अधिक मास
(पुरुषोत्तम मास)
अधिक मासातील व्रते अन् करायची पुण्य कर्मे, आणि त्या मागील शास्त्र
अधिक मास हा चांद्र वर्षाचा तेरावा महिना असून तो दर दोन किंवा तीन वर्षांनी येतो. त्याचे नाव त्याच्यानंतर येणाऱ्या महिन्यावरून ठेवले जाते — महिन्याच्या आधीच्या अधिक मासाला ‘(महिन्याचे नाव) अधिक मास’ आणि त्यानंतरच्या महिन्याला ‘निज (महिन्याचे नाव)’ असे म्हटले जाते. अधिक मास हे एक महान पर्व (शुभ काळ) मानले जाते. या कालावधीत विशेष धार्मिक विधी आणि पुण्य कर्मे केली जातात.
अधिक मासात व्रते आणि पुण्यकारक कर्मे करण्यामागील शास्त्र
प्रत्येक मासात सूर्य एकेका राशीत संक्रमण करतो; परंतु अधिक मासात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही. म्हणजेच अधिक मासात सूर्य संक्रात नसते. त्यामुळे चंद्र-सूर्याच्या गतीत फरक पडतो आणि वातावरणातही ग्रहणकालाप्रमाणे पालट होत असतात.
या पालटत्या अनिष्ट वातावरणाचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये; म्हणून या महिन्यात व्रते आणि पुण्यकारक कर्मे करावीत, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे.
या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा.
— हिंदु धर्म शास्त्रअधिक मासात काय करावे
अधिक मासात श्री पुरुषोत्तमप्रीत्यर्थ उपवास करावा. पुढील पैकी एकाचे पालन करू शकता:
- महिनाभर उपोषण
- अयाचित भोजन — अकस्मात एखाद्याच्या घरी भोजनासाठी जाणे (विना आमंत्रण)
- नक्तभोजन — दिवसा न जेवता केवळ रात्री पहिल्या प्रहरात (साधारण सायं. ६ ते रात्री ९) एकदाच जेवणे
- एकभुक्त — दिवसभरात एकदाच जेवावे
अशक्त व्यक्तीने या चार प्रकारांपैकी एक प्रकार निदान तीन दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा.
प्रतिदिन एकच वेळ भोजन करावे. जेवतांना बोलू नये. त्यामुळे आत्मबळ वाढते. मौन भोजन केल्याने पापक्षालन होते.
तीर्थस्नान करावे. किमान एक दिवस गंगास्नान केल्यास सर्व पापांची निवृत्ती होते.
शास्त्रात सांगितले आहे संपूर्ण मास दान करावे. तसे दान करणे शक्य नसेल, त्याने व्यतिपात, वैधृति या योगांवर विशेष दानधर्म करावा किंवा पुढील तिथींना दान करावे:
- शुक्ल आणि कृष्ण द्वादशी
- पौर्णिमा
- कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी
- अमावास्या
या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. अखंड अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करावा.
दीपदान करावे. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते.
तीर्थयात्रा करावी. देवदर्शन करावे.
तांबूलदान (विडा-दक्षिणा) करावे. महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती होते.
गोपूजन करावे. गोग्रास घालावा.
अपूपदान (अनारशांचे दान) करावे.
सनातनच्या आश्रमांना अन्नदान करा
अधिक मास निमित्त धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणाऱ्या सनातनच्या आश्रमांना अन्नदान करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही मिळवा !
अधिक मास – कोणती कर्मे करावीत ?
या मासात नित्य आणि नैमित्तिक कर्मे करावीत. जी केल्यावाचून गती नाही, अशी कर्मे करावीत.:
ज्वरशांती, पर्जन्येष्टी इत्यादी नेहमीची काम्य कर्मे करावीत.
या मासात देवाची पुनःप्रतिष्ठा करता येते.
ग्रहणश्राद्ध, जातकर्म, नामकर्म, अन्नप्राशन आदी संस्कार करावेत.
मन्वादि आणि युगादि संबंधित श्राद्धादि कृत्ये करावीत. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध आणि नित्यश्राद्ध करावे.
अधिक मासात कोणती कर्मे टाळावीत
नेहमीच्या काम्य कर्मांच्या व्यतिरिक्त अन्य काम्य कर्मांचा आरंभ आणि समाप्ती करू नये.
करू नये: अपूर्व देवदर्शन (पूर्वी कधी न गेलेल्या ठिकाणी देवदर्शनाला जाणे), गृहारंभ, वास्तूशांती, संन्यासग्रहण, नूतनव्रत ग्रहणदीक्षा, विवाह, चौल (शिशुचे प्रथम केशकर्तन), उपनयन (मूंज), देवप्रतिष्ठा.
या मासात वाढदिवस किंवा श्राद्ध आल्यास काय करावे
एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या मासात झाला असेल, तोच मास अधिक मास आल्यास त्या व्यक्तीचा वाढदिवस निज मासात करावा.
वर्ष २०१७ मध्ये ज्येष्ठ मासात जन्मलेल्या बालकाचा वाढदिवस २०२६ या वर्षी ज्येष्ठ मास अधिक असल्याने अधिक मासात न करता निज ज्येष्ठ मासात त्या तिथीला करावा. अधिक ज्येष्ठ मासात ज्या बालकाचा जन्म होईल, त्या बालकाचा वाढदिवस प्रतिवर्षी ज्येष्ठ मासात त्या तिथीला करावा.
या मासात श्राद्ध आल्यास काय करावे
ज्या मासात व्यक्तीचे निधन झाले असेल, त्याचे वर्षश्राद्ध तोच मास पुढील वर्षी अधिक मास आला तर त्या अधिक मासातच करावे. उदा. शके १९४१ च्या ज्येष्ठ मासात मृत्यू झाला असेल, तर त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध शके १९४२ च्या अधिक ज्येष्ठ मासात त्या तिथीला करावे.
प्रतिवर्षीचे ज्येष्ठ मासातील प्रतिसांवत्सरिक श्राद्ध या वर्षी निज ज्येष्ठ मासात करावे; मात्र पूर्वीच्या अधिक ज्येष्ठ मासात मृत्यू झालेल्यांचे प्रतिसांवत्सरीक श्राद्ध या वर्षी अधिक ज्येष्ठ मासात करावे.
शके १९४१ मध्ये आषाढ, श्रावण, भाद्रपद इत्यादी मासांत मृत्यू झालेल्यांचे प्रथम वर्षश्राद्ध त्या त्या मासातील त्यांच्या तिथीस करावे. १३ मास होतात; म्हणून १ मास आधी करू नये.
अधिक आश्विन किंवा निज आश्विन मासात मृत्यू झाल्यास त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध पुढील वर्षी आश्विन मासात त्या तिथीला करावे.
संदर्भ : धर्मसिंधु – मलमास निर्णय, वर्ज्य-अवर्ज्य कर्म विभाग · संदर्भ : दाते पंचांग
अधिक मास म्हणजे काय
सूर्य आणि चंद्र यांची एकदा युती होण्याच्या वेळेपासून, म्हणजे एका अमावास्येपासून पुनः अशी युती होईपर्यंत, म्हणजे पुढील मासाच्या अमावास्येपर्यंतचा काळ म्हणजे चांद्रमास होय. सण, उत्सव, व्रते, उपासना, हवन, शांती, विवाह आदी हिंदु धर्मशास्त्रातील सर्व कृत्ये चांद्रमासाप्रमाणे (चंद्राच्या गतीवरून) ठरलेली आहेत. चांद्रमासांची नावे त्या मासात येणाऱ्या पौर्णिमेच्या नक्षत्रांवरून पडली आहेत, उदा. चैत्र मासाच्या पौर्णिमेला चित्रा नक्षत्र असते.
चैत्र ते फाल्गुन या १२ महिन्यांच्या कालावधीला चांद्रवर्ष म्हणतात. चांद्रवर्षामध्ये ३५४ दिवस असतात; अधिक मास असलेल्या चांद्रवर्षात ३८४ दिवस असतात.
एका सूर्य संक्रांतीपासून दुसऱ्या सूर्य संक्रांतीपर्यंतच्या कालावधीला सौरमास म्हणतात. सौरमासात ३० किंवा ३१ दिवस असतात. ऋतू सौरमासाप्रमाणे (सूर्याच्या गतीवरून) ठरलेले आहेत.
सूर्य अश्विनी नक्षत्रापासून भ्रमण करत पुनः त्याच ठिकाणी येतो. तेवढ्या काळाला सौरवर्ष असे म्हणतात. सौरवर्षात साधारण ३६५ दिवस असतात.
चांद्रवर्षाचे ३५४ दिवस आणि सौरवर्षाचे ३६५ दिवस असतात, म्हणजेच या दोन वर्षांमध्ये ११ दिवसांचे अंतर असते. हे अंतर भरून यावे, तसेच चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांचा मेळ बसावा; म्हणून स्थूलमानाने सुमारे ३२॥ (साडेबत्तीस) मासांनी एक अधिक मास धरतात. म्हणजे २७ ते ३५ मासांनी १ अधिक मास येतो.
अधिक मासासाठी अन्य नावे
अधिक मासाला मलमास किंवा धोंड्याचा महिना असे म्हणतात. अधिक मासात मंगलकार्याऐवजी विशेष व्रते आणि पुण्यकारक कर्मे केली जातात; म्हणून याला पुरुषोत्तम मास, असेही म्हणतात.
अधिक मास कोणत्या मासात येतो
चैत्र ते आश्विन या सात मासांपैकी एक मास अधिक मास म्हणून येतो.
क्वचित फाल्गुन मासही अधिक मास म्हणून येतो.
कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष या मासांना जोडून अधिक मास येत नाही.
क्षय मास (हरवलेला अथवा लुप्त महिना)
जसा अधिक मास असतो तसा क्षय मास (हरवलेला अथवा लुप्त महिना) देखील असतो. कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष या तीन मासांपैकी कोणता तरी एक मास क्षय मास होऊ शकतो; कारण या तीन मासांत सूर्याची गती अधिक असल्यामुळे एका चांद्रमासात त्याची दोन संक्रमणे होऊ शकतात. क्षय मास येतो, तेव्हा एका वर्षात क्षय मासाच्या पूर्वी १ आणि नंतर १, असे २ अधिक मास जवळजवळ येतात. हे अत्यंत दुर्मिळ आहे. साधारण १४० किंवा १९० वर्षांनी असे होते.
माघ मास मात्र अधिक मास किंवा क्षय मास होत नाही.
अधिक मास काढण्याची पद्धत
ज्या मासाच्या कृष्ण पंचमीस सूर्याची संक्रांत येईल, तोच मास प्रायः पुढील वर्षी अधिक मास होतो; परंतु हे स्थूलमान (सर्वसाधारण) आहे.
जी बाकी राहील, ती ९ किंवा त्यापेक्षा न्यून असेल, तर त्या वर्षी अधिक मास येईल, असे समजावे.
बाकी → अधिक मास
३०, ४९, ६८, ८७, १०६, १२५ → चैत्र
११, ७६, ९५, ११४, १३३, १५२ → वैशाख
०, ८, १९, २७, ३८, ४६, ५७, ६५, ८४, १०३, १२२, १४१, १४९ → ज्येष्ठ
१६, ३५, ५४, ७३, ९२, १११, १३०, १५७ → आषाढ
५, २३, ४६, ६२, ७०, ८१, ८२, ८९, १००, १०८, ११९, १२७, १३८, १४६ → श्रावण
१३, ३२, ५१ → भाद्रपद
२, २१, ४०, ५९, ७८, ९७, १३५, १४३, १४५ → आश्विन
अन्य संख्या बाकी उरल्यास → अधिक मास येत नाही.
येणाऱ्या अधिक मासांचे कोष्टक
| सामान्य युग वर्ष | शालिवाहन शक | पुरुषोत्तम मास |
|---|---|---|
| २०२९ | १९५१ | चैत्र |
| २०३२ | १९५३ | भाद्रपद |
| २०३५ | १९५६ | आषाढ |
| २०३८ | १९५९ | ज्येष्ठ |
| २०४१ | १९६१ | आश्विन |
सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिषफलित विशारद (२२.४.२०२६)
तीन वर्षांनी अधिक मास येतो. या कालावधीत केलेल्या नामजप, सत्संग, सत्सेवा, त्याग, दान याला अधिक महत्त्व आहे. या कालावधीत दान केल्यास अधिक प्रमाणात आध्यात्मिक लाभ होताे. भारतीय संस्कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्यबळाची प्राप्ती करून देते. ‘या पृथ्वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी (ठेवा) नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.
सद़्भावनेने ‘सत्पात्रे अन्नदान’ केल्यास अन्नदात्याला त्याचे उचित फळ मिळते, तसेच सर्व पातकांतून त्याचा उद्धार होऊन तो ईश्वराच्या जवळ जातो. अन्नदान केल्यास अन्नदात्याला आध्यात्मिक स्तरावरही लाभ होतो.
— हिंदु धर्मशास्त्रसनातन संस्था राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध आहे. सनातन संस्थेचे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमधून धर्मप्रसाराचे कार्य केले जाते. सध्याच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांची सेवा करण्याचे महत्त्व लक्षात घेऊन शेकडो साधक आश्रमांत राहून पूर्णकालीन सेवा करत आहेत. धर्मजागृतीचे कार्य अव्याहतपणे करणाऱ्या सनातनच्या आश्रमांना अन्नदानासाठी धनरूपात साहाय्य करण्याची संधी अर्पणदात्यांना आहे.
सनातन संस्थेच्या आश्रमांना अन्नदान करा
‘अन्नदान करणे’, हे श्रेष्ठ कर्म मानले जाते. हिंदु धर्मशास्त्रानुसार जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी प्रतिदिन अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे, हे त्याचे कर्तव्य आहे. अधिक मास निमित्त सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसार आणि धर्मजागृतीच्या कार्यार्थ दान करून आध्यात्मिक लाभ मिळवा.
आषाढी एकादशी 2026 आणि पंढरपूरची वारी
महाशिवरात्र (Mahashivratri 2026)
पांडुरंगाच्या ओढीने वारीत आनंदाने वाटचाल करणारे वारकरी !
जिवंतिका पूजन
पांडुरंग आणि एकादशी यांचे माहात्म्य !
‘घडा’ या पारंपरिक गरबा नृत्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम
ya masat jar mulila bal zale asel tr javayala dan detat te deu shakto ka…aani javyala pn soyar lagu aste tr te dan gheu shaktat ka
नमस्कार
आपण सोयर संपल्यावर देऊ शकतात.
आपली
सनातन संस्था
Adhik mass madhe dohale jevan karu shakto ka
नमस्कार
हो. अधिक मासात डोहाळे जेवण करू शकतो.
या सोबतच बाळाला आणि आईला आवश्यक संस्कारांविषयी माहिती सनातनच्या ग्रंथांमध्ये दिलेली आहे. आपण ते अवश्य बघून घ्या. – https://sanatanshop.com/shop/marathi-books/mr-hindu-dharma-and-sanskar/mr-parenting/
आपली,
सनातन संस्था
Adhik masat jaminichi kharedi karu shakto ka
नमस्कार,
अधिक मासात विशेष कोणतेही काम निषिद्ध आहे. त्यामुळे भू खरेदी हे करता येणार नाही.
आपली,
सनातन संस्था
अधिक मासात डोहाळे जेवण करू शकतो का?
नमस्कार
हो. अधिक मासात डोहाळे जेवण करू शकतो.
या सोबतच बाळाला आणि आईला आवश्यक संस्कारांविषयी माहिती सनातनच्या ग्रंथांमध्ये दिलेली आहे. आपण ते अवश्य बघून घ्या. – https://sanatanshop.com/shop/marathi-books/mr-hindu-dharma-and-sanskar/mr-parenting/
आपली,
सनातन संस्था
अधिक मासात कपडे नवीन खरेदी करू शकतो का?
नमस्कार
हो. अधिक मासात नवीन कपडे घेऊ शकतो, मंगल कार्ये निषिद्ध आहेत.
आपली
सनातन संस्था
Adhikari masa madhe Aachi otti bhartat ka ?
नमस्कार
आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.
अनेक प्रांतांमध्ये ‘अधिक मासात आईची ओटी भरण्याची’ प्रथा आहे. तरी आपल्या प्रांतात अशी प्रथा असेल तर करू शकतात.
आपली,
सनातन संस्था