धार्मिक विधींच्या वेळी केल्या जाणार्‍या काही कृतींमागील शास्त्र

१. धार्मिक विधींच्या वेळी यजमान दांपत्यातील पत्नीने
पतीच्या उजव्या हाताला दर्भच लावणे अधिक योग्य असणे

Ketan_Shahane
वेदमूर्ती केतन शहाणे

प.पू. रामभाऊस्वामी यांच्या यज्ञाच्या संकल्पविधीच्या वेळी पू. (सौ.) गाडगीळ यांनी पू. मुकुल गाडगीळ यांच्या उजव्या हाताला दर्भ लावला. धार्मिक विधींच्या वेळी यजमान दांपत्यातील पत्नीने पतीच्या उजव्या हाताला स्वतःच्या हाताने स्पर्श न करता दर्भच लावणे अधिक योग्य आहे. त्रेताग्नि उपासनेत दर्भच लावत. स्मार्त याज्ञिकीत हाताला हात लावण्यास सांगतात.

२. दक्षिण भारतात पुरुष धार्मिक विधींच्या वेळी लुंगी
नेसतात आणि क्वचित प्रसंगी धोतर (काष्टा घातलेले) नेसतात

प.पू. रामभाऊस्वामी यांच्या यज्ञाला आलेले दक्षिणेतील याज्ञिक धोतर नेसले होते. काष्टा घातलेल्या पद्धतीने धोतर नेसणे, सगळ्यात सात्त्विक आहे. दक्षिण भारतात धार्मिक विधींच्या वेळी लुंगी नेसण्याची पद्धत आहे. क्वचितप्रसंगी धार्मिक विधींच्या वेळी ते धोतर (काष्टा घातलेले) नेसतात; मात्र संन्याशाला काष्टा घालण्याचे बंधन नाही.

ganapati_yadnya_320

३. मुठीत अक्षता धरून कानावर
थोपटणे, म्हणजे इडा आणि पिंगला नाड्यांना
जागृती देणे, असे प.पू. रामभाऊस्वामी यांनी सांगणे

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी प.पू. रामभाऊस्वामी मुठीत अक्षता धरून कानावर थोपटतात. त्याचे कारण सांगतांना ते म्हणाले, आपले शरीर हे एक देऊळ आहे, असे धरले, तर डोके हा कळस आहे. मुठीत तांदुळ घेऊन थोपटणे, म्हणजे इडा आणि पिंगला नाड्यांना जागृती देणे.

४. काळानुसार यज्ञकुंडात समिधा,
दर्भ इत्यादींची आहुती देणे अशा कृती
करतांना योग्य कृती करणे आणि भाव असणे महत्त्वाचे !

४ अ. यज्ञादी कर्मे करतांना यज्ञस्थळी देवता
उपस्थित आहेत, असा भाव असल्यास त्याचा लाभ होणे

आद्य शंकराचार्यांनी शिवं भूत्वा शिवं यजेत्, म्हणजे शिव होऊन शिवाची पूजा करावी, असे म्हटले आहे, तसेच दुर्गासप्तशती पाठ आदी ग्रंथांमध्ये स्वतःचा देह स्वतः निर्माण करून त्यात प्राणप्रतिष्ठा, न्यासादी कर्मे करण्याची प्रक्रिया सांगितली आहे. या कृती करतांना देवतेप्रती भाव अधिक महत्त्वाचा आहे. यज्ञात लाकूड (इंधन) घालणे, समिधांची आहुती देणे, अशा कृतींच्या वेळी असलेल्या अनुसंधानालाच महत्त्व आहे. यज्ञामध्ये एखाद्या द्रव्याचे हवन चालू असतांना इतर द्रव्यांचे हवन करू नये आणि यज्ञस्थळी देवता उपस्थित आहेत, असा भाव असल्यासच त्याचा लाभ होतो.

४ आ. अत्युच्च भाव असला आणि कृती चुकली,
तर त्याचा दोष न लागणे; मात्र अत्युच्च भाव असणे कठीण
असल्याने काळानुसार यज्ञकुंडात समिधा, दर्भ इत्यादींची आहुती देणे
अशा कृती करतांना योग्य कृती आणि भाव असेल, तरच फलनिष्पत्ती मिळणे

अत्युच्च भाव असला आणि कृती चुकली, तर त्याचा दोष त्या व्यक्तीला लागत नाही, उदा. विदुराच्या पत्नीने भावावस्थेत स्वतः केळी खाल्ली आणि केळ्याची साले श्रीकृष्णाला भरवली. येथे तिचा अत्युच्च भाव असल्याने कृती चुकीची होऊनही तिला दोष लागला नाही. पूजा, यज्ञ-याग यांचा मूळ उद्देश हा असतो की, स्वतःचे देहभान पूर्णतः विसरले गेले पाहिजे. देहभान हरपून जी पूजा होते, तिच्यात कृती चुकल्यास दोष लागत नाही. त्यामुळे केवळ असा अत्युच्च भाव असल्यासच यज्ञ करतांना चुकीची कृती झाल्यास तिचा दोष लागत नाही, अन्यथा दोष लागतो. त्यामुळे सध्याच्या काळात एवढा अत्युच्च भाव असणे कठीण असल्याने भाव आणि कृती दोन्ही असावे लागते, तरच फलनिष्पत्ती योग्य प्रमाणात मिळते.

– वेदमूर्ती केतन शहाणे, अध्यापक, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात