अनुक्रमणिका
- भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री धर्माचे पालन आणि साधनेचे महत्त्व ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
- १. स्त्री धर्म म्हणजे काय ?
- राजमाता जिजाऊंचे संस्कार, हा नारीशक्तीसाठी आदर्श !
- २. कुंकू लावणे आणि अलंकार (दागिने) परिधान करण्याचे आध्यात्मिक महत्त्व
- ३. कुलदेवतेचे महत्त्व आणि तिचा नामजप
- ४. ‘लव्ह जिहाद’पासून मुलींच्या रक्षणासाठी उपाय
- ५. धर्मशिक्षणासाठी आवाहन
- धर्माचरण आणि साधना यांद्वारे स्वतःतील दुर्गातत्त्व जागृत करा ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
- १. नारीशक्ती आणि साधनेचे महत्त्व
- २. अखंड नामजप आणि खरे सौंदर्य
- ३. सात्त्विक कुंकवाचे महत्त्व
- ४. केस मोकळे सोडण्याचे आणि कापण्याचे दुष्परिणाम
- ५. पारंपरिक वेशभूषा
- ६. अलंकार
- ७. दुर्गातत्त्वाची जागृती
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री धर्माचे पालन आणि साधनेचे महत्त्व ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
रायपूर (छत्तीसगड) येथे ‘शदाणी दरबार’च्या वतीने २० जुलै २०२६ या दिवशी ‘नारीशक्ती संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या लेखातील मार्गदर्शन सूत्रे केवळ सिंधी समाजातील बंधू भगिनींसाठी नसून ती सूत्रे आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहेत. या भावाने लेख वाचून त्यातील सूत्रे आचरणात आणून गुरुकृपेला पात्र होऊया.

१. स्त्री धर्म म्हणजे काय ?
भगवान श्रीकृष्ण, शदाणी दरबाराची गुरुपरंपरा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन ! आज पूज्य माता साहिब हासीदेवीजी यांचे स्मरण करत आपण भारतीय संस्कृतीतील ‘नारीशक्ती’चे वास्तविक स्वरूप आणि वर्तमान काळातील स्वतःची कर्तव्ये यांवर विचार करू.
आपल्या सनातन संस्कृतीत स्त्रीला ‘गृहलक्ष्मी’ आणि ‘शक्ती’ यांचे स्वरूप मानले गेले आहे. स्त्री-धर्माचा अर्थ ‘केवळ घरातील कामे करणे’, हा नाही, तर ‘स्वतःचे आचरण, त्याग आणि संस्कार यांनी संपूर्ण कुटुंबाला धर्माच्या मार्गावर चालवणे’, हा आहे. कुटुंब संस्थेचा पाया एक स्त्रीच असते. एक पुरुष घर बांधतो; परंतु एक स्त्री तिचे चैतन्य आणि भक्ती यांद्वारे त्याला ‘मंदिर’ बनवते. स्त्री धर्माची काही सोपी आणि व्यावहारिक उदाहरणे समजून घेऊया.
१ अ. सात्त्विक दिनचर्या
सकाळी लवकर उठून घरात स्वच्छता करणे, दिवा लावणे आणि घरातील वातावरण पवित्र बनवणे.
१ आ. भावपूर्ण भोजन बनवणे
स्वयंपाक करतांना ईश्वराचा नामजप करणे. जेव्हा आई नामजप करत स्वयंपाक करते, तेव्हा ते केवळ अन्न रहात नाही, तर कुटुंबासाठी ‘प्रसाद’ बनतो, ज्यामुळे मुलांचे विचार सात्त्विक होतात.
१ इ. संस्कार देणे
मुलांना केवळ भौतिक शिक्षण न देता त्यांना हिंदु परंपरा, संत आणि ‘शदाणी दरबार’च्या अनमोल विचारांशी जोडणे.
२. कुंकू लावणे आणि अलंकार (दागिने) परिधान करण्याचे आध्यात्मिक महत्त्व
आजकाल आधुनिकतेच्या अंध शर्यतीत अनेक हिंदु भगिनी कपाळावर कुंकू (टिकली) लावण्यास आणि पारंपरिक दागिने घालण्यास संकोच करतात. सनातन संस्थेने केलेल्या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक संशोधनानुसार स्त्रीचा हा शृंगार केवळ सौंदर्यासाठी नाही, तर ते तिचे ‘आध्यात्मिक सुरक्षा कवच’ आहे.
२ अ. कुंकू लावणे
कपाळाच्या मध्यभागी ‘आज्ञाचक्र’ असते. जेव्हा आपण तिथे शुद्ध कुंकू लावतो, तेव्हा आपली एकाग्रता वाढते. कुंकवामुळे सात्त्विक स्पंदने आकर्षित होतात आणि ते महिलांच्या आतील शक्ती (दुर्गातत्त्व) जागृत करते. हे नकारात्मक ऊर्जेपासून आपले रक्षण करते.
२ आ. सुवर्ण आणि रजत अलंकार
सोने आणि चांदी केवळ धातू नाहीत. सनातन धर्मानुसार सोन्याच्या दागिन्यांमधून ‘तेजतत्त्व’ आणि ‘चैतन्य’ मिळते. मंगळसूत्र, बांगड्या आणि पैंजण हे शरिराभोवती एक सुरक्षाकवच निर्माण करतात, ज्यामुळे वातावरणातील अनिष्ट शक्ती स्त्रीला प्रभावित करू शकत नाहीत.
म्हणूनच भगिनींनो, स्वतःचा पारंपरिक शृंगार अभिमानाने परिधान करा. ही आपली ओळखही आहे आणि आध्यात्मिक शक्तीही.
३. कुलदेवतेचे महत्त्व आणि तिचा नामजप
शदाणी दरबार हे एक महान आध्यात्मिक पीठ आहे, जिथे संत शदाराम साहिबजी यांच्या दिव्य गुरुपरंपरेचे अनमोल चैतन्य आपल्याला निरंतर मिळते. भगवान झुलेलाल आपले इष्टदेव आहेत. या सर्वांच्या कृपेसमवेतच स्वतःची आध्यात्मिक उन्नती आणि कौटुंबिक सुरक्षेत आणखी एका शक्तीचे मोठे योगदान असते ती, म्हणजे आपली कुलदेवी किंवा कुलदेवता.
ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला हिरवेगार ठेवण्यासाठी त्याच्या मुळांना पाणी देणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचे (कुळाचे) मूळ आपली कुलदेवी असते. जेव्हा आपल्यावर कोणतेही व्यावहारिक किंवा आध्यात्मिक संकट येते, तेव्हा सर्वांत आधी आपली कुलदेवीच धावून येऊन आपले रक्षण करते. ती आपल्या कुटुंबाभोवती एक सुरक्षाकवच निर्माण करते. म्हणूनच प्रतिदिन घरातील सर्व सदस्यांनी, विशेषतः महिलांनी किमान १ ते २ घंटे आपल्या कुलदेवतेचा नामजप नक्की करावा (उदा. ‘श्री कुलदैव्ये नमः’ किंवा जो काही तुमच्या कुळाचा नियम असेल).
४. ‘लव्ह जिहाद’पासून मुलींच्या रक्षणासाठी उपाय
आज आपण पहात आहोत की आपल्या हिंदु मुलींना एका सुनियोजित कटांतर्गत प्रेमाच्या जाळ्यात अडकवले जात आहे, ज्याला ‘लव्ह जिहाद’ म्हटले जाते. आपल्या भोळ्याभाबड्या मुली हिंदु संस्कृतीच्या अज्ञानामुळे ओळख लपवून येणार्या षड्यंत्रकार्यांच्या जाळ्यात अडकतात आणि नंतर त्यांचे जीवन नरक बनते. यापासून हिंदु मुलींना वाचवण्यासाठी आपल्याला ‘सजग माता’ बनावे लागेल.
४ अ. मुलींच्या मैत्रिणी बना !
आपल्या मुलींशी असा संवाद ठेवा की, त्या घराबाहेरील प्रत्येक गोष्ट तुमच्याशी न घाबरता आदान-प्रदान (शेअर) करतील. जर त्या काही चुकीचे करत असतील, तर रागाने नाही, तर प्रेमाने आणि समजूतीने त्यांना सत्य सांगा.
४ आ. धर्मशिक्षण द्या !
जी मुलगी स्वतःचा हिंदु धर्म, शौर्यशाली इतिहास आणि संस्कृतीचा गौरव जाणते, ती कधीही कोणत्याही अन्य धर्मियांच्या फसवणुकीमध्ये अडकू शकत नाही. त्यांना बालपणापासूनच आपल्या वीर आणि वीरांगना यांच्या कथा ऐकवा.
४ इ. सतर्कता बाळगा !
मुलींचे भ्रमणभाष संच, समाजमाध्यमांची खाती आणि तिची मित्रमंडळी यांवर माता-पित्यांचे लक्ष असले पाहिजे. ही हेरगिरी नाही, तर आई-वडिलांचे सुरक्षेचे कर्तव्य आहे.
४ ई. स्वरक्षणाचे प्रशिक्षण द्या !
मुलींना केवळ कोमल नाही, तर राणी लक्ष्मीबाईंप्रमाणे निडर बनवा. त्यांना आत्मरक्षणाचे धडे नक्की शिकवा.
५. धर्मशिक्षणासाठी आवाहन
सध्या आपण एका अत्यंत कठीण कालखंडातून जात आहोत. समाजात तणाव आणि अधर्म वाढत आहे. हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी स्वतःला ‘धर्मशिक्षित’ व्हावे लागेल. जोपर्यंत आपण हिंदु धर्माचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण आपल्या पुढच्या पिढीला संस्कार देऊ शकणार नाही. याच उद्देशाने सनातन संस्थेद्वारे नियमितपणे ‘ऑनलाईन’ आणि प्रत्यक्ष ‘सत्संग’ आयोजित केले जातात, जिथे साधना अन् अध्यात्माचे सोपे मार्गदर्शन मिळते. यासह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिला आणि युवती यांच्यासाठी विशेष ‘धर्मशिक्षण वर्ग’ घेतले जातात, जिथे आपण हिंदु धर्माचे आचरण कसे करावे ? लव्ह जिहादसारख्या आव्हानांपासून कसे वाचावे ? आणि स्वरक्षण कसे करावे ? हे शिकवले जाते. माझे सर्व माता-भगिनींना नम्र आवाहन आहे की, जेव्हा आपण धर्मशिक्षित होऊ, तेव्हाच आपण एका सशक्त हिंदु समाजाची निर्मिती करू शकू.
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन संस्था
धर्माचरण आणि साधना यांद्वारे स्वतःतील दुर्गातत्त्व जागृत करा ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

पवित्र शदाणी दरबाराच्या पावन भूमीला माझा कोटी-कोटी प्रणाम ! शदाणी दरबाराचे नववे पीठाधीश्वर, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज यांच्या पावन चरणी माझे विनम्र वंदन ! पूज्य माता साहिब हासीदेवीजी हे केवळ एक नाव नसून साक्षात् भक्ती, सेवा आणि नारीशक्ती यांचा अद्भुत संगम आहेत. त्यांच्या पावन स्मरणानेच मनात एका अलौकिक शक्तीचा संचार होतो.
भारतीय संस्कृतीत स्त्रीला कधीही ‘अबला’ किंवा ‘कमकुवत’ मानले गेले नाही; ती तर साक्षात् ‘शक्ती’चे स्वरूप आहे. आज आपण येथे त्याच दुर्गाशक्ती आणि आत्मबल यांना पुन्हा जागृत करण्यासाठी एकत्र आलो आहोत.
१. नारीशक्ती आणि साधनेचे महत्त्व
प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणात एक शक्ती विराजमान असते, जी साक्षात् दुर्गादेवीचे (जगतपालिकेचे) स्वरूप आहे; मात्र या शक्तीची जाणीव आपल्याला ‘साधना’ केल्यावरच होते. साधना, म्हणजे मन, बुद्धी आणि शरीर यांची शुद्धी होय. साधनेने आपण मुलांवर चांगले संस्कार करू शकतो.
२. अखंड नामजप आणि खरे सौंदर्य
गुरूंनी किंवा संप्रदायाने दिलेला नामजप अखंडपणे करायला हवा. यामुळे देहशुद्धी होते आणि स्त्रीमधील ‘नारीतत्त्व’ जागृत होऊन तिच्या मुखमंडलावर तेज निर्माण होते. आजकाल स्त्रिया जो बाह्य ‘मेकअप’ (सौंदर्यवर्धन) करतात, तो केवळ ६ ते ७ घंटे टिकतो; परंतु साधनेमुळे चेहर्यावर जी आभा आणि तेज निर्माण होते, तो ईश्वराचा ‘मेकअप’ असतो.
३. सात्त्विक कुंकवाचे महत्त्व
हळदीपासून बनवलेले सात्त्विक कुंकू लावल्याने (हळद म्हणजे पृथ्वीतत्त्व आणि कुंकू म्हणजे तेजतत्त्व) स्त्रीचे मुखमंडल २४ घंटे तेजस्वी रहाते. सात्त्विक कुंकू लावून ईश्वरीतत्त्वाची अनुभूती घ्या !
४. केस मोकळे सोडण्याचे आणि कापण्याचे दुष्परिणाम
सध्या महिला केस मोकळे सोडतात. पूर्वी महिला केसांचा अंबाडा (जुडा) बांधायच्या. केस मोकळे सोडल्यामुळे स्त्रीच्या शक्तीचा व्यय (र्हास) होतो आणि तिच्या देहात शक्ती उरत नाही. यामुळे अनिष्ट आणि नकारात्मक शक्तींचे आक्रमण होते आणि देह अशुद्ध होतो. त्यामुळे पूर्वीच्या काळाप्रमाणे केसांचा अंबाडा बांधावा, तसेच स्त्रियांनी केस कापू नयेत; कारण केस कापल्याने नकारात्मक स्पंदने शरिरात प्रवेश करतात.
५. पारंपरिक वेशभूषा
शर्ट-पँट किंवा इतर आधुनिक कपडे यांपेक्षा साडी परिधान केलेल्या स्त्रीची आभा (ऑरा) पुष्कळ सात्त्विक असते. पारंपरिक वेशभूषेत स्त्री साक्षात् देवीसमान दिसते, ज्यामुळे कोणतीही अनिष्ट शक्ती तिची टिंगल करू शकत नाही. घरातील मुलांना आपण हेच चैतन्याचे संस्कार दिले पाहिजेत.
६. अलंकार
ऑक्सिडाईज्ड (काळ्या धातूच्या) बांगड्या घालू नयेत; कारण त्यातून नकारात्मक स्पंदने येतात.
सनातन संस्थेने केशभूषा, वेशभूषा, अलंकारशास्त्र, आचारधर्म यांसारख्या विषयांवर ३७१ ग्रंथ प्रकाशित केले आहेत, ते वाचून प्रत्यक्ष विषयाचे शास्त्र जाणून घ्या आणि ते कृतीत आणा.
७. दुर्गातत्त्वाची जागृती
प्रत्येक स्त्रीने मन आणि बुद्धी यांच्या शुद्धीसाठी अखंड साधना करून स्वतःचे तेज वाढवावे, जेणेकरून तिच्यातील दुर्गादेवीचे तत्त्व प्रकट होईल, ती दुष्प्रवृत्तींचा नाश करील आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करील. आज आपण साधना आणि धर्माचे आचरण करण्याचा संकल्प करूया अन् स्वतःतील दुर्गादेवीचे तत्त्व आहे, ते जागृत करूया.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातन संस्था

हिंदु धर्मामध्येच स्त्री-पुरुषांना समान मान !
सक्षम अन् कणखर असलेली प्राचीन स्त्री आणि अबला आधुनिक स्त्री !
सीता हीच भारतीय स्त्रीत्वाचा आदर्श आहे ! – स्वामी विवेकानंद
प्रसंगी क्षात्रधर्म अंगीकारणार्या हिंदु स्त्रिया !
हिंदु नारींनो, हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कृतीशील व्हा !
महिलांनो जीवनमूल्ये समजून घ्या !