प.पू. नरेंद्रनाथ महाराज आणि पं. वसंतराव गाडगीळ यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

डावीकडून डॉ. श्रीकांत शास्त्री, पं. वसंतराव गाडगीळ, प.पू. नरेंद्रनाथ महाराज, प्रा. गजानन कुलकर्णी आणि श्री. अनिरुद्ध चौधरी यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना सनातनचे डॉ. दुर्गेश सामंत

रामनाथी – नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथ यांच्यानंतर त्यांच्या स्थानी १६ वे पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेले अकोला येथील प.पू. नरेंद्रनाथ महाराज आणि पुणे येथील शारदाज्ञानपीठम्चे संस्थापक आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ यांनी १५ डिसेंबर या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत प.पू. नरेंद्रनाथ महाराज यांचे चिरंजीव सनदी लेखापाल श्री. अनिरुद्ध चौधरी, वेदशास्त्रसंपन्न आणि कथाकार डॉ. श्रीकांत शास्त्री, तसेच प्रा. गजानन कुलकर्णी उपस्थित होते. त्यांना सनातनचे डॉ. दुर्गेश सामंत यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र, धर्म आणि आध्यात्मिक संशोधन या कार्यांविषयी परिचय करून दिला.

सनातन हाच आमचा धर्म आहे ! – पं. वसंतराव गाडगीळ

सनातन हा आपल्या धर्मात सर्वात प्राचीन शब्द आहे. वेदांमध्ये हिंदु धर्माचे नाव सनातन असे दिले आहे. त्यामुळे आपल्या धर्माचे खरे नाव सनातन धर्म आहे. सनातन म्हणजे ज्याला जन्म नाही आणि अंतही नाही. तोच आमचा धर्म आहे. हिंदु हा शब्द सिंधू या शब्दापासून निर्माण झाला आहे. मूळ वेदांमध्ये कृण्वन्तो विश्‍वम् आर्यम्। असे म्हटले आहे.

सनातन संस्थेविषयी बोलतांना ते म्हणाले, भगवंत अधर्माचा नाश करून धर्मसंस्थापनेसाठी पुन्हा पुन्हा अवतार घेतो. त्याचप्रमाणे सनातन संस्थेचे ईश्‍वरी कार्य असून ते परमेश्‍वरी संकेताने चालू आहे. माझ्यात श्‍वास असेपर्यंत मी सनातनला साहाय्य करणार आहे.

सनातन आश्रमात माणूस घडवला जात आहे ! – प.पू. नरेंद्रनाथ महाराज

सनातन संस्थेविषयी मी ऐकून होतो; परंतु आश्रमात आल्यावर येथे साधकांना उत्तम प्रकारे कसे घडवतात, हे प्रत्यक्षात पहायला मिळाले. येथे माणूस घडवला जात आहे, असे उद्गार प.पू. नरेंद्रनाथ महाराज यांनी काढले.

क्षणचित्रे

१. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी पं. वसंतराव गाडगीळ म्हणाले, राष्ट्राला त्यांची आवश्यकता आहे आणि तेच राष्ट्र आहेत.

२. या प्रसंगी प.पू. नरेंद्रनाथ महाराज आणि पं. वसंतराव गाडगीळ यांचा सनातनचे श्री. प्रकाश मराठे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला, तसेच प.पू. नरेंद्रनाथ महाराज यांच्या शिष्यांचाही सत्कार करण्यात आला.

३. वर्ष २०१७ मध्ये अकोला येथे सौर ऊर्जेवर आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. त्यासाठी जगभरातील संशोधक येणार आहेत. त्या संदर्भात केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भेटण्यासाठी प.पू. नरेंद्रनाथ महाराज आणि पं. वसंतराव गाडगीळ गोवा येथे आले होते. यानंतर ते शृंगेरी येथील शंकराचार्य यांना भेटण्यास जाणार होते. त्या वेळी त्यांनी सनातन आश्रमाला भेट दिली.