सनातन संस्थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

पुणे – सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण साध्य करणारे आहेत. ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यसनमुक्तीसाठी अध्यात्म’, ‘व्यक्तीमत्त्व विकासासाठी अध्यात्म’ आदी विषयांवरील प्रवचने, अध्यात्माचे अभ्यासवर्ग, साधना सत्संग, बालसंस्कारवर्ग आदी माध्यमांतून संस्था समाजाभिमुख कार्य करत आहे. सनातन संस्थेची २५ वर्षे, म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक सेवेची २५ वर्षे आहेत. सनातनचे साधक आणि शुभचिंतक यांच्या समर्पणाची २५ वर्षे आहेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे केले. सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त येथील ‘हॉटेल ग्रँड ट्युलिप’ येथे पत्रकारांसाठी मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. चेतन राजहंस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी श्री. चेतन राजहंस यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा परिचय आणि सनातन संस्थेच्या स्थापनेचा उद्देश विस्ताराने सांगितला. त्यानंतर पत्रकारांनी संस्थेचे उपक्रम, उद्देश, विचार आदी विषयांवरील प्रश्नांचे शंकानिरसन करून घेतले. नास्तिकतावाद्यांच्या हत्यांच्या प्रकरणात सनातन संस्थेचे नाव गोवण्यात आल्याच्या संदर्भातही पत्रकारांनी प्रश्न विचारून सनातन संस्थेची बाजू समजून घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेचे साधक श्री. चैतन्य तागडे यांनी केले.


 

पत्रकारांनी श्री. चेतन राजहंस यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांनी त्याची दिलेली उत्तरे

मुक्त संवाद कार्यक्रमात उपस्थित पत्रकार अन् बोलतांना श्री. चेतन राजहंस

१. मधल्या काळात बाँबस्फोट किंवा हत्या असे काही झाले की, सनातनचे नाव चर्चेत येते. हिंदुत्वाचे कार्य करण्यार्‍या अनेक संस्था असूनही सनातन संस्थेचे नाव का ?

उत्तर : राजकीय शक्तींना लक्ष्य करण्यासाठी समाजातील ‘सॉफ्ट टार्गेट’ (सोपे लक्ष्य) हवे असतात. वर्ष १९४७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काँग्रेस, निधर्मी, साम्यवादी आदी मंडळींचा ‘सॉफ्ट टार्गेट’ राहिला. वर्ष २०१४ नंतर संघाचा स्वयंसेवक हा प्रधानसेवक (पंतप्रधान) झाला. एक प्रकारे संघ मोठा झाल्याने ‘सॉफ्ट टार्गेट’ होऊ शकत नव्हता. मग अनेक राज्यांत हिंदुत्वाचे कार्य करते; म्हणून सनातन संस्थेला ‘सॉफ्ट टार्गेट’ करण्यात आले. सनातन संस्थेवर होणारे मिथ्या आरोप, म्हणजे सनातन संस्थेला राजकीय हेतूंनी होत असलेल्या विरोधाचे प्रमाण आहे.

२. सनातन संस्थेचे कार्य बहुतांशी महाराष्ट्रात असतांना सनातन संस्थेचा मुख्य आश्रम गोवा येथे का आहे ?

उत्तर : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गुरु प.प. भक्तराज महाराज यांनी वर्ष १९९३ मध्ये ‘अध्यात्मप्रसाराच्या कार्याचे मुख्यालय गोवा येथे होईल’, असे द्रष्टेपणाने सांगितले होते. पुढे कालांतराने रामनाथी, गोवा येथे सनातन संस्थेला भूमी अर्पण मिळाली. त्यामुळे गोवा येथे सनातन संस्थेचा मुख्य आश्रम स्थापन झाला.

३. शाम मानव हे सनातन संस्थेचे साधक होते का ? ‘साधकांना संमोहित केले जाते’ असे ते आरोप करतात. त्याविषयी काय सांगाल ?

श्री. चेतन राजहंस

उत्तर : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे स्वतः जागतिक कीर्तीचे मनोविकारांवरील वैद्यकीय संमोहन उपचारतज्ञ आहेत. वर्ष १९८५ ते १९८८ या कालावधीत त्यांच्याकडे शाम मानव हे संमोहनशास्त्र शिकायला येत होते. या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समाजातील ५०० हून अधिक दंतवैद्य, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते यांना वैद्यकीय संमोहन उपचार शिकवले होते. पुढे ‘वैद्यकीय शास्त्रापेक्षा अध्यात्मशास्त्र हेच प्रगत शास्त्र आहे’, हे लक्षात आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय बंद करून स्वतः गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना केली. अध्यात्मात उन्नती झाल्यानंतर अध्यात्माच्या प्रसारासाठी सनातन संस्थेची वर्ष १९९९ मध्ये स्थापना केली. सनातन संस्थेमध्ये केवळ साधना शिकवली जाते. त्यामुळे नास्तिकतावादी शाम मानव साधक कसे असू शकतील ? ‘कुणालाही त्याच्या इच्छेविरुद्ध संमोहित करता येत नाही, हे वैद्यकशास्त्रात सिद्ध झाले आहे’, असे असतांना प्रा. शाम मानव यांनी अशा प्रकारे विधाने करणे, म्हणजे संमोहन उपचारांविषयी अंधश्रद्धा पसरवणे होय.

४. सनातन संस्थेची हिंदु राष्ट्राची संकल्पना काय आहे ? याविषयी थोडे सांगा.

उत्तर : सध्या हिंदु राष्ट्राची चर्चा समाजात होते, ती प्रामुख्याने राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात होते. ‘हिंदूंचे हित साध्य करणारी राज्यव्यवस्था’, असा एक विचार सध्या लोकप्रिय होत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘आध्यात्मिक राष्ट्ररचनेला हिंदु राष्ट्र’ म्हटले आहे. वर्ष १९९८ मध्ये त्यांनी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हा ग्रंथ संकलित केला होता. त्यात समाजाला सत्त्वगुणी बनवणे, अध्यात्मकेंद्रीत राज्यव्यवस्था स्थापन करणे आणि त्यायोगे विश्वकल्याण साध्य करणे, ही हिंदु राष्ट्राची संकल्पना सांगितली होती. पुढे हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा पुस्तकात त्यांनी ‘विश्वकल्याणासाठी कार्यरत सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र’, अशी हिंदु राष्ट्राची व्याख्या केली होती. थोडक्यात हिंदूंचे हितच नव्हे, तर विश्वकल्याण साध्य करणे आणि त्यासाठी सत्त्वगुणी समाज निर्माण करणे, हा सनातन संस्थेचा विचार आहे.

सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थेत अशी व्यवस्था निर्माण करणे, म्हणजे एक प्रकारे धर्मसंस्थापनेचे कार्य आहे. हे कठीण असले, तरी कालमहिम्यानुसार होणारच आहे, याची निश्चिती बाळगा. याची एक प्रचीती म्हणजे धर्मसंस्थापना जेव्हा होते, तेव्हा देवता स्वतः प्रकट होऊन कार्य करतात. ज्ञानवापीच्या ३ दिवसांच्या सर्वेक्षणाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या तासाला वजूखान्यात भव्य शिवलिंग दिसले. देवता स्वतः प्रकट होत आहेत, याचे हे लक्षण आहे. सध्या ‘जी-२०’पासून ‘वन वर्ल्ड, वन फॅमिली’ (एक जग एक कुटुंब) या ब्रीदवाक्याचा प्रचार भारत सरकार करत आहे. यावरून विश्वकल्याणकारी व्यवस्थेचे बीजारोपण आता होऊ लागले आहे, हे लक्षात येते.

५. दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणांत सनातन संस्थेला लक्ष्य केल्याने खरे मारेकरी समोर आले नाहीत, अशा प्रतिक्रिया येत आहेत. याविषयी तुम्ही काय सांगाल ?

उत्तर : नास्तिकतावाद्यांच्या हत्यांनंतर हिंदुत्वनिष्ठांना पूर्वग्रह कलुषित दृष्टीकोनात लक्ष्य करण्यात आले, हे सत्य आहे. सनातन संस्थेला लक्ष्य करण्यासाठी अन्वेषण यंत्रणांनी वेगवेगळ्या कथा रचल्या. या प्रकरणांत अनेक खोटे दावे करण्यात आले. या हत्यांचे खरे अन्वेषण झालेच नाही. याविषयीची स्पष्टता मुंबई येथील सुप्रसिद्ध सर्जन (शल्यकर्म चिकित्सक) डॉ. अमित थडाणी यांनी लिहिलेले ‘द रॅशनलिस्ट मर्डर’ हे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येते. या काळात अन्वेषण यंत्रणांनी सनातनच्या १ सहस्र २०० साधकांच्या चौकशा केल्या. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी देणे’, ही म्हण आम्ही अक्षरश: अनुभवली. डॉ. तावडे यांसारखे कुशल सर्जन (शल्यकर्म चिकित्सक) ८ वर्षांहून अधिक काळ कारागृहात रहातात, हे अतिशय दुर्दैवी आहे. हिंदु धर्मातील कर्मफलसिद्धांतावर आमची श्रद्धा असल्याने साधकांचा छळ करणार्‍यांचा ईश्वराच्या न्यायालयात निश्चितच न्याय होईल, अशी आमची धारणा आहे.

Leave a Comment