दुष्काळ, आर्थिक संकटकाळात अष्टलक्ष्मी होम करणे फलदायी !
रामनाथी (फोंडा, गोवा) – आपत्काळात भक्तांचे रक्षण व्हावे, त्यांना धनधान्याची उणीव भासू नये, तसेच रामराज्यासम हिंदु राष्ट्राची शीघ्रातीशीघ्र स्थापना व्हावी, यासाठी समृद्धता प्रदान करणार्या आदिशक्तीचा जागर सनातनच्या आश्रमात करण्यात आला. सनातन संस्थेच्या वतीने येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीत ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत विविध होम करण्यात आले.
११ ऑक्टोबर, म्हणजे घटस्थापनेपासून १७ ऑक्टोबरपर्यंत ‘आदिलक्ष्मी’, ‘गजलक्ष्मी’, ‘संतानलक्ष्मी’, ‘धनलक्ष्मी’, ‘धान्यलक्ष्मी’, ‘विजयलक्ष्मी’, ‘धैर्यलक्ष्मी’ आणि ‘ऐश्वर्यलक्ष्मी’ या आदिशक्तीच्या अष्टरूपांची कृपा होण्यासाठी होम करण्यात आले. १८ आणि १९ ऑक्टोबर या दिवशी ‘नवचंडी होम’, तर २० ऑक्टोबर या दिवशी असलेल्या विजयादशमीला ‘साम्राज्यलक्ष्मी होम’ भावपूर्ण वातावरणात पार पडले. १० दिवसांच्या काळात सनातन संस्था, तसेच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी देवीच्या चरणी गायन आणि नृत्य सेवा अर्पण केली. ‘रामराज्यासम हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, तसेच साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील त्रास दूर व्हावेत’, या उद्देशांच्या पूर्तीसाठी हे होम करण्यात आले.
या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तसेच सनातनचे सद्गुरु अन् संत यांची वंदनीय उपस्थिती होती. सनातनच्या आश्रमातील साधकांनी या होमांचा लाभ घेतला. सनातन वेदपाठशाळेचे पुरोहित श्री. अमर जोशी, श्री. सिद्धेश करंदीकर, तसेच श्री. दामोदर वझेगुरुजी, श्री. पवन बर्वे यांनी होमाचे पौरोहित्य केले. सर्वांनीच होमाचा उद्देश साध्य होण्यासाठी प्रार्थना केली, तसेच होमांमुळे निर्माण झालेली दैवी ऊर्जा, शक्ती, तसेच चैतन्य यांचा लाभ घेतला.
सध्याच्या भारतातील अनेक राज्यांत दुष्काळाची स्थिती आहे. दुष्काळ, आर्थिक संकट किंवा पाण्याचे दुर्भिक्ष्य असण्याच्या काळात अष्टलक्ष्मी होम करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी ‘धान्यलक्ष्मी’, आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी ‘धनलक्ष्मी’ आणि ‘ऐश्वर्यलक्ष्मी’ यांची उपासना फलदायी ठरते. होमामध्ये दिल्या गेलेल्या आहुती आणि मंत्रोच्चार यांमुळे वातावरणातील नकारात्मकता दूर होऊन सर्वत्र चैतन्य निर्माण झाल्याची अनुभूती सर्व साधकांनी घेतली.

सनातन संस्थेच्या वतीने नवरात्रीत होणार आदिशक्तिचा जागर !
पुण्यात ‘सीजेपी आंदोलनात अर्बन नक्षलवाद’ या विषयावर परिसंवाद पार पडला
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !
सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कार’ प्रशिक्षणवर्गाचे आयोजन !
विविध मंदिरांतील देवतांच्या चरणी सनातन संस्था आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञा”ची निमंत्रणपत्रिका अर्पण !