योगऋषी रामदेवबाबा यांचे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला चरणस्पर्श !

प.पू. डॉ. आठवले आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्यात राष्ट्र अन् धर्म यांविषयी संवाद !

 

प.पू. डॉ. आठवले आणि योगऋषी रामदेवबाबा संवाद साधतांना
प.पू. डॉ. आठवले आणि योगऋषी रामदेवबाबा संवाद साधतांना

 

रामनाथी (फोंडा), २८ जानेवारी (वार्ता.) – राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी कार्यरत असलेले आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात अभूतपूर्व लढा देणारे हरिद्वार येथील पतंजली योगपिठाचे योगऋषी रामदेवबाबा यांचे २८ जानेवारीला सायंकाळी ५.१५ वाजता रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श लाभले. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे माजी समूह संपादक पू. श्री. पृथ्वीराज हजारे यांनी योगऋषींचे आश्रमात स्वागत केले. या वेळी योगऋषी रामदेवबाबा आणि सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांच्यात राष्ट्र अन् धर्म यांच्या सद्यस्थितीविषयी संवाद झाला.

या वेळी सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ याही उपस्थित होत्या.

 

भागवद् धर्माला मूर्त रूप देण्याचे कार्य
सनातन करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा

या प्रसंगी प.पू. डॉ. आठवले आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्यात २५ मिनिटे संवाद झाला. या वेळी योगऋषी रामदेवबाबा म्हणाले, ”सनातन अत्यंत प्रामाणिकपणे आणि नि:स्वार्थीपणे हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करत आहे. हे कार्य सर्वांनी केले पाहिजे. या कार्यास थोडा कालावधी लागणार असला, तरी ते निश्चितपणे होणारच आहे. अहंकार न्यून असलेलेच हे कार्य करू शकतात. एकूणच भागवद् धर्माला मूर्त रूप देण्याचे कार्य ‘सनातन संस्था’ करत आहे. तुम्हाला (प.पू. डॉ. आठवले यांना) भेटण्याची पुष्कळ इच्छा होती. आज भेट झाल्याने आनंद झाला.” या प्रसंगी प.पू. डॉ. आठवले म्हणाले, ”तुम्ही आल्यामुळे सर्व साधकांना चैतन्य मिळाले. हिंदु धर्माच्या कार्यात आमचे काही योगदान आवश्यक असल्यास आम्हाला सांगा, आम्ही आमच्या क्षमतेनुसार प्रयत्न करू.”

 

सनातन संस्था फार मोठे
कार्य करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा

आश्रमभेटीच्या वेळी योगऋषी रामदेवबाबा यांनी सनातन आश्रमात चालू असलेले राष्ट्र आणि धर्म विषयक कार्य जाणून घेतले. श्री. नागेश गाडे यांनी योगऋषींना आश्रमातील कार्याविषयी माहिती दिली. आश्रमात साधक करत असलेली सेवा पाहून योगऋषी म्हणाले, ”सनातन संस्थेचे कार्य अतिशय चांगले आहे. तुम्ही भागवद् धर्माचे फार मोठे कार्य करत आहात. माझे या कार्याला आशीर्वाद आहेत.”

 

क्षणचित्रे

१. सनातनच्या पुरोहित साधकांनी केलेल्या वेदमंत्रपठणाच्या चैतन्यदायी स्वरात योगऋषी रामदेवबाबांचे आश्रमात आगमन झाले.

२. योगऋषी रामदेवबाबा यांनी प.पू. डॉ. आठवले यांना त्यांच्या आरोग्यासाठी प्राणायमचे प्रकार सांगून काही औषधेही लिहून दिली.

 

प.पू. डॉक्टरांच्या प्रेमापोटी त्यांच्या आरोग्याची
चौकशी करण्यासाठी आश्रमाला भेट देणारे योगऋषी रामदेवबाबा

योगऋषी रामदेवबाबा गोव्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. याची माहिती मिळताच हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक यांनी त्यांची पर्वरी येथे भेट घेतली आणि त्यांना सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात भेट देण्याची विनंती केली. या वेळी त्यांना प.पू. डॉक्टरांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली; मात्र नियोजनातील व्यस्ततेमुळे आश्रम भेटीस येणे शक्य होणार नाही, असे त्यांनी नम्रपणे सांगितले. योगऋषी सायंकाळी विमानाने निघणार असतांना त्यांच्या विमानाला उशीर होणार, असे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ सनातनच्या आश्रमात प.पू. डॉक्टरांच्या भेटीसाठी जाण्याचे ठरवले. पणजी येथून ते थेट दाबोळी येथील विमानतळावर गेले असते, तर ते ३० किमी अंतर त्यांना लागले असते; मात्र प.पू. डॉक्टरांच्या भेटीसाठी पर्वरी ते रामनाथी असे ३० किमी अंतर पूर्ण करून आले आणि नंतर येथून दाबोळी येथे ३० किमी अंतरावरील विमानतळावर गेले.

 


 

हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि
सनातन संस्थेचे साधक यांनी घेतली योगऋषी रामदेवबाबा यांची भेट !

समाजहितकारी हिंदु राष्ट्र किंवा ईश्‍वरी राज्याच्या संकल्पनेचे मूळ वेदांत ! – योगऋषी रामदेवबाबा

पणजी, २८ जानेवारी (वार्ता.) – ईश्‍वरी राज्य ही व्यापक जनहितकारी संकल्पना आहे. वेदांमध्ये त्याचा उल्लेख आहे. प.पू. योगी अरविंद यांनी याला समाजामध्ये देवत्वाची प्रतिस्थापना, असे म्हटले आहे. रामराज्य, हिंदु राष्ट्र असेही याला पर्यायी शब्द आहेत. हे चांगले कार्य आहे. अशा राष्ट्राची संकल्पना आपण उचलून धरली पाहिजे, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले. योगऋषी रामदेवबाबा यांची हिंदू जनजागृती समितीचे श्री. नागेश गाडे आणि सनातन संस्थेचे श्री. संगम बोरकर यांनी २८ जानेवारी २०१३ या दिवशी पर्वरी, गोवा येथे भेट घेतली. त्या वेळी योगऋषी रामदेवबाबा यांनी हे विचार मांडले.

योगऋषी रामदेवबाबा यांना अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी रामनाथी, गोवा येथे २० जून २०१४ या दिवशी होणार असलेल्या तिसर्‍या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाचे उद्घाटन योगऋषी रामदेवबाबा यांनी करावे, अशी विनंती समितीच्या कार्यकर्त्यांनी योगऋषी रामदेवबाबा यांना या वेळी केली.

 

योगऋषी रामदेवबाबा यांच्याकडून सनातनचे
प्रेरणास्थान प.पू. डॉ. आठवले यांच्या स्वास्थाविषयी आस्थेने चौकशी !

योगऋषी रामदेवबाबा यांनी प.पू. डॉ. आठवले यांना प्रणाम करायला सांगा, असे साधकांना सांगितले. त्यांनी प.पू. डॉ. आठवले यांच्या आरोग्याची चौकशी केली. साधकांनी प.पू. डॉ. आठवले यांची प्राणशक्ती अल्प असल्याने त्यांना झोपून रहावे लागत असल्याची माहिती योगऋषी रामदेवबाबा यांना दिल्यावर त्यांनी प.पू. डॉ. आठवले यांच्या आरोग्याविषयीच्या चाचण्यांची माहिती देण्यास सांगितली तसेच त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाय सांगू, असे साधकांना सांगितले.

Leave a Comment