवन ऊजार्र् वापरात वेगाने वाढ करत आहेत.

 

७. मानव वसुंधरेचा कर्दनकाळ ठरण्याचे
एकमेव कारण म्हणजे त्याची रज-तमप्रधानता आणि
त्यावर एकमेव उपाय म्हणजे साधनेने सात्त्विकता वाढवणे !

1403513115_Kuladevatecha_namjap

मानवाच्या रज-तमात्मक वागण्याने सत्त्व-रज-तम यांचा समतोल मानवाने कसा नष्ट केला ?, याचे निरीक्षण करण्याची व्यवस्थाच पाश्‍चात्त्यांकडे नाही. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता केवळ संतांकडे असते. तेच पृथ्वीच्या सूक्ष्मातील समतोलाची विदारक स्थिती सांगू शकतात. दुर्दैवाने आजच्या विज्ञानयुगात संतांच्या वाट्याला उपेक्षाच आली आहे. सूक्ष्म स्पंदनांच्या अस्तित्वाला मान्यता देण्यावरूनच शंका-कुशंकांचे वादळ उठत आहे. या पार्श्‍वभूमीवर संतांचे मागदर्शन घेणे तर दूरच राहिले.

या दुर्व्यवहारी मानवाला वसुंधरामाता देहदंड दिल्याविना रहाणार नाही, असे निश्‍चितपणे वाटते. तिला प्रसन्न करायचे असल्यास स्वतःत साधक वृत्ती निर्माण करून तिच्या चरणी कृतज्ञतेने रहावे, तरच मानवाला टिकून रहाणे शक्य होईल.

– श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था (२६.१२.२०१५)

 

मानवाने पुढील उपाययोजनांचा अंगीकार करणे आवश्यक !

हे सगळे वाचून मी काय करू शकतो ?, याचा प्रत्येक मानवाने, विशेषतः साधक वृत्तीच्या व्यक्तीने विचार करणे आवश्यक आहे. काही प्रचलित उपाययोजना पुढे देत आहे. केवळ त्याचा अंगीकार करणे आवश्यक आहे.

  • पाण्याचा काटकसरीने वापर करणे
  • कागदाचा काटकसरीने वापर करणे. घरात २ – ३ वर्तमानपत्रे येत असतील, तर एकच घेणे. शक्य असणार्‍यांनी भ्रमणभाष, वीजदेयक संगणकाद्वारे भरण्याचा पर्याय निवडणे आणि कागदी देयकाची आवश्यकता नसल्याचे आस्थापनाला कळवणे
  • वातानुकूलित यंत्राचा वापर टाळणे
  • वाहनाचा अनावश्यक वापर टाळणे, शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करणे
  • दिवे, पंखा, अन्य उपकरणे अनावश्यक चालू नाहीत ना ?, याकडे कटाक्षाने लक्ष देणे
  • घरात सौरऊर्जेचा वापर करणारी उपकरणे बसवणे
  • परिसरात आयुर्वेदिक झाडे लावणे
  • दिखाऊपणाची जीवनशैली सोडून साधेपणाने वागण्याची जीवनशैली अंगीकारणे
    यात अनावश्यक कपडे, वस्तू, वाहने याविषयी स्वतःच अंतर्मुख होऊन विचार करणे आणि देवाला काय आवडेल ?, अशी सतत मनाची विचारप्रक्रिया कशी होईल ?, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
संदर्भ : www.goodplanet.org