पावसाळ्यातील सर्दी, खोकला, ताप, तसेच कोरोना यांमध्ये उपयुक्त घरगुती औषधे

Article also available in :

औषधे स्वतःच्या मनाने न घेता वैद्यांच्या मार्गदर्शनानुसारच घ्यायला हवीत; परंतु काही वेळा वैद्यांकडे लगेच जाता येण्यासारखी स्थिती नसते. काही वेळा थोडेफार औषध केल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे काही आयुर्वेदाची औषधे दिली आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास रोग अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

 

१. कारणांनुरूप उपचार

पावसाळ्यामध्ये सततच्या पावसाने वातावरणात पसरलेल्या थंडीपासून शक्य त्या परीने रक्षण केल्यास या दिवसांत होणारे सर्दी, खोकला आणि ताप लवकर बरे होण्यास साहाय्य होते.

१.अ. ताप असल्यास स्वेटरसारखे ऊबदार कपडे घालावेत. कानटोपी घालावी. यामुळे घाम येतो आणि ताप उतरतो. ‘त्रिभुवनकीर्ती रस’ १ गोळी बारीक करून थोड्याशा मधात मिसळून चाटावी. ताप अधिक असल्यास प्रत्येक २ घंट्यांनी १ गोळी घ्यावी. दिवसाला ५ – ६ गोळ्या घेतल्या, तरी चालते. एका दिवसात तापाची तीव्रता न्यून न झाल्यास ताप अंगावर न काढता वैद्यांना भेटावे.

१.आ. पिण्याचे पाणी उकळून कोमट करून प्यावे. या दिवसांत निरोगी व्यक्तीनेही गरम किंवा कोमट पाणी प्यायल्यास अन्नपचन चांगले होऊन आरोग्य चांगले रहाते.

१.इ. घसा तांबडा होणे, घसा खवखवणे किंवा दुखणे यांमध्ये कोमट पाण्यात थोडे त्रिफळा चूर्ण किंवा हळद आणि मीठ घालून गुळण्या कराव्यात. ‘चंद्रामृत रस’ १ – २ गोळ्या चघळाव्यात. लगेच बरे वाटू लागते. खोकला येत असल्यासही चंद्रामृत रसाचा उपयोग होतो. दिवसभरात ५ – ६ गोळ्या घेतल्या, तरी चालतात.

१.ई. डोके जड होणे, सर्दीमुळे नाक चोंदणे, जबड्याच्या मुळाशी दाबल्यास दुखणे ही लक्षणे असतांना बाहेरून गरम कपड्याने शेक द्यावा. गरम पाणी प्यायल्यावर पेला गरम रहातो. त्याने शेकून घ्यावे. बाहेरून शेकणे हे वाफ घेण्यापेक्षा जास्त लाभदायक आहे. दिवसातून ४ – ५ वेळा शेक घ्यावा.

१.उ. रात्री पंखा लावून झोपल्याने थंड हवा नाकातोंडात जाते. घसा आतून कोरडा होतो आणि थंडीमुळे घशातील रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा होऊ लागते. त्यामुळे घसा तांबडा होतो. हे टाळण्यासाठी फिरत्या टेबल फॅनचा (पंख्याचा) वापर करावा किंवा पंखा न लावता झोपावे. आजकाल ‘टायमर’चे पंखे आले आहेत. यामध्ये आपण झोपतांना ठराविक वेळाने पंखा बंद होण्याची सोय असते. त्याचा वापर करावा. झोपल्यावर थंड हवा नाकातोंडात जाऊ नये, यासाठी कानटोपी घालून नीट पांघरूण घेऊन झोपावे.

कोणत्याही उपचारपद्धतींनुसार औषधे घेतली, तरी वरील कारणांनुरूप उपचार केल्यास लवकर बरे होण्यास साहाय्य होते.

 

२. कफयुक्त खोकला

अ. खोकल्यातून कफ पडत असल्यास अडुळशाचा रस मधातून घ्यावा. अडुळशाची २ ते ४ पाने धुऊन तव्यावर किंचित गरम करावीत. नंतर ती खलबत्त्यात कुटून किंवा मिक्सरमध्ये वाटून आवश्यकता असल्यास थोडे पाणी घालून त्यांचा रस काढावा. अडुळशाची पाने गरम न करता कुटली, तर त्यांतून रस येत नाही. एका वेळेस पाव वाटी रस १ चमचा मध घालून प्यावा. अडुळशामुळे कफ सहजपणे सुटण्यास साहाय्य होते. अडुळशाचा मुख्य गुण रक्तातील वाढलेले पित्त न्यून करण्यासाठी होतो. त्यामुळे नाक, गुद किंवा योनीमार्गातून रक्तस्राव होणे, अंगात उष्णता वाटणे, पुरळ उठणे या लक्षणांसाठीही अडुळसा उपयुक्त आहे.

आ. १ चमचा ‘सितोपलादी चूर्ण’ आणि १ चमचा मध असे मिश्रण करून ठेवावे. दिवसातून मध्ये मध्ये हे मिश्रण वारंवार चाटावे. सितोपलादी चूर्ण दिवसभरात ३ चमच्यांपर्यंत वापरल्यास चालते. या चूर्णामुळे श्वसनमार्गातील विकृत कफ बाहेर पडण्यास साहाय्य होते, तसेच आवश्यक असा चांगला कफ बनू लागतो. यामुळे श्वसनमार्गाची शक्ती वाढते.

वैद्य मेघराज पराडकर

 

३. कोरडा खोकला

काही वेळा खोकल्यातून कफ न पडता केवळ कोरडी ढास लागते. पुढील सोप्या उपायाने कोरडा खोकला तात्काळ थांबतो. १ वाटीभर गोडेतेलात थोडी मोहरी, जिरे, लवंग, मिरी यांसारखे उपलब्ध मसाल्याचे पदार्थ घालून तेल गरम करून घ्यावे. असे केल्याने या मसाल्यांचा अंश तेलात उतरेल आणि तेलातील कच्चेपणा निघून जाईल. नंतर हे तेल गाळून थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे. कोरडा खोकला येतो, तेव्हा अर्धी वाटी गरम पाणी घेऊन त्यात यातील २ चमचे तेल घ्यावे आणि हे कोमट असतांना प्यावे. वर पुन्हा थोडे गरम पाणी प्यावे. हा उपाय केल्यावर घशाला आतून शेक मिळून तात्काळ आराम मिळतो आणि श्वसनमार्गातील वाताचे शमन होऊन कोरडी ढास थांबते.

 

४. घशात कफ येणे

जेवणावर विड्याचे पान खावे.

 

५. सर्दी, खोकला आणि ताप येऊ नये;
म्हणून किंवा आल्यास लवकर बरा होण्यासाठी

तुळस, गवती चहा, गुळवेल आणि पुनर्नवा यांचा काढा घ्यावा. यातील सर्व घटक न मिळाल्यास मिळतील तेवढे घटक घालून काढा बनवावा. २ ते ४ तुळशीची पाने, एखादे गवती चहाचे पान, वीतभर लांबीचे गुळवेलीचे खोड (ठेचून), वीतभर लांबीचे पुनर्नव्याचे खोड (पानांसहित) २ पेले पाण्यात उकळून १ पेला काढा करावा. अर्धा पेला काढा सकाळी आणि अर्धा पेला काढा सायंकाळी गरम गरम प्यावा. काढ्यात आवश्यकतेनुसार साखर किंवा गूळ घातल्यास चालतो.

५ अ. सर्दी, खोकला, ताप यांसारख्या विकारांमध्ये शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी टाळावे !

‘आजकाल रुग्णाईत व्यक्तीला शहाळ्याचे पाणी दिले जाते. शहाळे, म्हणजे कच्चा नारळ. अपक्व अवस्थेतील कोणतेही फळ हे पचायला जड असते. शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी कफ वाढवते. तापामध्ये कफ न वाढवणारा आहार घेणे आवश्यक असते. त्यामुळे ताप आलेला असतांना शहाळ्याचे किंवा नारळाचे पाणी पिणे टाळावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२३)

 

६. बद्धकोष्ठता

अ. ताप असतांना बद्धकोष्ठता असेल, तर जेवणापूर्वी अर्धा चमचा मेथीदाणे तोंडात टाकून कोमट पाण्यासह गिळावेत. काहींना मेथीदाणे खाल्ल्याने गुदद्वारी जळजळ किंवा वेदना होणे असे त्रास होतात. अशांनी मेथीदाण्यांऐवजी तूपमिरी (सब्जाचे बी) किंवा आहळीव (हळीव) गिळावेत.

आ. ‘गंधर्व हरीतकी वटी’ २ गोळ्या कोमट पाण्यासह दोन्ही वेळा जेवणापूर्वी घ्याव्यात.

 

७. कोरोना असल्याचे चाचणीत निष्पन्न होणे

‘सुवर्णमालिनी वसंत’ किंवा ‘महालक्ष्मीविलास रस’ यांपैकी कोणतीही एक गोळी बारीक करून सकाळी रिकाम्या पोटी २ ते ४ थेंब मधात मिसळून चाटून खावी. साधारण ७ ते १५ दिवस हे औषध घेतल्यास रोग लवकर बरा होण्यास साहाय्य होते. ही दोन्ही औषधे सुवर्णयुक्त (सोन्याचे भस्म असलेली) आहेत. त्यामुळे यांचे मूल्य अधिक असते. आयुर्वेदानुसार सुवर्ण हे उत्तम विषहर औषध असून एक उत्कृष्ट रसायन आहे. विविध जीवाणू किंवा विषाणू यांचा संसर्ग झाल्याने त्यांचे विषार शरिरात पसरतात. सुवर्णयुक्त औषधांच्या सेवनाने या विषारांचा प्रतिकार करण्यास शक्ती येते. ‘रसायन’ म्हणजे उत्तम शरीरघटक निर्माण करण्यास साहाय्य करणारे औषध.

 

८. आजारातून बरे झाल्यावर आलेला थकवा

सकाळी आणि सायंकाळी गुळवेलीचा काढा तूप घालून घ्यावा. वीतभर गुळवेल ठेचून २ पेले पाण्यात उकळून त्याचा १ पेला काढा करावा. अर्धा पेला काढा सकाळी आणि अर्धा पेला सायंकाळी घ्यावा. काढा शक्यतो गरम किंवा कोमट घ्यावा. प्रत्येक वेळी काढ्यामध्ये १ चमचा तूप घालावे. (या लेखात दिलेल्या औषधी वनस्पती घरोघरी लावण्यास सांगितलेल्या २७ औषधी वनस्पतींपैकी आहेत. या वनस्पती ओळखता येत नसल्यास जाणकारांकडून निश्चिती करून मगच वापराव्यात. अपसमजाने चुकीची वनस्पती वापरल्याने हानी होऊ शकते.)

येथे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून काही घरगुती आयुर्वेदाची औषधे दिली आहेत. एखाद्या लक्षणासाठी दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रकारचे औषध घेतल्यास चालते. दोन्ही प्रकारची औषधे घेण्याची आवश्यकता नाही. औषधे घेऊन बरे न वाटल्यास रोग अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.७.२०२२)

Leave a Comment