नामकरण

Article also available in :

Namkaran_666

 

१. उद्देश

अ. ‘लहान मुलाला ओळखता येण्यासाठी

अा. बालकाचे बीज आणि गर्भ यांपासून झालेल्या पापाचे क्षालन, आयुष्याची वाढ व इतर सर्व व्यवहार  सिद्ध होण्यासाठी आणि परमेश्वराशी प्रीती निर्माण होण्यासाठी

 

२. जन्मनाव आणि व्यावहारिक नाव

संध्येच्या वेळी मुलाला आपल्या जन्मनावाचा उच्चार करावा लागतो. तसेच जन्मपत्रिका बनवण्यासाठीही जन्मनावाची आवश्यकता असते. कोणत्याही विधीच्या वेळी जन्मनाव घेतले जाते. बाकी व्यवहारासाठी व्यावहारिक नाव प्रचलित असते.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

३. नामकरणाचा संकल्प आणि विधी

३ अ. नामकरणाचा संकल्प

या दिवशी असा संकल्प करतात – ‘या माझ्या बालकाच्या बीज आणि गर्भ यांपासून झालेल्या पापाचे क्षालन, आयुष्याची वाढ, इतर सर्व व्यवहार सिद्ध होण्यासाठी आणि श्री परमेश्वराच्या प्रीतीकरिता मी हा नामकरणसंस्कार करतो. त्याचे अंगभूत श्री गणपतिपूजनपूर्वक पुण्याहवाचन, मातृकापूजन आणि नांदीश्राद्ध करतो.’

३ आ. नामकरण विधी

३ अा १. नामकरण संस्काराचे शास्त्र : शास्त्रानुसार मुलाचे किंवा मुलीचे नामकरण ११व्या, १२व्या किंवा १३व्या दिवशी करावे. या दिवसांत नामकरण करण्यासाठी स्त्री शुद्ध असते. नामकरण करतांना श्री गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, होम करतात आणि कांस्यपात्रात तांदूळ घालून त्यावर मुलाचे नाव लिहितात. (जातकर्म, नामकरण, तसेच बालकाला जन्मवेळी नक्षत्र किंवा योग यांची शांती असल्यास, ते कर्म करण्याकरिता स्त्री शुद्ध असते; पण इतर कोणतेही देवकर्म करायचे असेल, तर शास्त्राप्रमाणे मुलगा झाल्यास ३० दिवसांनंतर आणि मुलगी झाल्यास ४० दिवसांनंतर स्त्री शुद्ध होते.)

३ अा २. नामकरण संस्काराच्या रूढी : नामकरण संस्काराच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. मुलाचे १२ वे दिवशी आणि मुलीचे ११ वे दिवशी बारसे करण्याची (नामकरण विधी) रूढी असून काही कुळांत ४० दिवसांनंतर बारसे करण्याची पद्धत आहे. मुलाच्या बारशाच्या वेळी आईने कुलदेवतेची पूजा करून तिची प्रार्थना करून नामकरणाची रूढी आहे.

३ अा ३. पालकारोहण (मुलाला पाळण्यात घालणे) : जन्मदिवसापासून बाराव्या किंवा तेराव्या दिवशी पालकारोहण हा विधी करतात. त्या वेळी पालकारोहण (मुलाला पाळण्यात घालणे) हा महत्त्वाचा विधी असतो.

३ अा ४. पाळणागीत : मुलाला पाळण्यात घालतांना (पालकारोहण विधीच्या वेळी) पाळणागीत म्हणण्याची पद्धत आहे. अशा शुभ प्रसंगी देवतांची पाळणागीते म्हटल्यामुळे वातावरण सात्त्विक बनते; परंतु आजकाल समाजात सिनेमातील अभिनेत्यांची नावे असलेले पाळणागीत म्हणण्याची चुकीची प्रथा रूढ होत आहे. सात्त्विक पाळणागीताचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

 

४. नावाची निवड कशी करावी ?

अ. देवतेचे नाम आणि मानवाचा नामकरणविधी यांतील नावाचे महत्त्व

देवतेचे नाम हे देवतेच्या रूपातील स्पंदनांशी मिळतेजुळते असते, तर मानवातील तसे नसते. मानवाचे नाव त्याच्या रूपातील स्पंदनांशी मिळतेजुळते व्हावे, यासाठी नावाची निवड कशी करावी, हे शास्त्रात सांगितले आहे.

आ. बालकास जे नाव द्यायचे ते पुढील नियमान्वये दिलेले असावे

नामाचे प्रथम अक्षर घोष (मृदूूवर्ण) अर्थात ककारादी पंचवर्गाचे प्रारंभीचे दोन दोन वर्ण वगळून बाकीच्या ग घ ङ ज झ ञ ड ढ ण द ध न ब भ म आणि य र ल व या एकोणीस वर्णांपैकी असावे. ककारादी पंचवर्गाचे प्रथम दोन दोन वर्ण म्हणजे क ख च छ ट ठ त थ आणि प फ. हे वर्ण पृथ्वी आणि आपतत्त्वप्रधान तसेच तमोगुणप्रधान असल्याने नामाचे प्रथम अक्षर त्यांपैकी नसावे.

इ. अंत्य अक्षर दीर्घ किंवा विसर्गयुक्त असावे.

र्‍हस्व अक्षरे शक्तीप्रधान आणि दीर्घ किंवा विसर्गयुक्त अक्षरे शिवप्रधान असतात. अध्यात्माचा उद्देश शिवतत्त्वाशी एकरूप होणे हा असल्याने असा नियम आहे.

र्इ. बालकाचे नाव दोन किंवा चार अक्षरांचे असावे.

उदा. भद्र, देव, देवदत्त, भव, भवनाथ, नागदेव इत्यादी, तर बालिकेचे नाव विषम अक्षरसंख्येचे म्हणजे
३-५-७ इतक्या अक्षरांचे असावे. विषम संख्येची अक्षरे शक्तीप्रधान आहेत, तर सम संख्येची अक्षरे शिवप्रधान आहेत.

उ. स्त्रियांच्या नावात आद्याक्षराचे द्वित्व असू नये.

स्त्रिया शक्तीप्रधान असतात. आद्याक्षरातील द्वित्व पुरुषप्रधान होते; म्हणूनच आद्याक्षराचे द्वित्व असल्यास स्त्रीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते.

ऊ. दोन अक्षरांचे नाव

मुलाची कीर्ती व्हावी, अशी इच्छा असल्यास दोन अक्षरांचे नाव ठेवावे.

ए. चार अक्षरांचे नाव

ब्रह्मवर्चसाची, अध्ययन आणि आचार यांच्या समृद्धीची इच्छा असल्यास चार अक्षरांचे नाव ठेवावे. चार अक्षरे ही धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांची प्रतिके आहेत.

एे. नावांचे परिणाम मानवी मन, व्यवहार आणि जीवन यांवर होतात. भारतीय मानसशास्त्र तसे ठासून सांगते.

मंगल्यं ब्राह्मणस्य स्यात् क्षत्रियस्य बलान्वितम् ।
वैश्यस्य धनसंयुक्तं शूद्रस्य तु जुगुप्सितम् ।।
शर्मवत् ब्राह्मणस्य स्यात् राज्ञो रक्षासमन्वितम् ।
वैश्यस्य पुष्टिसंयुक्तं शूद्रस्य प्रेष्यसंयुतम् ।।
स्त्रीणां सुखोद्यमक्रूरं विस्पष्टार्थं मनोहरम् ।
मंगल्यं दीर्घवर्णान्तम् आशीर्वादाभिधानवत् ।। – मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ३१ ते ३३

अर्थ : मुलाचे नाव ठेवतांना ब्राह्मणासाठी मंगलवाचक अर्थ असणारी नावे ठेवावीत. क्षत्रियाच्या नावात सामर्थ्यसूचक, वैश्याच्या नावात संपत्तीसूचक आणि शूद्राच्या नावात सेवकपणाचा भाव असावा. ब्राह्मणाचे नाव ‘शर्म’ शब्दाने युक्त असावे. क्षत्रियाच्या नावात रक्षणवाचक शब्दांचा उपयोग करावा. वैश्याच्या नावात समृद्धीवाचक शब्द असावेत आणि शूद्राच्या नावात आश्रिततासूचक (दास्यसूचक) शब्दांचा उपयोग करावा. स्त्रियांचे नाव उच्चारण्यास सुखावह, क्रूरतादर्शक अर्थाचा अभाव असणारे, सहज समजेल असे, मनोहर, मंगल, शेवटचे अक्षर दीर्घस्वर असलेले आणि आशीर्वाद शब्दाने युक्त असे ठेवावे.

(‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’ या नियमाला अनुसरून नाव ठेवण्याची मनूने सांगितलेली पद्धत किती शास्त्रीय होती, हे वरील मुद्यावरून लक्षात येते. – संकलक)

ब्राह्मणांच्या नावापुढे ‘शर्म’, क्षत्रियांच्या नावापुढे ‘वर्म’, वैश्यांच्या नावापुढे ‘गुप्त’ आणि शूद्रांच्या नावापुढे ‘दास’ हे पद लावून नाव ठेवण्याची वहिवाट पूर्वी होती. त्यामुळे नावावरूनच वर्णाचा बोध होत असे.

आे. मुलाचे नाव ठेवतांना ते स्वतःच्या आवडीप्रमाणे ठेवू नये, तर नक्षत्रचरण अक्षरानुसार आध्यात्मिक अर्थ असलेले ठेवावे, उदा. चैतन्य, भक्ती, कृपा.

 

५. नामांचे  प्रकार

‘खालीलपैकी ज्या नक्षत्रावर शिशूचा जन्म झाला त्यावरून नाक्षत्रनाम, ज्या मासात जन्म झाला त्यावरून मासनाम, कुलदेवतेवरून ठेवलेले नाव आणि व्यावहारिक नाव, असे नावांचे चार प्रकार प्रचलित आहेत.

अ. नाक्षत्रनाम

अश्विन्यादी सत्तावीस नक्षत्रांच्या तितक्याच अधिष्ठात्री देवता मानलेल्या आहेत. त्या देवतांवरून मुलाचे नाक्षत्रनाम ठेवावे असे शंख-लिखित सांगतात, उदा. अश्विनीवरून अश्विनीकुमार. नाक्षत्रनामाचा दुसरा एक प्रकारही रूढ आहे. प्रत्येक नक्षत्राचे चार चरण मानून त्या प्रत्येक चरणाला एकेक अक्षर दिलेले असते, उदा. अश्विनी – चू चे चो ला, भरणी – ली लू ले लो इत्यादी. मुलाचा जन्म नक्षत्राच्या ज्या चरणावर झाला असेल, त्या चरणाच्या अक्षरावरून त्याचे नाक्षत्रनाम ठेवले जाते, उदा. अश्विनी प्रथम चरण – चूडेश्वर, भरणी प्रथम चरण – लीलेश्वर किंवा लीलादेव इत्यादी. बौधायनाच्या मते नाक्षत्रनाम गुुह्य असावे. ‘हे नाव मुलाच्या जन्मदिवशीच ठेवावे, ते केवळ मातापित्यांनाच ज्ञात असावे आणि उपनयनाच्या वेळी गुरूंना अभिवादन करतांना त्याचा उच्चार व्हावा’, असे कित्येक आचार्य सांगतात; पण सांप्रत हे नाव उपनयनाच्या वेळी ठेवण्याची प्रथा आहे. या नामाविषयी गुप्तता राखण्याचे उदि्दष्ट, ‘एखाद्या शत्रूला त्या नामावरून त्या शिशूवर जारणमारणादी अभिचारकर्म करता येऊ नये’, हे असते.

आ. मासनाम

मासनाम हे त्या त्या मासाच्या अधिष्ठात्री देवतेवरून ठेवले जाते. गर्गऋषींच्या मताप्रमाणे मार्गशीर्ष मास प्रथम धरून बारा मासांच्या बारा देवता पुढीलप्रमाणे आहेत – १. कृष्ण, २. अनंत, ३. अच्युत, ४. चक्री, ५. वैकुंठ, ६. जनार्दन, ७. उपेंद्र, ८. यज्ञपुरुष, ९. वासुदेव, १०. हरि, ११. योगीश आणि १२. पुंडरीकाक्ष. ही सर्व नावे विष्णूची आहेत. त्यावरून वैष्णव संप्रदाय भारतात प्रतिषि्ठत झाल्यावर, अर्थात सूत्रकालाच्या नंतर मासनाम नाव ठेवण्याची पद्धत रूढ झाली असावी.

इ. कुलदेवतानाम

हे नाव ठेवतांना कुलाची जी देवता असेल, तिच्या नावापुढे दास, शरण इत्यादी उपपदे लावून हे नाव ठेवतात. कुलदेवता किंवा इष्टदेवता स्त्रीलिंगी असली, तरी ते स्त्रीलिंगीच नाव मुलाला ठेवण्याची काही ठिकाणी पद्धत आहे. अशा वेळी त्या स्त्रीवाचक नामापुढे ‘जी’ हे उपपद लावून ते पुरुषवाचक बनवतात, उदा. शिवाईवरून शिवाजी, बनशंकरीवरून बनाजी, भवानीवरून भवानजी.

ई. लौकिकनाम

हे नाव सामाजिक व्यवहारासाठी ठेवलेले असते आणि तेच महत्त्वपूर्ण असते. हे नाव मुख्यत्वे कुलाची संस्कृती आणि प्रतिष्ठा यांना साजेसे ठेवण्याची किंवा मंगलकारक, उच्चारणसुलभ आणि श्रुतीसुखद असे ठेवण्याची पद्धत आहे.

उ. राशीनुसार नाम

हे नाव ठेवण्याच्या दोन पद्धती आहेत.

१. चंद्रराशीनुसार : जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असेल, त्यानुसार नामाचे पहिले अक्षर असते, उदा. जन्मवेळी चंद्र वृषभ राशीत असेल, तर नामाचे प्रारंभीचे अक्षर ब, व किंवा उ असते, जसे, ब्रिजेश, वसंत, उमेश.

२. सूर्यराशीनुसार : जर बाळाचा जन्म १२ मार्चला झाला, तर त्याची सूर्यराशी मीन असते. अशा वेळी चंद्रराशी वृषभही असू शकेल.

ऊ. इतर

१. कुत्सितनाम : कुत्सित म्हणजे तुच्छतादर्शक होय. एखाद्याची मुले जगत नसतील, तर अशा वेळी जन्मलेल्या मुलाला एखादे तुच्छतादर्शक नाव ठेवावे, अशी लौकिक प्रथा आहे, उदा. दगडू, धोंडू, भिकू इत्यादी. असे नाव ठेवल्याने ते मूल जगेल आणि त्याचे आयुष्यही वाढेल, अशी त्यामागची लोकधारणा आहे.

२. आदिवासींमधील नाम : पूर्व भारतातल्या वन्य जमाती आपल्या मृत पूर्वजाचे नाव मुलाला ठेवतात. ‘त्या पूर्वजाचा आत्मा नवजात बालकात संक्रांत झालेला असतो’, अशी त्यांची समजूत असते. काही वन्य जमातींत मूल ज्या झाडाखाली जन्मले असेल, त्या झाडाचे किंवा जवळच्या डोंगराचे नाव मुलाला ठेवतात. काही जातींत वारांवरूनही मुलाचे नाव ठेवण्याची पद्धत आहे, उदा. सोमा, बुधा, शुक्रया इत्यादी.’

३. अध्यात्मशास्त्रानुसार  नाव : बाळाचे लिंग हे जसे बाळ गर्भाशयात असतांनाच ठरलेले असते, तसेच बाळाचे नावही आधीच ठरलेले असते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे घटक एकत्र असतात; म्हणूनच बाळाचे जे रूप आहे, त्यानुसार त्याचे नावही असते. केवळ ते आपल्याला ज्ञात नसते, उन्नतांना ज्ञात असते. कोणी उन्नत ज्ञात नसल्यास अनुरूप नाव कोणते, याचे मार्गदर्शन ज्योतिषशास्त्र करू शकते. ‘व्यक्तीचे नाव घेतल्यावर ते नाव त्याच्या केवळ शरिराचे नसते, तर आत्मचैतन्याधिषि्ठत शरिराचे असते.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

 

६. विधी आणि चार नावे

यजमानाने पुरोहितांस उद्देशून, ‘हे पुरोहितहो, बालकाचे अमुक नाम मी ठेवतो’ यासाठी अनुमोदन घ्यावे. पुरोहितासारख्या उन्नताने संमती दर्शविल्याने बाळाचे नाव आणि रूप एक व्हायला साहाय्य होते.

अ. पहिले नाव

काशाच्या ताटात तांदूळ पसरून त्यांवर सोन्याच्या सळईने ‘अमुक (कुलदेवतेचे नाव) कुलदेवताभक्त’, असे लिहावे. नंतर जन्मकालाच्या मासाचे नाव (मासनाम) लिहावे.

आ. दुसरे नाव

ज्या नावाने नमस्कार करावयाचा ते नाव (ज्या नावाने मुलाच्या वतीने त्याचे वडील पुरोहितांना नमस्कार करतात, ते नाव.) हळूच उच्चारावे. ते नाव उपनयन होईपर्यंत आई-वडिलांनीच जाणावे. इतरांना ते नाव कळू नये. यातला उद्देश हा की, करणी आदी करणार्‍यांना खरे नाव न कळल्यास ते करणी करू शकत नाहीत. उपनयनानंतर मुलाला ‘अमुक नावाने तू नमस्कार कर’, असे म्हणून ते नाव सांगावे.

इ. तिसरे नाव

ज्योतिषशास्त्रातील अवकहडा-चक्रानुसार जन्मनक्षत्राच्या चरणावरून नाम ठेवावे.

र्इ. चौथे नाव

हे व्यवहार करण्याकरिता आपल्या मनाप्रमाणे असते. हे सार्थ होण्यासारखे असावे; नाहीतर ‘नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा’ असे व्हायला नको. तसेच नावाचे लघुरूप केले, तरी ते चांगले वाटावे, उदा. ‘शिवदास’चे लघुरूप ‘शिवा’ झाले, तरी ते चांगले वाटते; मात्र ‘प्रकाश’चे ‘पक्या’ तेवढे चांगले वाटत नाही.

 

७. मुलीचे नामकरण

एका विचारधारेनुसार मुलाचे नामकरण बाराव्या दिवशी, तर मुलीचे तेराव्या दिवशी करतात. मुलीचे नामकरण मंत्राविना आणि मुलाचे मंत्रासह करतात.

 

८. मुलीच्या जननेंद्रियावर परिणाम
होऊ नये; म्हणून तिचे नामकरण मंत्राविना करण्यात येणे

मंत्रांमध्ये ‘ॐ’चा उच्चार वारंवार होतो. ‘ॐ’मुळे निर्माण होणार्‍या स्पंदनांनी शरिरात प्रचंड शक्ती (उष्णता) निर्माण होते. पुरुषांची जननेंद्रिये शरिराबाहेर असतात. त्यामुळे निर्माण होणार्‍या उष्णतेचा त्यांच्या जननेंद्रियांवर परिणाम होत नाही. स्त्रियांची जननेंद्रिये ओटीपोटात असल्यामुळे या उष्णतेचा परिणाम होऊन त्यांना त्रास होऊ शकतो. त्यांना पुढे मोठे झाल्यावर मासिक पाळी जास्त येणे, न येणे, पाळीच्या वेळी वेदना होणे, अशा पद्धतीच्या विविध व्याधी होऊ शकतात; म्हणून मुलीचे नामकरण मंत्राविना, तर मुलाचे नामकरण मंत्रासहित करतात.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सोळा संस्कार’