
‘माझ्या देवघरातील प्रथम सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत काही चांगले पालट दिसून आले. दिवसेंदिवस त्यांमध्ये वाढ होऊ लागली. काही दिवसांनी लक्षात आले की, सूर्यदेवाच्या मूर्तीच्या बाजूच्या नागदेवता आणि गरुडदेवता यांच्या मूर्तींमध्येही चांगले पालट झाले आहेत.
या मूर्तींचे चित्रीकरण केले आहे आणि दिवसेंदिवस जसे पालट दिसत गेले, त्यांनुसार छायाचित्रेही काढली आहेत. जेणेकरून पुढील काळातील जिज्ञासूंना त्यांचा अभ्यासही करता येईल. केवळ ‘समष्टीला अध्यात्मशास्त्राचे असे विविध पैलू कळावेत’, यासाठी देव इतके सर्वकाही देत आहे. त्यामुळे ‘ते समाजापर्यंत पोचवणे’, ही आमची साधनाच आहे; म्हणून हा लेख प्रकाशित करत आहोत.
या लेखात माझ्या खोलीतील देवघरातील नागदेवता आणि गरुडदेवता यांच्या मूर्तींमध्ये झालेल्या पालटांच्या संदर्भातील विश्लेषण केले आहे. ‘या लेखात देवतांच्या मूर्तींमध्ये होणार्या पालटांमागील शास्त्र वाचकांना समजून त्यांची देवावरील श्रद्धा वृद्धींगत होवो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२६.६.२०२६)
नागदेवता आणि गरुडदेवता यांच्या मूर्तींची माहिती

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी १४.८.२०१५ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना नागदेवतेची धातूची मूर्ती आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी दिली. ती त्यांच्या देवघरात ठेवण्यात आली.

श्री. नागराजन् चेन्नई येथील हितचिंतक श्री. नागराजन् यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेट म्हणून दिलेली गरुडदेवतेची लाकडाची मूर्ती फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांच्या देवघरात ठेवण्यात आली.
‘नागदेवता ही पृथ्वीतत्त्वाशी संबंधित आणि गरुडदेवता ही वायुतत्त्वाशी संबंधित आहे. या दोन्ही देवतांच्या मूर्तींमध्ये जाणवणारे पालट हे ते ते तत्त्व कार्यरत असल्याची लक्षणे आहेत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (९.६.२०२६)
नागदेवता आणि गरुडदेवता यांच्या मूर्तींत टप्प्याटप्प्याने झालेल्या पालटांची गुरुदेवांनी केलेली निरीक्षणे !
१. नागदेवतेच्या मूर्तीत झालेल्या पालटांची निरीक्षणे
१ अ. भावजागृती होणे
‘१४.८.२०१५ ते ३.३.२०२४ या कालावधीत देवघरातील नागदेवतेच्या मूर्तीत कोणतेही पालट दिसून आले नाहीत. ४.३.२०२४ या दिवशी देवघरातील नागदेवतेकडे बघून माझी भावजागृती झाली.
१ आ. ध्यान लागणे – १३.४.२०२६
नागदेवतेकडे बघितल्यावर पुष्कळ शक्ती जाणवून माझे ध्यान लागल्यासारखे झाले.
१ इ. नागदेवतेची हालचाल जाणवणे
१. ४.६.२०२६
मला नागदेवतेचा फणा बहुतांश वेळा मागे-पुढे, तर काही वेळा आजूबाजूला डोलतांना जाणवला.
२. ९.६.२०२६
नागदेवता आपला फणा आडवा पसरत असल्याचे दिसले.
३. १४.६.२०२६
या दिवसापूर्वी नागदेवतेचा फणा आजूबाजूला आणि समोर-मागे असा डोलतांना दिसत होता. १४.६.२०२६ या दिवशी ‘तो केवळ आजूबाजूला डोलत आहे’, असे मला दिसले.
४. २४.६.२०२६
‘नागदेवतेचा फणा आजूबाजूला साधारण १ – २ मि.मी. हलत आहे’, असे मला जाणवले.
५. ८.७.२०२६
देवघरातील नागदेवतेचा फणा आजूबाजूला साधारणतः ४ – ५ मि.मी. हलत असल्याचे मला जाणवले.
१ ई. नामजप करत मूर्तीकडे पाहिल्यावर जाणवलेले सूत्र
नागदेवतेप्रती कृतज्ञता म्हणून मी ४.६.२०२६ पासून प्रतिदिन तिचा १ माळ नामजप करण्यास आरंभ केला. ७.६.२०२६ या दिवशी नागदेवतेच्या मूर्तीकडे पाहून तिचा जप केल्यावर नागदेवता संथ गतीने आजूबाजूला डोलू लागली.
२. गरुडदेवतेच्या मूर्तीत झालेल्या पालटांची निरीक्षणे
माझ्या खोलीतील देवघरामध्ये चेन्नई येथील हितचिंतक श्री. नागराजन् यांनी दिलेली गरुडदेवतेची सुमारे १ फूट उंचीची लाकडी मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये मूर्तीशास्त्रानुसार पुढील त्रुटी आहेत.
अ. देवतेचे दंड (खांदा आणि कोपर यांच्यामधील भाग) आणि खांदे पूर्ण गोलाकार नसून थोड्या प्रमाणात चौकोनी आहेत.
आ. तळहाताच्या पंजाचा मनगटाकडील भाग अधिक प्रमाणात गोल आहे.
इ. हाताच्या बोटांच्या टोकांना गोलाई नसून ती सरळ कापल्याप्रमाणे आहेत.
ई. गरुडदेवतेचे धोतर केवळ एकाच मांडीवर दाखवले आहे, दुसर्या मांडीवर दाखवलेले नाही.
असे असले, तरी आता ३.३.२०२४ पासून या मूर्तीमध्ये आध्यात्मिक स्तरावर पुढील चांगले पालट दिसून येत आहेत.
२ अ. भावजागृती आणि आनंद होणे
१. ३.३.२०२४ : गरुडदेवतेच्या मूर्तीमधील चेहरा स्पष्ट दिसत नसला, तरी तो बघून माझा भाव जागृत झाला आणि मला पुष्कळ शांत वाटले.
२. ७.६.२०२६ : मूर्तीकडे बघितल्यावर माझा भाव जागृत झाला आणि मला आनंदही झाला.
२ आ. चेहर्यावर हास्य दिसणे – ७.६.२०२६
गरुडदेवतेच्या चेहर्यावर प्रसन्नतेचे हास्य दिसले.
२ इ. गरुडदेवतेचे हात आणि पंख यांची हालचाल जाणवणे
१. ७.६.२०२६ : ‘देवतेचे हात आणि पंख हलत आहेत’, असे दिसले.
२. १४.६.२०२६ : मला गरुडदेवतेचे दोन्ही हात वर-खाली हलतांना जाणवले.
३. २४.६.२०२६ : मला ‘गरुडदेवतेचे हात साधारण ५ – ६ मि.मी. खाली-वर हलत आहेत’, असे जाणवले.
४. ८.७.२०२६ : मला गरुडदेवतेचे हात पूर्वीपेक्षा थोड्या अधिक प्रमाणात खाली-वर हलत असल्याचे जाणवले.
२ ई. नामजप करत मूर्तीकडे पाहिल्यावर जाणवलेले सूत्र
गरुडदेवतेप्रती कृतज्ञता म्हणून मी ४.६.२०२६ पासून प्रतिदिन तिचा १ माळ नामजप करण्यास आरंभ केला.
७.६.२०२६ : या दिवशी गरुडदेवतेच्या मूर्तीकडे पाहून तिचा जप केल्यावर देवतेचे हात वर-खाली हलण्याचे आणि पंख मागे-पुढे हलण्याचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आले.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (८.७.२०२६)
नागदेवतेच्या मूर्तीत झालेल्या पालटांची निरीक्षणे
१ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१ अ १. ११.६.२०२६
अ. ‘मला नागदेवता डावीकडे आणि उजवीकडे सूक्ष्मातून हलत असल्याचे जाणवले.
आ. मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील त्यांच्या पलंगाजवळ लादीपासून साधारण ६ – ७ फूट वर सूक्ष्मातून एक नाग उजवीकडून डावीकडे जातांना दिसला.’
१ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ, वय ६२ वर्षे), गोवा.
१ आ १. ८.६.२०२६

अ. ‘मला नागदेवतेची मूर्ती पुष्कळ सजीव जाणवली.
आ. ‘नागदेवता डोलत आहे’, असे मला जाणवले. ‘श्री नागदेवाय नमः ।’ हा जप केल्यावर नागाचे डोलणे वाढल्याचे जाणवले.
इ. नागदेवतेसमोर उभे राहिल्यावर मला तिची शक्ती जाणवली.’
१ आ २. ११.७.२०२६
अ. ‘मला नागदेवतेची मूर्ती पुष्कळ सजीव आणि तेजस्वी वाटली.
आ. नागदेवतेच्या तोंडाकडे पाहिल्यावर मला तिचा फणा आजूबाजूला हलत असल्याची अनुभूती आली. मी तिच्याकडे पहात असतांना ‘ती (मूर्ती) एका लयीत आजूबाजूला डोलत आहे’, असे मला जाणवले.
इ. तिच्याकडे पाहिल्यावर मला माझे अनाहतचक्र आणि मूलाधारचक्र यांवर स्पंदने जाणवली. त्यांपैकी अनाहतचक्रावर मला थंडावा आणि मूलाधारचक्रावर शांती जाणवली.
ई. तिच्याकडे पाहून माझा भाव जागृत झाला.
उ. तिच्याकडे पहात असतांना डोळे मिटल्यावर काही वेळाने मला जाणवले, ‘ती माझ्या डोक्यावर शांतपणे बसली आहे.’
ऊ. तिच्यासमोर डोळे मिटून बसल्यावर माझ्या सर्व चक्रांची शुद्धी होऊन मला मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवू लागली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. काही वेळाने माझे ध्यान लागले.
ए. ध्यानातून आपोआप जाग आल्यावर घड्याळ बघितले, तर अर्धा घंटा झाला होता. तो कालावधी मला केवळ २ – ३ मिनिटांचा जाणवला.
ऐ . ‘नागदेवतेच्या मूर्तीमध्ये नागदेवतेचे तत्त्व १७ टक्के आले आहे’, असे मला जाणवले.
ओ. नागदेवतेची जाणवलेली स्पंदने
| स्पंदने | स्पंदनांचे प्रमाण (टक्के) |
|---|---|
| १. शक्ती | ५ |
| २. भाव | २५ |
| ३. चैतन्य | ३५ |
| ४. आनंद | १० |
| ५. शांती | २५ |
| एकूण | १०० |
औ. नागदेवतेच्या मूर्तीचे दर्शन घेण्यापूर्वी आणि दर्शन घेतल्यानंतर नागदेवतेची, तसेच माझीही छायाचित्रे काढण्यात आली. मी दर्शन घेतल्यानंतर नागदेवता पुष्कळ शांत जाणवत होती आणि तिचे डोलणे थांबले होते, तसेच माझ्या चेहर्यावरही शांतीची स्पंदने अधिक प्रमाणात होती.’
गरुडदेवतेच्या मूर्तीत झालेल्या पालटांची निरीक्षणे
२ अ. सद्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
२ अ १. ११.६.२०२६
अ. ‘गरुडदेवाची मूर्ती सजीव होत चालली आहे’, असे मला जाणवले.
आ. मला मूर्तीचे ओठ हलतांना दिसले.
इ. मूर्तीच्या चेहर्यावर हास्य दिसत होते; परंतु मूर्ती जवळून पाहिली असता ‘गरुडदेवतेचा चेहरा हसरा नाही’, असे माझ्या लक्षात आले.’
२ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ, वय ६२ वर्षे), गोवा.
२ आ १. ८.६.२०२६
अ. ‘मला गरुडदेवतेची मूर्ती पुष्कळ हसतांना जाणवली. हसतांना स्वतःचे गाल फुगतात, तसे त्या मूर्तीकडे पहातांना जाणवले. प्रत्यक्षात जवळ जाऊन पाहिले, तर ती मूर्ती हसरी नाही.
आ. ही मूर्ती पुष्कळ सजीव जाणवली.
इ. ‘गरुडदेवतेचे पसरलेले पंख आता हलतील’, असे मला जाणवले.
ई. गरुडदेवतेमध्ये पुष्कळ तारक तत्त्व जाणवले.’
२ आ २. ११.७.२०२६
अ. गरुडदेवतेच्या दर्शनासाठी गेल्यावर लगेचच पुष्कळ आनंद जाणवू लागला.
आ. मूर्तीसमोर गेल्यावर ‘गरुडदेवता माझ्या समोरच उडत येऊन तेथे स्थिरावली’, असे मला जाणवले.
इ. तिची मूर्ती लहान असूनही ती भव्य आणि दिव्य जाणवत होती.
ई. गरुडदेवतेला बघताच माझे लक्ष प्रथम तिच्या चरणांकडे गेले आणि माझा शरणागतभाव जागृत झाला. यावरून ‘गरुडदेवतेचा श्रीविष्णूप्रती किती शरणागतभाव असेल ?’, याची प्रचीती येते.
उ. गरुडदेवतेचा आनंद तिच्या गालांवर जाणवत होता.
ऊ. गरुडदेवतेची स्पंदने प्रथम माझ्या अनाहतचक्रावर जाणवली. त्यानंतर माझे आज्ञाचक्र तिच्या स्पंदनांनी भारित झाले.
ए. तिचे पंख, हात आणि तिच्या गळ्यातील नाग यांची हालचाल जाणवत होती.
ऐ. तिच्यामुळे माझ्या शरिराला वायुतत्त्वाचा दाब जाणवत होता.
ओ. मी डोळे मिटल्यावर माझे ध्यान लागले असूनही मला आनंद जाणवत होता.
औ. ध्यानामध्ये ‘मी तिच्या पाठीवर बसलो आहे आणि ती मला घेऊन उडत आहे’, असे मला जाणवले.
अं. ‘गरुडदेवतेच्या मूर्तीमध्ये गरुडदेवाचे तत्त्व १९ टक्के आले आहे’, असे जाणवले.
क. गरुडदेवतेची जाणवलेली स्पंदने
| स्पंदने | स्पंदनांचे प्रमाण (टक्के) |
|---|---|
| १. शक्ती | २० |
| २. भाव | १० |
| ३. चैतन्य | २० |
| ४. आनंद | ३० |
| ५. शांती | २० |
| एकूण | १०० |
ख. गरुडदेवतेच्या मूर्तीचे दर्शन घेण्यापूर्वी आणि दर्शन घेतल्यानंतर गरुडदेवाची, तसेच माझीही छायाचित्रे काढण्यात आली. मी दर्शन घेतल्यानंतर गरुडदेवाच्या, तसेच माझ्याही चेहर्यावर पुष्कळ आनंद जाणवत होता.’
गरुडदेवतेच्या मूर्तीतील पालटांचे संतांनी केलेले निरीक्षण अन् त्याचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

‘२९.२.२०२४ या दिवशी सनातनचे ४६ वे संत पू. भगवंत कुमार मेनराय (आताचे कै. पू. भगवंत कुमार मेनराय) यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरात ठेवलेल्या गरुडदेवतेच्या मूर्तीत झालेल्या पालटांचे निरीक्षण केले. हे निरीक्षण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी या निरीक्षणाचे केलेले विश्लेषण पुढे दिले आहे.
१. पू. भगवंत कुमार मेनराय यांनी केलेले निरीक्षण
गरुडदेवतेच्या मूर्तीकडे पाहिल्यावर ‘त्यातील चैतन्य पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे आणि तिने आपल्या हातांत संपूर्ण ब्रह्मांड धारण केले आहे’, असे मला जाणवले.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
आता आपत्काळ समीप आल्यामुळे काळानुसार विष्णुतत्त्वाची आवश्यकता अधिक आहे. त्यामुळे गरुडदेवतेच्या मूर्तीतील चैतन्य आणि विष्णुतत्त्व पुष्कळ प्रमाणात वाढत चालले आहे.’
नागदेवता आणि गरुडदेवता यांच्या मूर्तींत झालेल्या पालटांचे सूक्ष्म ज्ञानाद्वारे केलेले अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

‘माझ्या खोलीतील देवघरातील नागदेवता आणि गरुडदेवता यांच्या मूर्तींत झालेल्या पालटांमागील शास्त्र सर्वांना कळावे’, यासाठी मी माझी निरीक्षणे सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना सांगितली आणि त्यांना त्याविषयीचे शास्त्र विचारले. लेखात पुढे मी त्यांना सांगितलेली निरीक्षणे आणि त्यांनी सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे सांगितलेले शास्त्र दिले आहे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. नागदेवता
१ अ. निरीक्षण
‘देवघरातील नागदेवतेचा फणा कधी आजूबाजूला, तर कधी मागे-पुढे हालतांना दिसतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (८.७.२०२६)
१ अ १. शास्त्र – नागदेवतेचे तारक रूप कार्यरत झाल्यावर तिने फणा आजूबाजूला डोलवणे आणि मारक रूप कार्यरत झाल्यावर फणा मागे-पुढे हालवून वाईट शक्तींशी लढणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील पूजेतील नागदेवतेच्या मूर्तीत वैकुंठातील आदिशेषाचे तत्त्व कार्यरत झाले असून या मूर्तीवर विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लघु आणि सूक्ष्म रूप पहुडलेल्या स्थितीत असते. हे रूप अनुभवल्यामुळे आदिशेषाला आनंद होऊन त्याचे तारक रूप कार्यरत होते आणि तो आनंदाने त्याचा फणा आजूबाजूला डोलवतो.
जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत सूक्ष्मातून वाईट शक्ती आक्रमणे करण्यासाठी येतात, तेव्हा आदिशेष क्रोधित होऊन त्याचे मारक रूप कार्यरत होते आणि तो त्वेषाने त्याचा फणा मागे-पुढे हालवून वाईट शक्तींवर मारक शक्ती प्रक्षेपित करतो अन् त्यांच्याशी लढतो.’ (१२.७.२०२६)
२. गरुडदेवता
२ अ. निरीक्षण
‘गरुडदेवतेचा हात आजूबाजूला आणि वर-खाली हालत असल्याचे जाणवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३१.७.२०२६)
२ अ १. शास्त्र
२ अ १ अ. मारक आणि तारक कार्यानुसार गरुडदेवतेचे हात अनुक्रमे उजव्या अन् डाव्या बाजूला हालणे
‘देवासुर संग्रामात जेव्हा गरुडदेवता देवसेनेवर आक्रमण करणार्या असुरांशी भिडते, तेव्हा तिची सूर्यनाडी चालू होऊन तिच्याकडून मारक शक्ती प्रक्षेपित होते. याचे प्रतीक म्हणून तिचे दोन्ही हात उजव्या बाजूला हालतात. जेव्हा देवासुर संग्रामात नागपाशात बद्ध झालेल्या देवसेनेवर गरुडदेवता गारुडी विद्येचा उपयोग करून त्या देवसैनिकांना नागपाशातून मुक्त करत असते, तेव्हा तिची चंद्रनाडी चालू होऊन तिच्याकडून तारक शक्ती प्रक्षेपित होते. याचे प्रतीक म्हणून तिचे दोन्ही हात डाव्या बाजूला हालतात.
२ अ १ आ. गरुडदेवता श्रीविष्णूचे स्तुतीगान करत असतांना तिच्या भावानुसार तिचे दोन्ही हात वर-खाली हलणे
जेव्हा गरुडदेवतेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ठिकाणी श्रीमन्नारायणाचे दर्शन होते, तेव्हा ती तन्मयतेने आणि भावविभोर होऊन श्रीविष्णूचे स्तुतीगान करू लागते. तेव्हा तिच्या मनातील भावानुसार तिचे दोन्ही हात वर-खाली हालू लागतात. गरुडदेवतेच्या हातांची वर-खाली होणारी हालचाल पाहून तिच्या निस्सीम सेवाभक्तीची प्रचीती येते.’ (१.८.२०२६)
२ आ. निरीक्षण
‘२६.७.२०२६ या दिवशी रात्री ‘गरुडदेवता ध्यान लावून बसली आहे’, असे दिसले.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२७.७.२०२६)
२ आ १. शास्त्र – आसुरी सेनेशी लढण्यासाठी गरुडदेवतेने अधूनमधून ध्यानस्थ राहून स्वतःचे आध्यात्मिक बळ वाढवणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील गरुडदेवतेची मूर्ती हे साक्षात् श्रीविष्णूचे वाहन असलेल्या गरुडाचे प्रतिरूप आहे. त्यामुळे या मूर्तीमध्ये गरुडदेवतेचे तत्त्व कार्यरत झाले आहे. जेव्हा देवासुर संग्रामाची तीव्रता वाढते, तेव्हा गरुडदेवता ध्यानस्थ होऊन श्रीविष्णूचे ध्यान करते आणि त्याची कृपा प्राप्त करते. त्यानंतर ती जागृत अवस्थेत राहून आक्रमण करणार्या वाईट शक्तींच्या सेनेवर तुटून पडते आणि स्वतःच्या तीक्ष्ण नखांनी त्यांना ओरबाडते अन् अणकुचीदार चोचीने त्यांचा चावा घेते. अशा प्रकारे गरुडदेवता वाईट शक्तींच्या सेनेशी लढण्यासाठी अधूनमधून ध्यानस्थ राहून श्रीविष्णूचे भक्तीपूर्ण स्मरण करते आणि स्वतःचे आध्यात्मिक बळ वाढवते.’ (२९.७.२०२६)
‘देवघरातील देवतांची उपासना न करताही त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अकल्पित अनुभूती देणे’, ही देवतांची मोठी कृपाच होय !‘सर्वसाधारणतः आपण एखाद्या देवतेची दीर्घकाळ उपासना केल्यानंतर त्या देवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो; पण मी कधीच सूर्यदेव, गरुडदेवता अथवा नागदेवता यांची उपासना केली नाही. असे असूनही या देवता स्वतःहून इतक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्याची कधी कल्पनाही केली नाही, अशा अनुभूती देत आहेत. यावरून ‘या देवतांची माझ्यावर किती कृपा आहे !’, हे लक्षात येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (७.६.२०२६)
|
साधक आणि वाचक यांना आवाहन !
देवतांची उपासना केल्यावर भक्ताच्या भक्तीनुसार त्या देवतेच्या मूर्तीमध्येही पालट होण्याचे हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारे साधक अथवा वाचक यांना अन्य काही उदाहरणे यांची माहिती असल्यास त्याचे छायाचित्र आणि त्याची सविस्तर माहिती लिहून पाठवावी.
माहिती पाठवण्यासाठी इमेल पत्ता : [email protected]


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
वाराणसी आश्रमातील बुद्धीअगम्य पालट
‘कोरोना महामारी’च्या काळामध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रम परिसरात औदुंबराची अनेक रोपे आपोआप उगवण्यामागील कारणमीमांसा
रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात अनेक देवता असण्यामागील विश्लेषण
ऋषिमुनींच्या आश्रमात वावरणार्या पशू-पक्ष्यांची आठवण करून देणारे सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्याकडे आकृष्ट होणारे...