भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्‍वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !

  • ‘रामराज्या’च्या संकल्पपूर्तीसाठी प्रभादेवी येथे ७००० हून अधिक भाविकांची उपस्थिती
  • भारतासह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, आदी ४० देशांतील हजारो भाविकांनी घेतला ऑनलाईन लाभ !

मुंबई : सध्याच्या जागतिक अशांततेच्या आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारताला चारी बाजूंनी अभेद्य आध्यात्मिक संरक्षककवच लाभावे, या मुख्य उद्देशाने मुंबईत श्री सिद्धिविनायकाच्या कृपाछायेखाली झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ अत्यंत चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. सनातन संस्थेच्या वतीने प्रभादेवी, मुंबई येथील नर्दुल्ला टँक मैदानात आयोजित या महायज्ञाला ७००० हून अधिक भाविक उपस्थित होते. राष्ट्ररक्षण, देशाची सर्वांगीण प्रगती आणि ‘रामराज्या’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे, हा या आयोजनामागील मुख्य संकल्प होता. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ज्या मुंबापुरीत (मुंबईतून) धर्मकार्याचा श्रीगणेशा केला, त्याच भूमीतून राष्ट्रउभारणीचे हे एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे.”

श्री राजमातंगी महायज्ञात पूजन करताना श्रीसतशक्ती (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरू निलेश सिंगबाळ आणि श्रीचित्तशक्ती (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु मुकुल गाडगीळ आणि वेदमूर्ती

 

राष्ट्रहितासाठी झालेला व्यापक संकल्प

कमळावर आरूढ असलेल्या श्री राजमातंगी देवीचे प्रचलित चित्र

आदिशक्ती देवी सतीच्या क्रोधातून प्रकट झालेल्या ‘दशमहाविद्यां’मध्ये अत्यंत शक्तिशाली मानल्या गेलेल्या मातंगीदेवीचे स्थान अनन्यसाधारण आहे. आदिशक्तीची ‘प्रधानमंत्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवीची उपासना शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फलदायी मानली जाते. त्रेतायुगात प्रभु श्रीरामाच्या काळातही राजमातंगीदेवीचे तत्त्व कार्यरत होते आणि आदर्श रामराज्याच्या स्थापनेत त्याचा सहभाग होता, अशी श्रद्धा आहे.

आज देश चारी बाजूंनी विविध आव्हानांनी वेढलेला असतांना भारताच्या रक्षणासाठी केवळ भौतिक सामर्थ्य पुरेसे नाही, तर त्याला आध्यात्मिक बळाचीही जोड हवी. याच भावनेतून भारताचे संरक्षण व्हावे, राष्ट्राला आध्यात्मिक बळ प्राप्त व्हावे आणि सर्वांगीण विकास साध्य व्हावा, या उद्देशाने या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले.  श्री राजमातंगीदेवीचा हा महायज्ञ भारताला एक अभेद्य आध्यात्मिक कवच प्रदान करेल. महायज्ञादरम्यान भारताच्या रक्षणासाठी आणि लोककल्याणासाठी सामूहिक प्रार्थना व संकल्प करण्यात आला.

 

भावपूर्ण धार्मिक विधींनी सजलेला महायज्ञ

१७ मे रोजी दुपारी महागणपती पूजन, पुण्याहवाचन आणि महायज्ञाच्या संकल्पाने सोहळ्याचा प्रारंभ झाला. सनातनचे पुरोहित श्री. अमर जोशी यांनी केलेल्या शंखनादाने दैवी वातावरणाची निर्मिती झाली. त्यानंतर उपस्थित सर्व श्रद्धाळूंनी राष्ट्रहितार्थ सामूहिक संकल्प केला.

ललिता त्रिशती कुंकूमार्चनाद्वारे देवीला आवाहन करण्यात आले. शक्तितत्त्वाचे प्रतीक असलेल्या कुंकवाच्या माध्यमातून श्री राजमातंगीदेवी आणि दशमहाविद्या आदिशक्तींची कृपा प्राप्त व्हावी, या भावनेने सहयजमानांनी कुंकूमार्चन केले. त्यानंतर श्री राजमातंगीदेवीच्या मूलमंत्रांनी यज्ञकुंडात आहुती समर्पित करण्यात आल्या. या वेळी ९६ प्रकारच्या १०८ द्रव्यांच्या आहुती अर्पण करण्यात आल्या.

श्री गणपति होमाद्वारे गणेशाची आराधना करण्यात आली. त्यानंतर श्री राजमातंगी आणि परिवार देवतांचा होम, देवी सप्तशतीच्या सातव्या अध्यायाच्या पठणासह होम, गायत्रीमंत्र पाठ, पारायण आणि अन्य वैदिक विधी संपन्न झाले. ‘महिषासुरमर्दिनी स्तोत्राच्या’ सामूहिक पाठाने विधीची सांगता झाली.

या महायज्ञाचे पौरोहित्य इरोड (तमिळनाडू) येथील शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती यांनी केले, तर श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य हे यज्ञाचे मुख्य आचार्य होते.

 

सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे दर्शन

सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशाचे दर्शन घेताना भाविक
सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश

महायज्ञातील एक विशेष आकर्षण म्हणजे सोरटी सोमनाथ येथील मूळ ज्योतिर्लिंगाचे जतन करून ठेवलेले दिव्य अंश. सध्या सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या पुनर्निर्माणाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ साजरे केले जात आहे. या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधत सुमारे एक सहस्र वर्षांपूर्वी महंमद गझनीने भग्न केलेल्या आणि प्रत्यक्ष भगवान चंद्रदेवांनी स्थापित केलेल्या सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे थेट मुंबईत दर्शन घेण्याची एक अभूतपूर्व सुवर्णसंधी या यज्ञस्थळी भाविकांना मिळाली.

नादस्वराच्या मंगल ध्वनीमध्ये या दिव्य अंशांचे यज्ञस्थळी आगमन झाले. शक्तीची उपासना होत असलेल्या या महायज्ञात भगवान शिवाच्या या दिव्य उपस्थितीमुळे जणू ’शिवशक्ती संगमा’चा अनुभव प्राप्त झाल्याचा भाव अनेकांनी व्यक्त केला.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी या दिव्य अंशांचे औक्षण केले.

 

संत, मान्यवर आणि हजारो भाविकांची उपस्थिती

या महायज्ञाचे प्रमुख यजमान म्हणून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ उपस्थित होते. मुंबई आणि परिसरातील अनेक दांपत्यांनी सहयजमान म्हणून सहभाग घेऊन हे शक्तिशाली वैदिक अनुष्ठान केले.

या सोहळ्याला भाजपचे आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश गंगाधरे, मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार, श्री सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष श्री. आचार्य त्रिपाठी, स्वातंत्रवीर स्मारकाचे अध्यक्ष श्री. रणजित सावरकर, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभूदेसाई, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. नितीन प्रधान, उद्योजक श्री. धनराज विसपुते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संत उपस्थित होते. जीवनाडीपट्टी वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् हेही या सोहळ्यास उपस्थित होते.

सद्गुरु सत्यवान कदम, मागे सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) संगीता जाधव
सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर एका प्रसन्न भावमुद्रेत
जीवनाडीपट्टीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यज्ञस्थळी ध्यानस्थ !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु अनुराधा वाडेकर, सद्गुरु स्वाती खाडये, तसेच पू. अशोक पात्रीकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचीही उपस्थिती लाभली.

या महायज्ञाचे सनातन संस्थेच्या यूट्यूब वाहिनीवरून थेट प्रसारण विश्वभर करण्यात आले. याचा भारतातील अनेक राज्यांसह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, चीन, अर्जेन्टिना, पोलंड, थायलंड, ब्राझिल आदी ४० देशांतील हजारो भाविकांनी यज्ञाचा लाभ घेतला.

या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ आणि मंदिर विश्वस्त यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने भारताचा सर्वांगीण विकास आणि शत्रूंच्या नाशासाठी सामूहिक प्रार्थना केली.

 

भाविकांच्या अनुभूती आणि चैतन्यमय वातावरण

महायज्ञादरम्यान अनेक भाविकांनी चैतन्यदायी अनुभूतींचा उल्लेख केला. अनेकांना वातावरणात विलक्षण शांतता, आनंद, हलकेपणा आणि आध्यात्मिक स्पंदने जाणवल्याचे त्यांनी सांगितले.

काहींनी देवतांचे अस्तित्व जाणवल्याचे, काहींनी यज्ञस्थळी सूक्ष्म स्तरावरील दैवी कार्य अनुभवले असल्याचे सांगितले. अनेक भाविकांनी महायज्ञाला “आध्यात्मिक संरक्षककवच”, “चैतन्यमय अनुभव”, “मन, आत्मा आणि वातावरण यांचे शुद्धीकरण करणारा दिव्य सोहळा” असे संबोधले.

पूर्णाहुतीच्या वेळी अनेक भाविकांना भावजागृती झाली, तर काहींनी यज्ञस्थळ सोडावेसे वाटत नसल्याची भावना व्यक्त केली.

 

मान्यवरांचे अभिप्राय

महायज्ञाला उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी या आयोजनाचे कौतुक केले. भारताचे रक्षण, लोककल्याण, समाजातील नैतिकतेची वृद्धी आणि आध्यात्मिक बळ यांसाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

काही मान्यवरांनी यज्ञामुळे मनःशांती, ऊर्जा आणि चैतन्य लाभल्याचे सांगितले, तर काहींनी समाजात आध्यात्मिकतेचा प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता व्यक्त केली. यज्ञातील शिस्तबद्ध व्यवस्था, मंत्रोच्चारांची शुद्धता आणि भावपूर्ण वातावरण यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.

यज्ञाला उपस्थित भाजपचे आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे आणि शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे

१. डॉ. मनीषा कायंदे, आमदार, शिवसेना – सनातन संस्थेने देशाच्या हितासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी श्री राजमातंगी महायज्ञाचे आयोजन केले होते. हा यज्ञ अप्रतिम झाला. या यज्ञाला उपस्थित रहाता आले, हे मी माझे भाग्य समजते. भाग्यात असेल तरच हा योग येतो. ४० देशांमध्ये या यज्ञाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले. सर्वांना शक्ती आणि ऊर्जा देणार्‍या या यज्ञामुळे रामराज्य यावे, ही अपेक्षा आहे.

२. ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार, भाजप – सनातन संस्थेच्या वतीने श्री राजमातंगी महायज्ञाचे आयोजन केले आहे. यामुळे देश आणि राज्य यांवर येणार्‍या संकटातून मुक्ती मिळावी. सर्वांना ऐश्वर्य आणि आरोग्य लाभावे, देशामध्ये, राज्यांमध्ये सुख-शांती लाभावी, अशी मी प्रार्थना करताे. मी ३ घंटे या यज्ञासाठी बसून होतो. त्यामुळे मला पुष्कळ चैतन्य आणि ऊर्जा मिळाली. हा प्रभावी महायज्ञ आयोजित केल्याविषयी मी सनातन संस्थेचे अभिनंदन करतो. या यज्ञाचा लाभ देश आणि राज्य यांतील सर्व नागरिकांना होईल, असा मला विश्वास वाटतो.

यज्ञस्थळी देवीचे भावपूर्ण दर्शन घेतांना मनसेचे नगरसेवक श्री. यशवंत किल्लेदार

३. यशवंत किल्लेदार, नगरसेवक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – इथे येऊन मन आनंदी आणि प्रसन्न झाले आहे. एवढा मोठा महायज्ञ मुंबईसारख्या ठिकाणी होणे, हा एक सुखद अनुभव आहे. सनातन संस्थेने एवढा भव्य-दिव्य आणि अलौकिक असा महायज्ञ राष्ट्राची सुरक्षा अन् लोककल्याण यांसाठी आयोजित केलेला आहे. असे यज्ञ होणे अत्यंत आवश्यक आहे. मी यज्ञसंस्कृतीचा पुरस्कर्ता असून सनातन संस्थेविषयी कृतज्ञ आहे.

४. श्री. कुप्पूस्वामी, ‘श्री शंकर मठा’चे (शापूरजी पालनजी ग्रुप संचालित) अध्यक्ष, वडाळा – (यज्ञस्थळापासून जवळच रहात असल्याने महायज्ञाचे मंत्रोच्चार कानी पडल्यावर ते यज्ञस्थळी आले.) यज्ञाचे पौरोहित्य करणार्‍या पुरोहितांचे मंत्रोच्चार पुष्कळ चांगले आणि त्रुटींविरहित होते. बाहेर कडक ऊन असतांना आणि प्रचंड गरम होत असतांना यज्ञस्थळी असलेले भाविक मात्र यज्ञविधी भावपूर्ण अनुभवत होते. भाविकांसाठी पाण्यासह सर्व आवश्यक गोष्टींची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आलेल्या प्रत्येकाची काळजी घेतली जात होती. ‘ईश्वराच्या कृपेने भारताची समृद्धी होत राहो आणि प्रत्येक वेळी भारताचा विजय होवो’, या उदात्त भावनेने सोहळ्याचे आयोजन करणार्‍या सनातन संस्थेचे मी मनापासून आभार मानतो. भविष्यातही संस्थेने अशाच कार्यक्रमांचे आयोजन करावे, त्यासाठी आवश्यक ते साहाय्य ‘शंकर मठा’च्या वतीने केले जाईल.

 

यज्ञमहिमा आणि राष्ट्ररक्षणाची प्रार्थना

वेदपरंपरेचे चिरकालीन आणि शाश्वत स्वरूप दर्शवणारा यज्ञ हा देवता, निसर्ग आणि समाज यांना जोडणारा दैवी सेतू मानला जातो. तो केवळ कर्मकांड नसून सनातन वैदिक संस्कृतीची अमूल्य देणगी आहे.

यज्ञौ वै श्रेष्ठतमं कर्मः’ — यज्ञ हे सर्वश्रेष्ठ कर्म आहे.

यज्ञौ वै विष्णुः’ — यज्ञ म्हणजे साक्षात् भगवान विष्णूच.

या धर्मवचनांच्या भावनेतून राष्ट्रहितासाठी आयोजित करण्यात आलेला श्री राजमातंगी महायज्ञ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि श्री राजमातंगीदेवी यांच्या कृपेने पूर्णत्वास गेला.

साक्षात् वेदनारायणस्वरूप ‘त्यागातून समृद्धी’ हा संदेश देणारा हा महायज्ञ म्हणजे रामराज्यनिर्मितीच्या दिशेने उचललेले एक पाऊल ठरला. राष्ट्ररक्षण, लोककल्याण आणि भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हजारो भाविकांनी केलेल्या समष्टी संकल्पातून प्राप्त झालेले हे आध्यात्मिक बळ दीर्घकाळ प्रेरणादायी ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

हिंदूंनो, तिसर्‍या महायुद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी यज्ञसंस्कृतीचे पुनरुत्थान करा ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘यज्ञ हे आध्यात्मिक बळ निर्मितीचे सोपे माध्यम आहे. त्यामुळे प्राचीन काळापासून ‘यज्ञ करणे’ हे इप्सित फलप्राप्ती आणि आपत्ती-निवारण यांसाठीचा सहज मार्ग आहे. त्यामुळे यज्ञाला अधिक महत्त्व आहे. येणारा आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांना सामोरे जाण्यासाठी शारीरिक आणि मानसिक बळ निर्माण करण्याचे विविध मार्ग उपलब्ध होऊ शकतात; पण आध्यात्मिक बळ हे केवळ साधना आणि यज्ञ यांच्याद्वारेच निर्माण होऊ शकते.

आवश्यक त्या तीव्रतेने साधना करणे सर्वांना शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये यज्ञ करणे, हा सर्वांत सोपा आणि सर्वांसाठी पूरक असा मार्ग आहे. यज्ञाचा वातावरणावरही खूप जलद आणि अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम होतो, हे विविध वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध झाले आहे. यासाठी हिंदूंनो, आगामी तिसर्‍या महायुद्धाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि त्यापुढे रामराज्य स्थापनेसाठी यज्ञसंस्कृतीचे पुनरुत्थान करा !’

 

श्री राजमातंगी यज्ञ प्रत्यक्ष अनुभवा

Leave a Comment