धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी जन्माष्टमी महोत्सव निमित्त सनातन संस्थेच्या साधकांनी त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले ! !

 मंदिरे धर्मकार्यासाठी कशी कार्यान्वित होतील, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

श्री दत्त पद्मनाभ पीठ, तपोभूमी, गोवा यांच्या वतीने पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी जन्माष्टमी महोत्सव २७ फेब्रुवारीला श्रीक्षेत्र तपोभूमी येथे मोठ्या उत्साहात संपन्न !

तपोभूमी (कुंडई, गोवा) – आपण देव, देश आणि धर्म यांसाठी केलेल्या कार्यानेच सद्गुरु संतुष्ट होतात. आपण सर्वांनी आपल्या गावातील मंदिरे देवकार्य आणि धर्मकार्य यांसाठी कशी कार्यान्वित होतील, याकडे एक जागृत हिंदु म्हणून लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शनपर उद्गार पद्मश्री धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी तपोभूमी पिठावरील जन्माष्टमी कार्यक्रमात काढले.

सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी पुढे म्हणाले, ‘‘सर्वजण आपल्या मुलांना लाखो रुपये खर्च करून शिक्षण देतात. त्याचबरोबर देव, देश आणि धर्म यांचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आपली पुढची पिढी राष्ट्रभिमानी निर्माण होण्याची आवश्यकता आहे. आज आपण या ठिकाणी एकत्रित येऊन सर्वजण हरिनाम गजरात आनंदाने नाचून भक्तीचा आनंद प्राप्त केलात. आपल्या गोव्याच्या समुद्रकिनारी मद्यपान करून धिंगाणा घालण्याची आवश्यकता नाही, तर अशा सात्त्विक हरिनामाच्या गजरातूनसुद्धा आनंद प्राप्त करता येतो, याची ही प्रचीती आहे.’’

श्री दत्त पद्मनाभ पीठ, तपोभूमी, गोवा यांच्या वतीने पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी जन्माष्टमी महोत्सव २७ फेब्रुवारीला श्रीक्षेत्र तपोभूमी येथे मोठ्या उत्साहात झाला. सकाळच्या सत्रात धार्मिक विधी झाले.

संध्याकाळच्या सत्रात पूज्य सद्गुरु राजोपचार पूजा, संगीत रजनी, सद्गुरु दीप आराधना आदी विविध कार्यक्रमांनी युक्त भव्य प्रकट कार्यक्रम झाला. या वेळी व्यासपिठावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, श्रीदत्त पद्मनाभ पीठ संचालिका गुरुमाता ब्राह्मीदेवीजी, ग्लोबल योग अलायन्सचे श्री गोपाल जी, आदी मान्यवर उपस्थित होते. पूजनीय स्वामीजींच्या जन्माष्टमीनिमित्त देशविदेशातील सहस्रो भाविक उपस्थित होते. शांतीपाठ आणि सद्गुरु दर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींमुळे गोव्याची विश्वभर आध्यात्मिक ओळख ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाने संस्कृती जडणघडणीचे कार्य श्रीक्षेत्र तपोभूमीच्या वतीने चालू आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पूजनीय स्वामीजींचे सान्निध्य प्राप्त झाले, हे माझ्यासाठी परमभाग्य समजतो.

पूजनीय सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींमुळे गोव्याची विश्वभर आध्यात्मिक ओळख झाली आहे. पूजनीय स्वामीजींच्या जन्माष्टमीदिनी समस्त गोमंतकियांच्या वतीने त्यांना वंदन करतो.

सद्गुरु स्वामीजींचे दर्शन घेतांना सनातनचे श्री. धनंजय हर्षे (हिरवा कुर्ता घातलेले)आणि (त्यांच्या डाव्या बाजूला) समितीचे श्री. सत्यविजय नाईक

सनातनचे साधक श्री. धनंजय हर्षे आणि हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनीही सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे दर्शन घेऊन त्यांना वंदन केले.

Leave a Comment