प्रकृतीनुसार कपड्यांचा रंग

Article also available in :

व्यक्तीची आवडनिवड अन् प्रकृती यांनुसार कोणते कपडे वापरावेत, कपड्यांचा रंग निवडण्यामागील सर्वसाधारण आध्यात्मिक दृष्टीकोन, यांविषयीची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

 

१. आयुर्वेदानुसार प्रकृती

प्रकृती कपड्यांचा प्रकार कपड्यांचा रंग
१. ‘वात सुती किंवा कौशेय (रेशमी) लाल किंवा पिवळा
२. पित्त सुती पांढरा, हिरवा किंवा निळा
३. कफ लोकर लाल’

 

 

२. त्रिगुणांनुसार प्रकृती

व्यक्तीची आवडनिवड तिच्या प्रकृतीला अनुसरून असते अन् प्रकृती तिच्यातील सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांवर अवलंबून असते.

 

प्रकृतीतील प्रधान गुण प्रकृतीचे लक्षणस्वरूप गुण / दोष आवडणारे रंग
१. सत्त्व मनमिळावूपणा, नम्रता, एकाग्रता इत्यादी पांढरा, पिवळा आणि निळा
२. रज धाडसी, स्वाभिमानी, सतत कार्यरत, महत्त्वाकांक्षी इत्यादी तांबडा आणि शेंदरी
३. तम रागीट, संकुचित स्वभावाचा, लोभी, आळशी इत्यादी राखाडी, करडा, गडद लाल, जांभळा आणि काळा

 

अ. व्यक्तीवर ज्या गुणाचा प्रभाव जास्त असतो, त्या गुणाचा रंग तिला आवडतो.

आ. अध्यात्मात सत्त्वगुण महत्त्वाचा आहे. व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती जसजशी होत जाते, तसतसा तिच्यातील सत्त्वगुण वाढून रज-तमोगुण न्यून होत जातो. ‘अनेकातून एकात जाणे’, हेही अध्यात्मातील एक महत्त्वाचे तत्त्व आहे. व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती जसजशी होत जाते, तसतशी ती ‘अनेकातून एकात’ जाऊ लागते, उदा. विविध देवतांच्या उपासनेतून एका देवतेच्या उपासनेत येते. हाच न्याय कपड्यांच्या संदर्भातही लागू होतो. सत्त्वगुणी व्यक्ती पांढरा किंवा तत्सम फिकट रंगाचे कपडे वापरते, तर तमोगुणी व्यक्ती सप्तरंगांचे आणि सप्तरंगांतील विविध रंगांच्या मिश्रणांनी बनलेल्या विविध प्रकारच्या रंगांचे कपडे वापरते.

 

३. उद्देशानुसार कपड्यांचा रंग

याची दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’, असे अन्नाचे महत्त्व सांगितले आहे. पांढरा रंग हा पवित्रतेचे प्रतीक आहे; म्हणूनच पूर्वी स्त्रिया स्वयंपाक करतांना अन् भोजन वाढतांना शुभ्र वर्णाची साडी (सोवळे) नेसत आणि पुरुष भोजनाच्या वेळी पांढरे सोवळे किंवा पंचा नेसत अन् अंगावर उत्तरीय म्हणून पंचा घेत.

आ. अंत्ययात्रेत सहभागी होणारे पांढर्‍या रंगाचे कपडे घालतात; कारण पांढरा रंग वैराग्याचे दर्शक आहे.

 

४. कपड्यांच्या रंगांची आवड-नावड शारीरिक,
मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर असणे

अ. शारीरिक स्तर

‘जे रंग त्वचेच्या रंगाशी जुळत नाहीत, ते रंग व्यक्तीला सर्वसाधारणत आवडत नाहीत, उदा. काळ्या रंगाच्या व्यक्तीला लाल रंगाचा कपडा भडक वाटतो.

आ. मानसिक स्तर

मनाच्या विविध भावनांनुसार रंगांची आवड-नावड पालटत असते. हा पालट तात्कालिक असतो. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. सहलीला जातांना माणसे रंगीबेरंगी कपडे घालतात.

२. तरुण वयात पाटल (गुलाबी) रंग आवडणार्‍यांचे प्रमाण अधिक असते आणि जसजसे वय वाढत जाते, तसतसे त्या रंगाचा विसर पडतो.

३. एखाद्या आवडत्या व्यक्तीमत्त्वाच्या प्रभावामुळे रंगांची आवड पालटू शकते. नट-नटीने घातलेल्या रंगांचे कपडे तरुणवर्ग काही काळ ‘फॅशन’ म्हणून वापरतो.

४. पाकिस्तानद्वेषी भारतियाला हिरव्या रंगाची चीड येते, तर हिंदूंचा द्वेष करणार्‍या काही पंथियांना भगव्या रंगाची चीड येते.

इ. आध्यात्मिक स्तर

१. त्रिगुणांनुसार असलेल्या प्रकृतीनुसार रंगांची निवड असते.

२. साधनेच्या स्तरानुसारही रंगांची आवड पालटते. साधक भावाच्या स्तरावर असतो, त्या वेळी त्याला निळा रंग आवडतो. साधक चैतन्याच्या स्तरावर असतो, त्या वेळी त्याला पिवळा रंग आवडतो. पुढे तो शांतीच्या स्तरावर गेल्यावर त्याला पांढरा रंग आवडतो.’

– सनातनच्या साधक-चित्रकार सौ. जान्हवी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

५. कपड्यांचा रंग निवडण्यामागील सर्वसाधारण आध्यात्मिक दृष्टीकोन

कपड्यांचा रंग सात्त्विक असावा. पांढरा, पिवळा, निळा आणि त्यांच्या छटा अशा सात्त्विक रंगांचे कपडे निवडावेत.

अ. कपड्यांचा रंग भडक नसावा

भडक रंग हे तमोगुणाचे लक्षण आहे. भडक रंगांचे कपडे परिधान करणारा कालांतराने तमोगुणी बनतो.

आ. कपडे एकाच रंगाचे असावेत

एकसारख्या आध्यात्मिक रंगाचे वस्त्र हे जास्त प्रमाणात पारदर्शकतेचे दर्शक असल्याने ते आध्यात्मिकदृष्ट्या जास्त सत्त्वगुणी मानले जाते.

इ. कपड्यांचे रंग एकमेकांना पूरक असावेत

दोन वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालायचे असल्यास ते रंग एकमेकांना पूरक, म्हणजे एकमेकांशी न्यूनतम (कमीतकमी) २० टक्के जुळणारे असावेत, उदा. दोन सात्त्विक रंगांची जोडी आध्यात्मिकदृष्ट्या जास्त योग्य असते. सात्त्विक रंगांच्या जोडीची उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. पांढरा आणि फिकट निळा

२. गडद निळा आणि फिकट निळा

ई. कपड्यांच्या दोन रंगांमध्ये जास्त विरोधाभास नसावा

एकत्रित असलेल्या दोन रंगांमध्ये जास्त विरोधाभास असल्यास अयोग्य स्पंदने निर्माण होतात; म्हणून कपड्यांच्या दोन रंगांमध्ये जास्त विरोधाभास नसावा, उदा. पिवळा (सात्त्विक) आणि हिरवा (राजसिक) अशी जोडी नको. हिरव्या रंगामधील पिवळ्या रंगाकडे झुकलेली छटा चालेल; कारण तिच्यामध्ये पिवळा रंग अधिक प्रमाणात असल्यामुळे ती छटा सात्त्विकच असते.

 

६. राजसिक रंग सात्त्विक रंगासह अल्प
प्रमाणात वापरल्यास त्या कपड्यातून चांगली स्पंदने येणे

पांढर्‍या रंगाच्या कपड्यावर जर लालसर रंगाची फुलांची वेलवीण (नक्षी) असेल, तर त्या कपड्यातून एकूण स्पंदने चांगली जाणवतात. याचाच अर्थ कपड्यात सात्त्विक रंगाचे प्रमाण राजसिक रंगापेक्षा अधिक असल्यास राजसिक रंगाचा परिणाम अल्प होतो. थोडक्यात कपड्याच्या रंगांमधून येणारी स्पंदने ही ‘कपड्यात सात्त्विक आणि राजसिक रंगांचा वापर किती टक्के केला आहे’, यावर अवलंबून असतात.’

– सनातनच्या साधक-चित्रकार सौ. जान्हवी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’

Leave a Comment