एखाद्या गोष्टीचे रूप जाणण्यासाठी स्थूलरूप जाणणे जितके आवश्यक, तितकेच सूक्ष्म-पैलू जाणणे महत्त्वाचे !

Janhavi_Shinde_2011_clr
सौ. जान्हवी शिंदे

एखाद्या विषयाला जाणण्यासाठी निवळ त्याच्या स्थूलरूपाची ओळख करून घेतली, तर ती अपूर्ण रहाते. विषयाचे पूर्ण आकलन होण्यासाठी त्याच्यातील सूक्ष्म-पैलूंचे ज्ञान हवे. मनुष्याचे डोळे, मन आणि बुद्धी यांनी एखाद्या विषयातील स्थुलातील भाग कळतो, तर साधनेने सक्षम झालेले सूक्ष्म मन आणि सूक्ष्म बुद्धी यांना त्यातील सूक्ष्मातील भाग कळू शकतो. विषय आकलन करण्याच्या या पद्धती जाणून घेतांना एका अ नावाच्या व्यक्तीचे उदाहरण पाहू.

 

१. डोळे

पंचज्ञानेंद्रियांमधील एक म्हणजे आपले डोळे. डोळ्यांनी विषयाच्या स्थूलरूपाची ओळख होते. विषयाचे स्थुलातील घटक म्हणजे त्याचे रूप, आकार, रंग इत्यादी माध्यमांतून कळतात. मन आणि बुद्धी यांना विषयाची प्राथमिक ओळख करून देण्याचे हे माध्यम आहे. एखाद्या व्यक्तीचे रूप, रंग, वागणे-बोलणे, राहणीमान यांवरून आपल्याला त्याची प्राथमिक माहिती मिळते, उदा. अ नावाची व्यक्ती ही सावळ्या वर्णाची, मध्यम बांध्याची, तसेच नीटनेटकी आहे.

 

२. मन

माणसाची प्रकृती आणि गुण-दोष यांनुसार मन विषयाचे आकलन करते. बरेचदा त्या विषयासंदर्भात डोळ्यांना जे दिसते आणि बुद्धीला जे कळते, त्यावर मनाचे कळणे अवलंबून असते, उदा. अ ही व्यक्ती सदाचरणी असल्याने तिला पाहून चांगले वाटते आणि तिचा सहवास हवाहवासा वाटतो.
बुद्धी किंवा डोळे यांनी विषयाची केवळ स्थुलातीलच माहिती मिळत असल्याने मनाला त्यांच्या आधारे जे कळते, ते नेहमीच अपुरे असते किंवा ते सत्य असतेच, असे नाही.

 

३. बुद्धी

बुद्धी मनुष्याच्या शरिराशी संबंधित आहे. प्रत्येकाची बुद्धीची क्षमता निरनिराळी असून तो त्यानुसार आणि त्याप्रमाणात विषयाचे आकलन करतो, उदा. अ ही व्यक्ती काय व्यवसाय करते ? तिचे जन्मस्थान कोणते ? तिच्या आवडी-निवडी काय आहेत ? इत्यादी जाणून घेणे शक्य होते.

 

४. सूक्ष्ममन

विषयाच्या चांगल्या-वाईट सूक्ष्म स्पंदनांचे आकलन सूक्ष्ममन करते. जसजशी आध्यात्मिक प्रगती होते; परंतु तसे मन विश्‍वमनाशी एकरूप होऊन सूक्ष्म ते सूक्ष्मतम स्पंदने टप्प्याटप्प्याने ग्रहण करते, उदा. अ या व्यक्तीत भावाची स्पंदने जाणवतात. तिच्याशी बोलतांना आनंद जाणवतो. जर अ ला वाईट शक्तींचा त्रास असल्यास तिच्याकडे पाहून त्रासदायक वाटते इत्यादी. याचे दुसरे उदाहरण म्हणजे सनातन संस्था निर्मित देवतांची चित्रे ही याच प्रक्रियेने, म्हणजेच सूक्ष्म स्पंदनांचा अभ्यास करून काढलेली आहेत. ही प्रक्रिया आध्यात्मिक कलेचा पाया आहे.

 

५. सूक्ष्मबुद्धी

सूक्ष्मबुद्धीच्या आधारे कळणे म्हणजे विश्‍वबुद्धीतून विषयासंदर्भात मिळालेले बुद्धीअगम्य ज्ञान मिळवणे, उदा. अ या व्यक्तीची गतजन्मीची माहिती मिळणे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे सनातन संस्थेच्या साधकांना २००३ पासून अखिल मानवजातीला उपयुक्त असे विविध विषयांवरचे ज्ञान मिळत आहे आणि त्या आधारे संस्थेने शेकडो ग्रंथांची निर्मिती केली आहे.
– सौ. जान्हवी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.८.२०१४)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात