कोकणची काशी : श्री देव कुणकेश्‍वर

Article also available in :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्‍वराला कोकणची काशी असे संबोधतात. काशी येथे १०८ शिवलिंगे, तर कुणकेश्‍वर येथे १०७ शिवलिंगे आहेत. अशा या पवित्र स्थानाची संक्षिप्त माहिती प्रस्तुत लेखात देत आहोत.

संकलक : श्री. विजय पवार, देवगड, जि. सिंधुदुर्ग

श्रीक्षेत्र कुणकेश्‍वर देवाचे मंदिर कुणकेश्‍वर गावात समुद्रकाठी डोंगराच्या पायथ्याशी उंचवट्यावर आहे. मंदिराची उंची ७० फूट आहे. कोकणातील इतर प्रसिद्ध अशा भगवान शंकरांच्या स्थानांत याची गणना होते. कुणक म्हणजे कणक नावाच्या वृक्षाची राई तेथे होती. त्यावरून कुणकेश्‍वर असे नाव प्रचलित झाले आहे.

 

आख्यायिका

एका ब्राह्मणाची एक गाय चरत प्रतिदिन सध्या असलेल्या श्री कुणकेश्‍वर मंदिराच्या परिसरात येत असे. ती घरी काही दूध देत नसे. या प्रकाराचा उलगडा करण्यासाठी ब्राह्मण गायीच्या मागून निघाला. सदर ठिकाणी येताच गायीने एका स्वयंभू पाषाणावर पान्हा सोडल्याचे त्याने पाहिले. त्याने हातातील काठीने या पाषाणावर प्रहार केला. त्याक्षणी त्या पाषाणाचा एक तुकडा उडून त्यातून रक्त वाहू लागले. हे पाहून तो ब्राह्मण आश्‍चर्यचकीत झाला आणि त्या पाषाणास शरण गेला. त्यानंतर तो तेथे प्रतिदिन दिवाबत्ती लावून पूजा करू लागला. त्यानंतर त्या ठिकाणाची महती वाढत गेली. सध्या हे ठिकाण श्री क्षेत्र कुणकेश्‍वर म्हणून ओळखले जाते.

 

श्री देव कुणकेश्‍वराचा इतिहास

श्री देव कुणकेश्‍वराचे स्थान इ.स. ११ व्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आले होते. श्री देव कुणकेश्‍वराच्या संदर्भात नागदेव ताम्रपटातील मजकुरामध्ये ‘देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण इंदुल (आताचे हिंदळे गाव) या प्रशस्त गावात आला. तेथील राजाने त्याचा सन्मान केला. नंतर राजाला राजलक्ष्मी प्राप्त होऊन श्री कुणकेश्‍वराच्या रूपातील भगवान शंकराच्या प्रसादाने पुत्र झाला, असा उल्लेख आहे.

 

प्राचीन देवालय

श्री देव कुणकेश्‍वराच्या मंदिराची बांधणी द्रविडी (दाक्षिणात्य) पद्धतीची आहे. या मंदिराच्या परिसरात श्री जोगेश्‍वरीचे छोटे देवालय, श्री देव मंडलिक नावाचे एक शिवालय, श्री नारायण मंदिर, श्री गणेश मंदिर आणि श्री भैरव मंदिर आहे.

 

कुणकेश्‍वर येथील गुहा

कुणकेश्‍वर येथे ख्रिस्ताब्द १९२० च्या सुमारास देवालयापासून जवळच पूर्वेस डोंगर उतरणीवर काही लोक जमीन खोदत असतांना बुजलेल्या गुहेचे एक द्वार मोकळे झाले. त्यात आढळलेल्या कोरीव पाषाणी मूर्तींमध्ये योद्ध्यांचे पोषाख आणि शिरोभूषणे कोरलेल्या मूर्ती आहेत. मध्यभागी शिवलिंग आणि नंदी यांच्या मूर्ती, तर सभोवार त्या देवतांच्या उपासकांचे पुतळे आहेत.

 

पुरातन तलाव

देवालयाच्या दक्षिणेकडे तलावाच्या शेजारी श्री मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरात श्रीमान लब्दे महाराज तपश्‍चर्या करत असतांना त्यांना तलावाविषयी दृष्टांत झाला. या जागी खोदण्यास प्रारंभ केला असता तेथे तलाव आढळला. या तलावाचे पाणी गोड आहे.

 

 

श्री काशी क्षेत्राशी साम्य असणारी शिवलिगं

या मंदिराच्या मागे असलेल्या शिवलिंगांमुळेच या स्थानाला कोकणची काशी असे संबोधले जाते. गेली कित्येक वर्षे या शिवलिंगांवर समुद्रातील लाटांचा बाराही महिने मारा चालू असतो. तरीही शिवलिंगे झिजलेली नाहीत. सध्या केवळ ५-६ ठिकाणी शिवलिंगे पाण्याच्या ओहोटीच्या वेळी दृष्टीस पडतात. अशा प्रकारची खडकांवरील शिवलिंगे काशी या तीर्थस्थळावरही आहेत.

 

उत्सवाचे स्वरूप

श्री देव कुणकेश्‍वर हा आसपासच्या परिसरातील ७२ गावांतील दैवतांचा अधिपती मानला जातो. या शक्तीपिठातून आपले देवत्व वाढवण्यासाठी ७२ खेड्यांतील दैवते शिवरात्रीच्या दिवशी येथे परंपरेने येतात. या वेळी भाविक देवभेटींच्या अपूर्व सोहळ्याचा आनंद लुटतात. हे देव अमावास्येपर्यंत कुणकेश्‍वर येथे रहातात. या देवांचे भक्तगण समुद्रस्नान करून श्री देव कुणकेश्‍वराची पूजा करतात.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment