‘कोरोना महामारीच्या कठीण काळात समाजातील व्यक्तींना प्रेमाने आधार देणे’, ही समष्टी साधनाच असणे

Article also available in :

‘कोरोनाचा प्रकोप इतक्यात न्यून होण्याची शक्यता वाटत नाही. राज्यकर्ते, प्रशासन, वैद्यकीय क्षेत्र असे सर्व संबंधित घटक त्यांच्या परीने हा प्रकोप न्यून करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजातील व्यक्ती भयभीत झाल्या आहेत. त्याचा परिणाम समाजमनावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही जण आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेत आहेत. दूरचित्रवाणीवरील विविध वाहिन्या, वृत्तपत्रे, ‘व्हॉट्सॲप’वर येणारे संदेश, शेजार्‍यांशी होणारा संवाद यांत प्रतिदिन ‘कोरोना’ हाच विषय असतो. त्यामुळे समाजमन अधिकच भयभीत होत आहे. आज समाजाला आधाराची नितांत आवश्यकता आहे.

पू. अशोक पात्रीकर

१. ‘भयभीत झालेल्या समाजाला प्रेम आणि आधार
देण्याची पुष्कळ आवश्यकता आहे’, असे लक्षात येणे

कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक यांना कोरोना झाल्याचे समजल्यावर कुटुंबातील अन्य सदस्यांना काळजी वाटते. रुग्णाला ‘तू नक्की बरा होशील. देव तुझ्या पाठीशी आहे. तू देवाचे नाव घे. काहीही साहाय्य लागले, तर आम्ही करू’, असा प्रेमाचा आधार देण्याची नितांत आवश्यकता आहे’, असे लक्षात आले. केवळ कोरोना झाल्यावरच नव्हे, तर एरव्हीही भयभीत झालेल्या समाजाला कुणीही या पद्धतीने आधार देऊ शकतो. समाजातील विविध घटकांनी असे प्रयत्न केले, तर ते देवाला निश्चित आवडेल आणि त्यातून त्यांची समष्टी साधना होईल.

 

२. वैद्य, अधिवक्ते, शिक्षक, उद्योजक आणि पुजारी
यांनी समाजातील व्यक्तींना आधार देण्याचे प्रयत्न करावेत !

आधुनिक वैद्य हा रुग्णांसाठी देवच असतो. आज समाजात विविध चिकित्सापद्धतींनुसार उपचार करणारे वैद्य आहेत. त्या सर्वांचा कोरोना उपचारांच्या सेवेत प्रत्यक्ष सहभाग नसला, तरी ते ही सेवा करू शकतात. असे वैद्य त्यांच्याकडे नेहमी येणारे रुग्ण किंवा परिसरातील जनता यांना आधार देण्याची सेवा करू शकतात. असेच प्रयत्न अधिवक्ते त्यांचे अशील (पक्षकार), अन्य अधिवक्ते किंवा परिचित यांच्यासाठी करू शकतात. शिक्षक त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ वर्ग घेतांना ही सेवा करू शकतात. मंदिरातील पुजारी किंवा विश्वस्त त्यांच्या मंदिरात येणार्‍या भक्तांसाठी ‘ऑनलाईन’ बैठका घेऊन किंवा वैयक्तिक संपर्क करून त्यांना आधार देऊ शकतात. उद्योजक त्यांच्या कामगारांसाठी असे प्रयत्न करू शकतात.

 

३. सेवाभावाने किंवा कर्तव्य म्हणून निरपेक्षतेने लोकांना आधार
देण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तींची त्या कृतीतून समष्टी साधना होत असणे

आज केवळ विविध घटकांतील लोकांचे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे. आज समाजात अनेक समाजसेवी संस्था आहेत. ‘देवाने समाजसेवेची ही संधी दिली आहे’, असा भाव ठेवून ते ही सेवा करू शकतात. हे सर्व निरपेक्षभावाने केले, तर त्यातून त्यांची साधना होणार आहे. ही सेवा करणार्‍यांना इतरांना निरपेक्षपणे साहाय्य केल्याचा आनंद मिळेल आणि समाजाची देव अन् अध्यात्म यांवरील श्रद्धा वाढायला साहाय्य होईल.

 

४. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती समाजाला देत असलेला आधार !

‘समाजातील व्यक्तींना मानसिक बळ मिळावे’, यासाठी द्यावयाच्या स्वयंसूचना सनातन संस्थेने दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध केल्या आहेत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती ‘तणावमुक्तीसाठी साधनेची आवश्यकता’, तसेच ‘आपत्काळात साधनेची आवश्यकता’, अशा विषयांवर प्रवचने आयोजित करते. त्यांचाही लाभ समाजातील व्यक्ती घेऊ शकतात.

परात्पर गुरु डॉक्टरांनी सुचवलेली ही शब्दसुमने त्यांच्या चरणांवर कृतज्ञताभावाने आणि शरणागतभावाने समर्पित करतो.’

– पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक सनातन संस्था.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment