अनुक्रमणिका
- १. शिष्य या शब्दाची व्याख्या आणि अर्थ
- २. शिष्यत्वाचे महत्त्व
- ३. विद्यार्थी आणि शिष्य यांमध्ये कोणता भेद आहे ?
- ४. माध्यम आणि शिष्य
- ५. साधक आणि शिष्य
- ६. गुरु-शिष्य नातेच खरे कसे ?
- ७. शिष्याचा अहंकार नष्ट होणे आवश्यक !
- ८. शिष्यभावाचे महत्त्व
- ९. शिष्यभावाचे महत्त्व
- १०. प.पू. डॉक्टरांचा शिष्यभाव
- ११. गुरु हे शिष्यासाठी सर्वस्व !
- १२. गुरूंविषयी अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण !
आध्यात्मिक उन्नती करू इच्छिणार्या साधकाच्या जीवनात गुरूंचे महत्त्व अधिक असते; पण गुरूंचे मन जिंकण्यासाठी चांगला शिष्य होणेही आवश्यक असते. शिष्यत्वाचे महत्त्व, इतर नाती आणि शिष्य यांच्यातील भेद (फरक) तसेच गुरु कोणाला करावे, याविषयीची तात्त्विक माहिती पुढील लेखातून समजून घेऊया.
१. शिष्य या शब्दाची व्याख्या आणि अर्थ
अ. आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी जो गुरूंनी सांगितलेली साधना करतो, त्याला शिष्य असे म्हणतात. कुलार्णवतंत्रात शिष्याची व्याख्या करतांना म्हटले आहे,
शरीरमर्थप्राणांश्च सद्गुरुभ्यो निवेद्य यः ।
गुरुभ्यः शिक्षते योगं शिष्य इत्यभिधीयते ।।
अर्थ : जो तन, धन आणि प्राण (म्हणजे सर्वस्व) गुरूंना समर्पण करून त्यांच्याकडून योग शिकतो (म्हणजे गुरूंनी सांगितलेली साधना करतो), त्याला शिष्य म्हटले जाते. (म्हणूनच बायकोमुलांना अगदी वार्यावर सोडून जरी शिष्य गुरूंकडे गेला, तरी त्याला पाप लागत नाही.)
२. शिष्यत्वाचे महत्त्व
अ. देव, ऋषि, पितर आणि समाज ही चार ऋणे शिष्याला फेडावी लागत नाहीत.
आ. गुरुपुत्रो वरं मूर्खस्तस्य सिद्ध्यन्ति नान्यथा ।
शुभकर्माणि सर्वाणि दीक्षाव्रततपांसि च ।। १५१ ।। – श्री गुरुगीता
अर्थ : गुरुपुत्र या पदवीस योग्य असा गुरुसेवक शिष्य, व्यवहारात भोळसट असला, तरी त्याच्या दीक्षा, व्रते, तप, वगैरे साधना सिद्धीस जातात. गुरुसेवक नसणार्यांना तसे फळ मिळत नाही.
३. विद्यार्थी आणि शिष्य यांमध्ये कोणता भेद आहे ?
गुरु आणि शिक्षक यांच्यात भेद आहे, त्याचप्रमाणे शिष्य आणि विद्यार्थी यांच्यातही भेद आहे. शिक्षकाचे शुल्क दिले की, विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा हिशोब पूर्ण होतो; पण गुरु आत्मज्ञानच देत असल्याने गुरूंसाठी काहीही आणि कितीही केले तरी ते थोडेच असते. लहानपणी आईवडिलांनी आपले सर्व केलेले असल्यामुळे त्यांच्यासाठी आपण कितीही केले, तरी ते थोडेच असते, तसेच हेही आहे.
४. माध्यम आणि शिष्य
‘माध्यम म्हणून एखादा कार्य करतो, तेव्हा त्याची प्रगती होत नाही. तो परप्रकाशी रहातो. याउलट गुरु शिष्याकडून कार्य करवून घेतात, तेव्हा ते शिष्याची क्षमता वाढवतात; जसे श्री रामकृष्णांनी विवेकानंदांचे आत्मबल वाढवले आणि मग त्यांच्याकडून कार्य करवून घेतले.’ – प.पू. भक्तराज महाराज (सनातन संस्थेचे श्रद्धास्थान)
५. साधक आणि शिष्य
साधकाने स्थूल जगात अडकू नये म्हणून त्याने सगुणाबरोबर निर्गुण-तत्त्वाची उपासना करणे आवश्यक असते. गुरुप्राप्ती झाल्यावर सगुणातील निर्गुणाची, म्हणजे मायेतील ब्रह्माची, अनुभूती येण्यासाठी सगुणातील गुरूंची सेवा करणे आवश्यक असते.
६. गुरु-शिष्य नातेच खरे कसे ?
या जगात गुरु-शिष्य हे नाते पवित्र मानलेले आहे. हे एकच नाते खरे आहे. गुरु-शिष्य संबंध फक्त आध्यात्मिक स्वरूपाचे असतात. शिष्याला ‘माझा उद्धार व्हायला हवा’ ही एकच जाणीव असली पाहिजे. गुरूंना एकच जाणीव असते की, ‘याचा उद्धार व्हायला हवा.’ गुरु-शिष्याचे नाते हे वयपरत्वे नसते. हे नाते ज्ञानवृद्धि आणि साधनावृद्धि यांच्यावर आधारलेले असते. जीवसृष्टीतील सर्व प्राणी ज्ञान आणि साधना यांच्याच माध्यमातून अभिवृद्धि साधत असतात. बाकी सर्व नाती भीतीच्या किंवा सामाजिक बंधनांच्या पोटी आलेली असतात; म्हणून त्यांच्याशी व्यवहार सीमित असतो. त्या नात्यांत अहंभाव सातत्याने राखला जातो. त्या नात्यांत ज्ञान आणि साधनेला किंमत नसते. अहंभाव राखणे म्हणजेच नाती टिकविणे. अहंभाव राखणारी सर्व नाती खोटीच असतात.
७. शिष्याचा अहंकार नष्ट होणे आवश्यक !
गुरुविना तरणोपाय नाही, हे प्राथमिक अवस्थेतील प्रत्येक साधकाने वाचलेले असते, तर पुढच्या अवस्थेतील साधकाने अनुभवलेले असते. गुरुप्राप्तीसाठी निश्चितपणे काय करायचे, हे ठाऊक नसल्याने बर्याच साधकांच केवळ वर्तमान जन्मच नव्हे, तर पुढील कित्येक जन्म वाया जातात. गुरुप्राप्ती होण्यासाठी एखाद्या आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांचे मन जिंकायला लागते, तर अखंड गुरुकृपा होण्यासाठी गुरूंचे मन सातत्याने जिंकता यावे लागते. याचा सोपा मार्ग म्हणजे उन्नत आणि गुरू यांना अपेक्षित असेल ते करत रहाणे. त्यांना एकाच गोष्टीची अपेक्षा असते आणि ती म्हणजे साधना.
साधनेच्या पुढच्या टप्प्यात तन, मन, धन अन् प्राण हे सर्व श्री गुरूंना अर्पण करायचे असतात. तसे टप्प्याटप्प्याने करता शिष्य स्वतःत गुण असले पाहिजेत, गुरूंविषयी भाव कसा असावा, गुरुबंधूंशी कसे वागावे, शिष्याचे एकंदरीत जीवन कसे असावे, हे शिकत जातो.
अ. अहंकार नष्ट झाल्यावरच गुरु ज्ञान देतात !
ईश्वरप्राप्ती हे ध्येय साध्य करण्यासाठी मनुष्याने सातत्याने साधना करणे आवश्यक आहे. ज्ञानयोग, कर्मयोग इत्यादी योगमार्गांने साधना करतांनाही संत किंवा गुरु यांचे मार्गदर्शन आवश्यकच असते; अन्यथा अहंकाराचे वादळ त्याची साधनारूपी नौका परमार्थाच्या पैलतीरी पोहोचण्याआधीच नष्ट करते. संत किंवा गुरु प्रथम अहंकार नष्ट करतात; मगच आत्मज्ञान देतात. ते जीवनात येण्यासाठी स्वतःत साधकत्व निर्माण होणे महत्त्वाचे आहे.
आ. गुरूंनी दिलेले ज्ञान आत्मसात करण्यासाठी शिष्याचा अहं दूर होणे आवश्यक !
जसे समुद्रातील पाणी कितीही काढून घेतले, तरी ते संपत नाही. त्याचप्रमाणे गुरूंनी शिष्याला ज्ञान दिले, तरी गुरूंचे ज्ञान न्यून होत नाही. शेतात असणारे जंतू आणि किडे मारण्यासाठी प्रथम ते वाळवले जाते अन् नंतर शेतात पेरणी केली जाते. शिष्याला ज्ञान देण्यापूर्वी गुरु त्याचा अहं दूर करतात. पाणी भरतांना भांड्यातील हवा बाहेर गेल्यावरच पाणी त्या भांड्यात भरले जाते. त्याचप्रमाणे शिष्याचा अहं न्यून झाल्याविना गुरु देत असलेले ज्ञान तो आत्मसात करू शकत नाही. – (पू. बाळाजी आठवले यांचे विचारधन : खंड २)
इ. गुरु ज्ञान देऊन जिवाचा अहं न्यून करतो !
गुरु-शिष्य यांतील सर्वोच्च नाते केवळ शब्दातीत ज्ञानापुरतेच मर्यादित असते. गुरु शिष्याला चित्ताच्या स्तराला नेऊन त्याच्यावर ज्ञानरूपी गुह्यतेचा चैतन्याच्या भाषेत संस्कार करून त्याला मायारूपी भवसागर तरून जाण्याचे प्रशिक्षण देतो. गुरु हा प्राणदायक अन् जीवहारक आहे. गुरु ज्ञान देऊन जिवाचा अहं न्यून करतो. ज्या वेळी गुरूंचे कार्य संपत येते, त्या वेळी त्यांचे गुरु-शिष्य हे नातेच संपुष्टात येते; कारण त्या वेळी शिष्याला गुरुपण आलेले असते आणि गुरु आता उरलो उपकारापुरता या जाणिवेच्या स्तरावर कार्य करत असतात.
ई. शिष्याचा अहंकार घालवणे
१९९२ ची गुरुपौर्णिमा मुंबईला होती. त्याच्या सिद्धतेविषयी बाबा अधूनमधून विचारायचे की, काही हवे का ? तेव्हा मी (प.पू. डॉ. आठवले) बाबांना सांगत असे, आम्ही सर्व नीट करू. काही काळजी करू नका ! आम्ही पैसे गोळा करून गुरुपौर्णिमा चांगल्या प्रकारे साजरी करू, असा त्यात भाव असे. पुढे इंदूरच्या आश्रमाच्या बांधकामासाठी पैसे हवे आहेत, असे बाबांनी सांगितल्यावर आम्ही गुरुपौर्णिमेसाठी जमवलेले सर्व पैसे बाबांना दिले. नंतर पुन्हा पैसे जमवल्यावर गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा म्हणून मला देणार असलेल्या पैशांपैकी काही पैसे कांदळी आश्रमात विहीर खणण्यासाठी द्या, असे बाबांनी सांगितल्यावर त्यांना ते दिले. जमलेले पैसे दिल्यामुळे आता गुरुपौर्णिमा कशी साजरी करता येईल, ही काळजी आमच्या मनात निर्माण झाली. मग जाणीव झाली की, गुरुपौर्णिमा आम्ही करू हा अहंभाव नाहीसा करण्यासाठी बाबांनी हे सर्व केले. तेव्हापासून काळजीही गेली अन् पुढची कामेही सहज होत गेली. ( ग्रंथमालिका आदर्श शिष्य : खंड १)
८. शिष्यभावाचे महत्त्व
‘साधना करतांना साधकाने शिष्याचे गुण अंगी बाणवणे अतिशय महत्त्वाचे असते. साधक शिष्य झाला की, त्याची पुढची प्रगती गुरुकृपेने वेगाने होत जाते. शिष्य झाल्यावरच गुरु खर्या अर्थाने साधकाचे सर्व उत्तरदायित्व स्वीकारतात. तो साधनेत घसरू नये, यासाठी त्याला सतत मार्गदर्शन करतात. तसेच तो घसरू लागताच त्याला पुन्हा आधार देऊन पुढेच घेऊन जातात. हे सर्व ते अत्यंत प्रेमाने करतात; कारण गुरूंच्या जीवनात शिष्यांची प्रगती करवून घेणे याव्यतिरिक्त दुसरे ध्येयच नसते. शिष्य झाल्यावर मात्र शिष्याला आपला शिष्यभाव टिकवून ठेवावा लागतो, तरच तो पुढची प्रगती वेगाने करू शकतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे १०० टक्के पातळीपर्यंत साधकाला सतत शिकतच पुढे जावे लागते. त्याला अभ्यास वाढवावा लागतो. साधना अधिक चांगल्या प्रकारे आणि तळमळीने करावी लागते. तसेच आपले दोष आणि अहं यांचे समूळ उच्चाटन होईपर्यंत सतत सतर्क रहावे लागते. यासाठी शिष्य संत झाला, तरी त्याने सतत शिष्यभावात रहाणे आवश्यक असते. या लेखात शिष्यभावाचे महत्त्व आणि प.पू. डॉ. आठवले यांचा शिष्यभाव ही सूत्रे पाहूया.

९. शिष्यभावाचे महत्त्व
९ अ. सेवाभाव निर्माण होणे आणि तो टिकून रहाणे
शिष्यभावामुळे साधकात सेवाभाव निर्माण होण्यास आणि तो टिकून रहाण्यास साहाय्य होते. सेवेमुळेच गुरु अधिक प्रसन्न होत असल्यामुळे शिष्याला सतत सेवेचा ध्यास लागणेच अपेक्षित असते. सततच्या सेवेमुळे त्याचे सर्व देह शुद्ध होतात. तसेच सेवेमुळे त्याला सतत गुरूंचे अनुसंधान रहाते. सेवेमुळेच त्याची गुरूंच्या निर्गुण रूपाची साधना होऊन तो लवकर निर्गुणाकडे जाऊ शकतो. याद्वारे गुरु त्याची शीघ्र प्रगती करवून घेतात.
९ आ. संत झाल्यावरही शिष्यभावात राहिल्याने
अहंभाव लवकर न्यून होणे, त्यामुळे पुढची प्रगती शिघ्रतेने होणे
साधक संत झाल्यावरही शिष्यभावात राहिल्यामुळे त्याचा अहंभाव लवकर न्यून होतो. पुढच्या टप्प्यात अहंभाव अल्प होणेच महत्त्वाचे असते. त्यामुळे पुढची प्रगती शिघ्रतेने होते. स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजल्याने अहंभाव वाढण्याची शक्यता असते. तसेच ‘स्वतःची प्रगती झाली’, या विचारानेही सेवाभाव अल्प होऊ शकतो. यासाठी ‘मला शेवटच्या क्षणापर्यंत गुरु सांगतील ती सेवा करत रहायचे आहे’, या विचाराने साधक सतत सेवारत रहातो. संत झाल्यावर त्याची सूक्ष्मातील कार्य करण्याची क्षमताही वाढलेली असते. त्यामुळे तो आता अधिक व्यापक आणि मोठ्या प्रमाणात गुरुसेवा करू शकतो. शिष्यभावात राहिल्याने तो सतत नवीन सूत्रे शिकत रहातो आणि त्याद्वारे अधिक गुरुसेवा करू लागतो.
९ इ. शिष्यभावात राहिल्याने इतर साधकांना शिकता येणे
साधकांना शब्दांद्वारे मार्गदर्शन करून ते जे शिकतात, त्यापेक्षा ते एखाद्याच्या कृतीतून पटकन शिकतात. त्याचा संस्कार साधकांच्या मनावर पटकन होतो आणि ते लवकर शिकून पुढे जाऊ शकतात. शिष्यभावात असलेले संत इतर साधकांसारखीच सेवा करत असतात. त्यामुळे साधकांना अधिक शिकायला मिळते. तसेच प्रगती झाली, तरी सतत सेवेत राहिल्याने आपली क्षमता वाढून अहंभावही अल्प होतो, हे साधकांना शिकायला मिळते. यासाठी संत झाल्यावरही सतत सेवा करण्याचे फार महत्त्व आहे. त्यामुळे इतरांनाही आपण त्यांच्यातलेच एक वाटतो. त्यामुळे आपण त्यांच्याशी पटकन जवळीक साधू शकतो.
१०. प.पू. डॉक्टरांचा शिष्यभाव

प.पू. डॉक्टर ‘परात्पर गुरु’ आहेत, तरीही ते सतत शिष्यभावात असतात. त्यामुळे त्यांच्याकडूनच साधकांना ‘उत्तम शिष्य कसे बनावे’, हे शिकता येते. त्याची काही उदाहरणे पुढे देत आहे.
अ. प.पू. डॉक्टर स्वतःच्या सेवा इतर साधकांना करू देत नाहीत. त्यांना जेवढे शक्य आहे, ते सर्व ते स्वतःच करतात.
आ. खरेतर त्यांनी साधकांना साधनेसाठी पोषक वातावरण मिळावे आणि त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी आश्रम स्थापन केले आहेत. असे असले, तरी आश्रमात रहातांना प.पू. डॉक्टरांचा भाव असतो की, मी माझ्या गुरूंच्या आश्रमात रहातो आणि मलाही इथे त्यांची सेवा करायची आहे. त्यामुळे ते इतर सर्व साधकांप्रमाणेच सतत सेवेत असतात.
इ. तसेच आश्रमात ज्या विविध कार्यपद्धती आहेत, उदा. सेवेच्या वेळा, जेवणाच्या वेळा इत्यादींचे ते काटेकोरपणे पालन करतात.
ई. स्वतःच्या चुकाही ते इतरांसमोर अत्यंत सहजपणे सांगतात.
उ. स्वतः एवढे मोठे संत असूनही ते स्वतःला कोणतीही सवलत घेत नाहीत.
ऊ. प.पू. डॉक्टर साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि त्यांनी केलेले चांगले प्रयत्न यांतून ‘मलाही शिकायला मिळाले’, असे म्हणतात.
अ. साधकांची सेवा करणे
स्वतः एवढे मोठे संत असूनही साधकांनी त्यांना गुरुस्थानी मानून त्यांचे ऐकावे, त्यांची सतत सेवा करावी, अशी त्यांची कोणतीच अपेक्षा नसते. उलट तेच साधकांची सेवा करतात. त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. पूर्वी ते रात्री-अपरात्रीही आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर आध्यात्मिक उपाय करायचे. एखाद्या साधकाला फारच त्रास होत असेल, तर ते त्याच्या खोलीत स्वतः जाऊन उपाय करत असत.
२. त्यांच्यासाठी बनवलेले जेवण ते बर्याचदा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना देतात. त्याद्वारे त्यांना चैतन्य मिळून त्यांचा त्रास न्यून व्हावा, असा त्यांचा उद्देश असतो.
३. साधकांच्या मन आणि बुद्धी यांवर आलेले काळे आवरण नष्ट होऊन त्यांची सेवा चांगली व्हावी आणि साधकांना सेवेसाठी शक्ती मिळावी, यासाठी ते साधकांना सतत खाऊ (प्रसाद) देतात.
४. रुग्णाइत साधकांची ते सतत विचारपूस करतात. प्रसंगी त्यांना भेटायलाही जातात.
५. साधकांना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको, याची ते सतत काळजी घेतात.
आ. स्वतःला साधकांपेक्षा वेगळे न समजणे
१. प.पू. डॉक्टर पूर्वी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्यासमवेत फिरत असत, तेव्हा ते इतर साधकांप्रमाणेच सेवा करत असत. प.पू. भक्तराज महाराज ज्या भक्ताच्या घरी रहात असत, तिथेही ते सेवा करत असत.
२. पूर्वी प.पू. डॉक्टरांनी विविध जिल्ह्यांत धर्मजागृती सभा घेतल्या आहेत. तेव्हा त्यांच्यासाठी जे जेवण बनवले जाई, तेच सर्व साधकांसाठी आहे ना, याची ते खात्री करत. स्वतःला इतर साधकांपेक्षा वेगळी वागणूक दिलेली त्यांना मुळीच चालत नसे.
३. अगदी पूर्वी शीव सेवाकेंद्रात काही साधक काही दिवस राहून सेवा करत असत, तेव्हा सनातनचे कापडी फलक, पोस्टर्स आदींवरील लिखाण सात्त्विक अक्षरांत लिहिण्याची सेवा असे. बर्याचदा साधक सेवा झाल्यावर रंगांच्या डब्या, ब्रश इत्यादी तसेच ठेवून जात. प.पू. डॉक्टर ते सर्व आवरून ठेवत असत.
४. प.पू. डॉक्टर कुठेही गेले की, एखाद्या साधकाचे घर इमारतीत ३ र्या – ४ थ्या माळ्यावर असेल आणि समवेत बरेच साहित्य असेल, तर चालकसाधकाला जास्त हेलपाटे मारायला लागू नयेत; म्हणून स्वतःच काही साहित्य वर घेऊन जात असत.
इ. इतर संतांचीही शिष्यभावाने सेवा करणे
१. प.पू. डॉक्टरांनी या वयातही प.पू. शामराव महाराज यांची सेवा करून त्यांचे मन जिंकून घेतले. तसेच ‘आदर्श शिष्य कसा असावा’, याचा एक धडाच साधकांपुढे घालून दिला. प.पू. डॉक्टर त्यांच्या सेवेसाठी गेल्यावर प्रथम प्रतीदिन त्यांची चप्पल धुऊन ठेवत असत. एकदा प.पू. शामराव महाराज हे स्वेटर घालत होते. त्यांना तो नीट घालता येत नव्हता. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी पटकन उठून त्यांना स्वेटर व्यवस्थित घालून दिला. तेव्हा प.पू. शामराव महाराज म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टरांनी आमचे मन जिंकून घेतले.’’
२. प.पू. दास महाराज यांच्या पायाचा अस्थीभंग आणि शस्त्रकर्म झाल्यावर प.पू. डॉक्टरांनी त्यांना रामनाथी आश्रमात ठेवून घेतले होते. तेव्हा त्यांनी साधकांना संतसेवा उपलब्ध करून दिली आणि ते स्वतःही त्यांच्या प्रकृतीची जातीने विचारपूस करायचे.
ई. गुरुपदी असूनही स्वतःचे पूजन कधीच करवून न घेणारे प.पू. डॉक्टर !
प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार जगभरातील सहस्रो साधक साधना करत आहेत आणि आध्यात्मिक प्रगतीही करत आहेत. तसेच त्यांच्या कृपेमुळेच सनातनमध्ये अत्यंत अल्प कालावधीत ८१ संत (ऑगस्ट २०१८) झाले असून शेकडो साधकांनी ६० टक्के पातळी गाठलेली आहे. असे असूनही ते गुरुपौर्णिमेला स्वतःची पूजा कधीच करून घेत नाहीत. एरव्ही ते कधीही स्वतःची पाद्यपूजा इत्यादी करून घेत नाहीत. ते साधकांना कधी नमस्कारही करू देत नाहीत. ते साधकांनाही प.पू. भक्तराज महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करायला सांगतात. सनातनच्या देश-विदेशांतील सर्व गुरुपौर्णिमा महोत्सवांत केवळ प.पू. भक्तराज महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होते.
असे आदर्श महान गुरु संपूर्ण ब्रह्मांडात एकमेवच असतील, असे मला वाटते. केवढी ही निःस्पृहता. सर्व करून-सवरून नामानिराळे रहाण्याची आणि स्वतःकडे कसलेच श्रेय न घेण्याची ही वृत्ती विरळाच म्हणावी लागेल.
प्रार्थना : प.पू. डॉक्टर, आम्हा सर्व साधकांमध्येही आपल्यासारखाच शिष्यभाव येऊ दे आणि तो कायमस्वरूपी टिकून राहू दे अन् त्याद्वारे आम्हा सर्व साधकांना आपले मन सतत जिंकता येऊ दे, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’
– सौ. राजश्री खोल्लम (आषाढ कृ. चतुर्थी, कलियुग वर्ष ५११२ (३०.७.२०१०))
११. गुरु हे शिष्यासाठी सर्वस्व !
‘गुरु’ हा शब्द उच्चारल्या बरोबर मनात एकदम एक आदरार्थी भावना निर्माण होऊन शरणागत भाव निर्माण होतो. गुरूंच्या ठिकाणी शिष्य आपोआप नतमस्तक होतो. गुरूंचे स्थान हे शिष्यासाठी सर्वस्व आहे; कारण गुरु हे त्याची माता, पिता, बंधू, सखाच नव्हे, तर त्याचे सर्वस्व आहेत. शिष्याने गुरूंना आपले तन, मन, धन अर्पण केल्यामुळे शिष्य आणि गुरु यांच्यामध्ये भेदच रहात नाही. गुरुसुद्धा शिष्याला आपल्यासारखे करून सोडतात. परीस लोखंडाचे सोने करतो; परंतु गुरु शिष्याला गुरुपद देतात. हा त्यांचा महिमा अगाध आहे. शिष्याची उन्नती व्हावी, म्हणून गुरूंचा प्रेमवर्षाव शिष्यावर होत रहातो. यामुळे नुसते गुरूंचे स्मरण झाले, तरी शिष्याचे अष्टसात्त्विक भाव जागृत होतात. सहस्रो जन्म-मरणाच्या फेर्यांतून सुटण्यासाठी भगवंताने त्याला या जन्मात संधी दिलेली असते. गुरूंमुळेच त्याचा उद्धार होतो आणि तो या जन्म-मरणाच्या फेर्यांतून मुक्त होतो. ज्याला अशा प्रकारचे गुरु लाभून त्याचे कल्याण झाले असेल, तो खरोखरच भाग्यवान आहे.
– प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१२. गुरूंविषयी अयोग्य विचार आणि त्यांचे खंडण !
विश्वाच्या आरंभापासून भूतलावर असणारा सनातन वैदिक धर्म (हिंदु धर्म), हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता, धार्मिक विधी, अध्यात्म आदींवर अनेकांकडून टीका केली जाते.
याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

कलियुगात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आणि साधकांना सर्वांगांनी घडवणारी सनातन संस्थेची एकमेवाद्वितीय गुरु-शिष्य परंपरा !
समर्थ रामदासस्वामींना त्यांच्या आजारावरील उपाय म्हणून वाघिणीचे दूध आणून देणारे छत्रपती शिवाजी महाराज !
समर्थ रामदासस्वामी आणि मारुति यांच्या कथेतून प्रतीत होणारा सद्गुरु महिमा
गुरूंच्या आज्ञेचे पालन करून त्यांचे मन जिंकणारा उपमन्यू !
गुरु, सद्गुरु आणि परात्परगुरु
काळाची आवश्यकता ओळखून राष्ट्र अन् धर्मरक्षणाची शिकवण देणे, हे गुरूंचे आजचे आद्य कर्तव्यच !