अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या समाधीची छायाचित्रे

Akkalkot-swami
श्री स्वामी समर्थ

भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे असे सार्थ आशीर्वचन देणारे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणजे प्रभु दत्तात्रेयांचे चौथे अवतार होय. त्यांनी अक्कलकोट, सोलापूर येथे बावीस वर्षे वास्तव्य केले. त्यांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या अक्कलकोट येथील त्यांची समाधी आणि पादुका यांचे आज भावपूर्ण दर्शन घेऊया.

 

भक्तांना भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे,
असे अभयदान 
देणारे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ !

माघ कृष्ण पक्ष १, शके १३८०, इ.स. १४५८ मध्ये नृसिंह सरस्वती श्री शैल्य यात्रेच्या निमित्ताने कर्दली वनात गुप्त झाले. याच वनात ३०० वर्षे ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते. या काळात त्यांच्या दिव्य शरीरा भोवती मुंग्यांनी प्रचंड वारूळ निर्माण केले. या जंगलात एका लाकूडतोड्याच्या कुर्‍हाडीचा घाव त्या वारूळावर चुकून बसला आणि श्री स्वामी वारुळातून बाहेर आले. तेथून ते प्रथम काशीस प्रगट झाले. पुढे कोलकाता येथे जाऊन त्यांनी कालीमातेचे दर्शन घेतले. नंतर गंगा तटाकाने अनेक ठिकाणी भ्रमंती करून गोदावरी तटाकी आले. तेथून हैद्राबादवरून मंगळवेढ्यास १२ वर्षे राहिले. मग पंढरपूर, मोहोळ, सोलापूरमार्गे अक्कलकोट येथे आले. त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य अखेरपर्यंत म्हणजे शके १८०० पर्यंत होते. दत्त संप्रदायात श्रीपाद श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले आणि दुसरे अवतार म्हणून समजले जात. श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होत; म्हणजे दत्तावतार होय.
akkalkot_1
अक्कलकोट, सोलापूर येथील श्री स्वामी समर्थ यांची समाधी
akkalkot_2
अक्कलकोट, सोलापूर येथील श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका
akkalkot_3
अक्कलकोट, सोलापूर येथील भक्त
निवासातील प्रदर्शनातील श्री स्वामी समर्थ यांनी वापरलेला झोपाळा
akkalkot_4
अक्कलकोट येथील वटवृक्षाच्या
मुळाशी असलेले स्वामींचे पादुका मंदिर
अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अभयदान देतांना म्हणत, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही त्याची प्रचीती भक्तांना येत असते. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रथम खंडोबाच्या मंदिरात इ.स. १८५६ मध्ये प्रकट झाले. त्यांनी अनेक चमत्कार केले. जनजागृतीचे कार्य केले. जे माझे अनन्य भावाने मनन, चिंतन करतील आणि उपासना, सेवा मला सर्वस्व समजून अर्पण करतील, त्या नित्य उपासना करणार्‍या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन, असे त्यांनी वचन भक्तांना दिले आहे. स्वामींच्या या वचनाची आज कोट्यवधी भाविक अनुभूती घेत आहेत