यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण

Article also available in :

वैद्य मेघराज माधव पराडकर

ज्येष्ठमध चूर्ण थंड गुणधर्माचे असून डोळे, त्वचा, केस आणि घसा यांना हितकर आहे.

 

१. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग

हे औषध थंड गुणधर्माचे असून डोळे, त्वचा, केस आणि घसा यांना हितकर आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.

 

उपयोग औषध घेण्याची पद्धत कालावधी
अ. आकडी (फीट) येणे सकाळी आणि सायंकाळी ३ ग्रॅम (१ चमचा) ज्येष्ठमध चूर्ण अर्धा पेला कोहळ्याच्या रसातून घ्यावे. ६ मास
आ. खोकला, घसा दुखणे, घसा खवखवणे, घसा बसणे, घशातून कफ बाहेर न पडणे आणि तोंड येणे प्रतिदिन ४ वेळा पाव चमचा ज्येष्ठमध चूर्ण चघळून खावे. ५ दिवस
इ. हिरड्यांतून रक्त येणे दोन्ही वेळा जेवणानंतर पाव चमचा ज्येष्ठमध चूर्ण आणि १ चमचा काळे तीळ चावून चावून खावेत आणि ५ मिनिटांनी चूळ भरावी. ७ दिवस
ई. पित्तामुळे मळमळणे, अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे आणि आम्लपित्त यांमध्ये उलटीद्वारे शुद्धी होण्यासाठी ४ चमचे ज्येष्ठमध चूर्ण २ पेले कोमट पाण्यात मिसळून प्यावे आणि प्रसाधनगृहात उकिडवे किंवा स्टूलवर बसून उलटी होईपर्यंत जिभेवर बोटे घासावीत. हा उपचार अत्यावश्यक असल्यास ६ मासांतून एकदाच करावा. नंतर २ दिवस हलका आहार (रव्याचा उपमा, शिरा, मऊ भात, वरण भात, मुगाचे कढण इ.) घ्यावा. तात्कालिक
उ. बद्धकोष्ठता दोन्ही जेवणांपूर्वी १ चमचा ज्येष्ठमध चूर्ण आणि १ चिमूट मीठ कोमट पाण्यासह घ्यावे. १५ दिवस
ऊ. तोंडवळ्यावर मुरुमे येणे ज्येष्ठमध चूर्णाचा दुधातून लेप लावून तो वाळत आल्यावर धुवावा. १५ दिवस
ए. उष्णतेचे विकार (उष्ण पदार्थ न सोसणे, तोंड येणे, अंगाची आग होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, अंगावर पुरळ उठणे, चक्कर येणे इत्यादी) २ वेळा १ चमचा ज्येष्ठमध चूर्ण १ चमचा तुपातून घ्यावे. १५ दिवस
ऐ. वजन न्यून असणे आणि थकवा सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करून ३० मिनिटांनी १ चमचा ज्येष्ठमध चूर्ण १ कप दूध आणि २ चमचे तूप यांसह घ्यावे. नंतर १ घंटा काही खाऊ-पिऊ नये. ३ मास
ओ. ताप दिवसातून २ वेळा अर्धा चमचा ज्येष्ठमध चूर्ण, अर्धा चमचा तुळशीचा रस, अर्धा चमचा आल्याचा रस आणि १ चमचा मध यांचे मिश्रण घ्यावे. ३ ते ५ दिवस
औ. सूज पुरेशा प्रमाणात ज्येष्ठमध चूर्ण घेऊन त्यात आवश्यकतेनुसार कोमट पाणी मिसळून जाडसर लेप करावा. एका घंट्याने लेप कोमट पाण्याने धुऊन टाकावा. ७ दिवस

 

२. सूचना

अ. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात चूर्ण घ्यावे.

आ. ज्येष्ठमध अधिक प्रमाणात पोटात घेतल्यास उलटी होते. त्यामुळे तो प्रमाणातच घ्यावा.’

३. औषधाचा सुयोग्य परिणाम होण्यासाठी हे टाळावे !

मैदा आणि बेसन यांचे पदार्थ; आंबट, खारट, अती तेलकट अन् तिखट पदार्थ; आईस्क्रीम, काकवी, दही, पनीर, चीज; शिळे, अवेळी आणि अती प्रमाणात भोजन; उन्हात फिरणे; तसेच रात्रीचे जागरण

 

४. औषध घेतांना उपास्य देवतेला प्रार्थना करावी !

हे देवते, हे औषध मी तुझ्या चरणी अर्पण करून तुझा ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करत आहे. या औषधाने माझे विकार दूर होऊ देत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)

अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !

Leave a Comment