वर्धा येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदु राष्ट्रासाठी संघटित होण्याचा संकल्प !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त आयोजित हिंदू एकता दिंडी

पूजन केलेला धर्मध्वज आणि फुलांनी सजवलेली पालखी

वर्धा – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त येथील आर्वी रोड येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ३५० हून अधिक हिंदूंनी दिंडीद्वारे हिंदु राष्ट्रासाठी एकत्र येण्याचा संकल्प केला आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे व्रत घेतले.

गुरुपरंपरेचे प्रतिनिधित्व करणारी पालखी, हिंदु राष्ट्रावर प्रेरणादायी विचार मांडणारा चित्ररथ, देवता आणि महापुरुष यांच्या वेशभूषेतील बालसाधक अन् रणरागिणी यांनी हातात प्रतिकात्मक दंड धरून, तसेच दंडयुद्धाचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीच्या वेळी ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या वेळी विविध संप्रदायांतील भाविकांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम’चा जयघोष केल्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले.

रामदिघी संस्थानाचे अध्यक्ष श्री. हनुमंत कारेकर यांच्या हस्ते ब्रह्मध्वजाचे पूजन झाल्यावर शंखनादाने शोभायात्रेला आरंभ झाला. यात्रेत समाजातील अनेक भाविक पालखीत ठेवलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन, धर्मध्वजाचे पूजन आणि पालखीवर पुष्पवृष्टी करत होते. ठिकठिकाणी सुशोभित रांगोळ्या काढून दिंडीचे स्वागत करण्यात आले. या दिंडीत धर्माभिमानी ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते. दिंडीचा प्रारंभ श्री संतोषी माता मंदिरापासून होऊन शेवट शिवाजी चौक येथे शेवट करण्यात आला. या दिंडीमुळे लोकांचा सनातन धर्मावरील विश्वास दृढ झाला.

उपस्थित मान्यवर

विश्व हिंदु परिषदेचे श्री. बाळूभाऊ राजपुरोहित, श्री. अनिल कावळे, श्री. दिलीप तिवारी, श्री. अतुल देशपांडे; बजरंग दल मातृशक्तीच्या सौ. कावळे; स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे श्री. श्याम देशपांडे; राष्ट्रसेविका समितीच्या सौ. सुवर्णा काळे, सौ. अपर्णा हरदास; श्रीराम मंदिर देवस्थानचे श्री. संजीव लाभे, श्री. विजय धाबे, श्री संजीव हरदास; भाजपचे श्री. कमल कुलधरिया, धर्मजागरण विभागाचे श्री. जगदीश टावरी, सौ. माधुरी मेंढेवार; गायत्री परिवाराच्या श्रीमती राऊत, सौ. कविता भांडोपिया; भागवताचार्य सौ. लतादीदी तिवारी, महिला भजनी मंडळ, सेलू.

दिंडीच्या पुढे धर्मध्वज, मागे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा असलेली सजवलेली पालखी, हातात भगवा ध्वज घेतलेले विविध संघटनांचे कार्यकर्ते, दंड घेतलेले धर्मप्रेमी आणि साधक, राष्ट्रपुरुष, देवतांची वेशभूषा केलेल्या बालसाधकांचा चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. समाजातील लोक धर्मध्वज आणि पालखी यांना नमस्कार करत होते.

क्षणचित्रे

१. ४३ अंश सेल्सिअस उन्हात ज्येष्ठ नागरिक दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

२. धर्मप्रेमी नागरिकांनी दिंडीतील उपस्थित कार्यकर्त्यांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली, तसेच घोषणाही दिल्या.

Leave a Comment