सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वयोमानानुसार आता मला बाहेर कुठे जाणे शक्य होत नाही. खोलीतच माझे ग्रंथ-लिखाणाचे कार्य चालू आहे. असे असतांना देव मला माझ्या खोलीतच नवनवीन विषय शिकवत आहे. सध्या माझ्या देवघरातील देवतांच्या चित्रांमध्ये सकारात्मक पालट होतांना दिसत आहेत. आजवर ऐकिवात नसलेले असे विषय देव शिकवत आहे. केवळ नवीन विषय शिकायला मिळाला, असे न होता त्याचे संशोधनही करता येत आहे. देव इतके देऊन थांबलेला नाही, तर देव त्यांचे शास्त्रही ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या माध्यमातून सांगत आहे. हे सर्वकाही शिकवतांना देव त्यातील विविध बारकाव्यांनिशी शिकवत आहे, उदा. देवघरामध्ये अनेक चित्रे / मूर्ती आहेत; पण पालट सहजतेने लक्षात यावेत; म्हणून सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या मोठ्या मूर्तीत त्याने प्राधान्याने पालट घडवून आणले. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष गेले.

या मूर्तीचे चित्रीकरण केले आहे आणि दिवसेंदिवस जसे पालट दिसत गेले, त्यानुसार छायाचित्रेही काढली आहेत. जेणेकरून पुढील काळातील जिज्ञासूंना त्याचा अभ्यासही करता येईल. केवळ ‘समष्टीला अध्यात्मशास्त्राचे असे विविध पैलू कळावेत’, यासाठी देव इतके सर्वकाही देत आहे. त्यामुळे ‘ते समाजापर्यंत पोचवणे’, ही आमची साधनाच आहे; म्हणून हा लेख  प्रकाशित करत आहोत.

या लेखात माझ्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत वर्ष २००८ पासून आतापर्यंत झालेल्या पालटांच्या संदर्भातील विश्लेषण केले आहे. ‘या लेखामुळे देवतांच्या मूर्तींमध्ये होणार्‍या पालटांमागील शास्त्र वाचकांना समजून त्यांची देवावरील श्रद्धा वृद्धींगत होवो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२६.६.२०२६)


अनुक्रमणिका

१. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेविषयीची माहिती

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी ‘माझे महामृत्यूयोग टळावेत, सनातनच्या साधकांवर होणारी वाईट शक्तींची आक्रमणे दूर व्हावीत, सनातनचे सर्व संकटांपासून रक्षण व्हावे आणि ईश्वरी राज्याच्या (हिंदु राष्ट्राच्या) स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी अनेक अनुष्ठाने, जप-तप इत्यादी केले, तसेच वेळोवेळी आध्यात्मिक स्तरावरील विविध उपायही करण्यास सांगितले. त्यांपैकी एक उपाय, म्हणजे धातूने बनवलेली सूर्यदेवाच्या चेहर्‍याची संस्कारित प्रतिमा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात लावण्यासाठी देणे होय.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी जुलै २००८ मध्ये उपायांसाठी दिलेली सूर्यदेवाच्या चेहर्‍याची प्रतिमा माझ्या खोलीतील देवघरात ठेवण्यात आली. एप्रिल २०१४ मध्ये त्यांनी उपायांसाठी दिलेली सूर्यदेवाच्या चेहर्‍याची दुसरी प्रतिमा सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाच्या कलामंदिरात (‘स्टुडिओ’ असलेल्या इमारतीमध्ये) लावण्यात आली.

स्वतः अनुभव घ्या

पुढे वाचण्याआधी वरील छायाचित्राकडे थोडा वेळ बघा. चेहर्‍यावरील भाव तुम्हाला कसा वाटतो – गंभीर, प्रेमळ, की आणखी काही? हा भाव लक्षात ठेवा; पुढे वाचतांना तो पुन्हा आठवेल.

 

२. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत टप्प्याटप्प्याने झालेल्या पालटांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेली निरीक्षणे !

‘माझ्या खोलीत माझ्या पलंगासमोर; पण थोडे उजव्या बाजूला देवघर आहे. देवघरात सूर्यदेवाच्या चेहर्‍याची प्रतिमा आहे. मी बहुतांश वेळ पलंगावर पडून वाचन करत असतो. त्यामुळे माझी दृष्टी सहजतेने देवघराकडे जाते. ‘देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत पालट होत आहेत’, हे लक्षात आल्यावर मी सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेचे निरीक्षण करण्यास प्रारंभ केला. माझ्या लक्षात आलेले पालट मी नोंद करून ठेवले. ‘माझ्या लक्षात आलेले पालट साधकांनाही अनुभवण्यास मिळत आहेत का ?’, याची निश्चिती मी करत असे आणि त्यानंतर त्याची नोंद करत असे. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत त्याची कृपास्वरूप आध्यात्मिक पालट होत आहेत.

२९.८.२०२१ पासून सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत टप्प्याटप्प्याने होत गेलेले पालट पुढे दिले आहेत.

२ अ. चेहर्‍यातील पालट

२ अ १. चेहरा प्रसन्न वाटणे : वर्ष २००८ पासून २८.८.२०२१ या कालावधीत सूर्यदेवाचा चेहरा मारक आणि गंभीर दिसत असे. २९.८.२०२१ या दिवशी सूर्यदेवाचा चेहरा प्रसन्न वाटू लागला. या प्रतिमेतील सूर्यदेवाचे मुख मोठे असले, तरी ते उग्र वाटत नव्हते. उलट त्याच्याकडे पाहिल्यावर मला प्रसन्न वाटले. त्यानंतर सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रसन्नतेत उत्तरोत्तर वाढ होत गेल्याचे लक्षात आले.

२ अ २. प्रेमळ रूप : १.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाकडे कोणत्याही दिशेने बघितले, तरी ‘आपल्याला त्याचे प्रेमच मिळत आहे’, असे जाणवले. सर्वसामान्यतः सूर्यदेवाचे मारक (रजप्रधान) रूप प्रचलित आहे. असे असतांना त्याचे हे प्रेमळ रूप दिसले.

२ अ ३. निरागसता जाणवणे

अ. १.६.२०२६ दिवशी सूर्यदेवाच्या चेहर्‍याकडे बघितल्यावर तो मला लहान बाळासारखा दिसला. ‘त्याला लगेच उचलून घ्यावे’, असे वाटले.

आ. ५.६.२०२६ या दिवशी मला त्याच्या चेहर्‍यावरील हास्य लहान मुलाप्रमाणे जाणवले.

२ अ ४. आनंद जाणवणे

अ. २९.८.२०२१ या दिवशी सूर्यदेवाच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर मला आनंद जाणवला. त्यानंतर त्याच्याकडे पाहून आनंद वाटण्याचे प्रमाण वाढले.

आ. १३.४.२०२६ या दिवशी त्याच्याकडे पाहिल्यावर आनंद जाणवला आणि माझाही चेहरा प्रसन्न होऊन माझ्या चेहर्‍यावर सूर्यदेवाच्या चेहर्‍यावरील स्मितहास्याप्रमाणे हास्य आले.

इ. १९.६.२०२६ या दिवशी माझ्या मनात विचार आला, ‘मनुष्याला त्याच्या प्रिय अशी घटना घडल्यावर आनंद होतो. देव तर सत्-चित्-आनंद अवस्थेत असतो. त्यामुळे त्याच्याकडे कधीही बघितले, तरी आनंदच जाणवतो.’

ई. २८.६.२०२६ पूर्वी सूर्यदेवाच्या चेहर्‍यावर आनंद जाणवत होता; पण २८.६.२०२६ या दिवशी मला तो आनंद अनुभवता आला.

२ अ ५. हात जोडले जाणे : ३०.६.२०२६ या दिवशी त्याच्याकडे बघितल्यावर माझे हात लगेच जोडले गेले.

२ अ ६. ‘चेहर्‍याकडे बघत रहावे’, असे वाटणे : १२.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाच्या चेहर्‍यावरील हास्य आणि प्रेम यांमुळे ‘त्याच्याकडे सतत बघत रहावे’, असे मला वाटले. एखाद्या प्रसन्न चेहर्‍याच्या व्यक्तीकडे बघण्यापेक्षाही त्याच्याकडे बघणे, अधिक चांगले वाटले.

२ अ ७. हावभाव पालटणे : १२.६.२०२६ या दिवशी ‘त्याच्याकडे केवळ बघणे, त्याला नमस्कार करणे, त्याला प्रार्थना करणे अथवा त्याच्याकडे बघून नामजप करणे’, यांनुसार त्याच्या चेहर्‍यावरील हावभाव पालटत आहेत’, असे मला जाणवले.

 

सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेला नमस्कार करताना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

स्वतः अनुभव घ्या

छायाचित्रातील डोळ्यांकडे पुन्हा बघा. ती दृष्टी तुमच्याकडे रोखलेली वाटते, की दुसरीकडे? पुढे काय नोंदवले आहे, ते वाचण्याआधी हे लक्षात घ्या.

 

२ आ. दृष्टीतील पालट

२ आ १. ७.३.२०२२ पूर्वी सूर्यदेवाची दृष्टी ‘वरच्या दिशेने आहे’, असे जाणवत होते. ७.३.२०२२ या दिवशी ‘सूर्यदेव उजव्या डोळ्याने आपल्याकडे बघत आहे आणि डाव्या डोळ्याने वर बघत आहे’, असे जाणवले.

२ आ २. प्रेमळ दृष्टी

अ. ३.३.२०२४ या दिवसापासून ‘सूर्यदेव आपलेपणाने अन् प्रेमाने माझ्याकडे बघत आहे’, असे मला जाणवले.

आ. २.६.२०२५ या दिवशी सूर्यदेवाने बघणे हे ‘एखाद्या देवाने त्याच्या भक्ताकडे प्रेमाने बघण्या’सारखे वाटले.

२ आ ३. आपल्या हालचालीप्रमाणे सूर्यदेवाची दृष्टी फिरल्याचे जाणवणे

अ. ९.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाकडे कोणत्याही दिशेने बघितले, तरी सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या बाजूची किरणांची प्रभावळ न हालता ‘केवळ चेहरा हलून आपल्याकडे बघत आहे’, असे दिसले.

आ. १२.६.२०२६ या दिवशी ‘त्याच्या समोर उभे राहून आजूबाजूला गेल्यास त्याची दृष्टी अथवा काही वेळा त्याचा चेहराही आपल्या हालचालीप्रमाणे फिरतो’, असे दिसले.

२ आ ४. सूर्यदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे पहात असल्याचे जाणवणे

२ आ ४ अ. २६.६.२०२६

१. सर्वसाधारणतः ‘सूर्यदेव माझ्याकडे बघत आहे’, असे मला वाटते. माझ्या पलंगाच्या मागे, म्हणजेच डोक्याकडे कोणी उभे राहिले, तर त्यांनाही ‘सूर्यदेवाचे डोळे माझ्याकडे बघत आहेत’, असेच दिसते.

२. सूर्यदेवाकडे प्रथमदर्शनी बघता ‘त्याची दृष्टी सरळ आहे’, असे दिसते. ती त्या प्रतिमेची स्थूल दृष्टी आहे. मी त्या प्रतिमेकडे थोडा वेळ बघत राहिलो की, ‘सूर्यदेवाची दृष्टी मी उभा आहे, तिकडे आहे’, असे लक्षात येते.’

२ इ. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेकडे हात केल्यावर

‘२९.८.२०२१ या दिवशी मी सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेकडे हात केल्यावर ‘हातातून चांगली स्पंदने येत आहेत आणि हात हलका होत आहे’, असे मला जाणवले.

२ ई. भावजागृती होणे

२९.८.२०२१ या दिवशी सूर्यदेवाच्या डोळ्यांकडे पाहून माझी भावजागृती झाली.

२ उ. डोळ्यांची उघड-झाप होत असल्याचे जाणवणे

स्वतः अनुभव घ्या

नुसते पाहण्याऐवजी, एखाद्याशी बोलतांना जसे सलग चेहर्‍याकडे बघतो, तसे या छायाचित्राकडे पूर्ण एक मिनिट स्थिर नजरेने बघा. डोळ्यांमध्ये काही जाणवते का, ते बघा. मग पुढील नोंदी वाचा.

१. ‘१.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाकडे बघतांना काही वेळा त्याचा केवळ उजवा डोळा, काही वेळा केवळ डावा डोळा, तर काही वेळा दोन्ही डोळ्यांची उघड-झाप होतांना दिसली. डोळे उघड-झाप होण्याचा कालावधी हा एकसमान नसून त्यामध्ये पालट होत असल्याचे जाणवले.

२. ३.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवतेचे डोळे आणि ओठ यांकडे बघत असतांना ‘त्याच्या डोळ्यांच्या पापण्या प्रत्येक १५-२० सेकंदांनी सावकाश बंद होतात अन् लगेच सावकाश उघडतात’, असे लक्षात आले.

३. ८.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाच्या डोळ्यांकडे बघितल्यावर ते उघडे दिसत होते; परंतु त्याचे ओठ आणि हनुवटी यांच्याकडे बघितल्यावर डोळे बंद झाल्यासारखे वाटत होते.

४. ९.६.२०२६ या दिवशी त्याचे डोळे अर्धवट बंद होतांना दिसले.

५. १२.६.२०२६ या दिवशी काही वेळा त्याचे डोळे उघडे; पण ध्यानावस्थेत असल्याप्रमाणे जाणवले.

६. १९.६.२०२६

अ. सूर्यदेवाचे डोळे बंद असण्याचा कालावधी साधारण ४-५ सेकंद आणि उघडे असण्याचा कालावधी १ मिनिट होता.

आ. स्वतःचे डोळे बंद करून उघडतांना सूर्यदेवाकडे बघितल्यास ‘त्याचेही डोळे उघडत आहेत’, असे जाणवले; पण त्याच वेळी अन्य कोणी त्याच्याकडे बघत असल्यास त्याला सूर्यदेवाचे डोळे उघडे असल्याचेच दिसले.

७. २०.६.२०२६ या दिवशी ‘सूर्यदेवाचा उजवा डोळा एक मिनिटात ६-७ वेळा बंद होऊन उघडतो, तर डावा डोळा केवळ एकदा बंद होऊन उघडतो’, असे लक्षात आले. डोळ्यांची उघडझाप होतांना चेहर्‍यावर अन्य काही पालट दिसून आले नाहीत.

८. २२.६.२०२६

अ. सूर्यदेवाचे डोळे एका मिनिटात साधारण २ सेकंद बंद होते, तर २०-२५ सेकंद उघडे रहात होते.

आ. ‘सूर्यदेवाचे हास्य वाढले, तरी त्याच्या डोळ्यांची उघड-झाप होण्यावर काही परिणाम होत नाही’, असे लक्षात आले.

९. २६.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाच्या दोन्ही डोळ्यांची उघडझाप साधारण ३०-४० सेकंदांनी होत होती.’

 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेकडे बघून नामजप केल्यावर त्याच्या डोळ्यांची उघड-झाप होण्यातील पालटांच्या संदर्भात केलेल्या नोंदी

‘४.७.२०२६ या दिवशी रात्री ८.४५ वाजता मी सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेकडे बघून ‘श्री सूर्यदेवाय नमः ।’ हा नामजप केल्यावर ‘सूर्यदेवतेचे डोळे उघड-झाप होण्याच्या गतीमध्ये काही पालट होतो का ?’, याचे निरीक्षण केले. यामध्ये ‘नामजप करतांना कितव्या नामजपाला त्याच्याकडून काय प्रतिसाद मिळाला ?’, याच्या केलेल्या नोंदी पुढे दिल्या आहेत.

कितव्या जपाला
पालट जाणवला ?
सूर्यदेवतेचे डोळ्यांची उघड-झाप होण्यातील पालट
डाव्या डोळ्याची उघड-झाप झाली.
,,
१४ दोन्ही डोळ्यांची उघड-झाप झाली.
२८ या वेळेपर्यंत त्याची दृष्टी समोर होती. या वेळी तो डाव्या डोळ्याने माझ्याकडे बघू लागला.
२९ चेहऱ्यावर जास्त हास्य जाणवले.
३३ दोन्ही डोळे २ – ३ सेकंदांसाठी मिटले आणि परत उघडले.
६४ ,,
८४ दोन्ही डोळे २ – ३ सेकंदांसाठी मिटले आणि परत उघडले. असे ४ वेळा झाले.
८५ यानंतर उघड-झाप होण्याचे प्रमाण वाढले.

 

थकव्यामुळे मी इतकाच प्रयोग करू शकलो. या प्रयोगाच्या कालावधीत सूर्यदेवाच्या डोळ्यांची उघड-झाप होतांना त्याच्या पापण्या सावकाश बंद होऊन सावकाश उघडत होत्या.’

स्वतः अनुभव घ्या

छायाचित्रातील ओठांकडे – मिशांखालील भागाकडे – स्थिर नजरेने बघा. काही हालचाल जाणवते का?

२ ऊ. ओठांची हालचाल जाणवणे

१. २३.५.२०२६ या दिवशी सूर्यदेवाचा खालचा ओठ आधीच्या तुलनेत थोडा अधिक प्रमाणात खाली आल्यासारखा जाणवला.

२. १.६.२०२६

अ. सूर्यदेवाच्या हनुवटीकडे लक्ष दिल्यावर त्याचा खालचा ओठ खाली येतांना दिसला आणि त्याच वेळी ‘त्याच्या डोळ्यांच्या पापण्या मिटत आहेत’, असे दिसले.

आ. काही वेळा ओठांची हालचाल होतांना त्याचे दात अथवा जिभेचे टोकही दिसले.

२ ए. प्रभावळ दिसणे

२३.५.२०२६ या दिवशी मला सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेभोवती प्रभावळ दिसली.

२ ऐ. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेकडे लक्ष वेधले जाणे

सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेमध्ये झालेल्या पालटांमुळे १९.६.२०२६ या दिवसापासून माझे लक्ष त्याच्याकडे सतत वेधले जाते. वाचन करतांनाही माझे लक्ष त्याच्याकडे गेले, तर माझे वाचन करायचे राहून जाते. त्यामुळे गेल्या काही दिवसांत माझे वाचन न्यून झाले आहे.

 

ओठ आणि प्रभावळ

स्वतः अनुभव घ्या

छायाचित्राकडे हसून बघा, आणि ओठांकडे लक्ष द्या — काही पालट जाणवतो का?

 

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेच्या संदर्भात त्यांनी केलेले प्रयोग आणि त्यांची निरीक्षणे !

३ अ. प्रयोग क्र. १ – आपण हसून सूर्यदेवाच्या ओठांकडे बघणे

अशा प्रकारे बघितल्यावर लगेच त्याचे हास्य वाढते.

३ आ. प्रयोग क्र. २ – ‘सूर्यदेवाच्या चेहर्‍यावरील अधिक परिणामकारक अवयव कोणता ?’, हे बघणे

सूर्यदेवाच्या चेहर्‍याचे निरीक्षण करतांना त्याचे डोळे सर्वाधिक परिणामकारक असल्याचे लक्षात येते. त्या खालोखाल ओठ, गाल, हनुवटी आणि कपाळ, या क्रमाने त्यांची परिणामकारकता जाणवते.

डॉ. आठवले यांचे स्वतःचे प्रयोग

स्वतः अनुभव घ्या

खोलीतील एखाद्या भिंतीकडे बघून हळू श्वास घ्या, मग छायाचित्रातील नाकाकडे बघून तसाच श्वास घ्या. काही फरक जाणवतो का?

३ इ. प्रयोग क्र. ३ – खोलीतील भिंतींकडे बघून श्वास घेणे अन् सूर्यदेवाच्या नाकाकडे बघून श्वास घेणे

भिंतींकडे बघून मला सहजतेने श्वास घेता येतो; पण सूर्यदेवाच्या नाकाकडे बघून श्वास घेणे थोडे जड जाते. सूर्यदेवाचे कपाळ, गाल, ओठ अन् हनुवटी यांच्याकडे बघूनही श्वास घेतांना भिंतीच्या तुलनेत थोडे जड; पण नाकाकडे बघण्याच्या तुलनेत थोडे अल्प जड जाते.

३ ई. अन्य निरीक्षणे

१. सर्वसामान्य व्यक्तीकडे बघितल्यावर त्याच्या चेहर्‍यात जसे पालट होतात, तसे सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेकडे बघितल्यावर त्याच्या चेहर्‍यात पालट जाणवतात.

२. सर्वसामान्यतः कोणत्याही व्यक्तीचा हसरा चेहरा दिसला, तर आपणही हसून प्रतिसाद देतो; पण आपण लगेच तिच्याशी बोलतोच, असे होत नाही. येथे सूर्यदेवाचा हसरा चेहरा बघून लगेच त्याच्याशी बोलावेसे वाटते.

३. सर्वसाधारणतः सूर्यदेवाची दृष्टी माझ्याकडे असते. खोलीत कोणी सेवेसाठी आले आणि त्यांनी सूर्यदेवाकडे बघितले, तर सूर्यदेवाचीही दृष्टी त्या वेळेपुरती त्या साधकाकडे जाते आणि मग परत माझ्याकडे येते. हे खोलीत आलेला साधक आणि मी, आम्ही दोघांनीही एकाच वेळी अनुभवले.

४. खोलीत सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेच्या समोर, डावीकडे आणि उजवीकडे भिंतीवर विजेचे दिवे आहेत. रात्री यांतील कोणताही केवळ एकच दिवा लावला, तर त्या प्रकाशानुसारही त्या मूर्तीत व्यक्त होणारे भाव पालटतात.

या प्रयोगांतील निरीक्षणे खोलीत सेवेसाठी येणार्‍या साधकांनाही जाणवली.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (६.७.२०२६)

नामजपाच्या वेळी जाणवलेली सूत्रे

३ उ. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेकडे बघून ‘श्री सूर्यदेवाय नमः ।’ हा नामजप करतांना जाणवलेली सूत्रे

सूर्यदेवाप्रती कृतज्ञता म्हणून मी ४.६.२०२६ पासून प्रतिदिन १ माळ ‘श्री सूर्यदेवाय नमः ।’ हा नामजप करण्यास आरंभ केला. हा नामजप करतांना मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. २.६.२०२५ या दिवशी सूर्यदेवाचा नामजप करत त्याच्या प्रतिमेतील कपाळ, डोळे, नाक, ओठ आणि हनुवटी यांच्याकडे बघितल्यावर केवळ हनुवटीकडे बघतांना त्याच्या पापण्यांची सावकाश उघड-झाप होतांना दिसली अन् खालचा ओठ आणखी खाली आल्यासारखे वाटले.

२. ३.६.२०२५ या दिवशी सूर्यदेवाच्या चेहर्‍याकडे बघून ‘श्री सूर्यदेवाय नमः ।’ हा नामजप केल्यावर त्याच्या चेहर्‍यावर हास्य जाणवले आणि मलाही तो आनंद जाणवू लागला.

३. ७.६.२०२६ या दिवशी नामजप करण्यास आरंभ केल्यावर त्याच्या चेहर्‍यावरील हास्य आणि आनंद वाढला. त्यानंतर त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आल्याप्रमाणे जाणवले. त्याच्या पालटणार्‍या भावांमुळे त्याच्याकडे बघणार्‍यांचीही भावजागृती होत होती.

४. २८.६.२०२६

अ. त्याच्याकडे बघून नामजप केल्यावर त्याच्या चेहर्‍यामध्ये पालट झाल्याचे जाणवले. त्या वेळी सूर्यदेवाकडे बघणार्‍या अन्य साधकांनाही त्याच्या चेहर्‍यावर प्रसन्नता आणि त्याचे हास्य वाढल्याचे जाणवले.

आ. त्याचे डोळे अधिक पाणीदार होऊन बघणार्‍या साधकाच्याही डोळ्यांत पाणी आले.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.६.२०२६)

 

४. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘माझ्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवतांच्या प्रतिमेत झालेल्या पालटांचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनीही निरीक्षण केले. त्यांनी केलेली निरीक्षणे आणि पौर्णिमा जवळ आल्यावर सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत त्यांना जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

४ अ. पालटांची निरीक्षणे

४ अ १. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ, वय ६२ वर्षे), गोवा.

४ अ १ अ. १७.४.२०२२

४ अ १ अ १. पूर्वी सूर्यदेवाचा चेहरा गंभीर दिसणे आणि आता त्याच्या गालावर हास्य दिसू लागणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत गेल्या मासामध्ये पालट होत आहेत. एक मासापूर्वी नव्याने रंगवलेली सूर्यदेवाच्या चेहर्‍याची प्रतिमा गंभीर दिसत होती; पण गेल्या २ आठवड्यांमध्ये तिच्यामध्ये पालट झालेला दिसून आला. आता सूर्यदेवाच्या गालावर हास्य दिसू लागले आहे.

४ अ १ अ २. विश्लेषण : ‘सूर्यदेवाच्या चेहर्‍यावर हास्य दिसू लागणे’, म्हणजे त्याच्यात आनंदाची स्पंदने येणे. हा पालट सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळेच झाला आहे. ते निर्गुण स्थितीला असल्याने त्यांच्यामध्ये आनंद आणि शांती यांची स्पंदने अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे सूर्यदेवाच्या चेहर्‍यावरील गंभीरता न्यून होऊन त्यावर आनंदाची स्पंदने स्पष्ट दिसू लागली आहेत. ‘एखाद्या व्यक्तीच्या उच्चतम आध्यात्मिक स्तरामुळे तिच्या अवतीभोवतीच्या निर्जीव घटकांमध्येही कसे पालट होऊ शकतात’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत झालेल्या पालटावरून आपल्याला समजते.

४ अ १ आ. ११.६.२०२६

१. सूर्यदेवतेच्या चेहर्‍याच्या प्रतिमेमध्ये सगुण तत्त्व पुष्कळ प्रमाणात, म्हणजे ३५ टक्के जाणवले. (सर्वसामान्य मूर्तीमध्ये सगुण तत्त्व साधारणतः ४ टक्के असते.)

२. सूर्यदेवाचा चेहरा पुष्कळ प्रसन्न आणि हसरा जाणवतो. तो हसतांना त्याचे गाल फुगीर झालेले जाणवतात.

३. त्याच्या डोळ्यांत पुष्कळ प्रीती जाणवते.

४. सूर्यदेव पुष्कळ तारक जाणवला. त्याच्यातील तारक तत्त्व ९० टक्के जाणवले. (सर्वसामान्य मूर्तीमध्ये तारक तत्त्व साधारणतः १० टक्के असते.)

५. ‘सूर्यदेवाच्या पापण्यांची उघड-झाप होत आहे’, असे जाणवले. सूर्याच्या पापण्यांची सूक्ष्मातून उघड-झाप होतांना आपल्या पापण्यांवर संवेदना जाणवतात. त्यांवरून ‘सूर्याच्या पापण्यांची किती वेळा उघड-झाप होत आहे ?’, याची संख्या काढता येते. एका मिनिटात सूर्याच्या पापण्यांची ३२ वेळा उघड-झाप झाली.

६. सूर्यदेवाच्या उजव्या डोळ्याची उघड-झाप अधिक वेळा होतांना जाणवली.

७. सूर्यदेवाच्या डावीकडे किंवा उजवीकडे उभे राहिल्यास त्याचे डोळेच नव्हे, तर संपूर्ण चेहरा आपल्याकडे वळलेला जाणवतो. प्रामुख्याने सूर्याचे नाकही आपल्या दिशेने वळलेले जाणवते.

८. ‘श्री सूर्यदेवाय नमः ।’ हा नामजप करत सूर्याच्या कपाळावरून हनुवटीकडे आपली दृष्टी फिरवली, तर सूर्याचे ओठ आणखी हसतांना जाणवतात, तसेच त्याची हनुवटीही हलतांना जाणवते.

९. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेचे चैतन्य त्याच्या मुखाभोवतीच्या ज्वाळांच्या आकृतीतून प्रक्षेपित होतांना जाणवले.

१०. सूर्यदेवाच्या चेहर्‍याची प्रतिमा हातात घेतल्यावर मला ती पुष्कळ हलकी जाणवली.

११. पेठेत मिळणार्‍या यांसारख्या सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेमध्ये साधारणतः २ टक्के सूर्यदेवाचे तत्त्व असते, तर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील या सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेमध्ये सूर्यदेवाचे तत्त्व २१ टक्के आले आहे.

४ अ १ इ. ९.७.२०२६

१. जुलै २०२६ मध्ये सूर्यदेवाच्या प्रतिमेकडे पाहून पुष्कळ शांत वाटते; कारण सूर्यदेवातील शक्तीची स्पंदने अत्यल्प होऊन त्याच्यातील शांतीची स्पंदने आणि तारक तत्त्व वाढले आहे. प्रतिमेतील शांतीची स्पंदने वाढल्यामुळे सूर्यदेवाच्या चेहर्‍यावरील हास्य पूर्वीपेक्षा न्यून झाल्याचे जाणवते.

२. जून २०२६ मध्ये सूर्यदेवाच्या प्रतिमेमधील सूर्यतत्त्व २१ टक्के होते. आता जुलै २०२६ मध्ये सूर्यदेवाच्या प्रतिमेमधील सूर्यतत्त्वामध्ये वाढ होऊन ते २४ टक्के झाले आहे. त्यामुळे आता प्रतिमेमध्ये आणखी जिवंतपणा जाणवतो.

३. जून २०२६ मधील सूर्यप्रतिमेच्या तुलनेत जुलै २०२६ मधील सूर्यप्रतिमेमध्ये प्रीती ५ टक्क्यांनी वाढून ती २५ टक्के झाली आहे.’

 

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांची निरीक्षणे

४ अ २. सद्गुरु राजेंद्र शिंदे (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

४ अ २ अ. ११.६.२०२६

१. ‘सूर्यदेवाला पहातांना मला पुष्कळ आनंद जाणवत होता. त्याची आनंदाची स्पंदने मोठ्या प्रमाणात माझ्या देहात जात होती.

२. सूर्यदेवाचा चेहरा अतिशय आनंदी, तेजस्वी, समाधानी आणि हसरा झाला असून ‘सूर्यदेवाकडे पहात रहावे’, असे मला वाटले.

४ अ २ आ. २७.६.२०२६

१. सूर्यदेवाच्या डोळ्यांत मला कृतज्ञताभाव जाणवला.

२. सूर्यदेवाच्या डोळ्यांची उघड-झाप होतांना जाणवली आणि ती एका मिनिटात साधारण ३४ वेळा झाल्याचे मला जाणवले.

३. ‘सूर्यदेवाचा उजवा डोळा अधिक वेळा, तर डावा डोळा अल्प वेळा उघड-झाप करतो’, असे माझ्या लक्षात आले.

४. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेसमोर डावीकडे किंवा उजवीकडे, अशा कोणत्याही दिशेने उभे राहिल्यास ‘सूर्यदेवाची दृष्टी आणि चेहरा आपल्या दिशेने फिरत आहे’, असे वाटले.

५. ‘सूर्यदेवाकडे पहात असतांना त्याचे स्मितहास्य वाढते’, असे लक्षात आले. त्याचे स्मितहास्य अत्यंत समाधानाचे वाटते.

६. ‘श्री सूर्यदेवाय नमः ।’ हा नामजप करत सूर्यदेवाच्या कपाळापासून हनुवटीपर्यंत बघत गेल्यावर मला पुढील अनुभूती आल्या.

अ. नामजप करत सूर्यदेवाच्या कपाळापासून खाली बघत ओठांपर्यंत आल्यावर ‘आपले ओठ हसतांना जसे विलग होतात’, तसे सूर्यदेवाचे ओठ विलग झाल्याचे जाणवले.

आ. सूर्यदेवाच्या कपाळापासून हनुवटीपर्यंत येतांना ‘त्याच्या आनंदाचे प्रमाण वाढत जात आहे’, असे लक्षात आले.

इ. मला स्वतःलाही ‘माझा आनंद वाढत जात आहे’, असे जाणवले.’

 

४ आ. पौर्णिमेच्या तुलनात्मक नोंदी

पौर्णिमा जवळ आल्यावर सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत झालेले पालट ! (२९.६.२०२६ या दिवशी पौर्णिमा होती.)

४ आ १. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेली निरीक्षणे

सूर्यदेवाच्या चेहऱ्याची केलेली निरीक्षणे २६.६.२०२६ २७.६.२०२६
(पौर्णिमेच्या २ दिवस आधी)
२८.६.२०२६
(पौर्णिमेच्या आदल्या दिवशी)
१. चेहऱ्यावरील हास्य पुष्कळ थोडे अल्प होणे आणखी थोडे अल्प होऊन चेहरा गंभीर वाटणे
२. डोळ्यांची उघड-झाप (एका मिनिटात) ३२ वेळा आणि केवळ उजव्या डोळ्याची ४१ वेळा आणि केवळ उजव्या डोळ्याची डोळे ध्यानावस्थेत असल्याचे जाणवणे (टीप १)
३. सगुण तत्त्व (टक्के) ३५ ३० (टीप २) १९ (टीप २)
४. मारक तत्त्व (टक्के) १० १३ (टीप २) १५ (टीप २)

 

टीप १ – सूर्यदेवाचे ध्यानावस्थेतील डोळे, म्हणजे तो पौर्णिमेच्या कालावधीत वातावरणात वाढणार्‍या वाईट शक्तींशी निर्गुण स्थितीतून लढतो, ते डोळे.

टीप २ – पौर्णिमेच्या कालावधीत वातावरणात वाढणार्‍या वाईट शक्तींशी सूर्यदेव अधिकाधिक निर्गुण तत्त्व धारण करून, तसेच मारक तत्त्व वाढवून लढतो.

पौर्णिमा, तसेच अमावास्या या तिथींच्या कालावधीत वातावरणातील वाईट शक्तींचा जोर वाढतो; म्हणून सनातनचे साधक या दोन्ही तिथींच्या आधीचे २ दिवस आणि नंतरचे २ दिवस, तसेच त्या तिथींच्या दिवशी वाईट शक्तींचा त्रास होऊ नये; म्हणून प्रार्थना अन् नामजप एरव्हीपेक्षा वाढवतात.’ (२८.६.२०२६)

४ आ २. सद्गुरु राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

अ. २६.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाच्या चेहर्‍यावर पुष्कळ हास्य होते; पण २७.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाच्या चेहर्‍यावरील हास्य आदल्या दिवसापेक्षा अल्प जाणवले, तसेच शक्तीचे प्रमाण वाढल्याचे जाणवले.

आ. याविषयी मी सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘सूर्यदेवाची शक्ती सूक्ष्मातील वाईट शक्तींचे आक्रमण दूर करण्यासाठी कार्यरत झाल्यामुळे असे वाटत आहे. २९.६.२०२६ या दिवशी पौर्णिमा असल्याने २ दिवस आधीपासून वाईट शक्तींचे आक्रमण वाढते. त्यामुळे असे झाले.’ (२८.६.२०२६)

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.६.२०२६)

 

५. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांचे सूक्ष्म ज्ञानाद्वारे केलेले अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

‘माझ्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांमागील शास्त्र सर्वांना कळावे’, यासाठी मी माझी निरीक्षणे सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना सांगितली आणि त्यांना त्याविषयीचे शास्त्र विचारले. लेखातील या भागात मी त्यांना सांगितलेली निरीक्षणे आणि त्यांनी सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे सांगितलेले शास्त्र दिले आहे. अभ्यास म्हणून येथे काही निवडक निरीक्षणे आणि त्यांचे शास्त्र दिले आहे. याचा सविस्तर भाग आगामी काळात याविषयी प्रसिद्ध होणार्‍या ग्रंथात समाविष्ट करण्यात येणार आहे.

५ अ १ अ. शास्त्र – सूर्यदेवाला रामराज्याची चाहूल लागल्यामुळे तो प्रसन्न होऊन प्रेमाने आणि आनंदाने हसत असणे

वर्ष २००० पासून सूक्ष्मातून देवासुर संग्राम चालू आहे. या सूक्ष्मातील धर्मयुद्धात देवसेना अत्यंत निकराने आणि भक्तीभावाने लढत आहे. त्यामुळे या युद्धाच्या शेवटी अधर्माचा पराभव होऊन धर्माचा विजय होणार आहे. नंतर धर्मसंस्थापना होऊन सर्वत्र रामराज्य येणार आहे. या रामराज्याची चाहूल सूर्यदेवतेला लागल्यामुळे तो देवसेनेवर प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपावर्षाव करत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे समष्टी मोक्षगुरु आणि श्रीविष्णूचे अंशावतार आहेत. त्यांच्या सान्निध्यात राहून सूर्यदेवाने त्यांची असीम प्रीती अनुभवली आहे. त्यामुळे त्याचे रूप सौम्य आणि सात्त्विक बनले आहे.

त्रेतायुगात रामायणकाळात प्रभु श्रीराम आणि रावण यांच्यात युद्ध होत असतांना महर्षि अगस्ती यांनी युद्धभूमीवर सूक्ष्मातून जाऊन ‘आदित्य हृदय स्तोत्र’ म्हणून प्रभु श्रीरामाभोवती सूर्यकवच निर्माण केले होते. त्यामुळे रावणाशी युद्ध करत असतांना प्रभु श्रीरामाचे रक्षण झाले, तसेच आता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्म रूप देवासुर संग्रामात सहभागी झाले आहे. आता सप्तर्षींनी ‘सूर्यगायत्री मंत्र’ म्हणून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सूक्ष्म रूपाभोवती दैवी शक्तीने भारित असलेले ‘सूर्यकवच’ निर्माण केले आहे. त्यामुळे देवासुर संग्रामात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्राणांचे रक्षण होत आहे.

सूर्यगायत्री मंत्र

ॐ भास्कराय विद्महे। महद्द्युतिकराय धीमहि । तन्नो आदित्यः प्रचोदयात् ।।

अर्थ : आम्ही भास्कराला (सूर्याचे एक नाव) जाणतो. आम्ही सूर्याचे ध्यान करतो. तो सूर्य आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर पाताळातील वाईट शक्तींनी सूक्ष्मातून आक्रमणे केल्यामुळे त्यांची प्राणशक्ती न्यून होऊन ते अंथरुणाला खिळून आहेत. त्यांच्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यासाठी सूर्यदेव ‘नारायण गायत्री’ हा मंत्र म्हणून त्यांच्यातील सुप्तावस्थेत असलेले विष्णुतत्त्व तेजतत्त्वाच्या स्तरावर जागृत करत आहे. त्यामुळे ‘काही वेळा सूर्यदेवाच्या ओठांची हालचाल होतांना त्याचे दात अथवा जिभेचे टोकही दिसते.’

नारायण गायत्री मंत्र

ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णुः प्रचोदयात् ।।

अर्थ : आम्ही नारायणाला जाणतो. आम्ही वासुदेवाचे ध्यान करतो. तो विष्णु आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.

– सुश्री मधुरा भोसले, सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा

 

६. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेचे केलेले वैशिष्ट्यपूर्ण लोलक-संशोधन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत काळानुसार झालेले सूक्ष्मातील पालट अभ्यासण्यासाठी एप्रिल २०२३ ते जुलै २०२६ या कालावधीतील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेच्या काही निवडक छायाचित्रांचे लोलकाने परीक्षण करण्यात आले. प्रतिमेतील अनुभूतीजन्य स्पंदने, सगुण/निर्गुण तत्त्व आणि तारक/मारक तत्त्व यांचे प्रमाण, तसेच तिची आध्यात्मिक वैशिष्ट्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्मातून अभ्यास करून शोधली आहेत.

टीप १ – लोलकाने केलेले परीक्षण : लोलकाने केलेल्या परीक्षणाद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. लोलकाने परीक्षण करण्यासाठी ज्याचे परीक्षण करायचे तो घटक किंवा त्याचे छायाचित्र, लोलक आणि काही तक्ते यांची आवश्यकता असते. लोलकाने परीक्षण करणारी व्यक्ती सर्वप्रथम इष्टदेवतेला ‘माझ्या भोवती आणि लोलकाच्या भोवती संरक्षककवच निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना करते. त्यानंतर ती लोलकाला दोन प्रश्न विचारते — ‘मी लोलकाने परीक्षण करू शकते का ?’ आणि ‘लोलकाने परीक्षण करण्यासाठी निवडलेले स्थळ आणि वेळ योग्य आहे का ?’ दोन्हींना होकार मिळाल्यावर परीक्षण सुरू होते, विविध तक्त्यांचा (हो/नाही, मीटर/किलोमीटर, आकडे) वापर करून. परीक्षण पूर्ण झाल्यावर व्यक्ती इष्टदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करते.

 

 

सूर्यप्रतिमेच्या स्पंदनांचा प्रकार सूर्यदेवाच्या चेहऱ्याच्या प्रतिमेच्या स्पंदनांचे प्रमाण (टक्के)
एप्रिल २०२३
(छायाचित्र १)
सप्टेंबर २०२४
(छायाचित्र २)
डिसेंबर २०२४
(छायाचित्र ३)
नोव्हेंबर २०२५
(छायाचित्र ४)
जून २०२६
(छायाचित्र ५)
जुलै २०२६
(छायाचित्र ६)
१. अनुभूतीजन्य स्पंदने
अ. शक्ती २२ २० २० २० १९
आ. भाव १३ १० १५ २० २१ २५
इ. चैतन्य २० २५ २० २० २५ २५
ई. आनंद २५ २० २५ २० २५ २५
उ. शांती २० २५ २० २० १० २०
एकूण १०० १०० १०० १०० १०० १००
२. सगुण / निर्गुण तत्त्व
अ. सगुण २५ २० २५ ३० ३५ ४०
आ. निर्गुण ७५ ८० ७५ ७० ६५ ६०
एकूण १०० १०० १०० १०० १०० १००
३. तारक / मारक तत्त्व
अ. तारक ८९ ९० ९० ९० ९० ९४
आ. मारक ११ १० १० १० १०
एकूण १०० १०० १०० १०० १०० १००
४. सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (मीटर) १,१६५ ८,३३० २५,२७० ३०,२५० ४२,५७० ५६,५६०

 

टीप – तुलनेसाठी म्हणून जून २०२६ मध्ये रामनाथी आश्रमातील कलामंदिरात लावलेल्या सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेच्या छायाचित्राचे लोलकाने परीक्षण करण्यात आले. त्या प्रतिमेमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीही नव्हती आणि तिच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ७,५४० मीटर होती.

६ अ १-५. महिना-दर-महिना बदल : सप्टेंबर २०२४ पर्यंत चैतन्य आणि तारक तत्त्व वाढल्याने प्रभावळ ७,१६५ मीटरने वाढली. डिसेंबर २०२४ पर्यंत भाव, आनंद व सगुण तत्त्व वाढल्याने अवघ्या ३ मासांत प्रभावळ १६,९४० मीटरने वाढली. नोव्हेंबर २०२५ पर्यंत भाव आणि सगुण तत्त्व आणखी वाढले. जून २०२६ पर्यंत भाव, चैतन्य आणि आनंद वाढल्याने प्रभावळ ४२,५७० मीटरपर्यंत पोचली. जुलै २०२६ मध्ये भाव आणि शांती, तसेच सगुण व तारक तत्त्व वाढल्याने अवघ्या १ मासात प्रभावळ १३,९९० मीटरने वाढून ५६,५६० मीटर झाली.

६ अ ६. या दोन्ही प्रतिमा स्थुलातून दिसायला एकसारख्याच आहेत; पण त्यांच्यातील सूक्ष्म स्पंदनांमध्ये भेद आहे. त्यामुळे त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीतही भेद आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अस्तित्वाने, तसेच त्यांच्या समष्टी कार्यामुळे त्यांच्या खोलीतील स्पंदने भाव, चैतन्य आणि आनंद यांनी युक्त आहेत. या स्पंदनांचा परिणाम त्यांच्या खोलीतील सर्व वस्तूंवर होतो.

६ अ ७. सनातन संस्थेचे साधक रामराज्य स्थापन होण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली समष्टी साधना करत आहेत. गेली २६ वर्षे साधकांची साधना वाढली. सनातनचे १३३ साधक संतपदी (ऑगष्ट २०२६) विराजमान झाले, तर एक सहस्रांहून अधिक साधकांनी ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठली. ‘गुरुदेवांच्या खोलीतील सूर्यदेवाच्या प्रतिमेच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ होत जाणे’, हे सूर्यदेवाचा कृपाशीर्वाद वाढत गेल्याचेच द्योतक आहे.

६ आ १. योगतज्ञ प.पू. दादाजी यांनी दिलेल्या सूर्यदेवाच्या संस्कारित प्रतिमा एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे कार्य करतात. वातावरणातील वाईट शक्ती सूर्यदेवाच्या या प्रतिमांकडे खेचल्या जाऊन त्यांतील तेजाने नष्ट होतात.

६ आ २. गुरुदेवांचा योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्याप्रती अपार भाव आहे. गुरुदेवांच्या उच्च कोटीच्या भक्तीभावामुळे सूर्यदेवाच्या प्रतिमेतील चैतन्य अधिकाधिक प्रमाणात कार्यरत होत आहे.

योगतज्ञ प.पू. दादाजी यांनी २०.५.२०१९ या दिवशी नाशिक येथे देहत्याग केला. आता स्थूलदेहाने जरी ते आपल्यात नसले, तरी त्यांचे निर्गुण रूप (चैतन्यमय सूक्ष्म अस्तित्व) गुरुदेव, त्यांनी निर्मिलेले आश्रम आणि सर्व साधक यांच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत आहे. परम कृपाळू योगतज्ञ प.पू. दादाजी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ) आणि सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.७.२०२६)

 

७. सामूहिक सूक्ष्म-प्रयोग

सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेविषयी करण्यात आलेला सूक्ष्मातील प्रयोग !

‘२७.६.२०२६ या दिवशी माझ्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेविषयी प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात एकूण १० साधक आणि २ संत सहभागी झाले होते. या प्रयोगाच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे सारणी स्वरूपात पुढे दिली आहेत.

किती जणांना जाणवले ? (संख्या)
साधक संत
१. सूर्यप्रतिमेकडे पाहून कसे वाटले ? चांगले १०
त्रासदायक
२. सूर्यदेवाच्या चेहऱ्यावरील भाव स्मिसहास्य
आनंद
३. सूर्यदेवाच्या डोळ्यांकडे पाहून काय जाणवले ? प्रेम
कृतज्ञता
शरणागतभाव
४. सूर्यदेवाचे हास्य बघून काय जाणवले ? प्रेम
सजीवता
आनंद
शांती
५. सगुण तत्त्व अधिक जाणवते कि निर्गुण तत्त्व ? सगुण तत्त्व
निर्गुण तत्त्व
६. तारक तत्त्व अधिक जाणवते कि मारक तत्त्व ? तारक तत्त्व १०
मारत तत्त्व
७. प्रामुख्याने कोणत्या प्रकारची स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे जाणवते ? भाव
चैतन्य
आनंद
शांती
८. सूर्यदेवाच्या कुठल्या अवयवाची हालचाल होतांना जाणवते ? डोळे आणि ओठ १०
अन्य

 

निष्कर्ष : या प्रयोगातून स्पष्ट होते की, सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेतील पालट केवळ मलाच नव्हे, तर सनातनचे संत आणि साधक यांनाही जाणवले.

८. समारोप

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूर्यदेवाची उपासना केलेली नसतांनाही त्यांना त्याच्या सगुण रूपाच्या संदर्भातील आलेल्या विविध अनुभूती

सर्वसाधारणतः कोणत्याही देवतेची कठोर उपासना केल्यावर ती देवता प्रसन्न होते आणि त्यानंतर तिच्या सगुण रूपाच्या संदर्भातील अनुभूती येतात; परंतु मी कधीही सूर्यदेवाची उपासना केलेली नाही, तरीही माझ्या देवघरात ठेवलेल्या त्याच्या प्रतिमेमधून मला प्रतिदिन त्याच्या सगुण रूपाच्या संदर्भातील विविध अनुभूती येत आहेत. याचा अर्थ इतर वेळी प्रथम भक्ताने देवाकडे पाऊल टाकल्यावर देव पुढे येतो; पण आता देवाने प्रथम भक्ताकडे पाऊल टाकल्याचे उदाहरण मी अनुभवत आहे. त्याच्याकडून येणार्‍या या अनुभूतींनंतर आता मी प्रतिदिन त्याचे निरीक्षण करतो, त्याचा नामजप करतो आणि त्याला नमस्कार करतो.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

Leave a Comment