गडद रंग आणि फिकट रंग यांच्या संदर्भातील आध्यात्मिक प्रयोग

पहिल्या रांगेतील चौकोनांमध्ये काही रंग आणि त्यांच्याच बाजूच्या ३ रांगांत त्याच रंगाची फिकट छटा असलेले चौकोन घेतले आहेत. रंग फिकट करतांना गडद रंग १०० टक्के असल्यास तो टप्प्याटप्प्याने म्हणजेच ७० टक्के, ३० टक्के, १० टक्के असा घेतला आहे.

प्रयोग

प्रथम गडद रंगांच्या चौकोनांकडून सर्वांत फिकट रंगांच्या चौकोनांकडे दृष्टी फिरवा. नंतर त्या उलट म्हणजे फिकट रंगांच्या चौकोनांकडून गडद रंगांच्या चौकोनांकडे दृष्टी फिरवा. असे ४ – ५ वेळा करून काय वाटते, ते अनुभवा.

सर्व रंगांचे प्रमाण टक्यांमध्ये

New_hangerCMYK

गडद रंगांपेक्षा फिकट रंगांकडे पाहून
अधिक चांगले वाटण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा

विश्‍लेषण

Janhavi_Shinde_2011_clr
सौ. जान्हवी शिंदे

या चौकोनांकडे पाहिल्याबरोबर गडद रंग आपले लक्ष वेधून घेतात. फिकट रंगांच्या तुलनेत गडद रंग जास्त आकर्षक वाटतात; परंतु सूक्ष्मातून प्रयोग केल्यास फिकट रंगांकडे पाहून अधिक चांगले वाटते, म्हणजे डोळ्यांना गडद रंग, तर मनाला फिकट रंग चांगले वाटतात. डोळ्यांना जे आकर्षक वाटते, त्यापेक्षा मनाला जे वाटते, ते अधिक योग्य असते.

१. फिकट रंग चांगले वाटण्याची कारणे

१ अ. दृष्टी गडद रंगांकडून फिकट रंगांकडे फिरवतांना
स्थुलाकडून सूक्ष्मात जाण्याची आणि निर्गुणाची अनुभूती येणे

साधनेचा प्रवास नेहमीच जडत्वाकडून निर्गुणाकडे, म्हणजेच स्थुलाकडून सूक्ष्माकडे असतो. जितके सूक्ष्म तितके आनंददायी. वरील रंगांच्या चौकोनांच्या संचांचेही तसेच आहे. दृष्टी गडद रंगांकडून फिकट रंगांकडे फिरवतांना स्थुलाकडून सूक्ष्मात जाण्याची अनुभूती घेता येते. फिकट होत गेलेले रंग शेवटी पांढर्‍या रंगात विलीन होतात. तेथे मन स्थिरावते म्हणजेच मनाला निर्गुणाची अनुभूती येते.

१ आ. अनेक रंगांचे अस्तित्व न्यून होत जाऊन ते
शेवटी पांढर्‍या रंगात विलीन होत असल्याने मनाला चांगले वाटणे

अनेकातून एकात जाणे, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. वरील प्रयोगात अनेक रंगांचे अस्तित्व न्यून होत जाऊन ते शेवटी एका रंगात, म्हणजे पांढर्‍या रंगात विलीन होतात. त्यामुळे मनाला चांगले वाटते.

वरील प्रयोगामध्ये गडद रंगांच्या संचाकडून फिकट रंगांच्या संचाकडे जातांना जी अनुभूती येते, तशीच अनुभूती त्या संचातील कोणत्याही एका रंगाचा तसा प्रयोग केल्यास येते.

२. गडद रंगाच्या वस्तू का वापरू नयेत ?

फिकट रंग वापरल्याने आध्यात्मिक स्तरावर लाभ होत असतो, तर गडद रंगामुळे निव्वळ मानसिक समाधान मिळते. गडद रंगाच्या वस्तू का वापरू नयेत, हे या प्रयोगावरून लक्षात येते.

३. रंगांची आवड-निवड कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते ?

३ अ. आध्यात्मिक स्तर

गडद किंवा फिकट रंगांची निवड व्यक्तीचा आध्यात्मिक स्तर आणि व्यक्तीची प्रकृती यांवरही अवलंबून असते. जसजसा मनुष्याचा आध्यात्मिक स्तर वाढतो, तसतशी निर्गुणाशी एकरूप होण्याची त्याची ओढ वाढते. त्यामुळे नकळतच निर्गुणाची अनुभूती देणार्‍या वस्तूंकडे तो खेचला जातो. त्यामुळेच त्याला सौम्य आणि फिकट रंग आवडू लागतात.

आध्यात्मिक स्तर न्यून असलेल्या माणसाची आवड-निवड मानसिक स्तराची असते. त्याला मनाला सुख देणारे आणि उत्साहवर्धक भडक रंग आवडतात.

३ आ. आध्यात्मिक प्रकृती

माणसाच्या आध्यात्मिक प्रकृतीनुसारही त्याची रंगांची आवड ठरते. सात्त्विक प्रकृतीचा माणूस फिकट आणि सात्त्विक रंगांची निवड करतो, तर राजसिक-तामसिक प्रकृतीचा माणूस भडक अन् गडद रंगांची निवड करतो. असे असले, तरीही काही वेळा प्रत्यक्षात येणार्‍या अडचणींमुळे जे आवडते, त्यापेक्षा वेगळ्या रंगांची निवड केली जाते, उदा. फिकट रंग आवडत असला, तरीही त्या रंगाचे कपडे घातल्यावर ते लगेच मळतात किंवा ते पुष्कळ पारदर्शक असतात; म्हणून गडद रंगांचे कपडे वापरले जातात. इतर वस्तूंच्या संदर्भातही असेच होते.

३ इ. वाईट शक्तींचा त्रास

वाईट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांची रंगांच्या संदर्भातील आवड-निवड त्यांच्या त्रासावर अवलंबून असते. फिकट रंग त्यांना त्रासदायक वाटतात; कारण त्यांतून निर्गुणाची स्पंदने येत असल्याने त्या माध्यमातून त्यांच्यावर उपाय होतात.

– सौ. जान्हवी रमेश शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.८.२०१४)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात