सनातनचे आश्रम हे बदलत्या काळातील आधुनिक आणि आदर्श गुरुकुल !

संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज यांची सनातनच्या देवद आश्रमाला भेट

सनातनचे आश्रम हे बदलत्या काळातील आधुनिक आणि
आदर्श गुरुकुल ! – संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज

देवद (पनवेल)  – सध्याच्या काळात प्राचीन काळाप्रमाणे गुरुकुल पद्धती शक्य नाही; पण एखाद्या संस्थेने असा प्रयत्न केला, तर ते अत्यंत स्तुत्य आहे. पूर्वीच्या पद्धतीच्या गुरुकुलावर आधारित आश्रम सनातन संस्था चालवत आहे, हे पाहून मला आज विलक्षण आनंद झाला. विशेष म्हणजे येथील सर्व साधक आपला भार संस्थेवर पडू देत नाहीत. येथील कृतींमध्ये प्रत्येकाचा सहभाग असतो. आपले नैतिक कर्तव्य समजून सर्वजण त्यात सहभागी होतात. परपस्परांमध्ये हेवेदावे नाहीत. प्रेमाची आणि आपुलकीची भावना आहे. बदलत्या काळातील हे आधुनिक आणि आदर्श गुरुकुल आहे. त्या दृष्टीने सर्वांनीच सनातन संस्थेकडे पाहिले पाहिजे, असे उद्गार संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर महाराज यांनी काढले. १५ जानेवारीला त्यांनी पनवेल येथील सनातनच्या देवद आश्रमाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. सनातनचे ६१ टक्के पातळी गाठलेले श्री. विनायक आगवेकर यांनी त्यांना आश्रम दाखवला आणि तेथील सर्व कार्याविषयी परिचयही करून दिला. या वेळी हिंदू जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा समन्वयक श्री. शिवाजी वटकर यांनी महाराजांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर हेही उपस्थित होते. आश्रम दर्शन करतांना स्वयंपाकघरातील पोळ्या करण्याचे यंत्र पाहून त्यांना कुतूहल वाटले आणि त्यांनी त्याविषयी जिज्ञासेने जाणूनही घेतले. मडगाव स्फोटात सनातनला निष्कारण गोवण्याचा प्रयत्न केला होता, असेही ते चर्चेच्या वेळी म्हणाले. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने केले जाणारे थरारली नोट या नाटकाच्या विरोधातील आंदोलन, तिरुपती येथील इस्लामिक युनिव्हर्सिटीच्या विरोधातील आंदोलन, अंनिसच्या जादूटोणाविरोधी कायद्याविषयीचे आंदोलन यांची माहिती ऐकून महाराजांनी कार्याचे कौतुक केले. ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या धर्मांतरावर बंदी, देवता आणि संत यांचे विडंबन रोखण्यासाठी कायदे करण्याची आवश्यकता यांविषयीही त्यांनी सहमती दर्शवली.

 

संतवीर ह.भ.प. बंडातात्या
कराडकर महाराज यांचे उद्बोधक विचार

१. गुरुकुलावर भारतीय संस्कृतीची इमारत उभी आहे !

भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा गुरुकुल आहे. त्याच्यावर भारतीय संस्कृतीची इमारत उभी आहे. प्राचीन काळी भारतात अशी गुरुकुले ठिकठिकाणी असायची. त्यात सर्वसंग परित्यागी आणि विरक्त ऋषीमुनी रहायचे. ती केवळ परोपकार आणि समाजसेवा अन् जीनव उद्धारासाठी चालवली जात होती. तेथील रहाणार्‍या साधकाचा सर्व भार गुरुकुलाच्या वतीने उचलला जात असे. याला सहचारी जीवन म्हणतात.

 

२. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील अनाचार
रोखण्यासाठी ठेकेदारांची मक्तेगिरी दूर व्हायला हवी !

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या हक्क संबंधीचा निकाल बडवे आणि उत्पात यांच्या विरोधात लागला आहे. शासनालाही पूर्ण नियंत्रण मिळाले आहे. याविषयी ते म्हणाले, शासनाने पूजा करण्याच्या विरोधात मी आहे. मंदिरात सेवेकरी आणि ठेकेदार असे दोन गट झाले आहेत. ठेकेदार सर्व लाभ घेतात आणि सेवेकरी तसेच रहातात. ते केवळ वेतनावरच आहेत. त्यांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि ठेकेदार गेले पाहिजे. मंदिरातील मक्तेदारी जायला हवी. प्रथा परंपरेनुसार चालत आलेली पूजा यांचे अधिकार बडवे-उत्पात यांच्याकडेच असावेत. ठेकेदारांकडे जुगार, व्यसने, अनाचार आहेत. ब्राह्मण या कल्पनेत ते बसत नाहीत. अशीच स्थिती आळंदीचीही आहे. देवापुढे बसलेले पुजारी गांजा ओढतात. न्यायालयाच्या निकालाचे मी स्वागत करतो; पण देवळात ब्राह्मण पुजारी आहेत, असे मी म्हणत नाही. त्यांची मक्तेदारी आणि अनाचारी धंदे जायला हवेत. मंदिर आताही शासनाच्या कह्यात आहे. लिलावात ठेकेदार येतील आणि ते अयोग्य धंदे करतील. उलट विधीवत् पूजा ब्राह्मणच करू शकतात.

३. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील
घोटाळ्यांच्या विरोधात जनहित याचिका
दाखल करण्याचा हिंदू जनजागृती समितीचा निर्णय योग्य !

आम्ही माहितीच्या अधिकाराखाली श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराविषयी बरीच माहिती काढली आहे. त्यात बरेच घोटाळे आहेत. सहस्रो एकर जमिनीची नोंदच नाही. आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत, असे श्री. वटकर यांनी महाराजांना सांगितल्यावर ते म्हणाले, सध्या शासन आणि पुरोगामी लोक यांचा धार्मिक स्थळे अन् धर्म यांकडे पहाण्याचा चुकीचा दृष्टीकोन निर्माण झाला आहे. दुसर्‍या बाजूला या ठिकाणी असलेल्या लोकांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे पालट व्हायला हवेत. यासाठी तुम्ही याचिका दाखल करणार, हे चांगले आहे.

 

४. सज्जनगडप्रमाणे चांगले उपक्रम
आळंदी किंवा पंढरपूर येथे राबवले जात नाहीत !

आम्ही पंढरपूर देवस्थान समितीला १०० शौचालये बांधण्यास सांगत आहोत; पण कोट्यवधी रुपये असतांना ते सामाजिक कार्य करण्यास तयार नाहीत. ते त्यांची तुलना केवळ लाडू विकण्यासाठी तिरुपतीशी करतात; पण तिरुपतीप्रमाणे सोयीसुविधा आणि सामाजिक कार्य करण्यास व्यवस्थापन सिद्ध नाही. आम्ही पंढरपूर-आळंदीच्या व्यवस्थापनावरही टीका करतो; मात्र गोंदवलेकर महाराजांचे धर्मस्थळ किंवा सज्जनगड यांच्या विरोधात बोलत नाही. आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात असतो, तर सज्जनगडावरही टीका केली असती. तेथे सहस्रो लोकांचे अन्नछत्र चालते; पण असा कोणताच चांगला उपक्रम पंढरपूर आणि आळंदी येथे चालत नाही.

५. निधर्मीपणाचे तुणतुणे वाजवणारे शासन
हिंदूंना नव्हे, मुसलमानांना कोट्यवधींचे अनुदान देते !

शासनाने मदरशांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले आहे. तसे वारकरी शिक्षणसंस्था, वेदपाठशाळा यांना काहीच मिळत नाही. याविषयी श्री. वटकर यांनी विचारताच महाराज म्हणाले, निधर्मीपणाचे तुणतुणे वाजवणार्‍या शासनाने आता कसे काय पैसे दिले ? याविषयी कोणीच काही विचारत नाही; म्हणून असे चालले आहे.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment