ईश्‍वरी अधिष्ठान असल्यानेच सनातन संस्थेचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण ! – पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते

पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांचे
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या वाटचालीविषयी जाणून घेतांना पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते

देवद (पनवेल) – आज धर्मप्रचार करणार्‍या अनेक संघटना आहेत; पण त्या केवळ प्रसंग आणि घटना यांना धरून प्रचार करतात. सनातन संस्थेला ईश्‍वरी अधिष्ठान आहे. त्यामुळे संस्थेचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतर सगळे केवळ प्रचारक आहेत. सनातन संस्थेचे साधक उपासक आहेत, असे गौरवोद्गार हिंदु धर्माचे गाढे अभ्यासक आणि धर्माचार्य पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते (वय ८३ वर्षे) यांनी काढले. येथील सनातनच्या आश्रमात ३ जानेवारीला त्यांचे आगमन झाल्यावर ते साधकांशी चर्चा करतांना बोलत होते.

या वेळी त्यांना आश्रमातील सेवा आणि सनातनचे कार्य यांविषयी श्री. ओंकार कापशीकर आणि श्री. शिवाजी वटकर यांनी अवगत केले. महाराजांनी आश्रमात लावलेले चुकांचे फलक वाचून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियाही समजून घेतली. प.पू. पांडे महाराज यांनी पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांचा शाल, श्रीफळ, प्रसाद आणि श्रीकृष्णाचे चित्र देऊन सन्मान केला. सन्मानप्रसंगी सनातनचे पू. राजेंद्र शिंदे यांनी पू. (ह.भ.प.) महाराजांविषयी माहिती कथन केली. या वेळी ते म्हणाले, धर्मप्रसाराचे कार्य धडाडीने करणारे, धर्मद्रोही आणि विद्रोही यांच्या लिखाणाचे खंडण करणारे पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते हे आधीपासूनच संतपदावर पोहोचलेले आहेत. या वेळी महाराजांच्या मानसकन्या आणि सेवेकरी रुक्मिणी देवकाते अन् नातू ह.प.प. शुभम महाराज वक्ते उपस्थित होते.

सनातनच्या साधिका सौ. स्मिता नाणोसकर यांनी रुक्मिणी देवकसे यांची ओटी भरली.

आश्रमदर्शनाच्या वेळी ध्यानमंदिरातील सनातननिर्मित श्री दुर्गादेवीचे मारक रूपातील चित्र पाहून हे माझेच रूप आहे, असे ते म्हणाले. सात्त्विक गणेशमूर्तीविषयी सनातनने प्रबोधन केल्यानेच समाजात चांगला पालट दिसून येतो, असेही त्यांनी सांगितले.

परिचय

पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते

पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते हे वारकरी संप्रदायातील सध्याच्या काळातील अत्यंत ज्येष्ठ सत्पुरुष आहेत. वारकरी परंपरेच्या जोडीला सनातन हिंदु धर्मपरंपरेतील वेद, उपनिषदे, श्रुति-स्मृति आणि पुराणे यांचेही ते गाढे अभ्यासक आहेत. वारकरी परंपरेतील प्रसारासह सनातन वैदिक धर्माची जागृती करणे, तसेच विद्रोही विचारांचे सर्व स्तरांवर सातत्याने खंडण करणे हेही त्यांचे कार्य आहे. मनुस्मृति, रामायण, महाभारत, भगवद्गीता यांचे वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व ते सातत्याने समाजासमोर मांडतात. या शास्त्रांविषयी आणि विद्रोहाच्या खंडणाविषयीही ते लिखाण करतात. ते स्वतःच्या क्षमतेनुसार विद्रोहींच्या विरोधात आंदोलने करतात.

त्यांच्यात पुष्कळ क्षात्रवृत्ती आहे. धर्मद्रोही व्यक्ती कुठल्याही क्षेत्रातील अगदी कितीही मोठी असू दे, ते कसलीही भीड न बाळगता उपलब्ध व्यासपिठावरून टीका करून समाजाला जागृत करतात. वारकरी परंपरेतील विविध नियतकालिके, तसेच सनातन प्रभातम यांमधून त्यांचे धर्मजागृतीपर लिखाण सातत्याने चालू असते. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्यासाठी मंत्री आणि आमदार यांना आमदारांना भेटण्यासाठी ते प्रवास करून दूरच्या ठिकाणी जायचे, तसेच विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात मुंबई अन् नागपूर येथे प्रत्येक वेळी जाऊन ते कायद्याला विरोध करायचे.

 

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था
यांच्याशी 
पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांचा असलेला संबंध

हिंदु जनजागृती समितीच्याही सर्व कार्यांत त्यांचा सहभाग आणि मार्गदर्शन असते. सनातन संस्थेविषयी त्यांना विशेष आत्मीयता आहे. सनातन संस्थेला असलेल्या ईश्‍वरी अधिष्ठानाविषयी ते सातत्याने सांगत असतात. गेली १० वर्षे ते कार्तिकी एकादशीला वारकरी, तसेच इतर आध्यात्मिक हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासह धर्मजागृतीसाठी मोठी अधिवेशन आयोजित करत आहेत. याचा खर्च ते स्वतः करतात. सनातनवरील बंदीच्या काळात विविध आध्यात्मिक उपायही त्यांनी सांगितले होते. बंदी येऊ नये, यासाठी ते स्वतः प्रार्थनाही करायचे.

 

पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांनी केलेले मार्गदर्शन

पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते यांचा सन्मान करतांना प.पू. पांडे महाराज

१. सर्व हिंदुत्ववादी संघटनांना एकत्र आणायला हवे. प्रत्येक संघटनेत काही कमीअधिक असे असतेच. त्याकडे दुर्लक्ष करून सर्वांनी पुढे जायला हवे.

२. ख्रिस्ती आणि मुसलमान त्यांच्या धर्मग्रंथाविषयी सांगू शकतात; पण हिंदूंना आपला धर्मग्रंथच ठाऊक नाही. आपला धर्मग्रंथ मनुस्मृति आहे. ती जाळणार्‍यांनाच राजकीय नेते सहस्रो रुपयांचे हार घालतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे हिंदु धर्म बुडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मूर्ख हिंदू त्यांनाच निवडून देतात.

३. सनातन संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि हेमंत करकरे यांनी खोटेनाटे आरोप केले.

४. सात्त्विक वृत्ती असणार्‍यालाच सगळे पटते. धर्माप्रमाणे वागायला हवे. विचार शास्त्राचाच आहे.

५. मी कीर्तनात उघडपणे धर्मद्रोह्यांच्या विरोधात कठोर बोलतो. सनातन प्रभात हे जगातील एकमेव दैनिक आहे. तेच धर्माविषयी उघडपणे कटू सत्य मांडते.

६. देवाने जगवले, तर वर्ष २०२३ ची हिंदु राष्ट्राची पहाट पाहीन.

७. आपण साधक व्हायला पाहिजे; म्हणजे आपल्याला उपदेश, मार्गदर्शन मिळत जाईल अन् समाधानही लाभेल.

 

सनातनविषयी काढलेले गौरवोद्गार

१. सनातनचा आश्रम म्हणजे ऋषिमुनींचा आश्रम आहे. प्रत्येक साधकाचे वागणे, बोलणे, सेवा करणे धर्मशास्त्राला धरून आहे.

२. सनातन संस्थेमुळे आळंदी येथील वारकर्‍यांच्या अधिवेशनाला पुष्कळ साहाय्य होते.

३. सनातनवर बंदी कधीही आणू देणार नाही; कारण सनातन संस्था ही धर्मसंस्थापना करणारी संस्था आहे. अन्य हिंदुत्ववादी संघटना केवळ हिंदूसंघटनाचे कार्य करतात.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’