‘वर्षश्राद्ध’ आणि ‘पितृपक्षातील श्राद्ध’ असे वर्षातून दोनदा श्राद्ध का करावे ?

या लेखात पुढील सूत्रांविषयी अध्यात्मशास्र जाणून घेऊ.

 

१. श्राद्ध तिथीनुसार का करावे ?
२. पितरांचे ‘वर्षश्राद्ध’ आणि ‘पितृपक्षातील श्राद्ध’ असे वर्षातून दोनदा श्राद्ध का करावे ? तसेच या दोन्ही श्राद्धांतील नेमका भेद काय ?
३. श्राद्धाचा मास (महिना) ज्ञात असून तिथी ज्ञात नसल्यास त्या मासाच्या शुक्ल वा कृष्ण एकादशीस किंवा अमावास्येला श्राद्ध का करावे ?
४. सर्वसाधारणतः संध्याकाळ, रात्र आणि संधीकाल यांच्या जवळच्या वेळा श्राद्धाला वर्ज्य का असतात ?

 

१. श्राद्ध तिथीनुसार का करावे ?

प्रत्येक गोष्ट त्या त्या तिथीला आणि त्या त्या मुहूर्ताला करणे महत्त्वाचे आहे; कारण या दिवशी त्या त्या घटनात्मक कर्मांचे कालचक्र आणि त्यांचा प्रत्यक्ष घटनाक्रम, त्यातून उत्पन्न होणारा परिणाम या सर्वांची स्पंदने एकसारखी म्हणजेच एकमेकांना पूरक असणे

‘प्रत्येक गोष्ट ही त्याच्या कार्यकारण-भावासहित जन्माला येते. प्रत्येक गोष्टीची परिणामकारकता ही त्याचा कार्यमान कर्ता, कार्यातील योग्य घटिका आणि कार्यस्थळ यांवर अवलंबून असते. या सर्वांच्या पूरकतेवर कार्याची फलनिष्पत्ती, म्हणजेच परिपूर्णता ठरून कर्त्याला विशिष्ट फलप्राप्ती होते. ही गोष्ट ज्या वेळी ईश्वरी नियोजनाच्या म्हणजेच प्रवृत्ती आणि प्रकृती यांच्या संगमाने घडते, त्या वेळी ती प्रत्यक्ष इच्छा, क्रिया आणि ज्ञान या तीन स्तरांवरील शक्तीच्या साहाय्याने सगुण रूप धारण करून साकार होते. तिथी ही प्रकृतीला आवश्यक, म्हणजेच बळ देणारी म्हणजेच मूळ ऊर्जास्वरूप आहे, तर त्या तिथीला त्या त्या जिवाच्या नावाने घडणारे कर्म हे त्यातून उत्पन्न होणार्‍या प्रवृत्तीला, म्हणजेच फलनिष्पत्तीस पोषक आहे. प्रत्येक गोष्ट त्या त्या तिथीला आणि त्या त्या मुहूर्ताला करणे महत्त्वाचे आहे; कारण या दिवशी त्या त्या घटनात्मक कर्मांचे कालचक्र आणि त्यांचा प्रत्यक्ष घटनाक्रम, त्यातून उत्पन्न होणारा परिणाम या सर्वांची स्पंदने एकसारखी म्हणजेच एकमेकांना पूरक असतात. ‘तिथी’ ही तो तो घटनाक्रम पूर्णत्वास नेण्यास आवश्यक असणार्‍या लहरी कार्यरत करणारी असते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, सायं. ६.०२)

 

२. पितृपक्षात श्राद्ध का करावे ?

`पितृपंधरवड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरींचे (रज-तमात्मक लहरींचे) आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रज-तमात्मक कोषांशी निगडित असणार्‍या पितरांना पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणे सोपे जाते. म्हणून हिंदु धर्मात सांगितलेले विधीकर्म हे त्या त्या काळी करणे जास्त श्रेयस्कर असते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, सायं. ६.०२)

२ अ. वर्षश्राद्ध केल्यानंतर पितृपंधरवड्यातही श्राद्ध का करावे ?
(वर्षश्राद्धामुळे व्यष्टी स्तरावर, तर पितृपंधरवड्यातील
श्राद्धामुळे समष्टी स्तरावर पितरांचे ऋण फिटण्यास साहाय्य होणे)

‘वर्षश्राद्धामुळे त्या त्या विशिष्ट लिंगदेहाला गती मिळण्यास साहाय्य होते. असे झाल्याने त्या त्या व्यक्तीचे प्रत्यक्ष व्यष्टी स्तरावरील ऋण फिटण्यास साहाय्य होते. वर्षश्राद्ध करणे, ही एक हिंदु धर्माने वैयक्तिक स्तरावर नेमून दिलेली ऋण फेडण्याची व्यष्टी उपासनाच आहे, तर पितृपंधरवड्याच्या निमित्ताने समष्टी स्तरावर पितरांचे ऋण फेडणे, हा समष्टी उपासनेचा भाग आहे. व्यष्टी ऋण हे त्या त्या लिंगदेहाप्रती प्रत्यक्ष कर्तव्यपालन शिकवते, तर समष्टी ऋण हे एकाच वेळी व्यापक स्तरावर देवाणघेवाण फेडते.

आपल्याशी घनिष्ट संबंध असणार्‍या आधीच्या १-२ पिढ्यांतील पितरांचे आपण श्राद्ध करतो; कारण या पिढ्यांसमवेत आपले प्रत्यक्ष कर्तव्यस्वरूप देवाण-घेवाण संबंध असतात. इतर पिढ्यांपेक्षा या पितरांमध्ये कुटुंबात अडकलेल्या आसक्तीविषयक विचारांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचे हे प्रत्यक्ष बंधन जास्त तीव्रतेचे असल्याने ते तोडण्यासाठी वैयक्तिक स्वरूपात वर्षश्राद्धविषयक विधी करणे आवश्यक असते. त्यामानाने त्या आधीच्या इतर पितरांचे आपल्याशी असणारे बंध अल्प तीव्रतेचे असल्याने त्यांच्यासाठी पितृपक्ष विधी सामायिक स्वरूपात करणे इष्ट ठरते; म्हणून वर्षश्राद्ध, तसेच पितृपक्ष हे दोन्हीही विधी करणे आवश्यक आहे.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १२.११.२००५, दुपारी ४.०९)

 

२ आ. पतीच्या निधनापूर्वी मृत पावणार्‍या स्त्रियांचे
श्राद्ध पितृपक्षामध्ये नवमीलाच (अविधवा नवमीलाच) का करावे ?

‘नवमीच्या दिवशी ब्रह्मांडात रजोगुणी पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित शिवलहरींचे आधिक्य असल्याने या लहरींच्या साहाय्याने श्राद्धातून प्रक्षेपित होणार्‍या मंत्रोच्चारयुक्त लहरी शिवरूपाने ग्रहण करण्याचे सूक्ष्म बळ त्या त्या सुवासिनीच्या लिंगदेहाला प्राप्त होते. या दिवशी कार्यरत असणारा शिवलहरींचा पृथ्वी आणि आप तत्त्वात्मक प्रवाह त्या त्या लिंगदेहात आवश्यक त्या लहरी झिरपवण्यास पोषक अन् पूरक ठरतो. या दिवशी सुवासिनीतील शक्तीतत्त्वाशी सूक्ष्म शिवशक्तीचा संयोग होण्यास साहाय्य झाल्याने सुवासिनीचा लिंगदेह लगेच पुढील गती धारण करतो.

या दिवशी असणार्‍या शिवलहरींच्या आधिक्यामुळे सुवासिनीला सूक्ष्मरूपी शिवतत्त्वाचे बळ प्राप्त होऊन तिचे स्थूल शिवरूपी पुरुषप्रकृतीशी जोडलेले पृथ्वीवरील संस्कारांशी निगडित घनिष्ट आसक्तीयुक्त धागे विघटित होण्यास साहाय्य झाल्याने ती पतीबंधनातून मुक्त होण्यास साहाय्य होते. म्हणून रजोगुणी शक्तीरूपाचे प्रतीक असलेल्या सुवासिनींचे श्राद्ध महालयातील शिवलहरींचे आधिक्य दर्शवणार्‍या नवमीलाच करतात.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.८.२००६, दुपारी १२.५०)

 

३. श्राद्धाचा मास (महिना) ज्ञात असून तिथी ज्ञात नसल्यास
त्या मासाच्या शुक्ल वा कृष्ण एकादशीस किंवा अमावास्येला श्राद्ध का करावे ?

‘या दिवशी वायूमंडलात यमलहरींचे आधिक्य असल्याने त्या लहरींच्या प्रवाहातून पितरांना आवाहन करून त्यांना मंत्रोच्चाराचे बळ पुरवून वायूमंडलात अल्प कालावधीत आकृष्ट करणे सोपे असते. यमलहरींच्या आधिक्यदर्शक प्रवाहातून पितर पृथ्वीमंडलात सहज प्रवेश करू शकतात.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ६.८.२००६, रात्री ८.३७)

(इतके मार्ग असूनही हिंदू श्राद्ध इत्यादी करत नाहीत. मग अशा हिंदूंना कोण साहाय्य करू शकणार ? – संकलक)

 

४. सर्वसाधारणतः संध्याकाळ, रात्र आणि
संधीकाल यांच्या जवळच्या वेळा श्राद्धाला वर्ज्य का असतात ?

४ अ. संध्याकाळ, रात्र आणि संधीकाल यांच्या जवळच्या वेळी
वायूमंडल दूषित असल्याने श्राद्धासाठी आलेला लिंगदेहाला नरकयातना भोगाव्या लागणे शक्य असल्यामुळे त्या वेळा श्राद्धाला वर्ज्य असणे

‘संध्याकाळ, रात्र आणि संधीकाल यांच्या जवळच्या वेळेत त्या त्या लहरींच्या ऊर्जाप्रवाहाचा जोर अधिक असतो. याचा लाभ घेऊन अनेक वाईट शक्ती या गतिमान ऊर्जास्रोतासह पृथ्वीच्या कक्षेत आगमन करत असतात; म्हणून या कालाला ‘रज-तमयुक्त आगमनकाल’, असेही म्हणतात.

संध्याकाळच्या वेळी वातावरणात तिर्यक लहरींचे प्राबल्य असते, संधीकालात विस्फुटित लहरी कार्यमान अवस्थेत असतात, तर रात्रीच्या वेळेत विस्फुटित, तिर्यक, तसेच यम या तिन्ही लहरींचे आधिक्य असल्याने या वेळी वातावरण अतिशय तप्त अशा ऊर्जेने भारित असते.

श्राद्धाच्या वेळी त्या त्या पिंडासाठी संकल्प सोडला जातो. त्या वेळी आवाहनात्मक प्रक्रिया म्हणून त्या त्या संबंधित लिंगदेहांचे वातावरणात आगमन होते. वायूमंडल रज-तम कणांनी भारित असेल, तर वायूमंडलात संचार करणार्‍या अनेक वाईट शक्तींमुळे पृथ्वीच्या वातावरणकक्षेत प्रवेश करणार्‍या लिंगदेहाला अडथळा प्राप्त होऊ शकतो. म्हणून शक्यतो वायूमंडल दूषित असतांना लिंगदेहाला अडथळा बनणार्‍या लहरींच्या प्राबल्याखाली श्राद्धादी विधी करू नयेत. नाहीतर लिंगदेहाला नेहमीसाठी नरकयातना भोगाव्या लागतात. यासाठी हिंदु धर्माने घालून दिलेल्या कृतींचे आचारासहित पालन करणे फार महत्त्वाचे असते, तरच इष्ट फलप्राप्ती होते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.१२.२००५, सकाळी ११.३८)

 

४ आ. श्राद्धातील मंत्रोच्चारात्मक आवाहनात्मक शक्तीमुळे पितरांनी वातावरणकक्षेत प्रवेश केल्याने सायंकाळच्या वेळेस आधीच दूषित असलेले वायूमंडल जास्त दूषित बनणे आणि त्यामुळे श्राद्धविधी करणार्‍याला, तसेच विधीचा संकल्प सोडणार्‍या जिवाला महापातक लागणे

‘सायंकाळची वेळ रज-तमात्मक असते. या वेळी ब्रह्मांडात पृथ्वी आणि आप यांच्या साहाय्याने कार्यरत असणार्‍या रज-तमात्मक लहरींचे आधिक्य असते. या लहरींची ओढ अधोगामी, म्हणजेच पाताळाच्या दिशेने असते. या लहरींच्या वातावरणात बनलेल्या कनिष्ठ स्तरावरील अतीदाबाच्या पट्ट्यामुळे भूमीशी संलग्न अशा तिर्यक आणि विस्फुटित लहरी कार्यमान अवस्थेत येतात.

या लहरींच्या प्रादुर्भावामुळे पृथ्वीवर वावरणारे जीव हे रज-तमात्मक बनतात. अशा वेळी जिवाने पितरांसाठी श्राद्धादी अशुभ कर्म केले, तर रज-तमात्मक वातावरणात श्राद्धातून उत्पन्न होणार्‍या मंत्रोच्चारात्मक आवाहनात्मक शक्तीमुळे त्या त्या स्तरांवरील पितर वातावरणकक्षेत आपल्या रजतमाच्या वासनामय कोषासह प्रवेश करून आधीच सायंकाळच्या वेळेस दूषित झालेले वायूमंडल अधिक दूषित बनवतात.

यामुळे विधी करणार्‍याला, तसेच त्या विधीचा संकल्प सोडणार्‍या जिवालाही महापातक लागून नरकवास भोगावा लागतो; म्हणून शक्यतो सायंकाळच्या वेळेत रज-तमात्मक विधी करू नयेत.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.८.२००५, रात्री ८.२०)

 

५. विशिष्ट श्राद्ध विशिष्ट काळी करण्यामागील शास्त्र

श्राद्धाचे प्रकार श्राद्धकाल शास्त्र
१. सर्वसाधारण
श्राद्ध
अमावास्या, वर्षातील बारा संक्रांती,
चंद्र-सूर्य ग्रहणे, युगादी आणि
मन्वादी तिथी, अर्धोदयादी पर्वे,
मृत्यूदिन, श्रोत्रिय ब्राह्मणांचे
आगमन, अपराण्हकाल (दिवसाच्या
पाच भागांतील चौथा भाग)
हा काल सर्वसाधारण जिवांना श्राद्धातील मंत्रांतून उत्पन्न होणार्‍या लहरी ग्रहण करण्यास पोषक असतो. या कालामध्ये रज-तम कणांचा संचार किंवा प्रवाह हा गतिमान अवस्थेत असल्याने या काळात लिंगदेहांना दिलेले अन्नादी घटक सूक्ष्म
वायूच्या रूपात अल्प कालावधीत वाहून नेले जाऊन त्यांची संतुष्टता करतात. हा काल पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित लहरींच्या स्तरावर कार्यमान असल्याने या
रज-तम कणांच्या प्रवाहातून आपल्या वासना संतुष्ट करून घेणे मृतात्म्यांना सोपे जाते.
२. वृद्धीश्राद्ध प्रातःकाल किंवा संगवकाल
(दिवसाच्या पाच भागांपैकी
दुसरा भाग)
धन, धान्य, तसेच पौत्रादी सुखात येणारे मृतात्म्यांचे अडथळे दूर करून संपत्तीकालात वृद्धी करण्यासाठी हे श्राद्ध प्रातःकालात किंवा संगवकालात, म्हणजेच आपतत्त्वाचे प्रमाण अधिक असणार्‍या कालात केले जाते. त्या त्या संबंधित वासनांत अडकलेल्या, म्हणजेच स्वतःभोवती असलेल्या कोषांनी त्या त्या वस्तूंशी बांधल्या गेलेल्या मृतात्म्यांच्या कोषात आपतत्त्वाचे प्रमाण अधिक असल्याने त्या त्या संबंधित तत्त्वाच्या कार्याला पूरक असणारा हा काल श्राद्धाला पोषक असतो.
३. हिरण्यश्राद्ध
आणि
आमश्राद्ध
दिवसाचा पूर्व भाग (सूर्योदयापासून
माध्यान्हपर्यंतचा काळ)
या कालात पृथ्वीतत्त्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असल्याने अन्नाची वासना पुष्कळ असलेल्या शूद्र जिवांना न शिजवलेले अन्न अर्पण करून आमश्राद्ध, तसेच भूमीत वासना अडकलेल्या जिवांना गती मिळावी यासाठी भोजनापेक्षा भूमीच्या रूपात
दक्षिणेवर संकल्प सोडून हिरण्यश्राद्ध केले जाते.
४. एकोदि्दष्ट
श्राद्ध
मध्यान्ही मध्यान्ह काल हा दुपारी १२ नंतर चालू होतो. हे श्राद्ध केवळ एकाला उद्दीष्ट ठेवूनच केले जाते. मध्यान्ह कालात रज-तम कणांची गती मध्यम असते. या कालातील सर्व विधी हे संयमित मानले जातात; कारण या विधीतील मंत्रोच्चारांवर पूर्ण एकाग्र होऊन तो तो संकल्प पिंडावर सोडला जातो. या कालात तो मृतात्मा एकटाच त्या त्या
स्तरावरील कक्षेतून श्राद्धस्थळी येणार असल्याने त्याला मंत्रांच्या साहाय्याने पूर्णतः संरक्षण देऊन त्या त्या कक्षेत आकृष्ट करावे लागते; म्हणून गतिमान कालापेक्षा मध्यान्ह काल योजून हे श्राद्ध एकट्या मृतात्म्यास येण्यास पूरक ठरावे यासाठी या संयमित कालात केले जाते.
५. ग्रहणकालीन
श्राद्ध आणि
पुत्रजन्माच्या
वेळचे
वृद्धीश्राद्ध
रात्र एखाद्या कुटुंबातील मुले जन्मतःच मृत होत असतील, तर त्यांच्या आयुष्यरक्षणासाठी, म्हणजेच त्यांना त्या त्या मृतात्म्यांच्या त्रासांपासून मुक्तता मिळून त्यांचे संरक्षण होऊन त्यांना जीवदान मिळण्यासाठी, म्हणजेच आयुर्मान वृद्धीसाठी हे वृद्धीश्राद्ध केले जाते.
ग्रहणकाल हा रज-तमात्मक लहरींच्या गतीला पोषक असल्याने ते ते क्रूर जडत्वधारी वासनात्मक लिंगदेह या लहरींच्या प्रवाहाच्या बळावर श्राद्धस्थळी येऊन आपली वासनापूर्ती करून घेतात; म्हणून या कालात वृद्धीश्राद्ध केले जाते.

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’

16 thoughts on “‘वर्षश्राद्ध’ आणि ‘पितृपक्षातील श्राद्ध’ असे वर्षातून दोनदा श्राद्ध का करावे ?”

 1. पत्नी अहेव गेली नंतर वडील भाऊ गेला. पत्नीचे वर्षश्राद्ध वेळेवर करता येईल का?

  Reply
  • नमस्कार,

   तुम्हाला तुमच्या पत्नीचे वर्षश्राद्ध करता येईल. महालय श्राद्ध वर्ष श्राद्धाच्या आधी येत असल्यास, तुम्हाला पत्नीचा उल्लेख महालय श्राद्धात करता येणार नाही; मात्र त्या सौभाग्यवती गेल्या असल्याने पितृपक्षात अविधवा नवमीला त्यांच्यासाठी श्राद्ध करावे.

   Reply
 2. माझा लहान भाऊ श्री. अमोल वसंतराव हेडाऊ ,राहणार अचलपूर सिटी ज़िल्हा अमरावती .त्याचा मृत्यू दिनांक २८ ऑक्टोबर २०२० ह्या दिवशी संध्याकाळी ६ ते ६.३० च्या दरम्यान झाला .त्याचा मला वर्ष श्राद्ध करायचे आहे ते कधी आणि कुठल्या दिवशी करावे हे सांगण्यात माझी मदत करावी ,

  संदीप वसंतराव हेडाऊ
  पुणे महाराष्ट्र

  Reply
  • नमस्कार,

   २८ ऑक्टोबर २०२० या दिवशीची तिथी काय होती ते शोधून, २०२१ या वर्षी त्याच तिथीला भावाचे वर्षश्राद्ध करावे. एखाद्या दिवसाची तिथी माहिती करून घेण्यासाठी mypanchang.com या संकेतस्थळाच्या आधारे शोधू शकता.

   Reply
  • नमस्कार,

   ज्या दिवशी भरणी नक्षत्र असेल त्या दिवशी, द्वादशी, अष्टमी किंवा अमावास्या या तिथींना पितृपक्षात पौर्णिमा श्राद्ध करू शकता.

   Reply
 3. आई 16एप्रिल2021रोजी मयत झाली हे.वडील 27एप्रिल2000 रोजी मयत झालेत.आईचे भरणी श्राद्ध व वडीलांचा महालयश्राद्ध करता येईल का?दोघांची तिथी एकच आहे.मला मर्गदर्शन करावे.

  Reply
  • नमस्कार,

   वर्षश्राद्ध झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही, त्यामुळे आईचे श्राद्ध यावेळी पितृपक्षात करता येणार नाही. तिचा उल्लेख महालय श्राद्धात करता येणार नाही.

   आई आणि बाबांचे निधन झाल्याच्या वेळांनुसार त्यांची तिथी एकच असल्याचे पुरोहितांना विचारून घेतले आहे का ?

   Reply
 4. पित्र कधी करावे वर्ष श्राद्धाच्या आधी का नंतर

  Reply
  • नमस्कार,

   पितृपक्षात जे करतात ते पितृपक्षातील श्राद्ध किंवा महालय श्राद्ध. व्यक्तीचे निधन झाल्यावर १ वर्ष पूर्ण झाल्यावरच तिच्यासाठी महालय श्राद्ध करता येते. ज्या तिथीला व्यक्ती गेली असेल, त्या तिथीला पितृपक्षात तिचे महालय श्राद्ध करावे.

   Reply
 5. आमच्या आजी सवाष्ण् गेल्यात . आम्ही महालयात नवमी तिथीला आजीचे श्राद्ध करतो . आणि आजोबा नंतर गेले त्यांची दशमी तिथी आहे . तर आम्ही नवमी आणि दशमी दोन्ही दिवशी श्राध्द करतो आणि दोन्ही दिवशी सवाष्ण् व पितर जेवू घालतो. असे करणे बरोबर आहे का ?

  Reply
  • नमस्कार,

   जी व्यक्ती ज्या तिथीला गेली, त्या तिथीला तिचे वार्षिक श्राद्ध करावे.

   Reply
 6. तसेच काही लोक सांगतात की, आहेव स्त्री मेली तर अविधवा नवमी करावी. नंतर पती मेला की नवमी बंद करावी ? मग मेलेली आहेव स्त्री विधवा होते का ?
  तिचा सौभाग्यवती चा मान तिला देवानेच दिला तो आपणसुद्धा जपायला नको का? ती लाच अखंड सौभाग्यवती म्हणतात.

  Reply
  • नमस्कार,

   पती असे पर्यंत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रीचे श्राद्ध अविधवा नवमीला करावे. पती गेल्यानंतर तिचे श्राद्ध ती गेल्याच्या तिथीला करावे.

   Reply
 7. नमस्कार
  माझे वडील 6 वर्षांपूर्वी एकादशी तिथीला वारले आहेत।त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीला करावे…आमच्याकडे काही लोक एकादशीला श्राद्ध वर्ज्य आहे असे सांगतात….
  खूप संभ्रम आहे कृपया योग्य मार्गदर्शन करावे

  Reply
  • नमस्कार,

   जी व्यक्ती ज्या तिथीला गेली, त्या तिथीला तिचे श्राद्ध करावे, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.

   Reply

Leave a Comment