भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’

मुंबई : जगावर सध्या तिसऱ्या महायुद्धाचे काळे ढग दाटले असताना, केवळ राजकीय किंवा बौद्धिक स्तरावरील प्रयत्न पुरेसे नसून राष्ट्राला आध्यात्मिक अधिष्ठानाची मोठी गरज आहे. याच उदात्त हेतूने, भारताला अभेद्य आध्यात्मिक संरक्षककवच लाभावे आणि देशाची सर्वांगीण प्रगती होऊन पुन्हा एकदा ‘रामराज्या’चा उदय व्हावा, या संकल्पपूर्तीसाठी सनातन संस्थेच्या वतीने मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी, १७ मे २०२६ रोजी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नर्दुल्ला टँक मैदानावर दुपारी ३.३० ते सायं. ७.३० या वेळेत हा यज्ञ सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न होणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस, पुरोहित अन् ज्योतिर्विद श्री. श्रेयस पिसोळकर आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नवी मुंबई समन्वयक श्री. कैलास पाटील उपस्थित होते. हा महायज्ञ केवळ धार्मिक विधी नसून तो राष्ट्ररक्षणाचा एक आध्यात्मिक लढा असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले.

या यज्ञाचे आध्यात्मिक महत्त्व विशद करताना श्री. अभय वर्तक म्हणाले की, आदिशक्ती देवी सतीच्या क्रोधातून प्रकट झालेल्या ‘दशमहाविद्यां’मध्ये मातंगीदेवीचे स्थान अनन्यसाधारण आहे. देवी मातंगी ही आदिशक्तीची ‘प्रधानमंत्री’ म्हणजेच प्रमुख सल्लागार मानली जाते. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या देवीची उपासना फलदायी ठरते. ऐतिहासिक संदर्भांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, त्रेतायुगात प्रभू श्रीरामाच्या अवताराच्या वेळीही राजमातंगी देवीचे तत्त्व कार्यरत होते, ज्यामुळे आदर्श रामराज्य स्थापन होऊ शकले. आजच्या काळातही तशाच दैवी शक्तीच्या आशीर्वादाने भारताचे संरक्षण व्हावे, हा या यज्ञामागील मुख्य उद्देश आहे.

या महायज्ञाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे १ हजार वर्षांपूर्वी आक्रमक महंमद गझनीने भग्न केलेल्या सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे दर्शन ! इतिहासाची साक्ष देणारे हे पवित्र अवशेष याठिकाणी दर्शनासाठी ठेवले जाणार असून भाविकांसाठी ही एक दुर्मिळ संधी असणार आहे असे श्री. चेतन राजहंस म्हणाले. यज्ञाची सुरुवात महासंकल्प, श्री गणेश आवाहन आणि पुण्याहवाचन  होणार असून, श्री राजमातंगी देवीच्या मूलमंत्रांनी यज्ञामध्ये आहुती अर्पण केल्या जातील. यज्ञाचे पौरोहित्य इरोड, तामिळनाडू येथील शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती करतील तर शिवाचार्य श्री. गुरुमूर्ती हे यज्ञाचे मुख्य आचार्य असतील, असे पुरोहित अन् ज्योतिर्विद श्री. श्रेयस पिसोळकर म्हणाले. या यज्ञाला मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हयातील अनेक मंदिरांचे विश्वस्त आणि पुजारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे नवी मुंबई समन्वयक श्री. कैलास पाटील यांनी दिली.

सनातन संस्थेने आतापर्यंत ७५० हून अधिक यज्ञ-अनुष्ठाने केली आहेत. या यज्ञ सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, संत-महंत, राज्य सरकारमधील मंत्री, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, विचारवंत, वकील आणि उद्योजकांसह सुमारे ५ हजार भाविक उपस्थित राहतील. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ज्या मुंबापुरीतून धर्मकार्याचा श्रीगणेशा केला, त्याच नगरीत होणारा हा महायज्ञ राष्ट्रउभारणीच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. सर्व धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. अभय वर्तक यांनी केले आहे.

 

श्री राजमातंगी महायज्ञ

भारताचे संरक्षण, सर्वांगीण अभिवृद्धी आणि लोककल्याणार्थ

यज्ञ हे सनातन सनातन संस्कृतीचे एक महत्त्वाचे अंग आहे. धर्मग्रंथांत वर्णिलेल्या यज्ञांचा लाभ समाजाला मिळावा, यासाठी काही संत प्रयत्नरत आहेत. संतांच्या अथक प्रयत्नांमुळेच यज्ञसंस्कृती टिकून आहे. विश्वकल्याणासाठी यज्ञयाग करण्याची आपली परंपरा आहे. सध्या तिसऱ्या महायुद्धाचे सावट संपूर्ण जगावर आहे. जरी राजकीय, बौद्धिक स्तरावर प्रयत्न होत असले, तरी आध्यात्मिक पाठबळ हे खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच मुंबई येथे श्री राजमातंगी महायज्ञाचे आयोजन सनातन संस्थेच्या वतीने केले आहे, या निमित्ताने लेखप्रपंच !

यज्ञ संस्कृती

भारतीय संस्कृतीत यज्ञाला ‘ब्रह्मांडाची नाभी’ मानले जाते. म्हणजेच यज्ञ हा सृष्टीचा केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळेच वैदिक काळापासून यज्ञांना विशेष महत्व दिले आहे. एकूणच या यज्ञांच्या माध्यमातून देवतांचे आशीर्वाद प्राप्त करून इच्छित ध्येय साध्य करणे सुलभ होते. राजसूय, अश्‍वमेध, पुत्रकामेष्टी आदी यज्ञांविषयी सविस्तर माहिती हिंदू धर्मग्रंथांत आढळते. यज्ञातील अग्नी आणि मंत्रांच्या उच्चाराने वातावरणातील नकारात्मकता दूर केली जाते. यज्ञाच्या माध्यमातून वातावरणाचे संतुलन राखले जाते आणि त्याची शुद्धी होत असते. यज्ञाचा पर्यावरणावर, तसेच मानवजातीवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो, हे आता वैज्ञानिक संशोधनातूनही समोर आले आहे.

सनातनच्या आश्रमात आतापर्यंत रामराज्याच्या स्थापनेसाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी ३०० हून अधिक यज्ञ आणि १,००० हून अधिक धार्मिक विधी केले आहेत. यामध्ये साग्निचित् अश्वमेध महासोमयाग, उच्छिष्ट गणपति यज्ञ, चंडीयाग, धन्वंतरि याग, संजीवनी होम, पंचमहाभूत याग आदी यागांचा समावेश आहे. या यज्ञयागांचा संकल्प धर्मकार्यात येणारे अडथळ्यांचे निवारण व्हावे तसेच रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, असा समष्टीच्या कल्याणाचा होता. मे २०२५ मध्ये गोवा येथे झालेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात भारताच्या रक्षणासाठी अन् विजयासाठी शतचंडी यज्ञ आणि अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ‘श्री महाधन्वन्तरि याग’ आयोजित करण्यात आला. या वेळी देशविदेशातील संत-महंत यांच्यासह ३० हजारांहून अधिक भाविक आणि हिंदू धर्मप्रेमींची उपस्थिती होती.

श्री राजमातंगी देवीचे कार्य आणि महायज्ञाचे प्रयोजन !

आदिशक्ति देवी सतीच्या क्रोधातून निर्माण झालेली शक्तीची दहा रूपे म्हणजे ‘दशमहाविद्या’! काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरभैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या दशमहाविद्या आहेत. मातंगी आदिशक्तिची प्रधानमंत्री (सल्लागार) असल्याने तिला ‘श्री राजमातंगी’ असे म्हटले जाते. या देवीच्या उपासनेने शत्रूवर नियंत्रण प्राप्त होत असल्याने सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत तपोभूमी भारताचे रक्षण होण्यासाठी श्री राजमातंगीदेवीचे संरक्षककवच आवश्यक आहे. श्रीविष्णूच्या विविध दशावतारांच्या वेळीही दशमहाविद्या कार्यरत असतात. त्रेतायुगात श्रीरामाच्या अवताराच्या वेळी श्री राजमातंगीदेवीचे तत्त्व कार्यरत होते; म्हणून आदर्श रामराज्य स्थापन झाले ! सद्यस्थितीतही रामराज्याच्या निर्मितीसाठी श्रीराजमातंगी देवीची कृपा आवश्यक आहे !

राजमातंगी ही ‘विजयप्रदा आहे. सध्याच्या युद्धकाळात तपोभूमी भारताला संरक्षककवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी; म्हणून सनातन संस्थेने ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ आयोजित केला आहे. या वेळी श्री राजमातंगीदेवीची स्तुती करून भारताचा सर्वांगीण विकास आणि रक्षण यांसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येईल ! सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी धर्मकार्याचा आरंभ केला, त्या मुंबादेवीच्या नगरीत आयोजित हा महायज्ञ म्हणजे ‘रामराज्य निर्मिती’च्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊलच ! या यज्ञाचा आध्यात्मिक लाभ आपण सपरिवार उपस्थित राहून अवश्य घ्यावा, ही विनंती !

Leave a Comment