गोवा येथील रामनाथी आश्रम म्हणजेचैतन्याचे स्फुल्लिंग देणारे एक अनोखे तीर्थक्षेत्र ! (भाग १)

पंढरपूर येथील दैनिक ‘पंढरी संचार’चे संपादक आणि संचालक श्री. बाळासाहेब बडवे यांनी पौष शुक्ल पक्ष ५, कलियुग वर्ष ५११४, दिनांक १६.१.२०१३ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी रामनाथी आश्रमातील स्वच्छता आणि स्वयंशिस्त यांमुळे ते भारावून गेले. त्यांना तेथे आत्मियता, भौतिकता अन् नैतिकता यांचा त्रिवेणी संगम पहायला मिळाला. रामनाथी आश्रमाविषयीची प्रतिक्रिया व्यक्त करतांना ते म्हणाले, ‘‘मी देशभरातील ३५० पेक्षा अधिक आश्रम पाहिले; पण रामनाथी आश्रम पाहून मी मंत्रमुग्ध झालो.’’

 

१. रामनाथी आश्रमाची भेट म्हणजे जीवनातील दुर्मिळ ठेवा असणे

‘भौतिक जगात अनेक बाह्य आकर्षणांनी ऐहिक स्वार्थांधता उफाळून वर येत आहे. अशा या कालखंडात धर्मविचार, राष्ट्रविचार आणि आत्मकल्याण यांच्या श्रद्धेची ऊर्जा मिळून जीवन सार्थकी लावण्याची प्रक्रिया ज्या ज्या धर्मस्थानातून होत असते त्या धर्मस्थानांत रामनाथी आश्रम आणि या संस्थेचे प्रेरणास्थान पूज्य डॉ. जयंत आठवले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. रामनाथी आश्रमातील भव्य वास्तुच्या विशालतेबरोबर तिथे मिळणारी ज्ञानाची विशालता आणि शुद्ध आचरणाची शिदोरी विलक्षण प्रचीती देणारी आहे.’

बद्रीनारायण, हृषिकेशपासून ते कन्याकुमारीपर्यंत लहान मोठे सुमारे साडेतीनशेच्यावर आश्रम अगदी जवळून पहाण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक ठिकाणी काही वैशिष्ट्ये आढळली, तर अनेक ठिकाणी दोषांचे चित्रही समोर आले. गोवा येथील सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमाची भेट हा माझ्या जीवनातील दुर्मिळ ठेवा समजला जाईल, इतका तो महत्त्वाचा होता.

 

२. समाजव्यवस्थेत पालट करतांना
सामाजिक समरसतेचे भान ठेवणे आवश्यक

भारतीय समाजव्यवस्थेत, विशेषतः लोकशाहीच्या कालखंडात राजकीय क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापूर्वी या देशाच्या राजकीय व्यवस्थेत ‘रामराज्य परिषद’ नावाचा सनातनी विचार आणि प्रवृत्ती जोपासणारा एक राजकीय पक्ष निर्माण केला होता. लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुकीत या पक्षाने आपले काही उमेदवारही उभे केले होते. या वेळी अशा उमेदवारांच्या अनामत रकमाही निवडणुकीत जप्त झाल्या. व्यवस्थेत पालट करतांना जी सामाजिक समरसता हवी असते, तिचे भान कोणी ठेवले नाही. त्यामुळे अन्य पक्षांबरोबर असे धर्मनिष्ठ पक्ष टिकू शकले नाहीत आणि कोणालाही अपेक्षित यश मिळाले नाही. हिंदु महासभा किंवा अन्य काही ठिकाणच्या प्रादेशिक पक्षांनी आपली राजकीय चळवळ पुढे नेण्याचा फार प्रयत्न केला. प्रभुदत्त ब्रह्मचारी यांच्यासारखे योगी महापुरुषसुद्धा ही व्यवस्था पालटण्याच्या विचाराने राजकारणात सक्रीय झाले. स्वातंत्र्य पूर्वकाळात ‘स्वातंत्र्य आधी कि सुधारणा आधी’, याचा प्रचंड संघर्ष या भारत भूमीवर झाला. बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या नेत्यांनी वृत्तपत्र आणि व्याख्याने यांद्वारे जनजागृती करण्याचा यशस्वी प्रयत्न केला; पण पुढे त्यालाही फाटे फुटत गेले.

 

३. प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांची लक्षात आलेली वैशिष्ट्ये

प.पू. डॉ. आठवले H.H. Dr. Athavale
प.पू. डॉ. जयंत आठवले

 

३ अ. धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तीमत्त्व आध्यात्मिक
क्षेत्रात सूर्यासारखे तळपणे, हे ईश्वरी संकेताविना शक्य नसणे

डॉ. आठवले हे मुळचे मुंबईचे असून ते संमोहनशास्त्र आणि मानसोपचारतज्ञ आहेत. ते आणि त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी डॉ. (सौ.) कुंदा आठवले हे धर्मनिष्ठ, कर्मनिष्ठ आणि ध्येयनिष्ठ असल्याने त्यांनी अत्यंत मनोभावे रुग्णांची सेवा करता करता त्यांच्या जीवनात आध्यात्मिक परिवर्तन घडून आले. अतिशय उत्तम रितीने चाललेला व्यवसाय केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी बाजूला ठेवून आठवले पतीपत्नींनी आध्यात्मिक नेतृत्व करण्याचे दायित्व स्वीकारले. नियतीने स्वीकारावे, प्रारब्धाने प्रक्षेपित करावे आणि परम विधात्या परमेश्वराने जवळ घ्यावे, या त्रिसूत्रीद्वारे जगातले एक धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तीमत्त्व आध्यात्मिक क्षेत्रात सूर्यासारखे तळपणे, हे ईश्वरी संकेताविना शक्य नाही.

३ आ. डॉ. आठवले यांना पाहिल्यावर त्यांच्या
विद्वत्तेची उंची गगनाला भिडणारी असल्याचे आणि त्यांची देहयष्टी म्हणजे
जणुकाही वेदमंत्राच्या साहाय्याने निर्माण झालेली एक प्रकृती असल्याचे जाणवणे

विशाल भाल प्रदेश, विशाल भालमुद्रा, ब्राह्मतेज, नेत्रांतून प्रक्षेपित होणार्‍या ज्ञानज्योती, तसेच आकर्षक कर्ण पाहिल्यावर जणुकाही ‘गजाननाचेच कर्ण असावेत’, असे वाटते. आध्यात्मिक जडणघडणीतून निर्माण झालेली तेजस्वी भावमुद्रा आणि मुखातून बाहेर पडणारी विश्वसनीय वाणी म्हणजे प्रत्येक शब्दाला ॐकाराचा अर्थ निर्माण करून देणारी आहे. डॉ. आठवले यांचे व्यक्तीमत्त्व सडपातळ असून त्यांच्या विद्वत्तेची उंची गगनाला भिडणारी आहे. त्यांची देहयष्टी म्हणजे जणुकाही वेदमंत्राच्या साहाय्याने निर्माण झालेली एक प्रकृतीच ! डॉ. आठवले म्हणजे जनतेला आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्यासाठी विधात्याने निर्माण केलेले व्यक्तीमत्त्व याचा प्रत्यय आल्याविना रहात नाही.

३ इ. डॉ. आठवले यांना त्यांचे गुरु प.पू.
भक्तराज महाराज यांच्याकडून आशीर्वादरूपी ऊर्जा मिळणे

डॉ. जयंत आठवले यांना त्यांचे आध्यात्मिक गुरु ब्रह्मीभूत भक्तराज महाराज यांनी या कार्यासाठी प्रवृत्त केले. डॉ. जयंत आठवले यांची त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्यावर निस्सीम श्रद्धा असून त्यांच्याकडून डॉ. आठवले यांना आशीर्वादरूपी ऊर्जा मिळाली. या धकाधकीच्या कालखंडात संभ्रमित झालेला माणूस भक्ती, शक्ती आणि उपासना यांच्या माध्यमातून यशस्वी जीवन जगू शकतो, हे त्यांनी सिद्ध केले.

३ ई. प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले श्रीमत् शंकराचार्यांच्या
प्रमाणे एक सांस्कृतिक परिवर्तनाचा इतिहास घडवत असल्याची निश्चिती होणे

रामनाथी आश्रमाचे प्रणेते प.पू. डॉ. जयंत आठवले हे विज्ञानाची कास धरून अध्यात्माच्या साहाय्याने परिवर्तनाच्या दिशेने निघालेले एक योद्धे आहेत. ‘शाश्वत मूल्ये ही दैवी संपत्ती आहे’, हा सिद्धांत त्यांनी मांडला. मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य असणारे डॉ. आठवले हे योग्यापेक्षा वेगळे नाहीत. ज्ञानामुळे संकटे एकसारखी मागेपुढे घोंगावत असतात. नीतीने, न्यायाने वागतांनाही निंदा होत असते. डॉ. आठवले त्या निंदेलाही स्तुती केल्यासारखे समजतात. ‘कृतकर्मास शासन मिळालेच पाहिजे’, हा संदेश त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून मिळाला. त्याचे भक्त असलेल्या ‘डॉ. जयंत आठवले यांच्या जीवनातून आध्यात्मिक ऊर्जेच्या सहस्रावधी कुप्या फोडाव्यात आणि त्यातून ईश्वरीय चिंतनाचा नादब्रह्म मिळावा’, असे त्यांचे जीवन आहे. ‘ईश्वराधिष्ठीत कृपेवरच विश्व अवलंबून आहे’, हे परम सत्य डॉ. जयंत आठवले या योद्ध्याने समाजासमोर मांडले.

मित्र, पुत्र, बंधु, पती, तत्त्वज्ञ, योद्धा आणि गुरु अशा अनेक भूमिका डॉ. आठवले पार पाडतांना दिसतात. एखादी क्रांती यशस्वी होण्यासाठी अवतीभवती अनेक लोकांचा समुदाय असावा लागतो. एकाच विचाराने भारावलेल्या या साधकांनी तो उपदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावा लागतो. इ.स.पूर्व ५ व्या शतकात आद्य शंकराचार्यांच्यामुळे एक सांस्कृतिक परिवर्तनाचा इतिहास घडला. याच वाटेने प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले जात आहेत. त्यांचा विचार सातासमुद्राच्या सीमेपलीकडे प्रवेश करतो, तेव्हा ही भविष्यातल्या क्रांतीची नांदी आहे, याची निश्चिती होते.

 

४. ‘सनातन संस्थे’ची स्थापना आणि तिचा उद्देश

४ अ. ईश्वरप्राप्ती करत असतांना राष्ट्रनिर्मिती व्हावी आणि यातून बलशाही
भारताची निर्मिती व्हावी, यासाठी त्यांनी समाजाला धर्मशिक्षण देण्याचे व्रत स्वीकारणे

ईश्वरप्राप्ती करत असतांना राष्ट्रनिर्मिती व्हावी आणि यातून बलशाही भारताची निर्मिती व्हावी, हा त्यांचा विचार उदात्त आहे. ‘आत्मकल्याणाबरोबर राष्ट्रकल्याणाचे कार्य करून आत्मसाधनेद्वारे मोक्षप्राप्तीच्या जवळ जाता येते’, यावर प.पू. डॉ. आठवले यांची श्रद्धा असल्याने त्यांनी मन, बुद्धी आणि अहंकार यांवर विजय मिळवण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देण्याचे व्रत स्वीकारले. यासाठीच १९९० साली त्यांनी ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली. ते सनातन संस्थेचे प्रेरणास्रोत असल्याने या संस्थेला एका दिव्य महात्म्याचे नेतृत्व लाभले आहे.

४ आ. सनातन संस्थेने धर्मप्रसाराच्या माध्यमातून
समाजापुढे ठेवलेली ईश्वरीय राज्याच्या निर्मितीची संकल्पना विलक्षण असणे

सहस्रो वर्षांपासून तथाकथित विद्वानांच्या धर्मसंमेलनाविषयीच्या अनेक व्याख्या प्रसिद्ध झाल्या आणि होत आहेत. धर्मसंकल्पना ही व्यक्तिनिष्ठ, समाजनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, अर्थनिष्ठ आणि सेवानिष्ठ असावी, याविषयीची अनेक मतमतांतरे विद्वान, संत, महात्मे, ऋषी-मुनी, साधू, संन्याशी, योगी, तसेच वैरागी यांनी आपल्या पुढ्यात ठेवली आहेत. समाजाने आपापल्या परीने त्यांचे चिंतन केले आणि यापुढेही करीत राहिल, यात शंका नाही; पण ‘सनातन संस्थे’ने ईश्वरीय राज्याच्या निर्मितीची संकल्पना आपल्या तत्त्वज्ञानाच्या प्रसारातून पुढे ठेवली आहे, ती विलक्षण आहे.

४ इ. ‘सनातन संस्थे’चा उद्देश राज्यसत्ता मिळवणे हा नसून भारतीय संस्कृती,
राष्ट्राचे संरक्षण आणि संवर्धन करणार्‍या विचारांचे राज्य निर्माण करणे, हा असणे

सर्व राजकीय पक्ष आणि ‘सनातन संस्था’ यांचे विचार निश्चितपणे वेगवेगळे आहेत. ‘सनातन संस्था’ राज्य निर्माण करण्यासाठी विचारांचे जागरण करते, तेव्हा या जागरणाला परमेश्वराचे अधिष्ठान लाभलेले दिसते. ‘राज्यसत्ता मिळवणे’, हे ‘सनातन संस्थे’चे उद्दीष्ट नाही, हे त्यांचे कार्य जवळून पाहिल्यानंतरच लक्षात येईल. ‘ईश्वरीय राज्य म्हणजे पवित्र विचारांनी भारावलेल्या भारतीय संस्कृतीचे आणि राष्ट्राचे संरक्षण, संवर्धन करणार्‍या विचारांचे राज्य’, हे बुद्धीला पटते. ‘सत्य संकल्पाचा दाता नारायण असतो’, असे म्हणतात. डॉक्टरांच्या या संकल्पाला मूर्तस्वरूप येत आहे. त्यांच्या आध्यात्मिक नेवृत्वाने सर्व दिशा न्हाऊन निघू लागल्या आहेत.

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

५. रामनाथी आश्रमाची जाणवलेली वैशिष्ट्ये

५ अ. शिस्त आणि शास्त्र यांचा सुरेख संगम

झाडण्याचा कुंचा ठेवण्याच्या पद्धतीपासून ते स्वागत कक्षापर्यंत कोपर्‍यात पादत्राणे ठेवण्यापर्यंत असलेली शिस्त येणार्‍या अभ्यागतांना वेगळाच साक्षात्कार घडवून जाते. परीट घडीचे कपडे घालून आश्रमात लोळण घेतली, तरी कपड्याला एखादा मृत्तिकाकणही लागू शकत नाही.

५ आ. उच्च विद्याविभूषित आणि तज्ञ यांनी साधना म्हणून कार्याला समर्पित करणे

रामनाथी आश्रमात सुमारे ३०० साधक असून त्यात महिलांचाही समावेश आहे. या साधकांत संगणकक्षेत्राची उच्च पदवी घेतलेले अनेक अभियंते आहेत. एम्.बी.बी.एस्., एम्.डी. (मेडिसिन), यांसह आयुर्वेदाचा अभ्यास करणारे वैद्य असे अनेक वैद्यकीय सल्लागार आहेत. आश्रमातील वैद्यकीय सेवाही अतिशय प्रभावी आणि परिणामकारक आहे. विविध अभ्यासक्रमांचे उच्च विद्याविभूषित आणि तज्ञ अशा १५० साधकांकडून संगणकीय कार्य केले जाते. काही जण अहोरात्र संशोधन आणि ग्रंथ लिखाणाचे कार्य करीत असतात.

संस्थेवर देशातल्या अनेक न्यायालयांत खटले दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालय येथे काम केलेले अनेक विधिज्ञ सनातनच्या लढ्यासाठी विनामोबदला तयार असतात.

५ इ. परिवर्तनाचा ध्यास आणि उच्च विद्याविभूषित असूनही प्रत्येक
साधकामधील विनम्रता आश्रमात श्रद्धेचा सडा शिंपत असल्याचे जाणवणे

साधकांच्या मुखावरील भाव, सातत्याने मिळणार्‍या आध्यात्मिक ऊर्जेने प्रफुल्लीत असलेले तोंडवळे, त्यांच्या अंतःकरणात वास करणारा परिवर्तनाचा ध्यास आणि उच्च विद्याविभूषित असूनही प्रत्येक साधकामधील विनम्रता सार्‍या आश्रमात जणुकाही श्रद्धेचा सडा शिंपत असते. दास्यभाव आणि समर्पण वृत्ती यांची पंचारती घेऊन हे साधक रामनाथी आश्रमाच्या प्रवेशद्वारावर जणुकाही देवदूत म्हणूनच उभे असतात.

५ ई. भारतीय संस्कृतीच्या गुरुकुलपद्धतीचा आणि आधुनिक तंत्रज्ञाचा सुरेख संगम !

देशातल्या अनेक आश्रमांची आणि तीर्थक्षेत्रांतील मठांची, धर्मशाळांची अवस्था पाहिली की, कधी कधी शरमेने मान खाली घालावी लागते. रामनाथी आश्रम हा भारतीय संस्कृतीच्या गुरुकुलपद्धतीच्या आश्रमाचा २१ व्या शतकात आदर्शवत असा ठेवा आहे. धर्मनिष्ठा म्हणून सेवा करतांना या आश्रमात नवनिर्मितीच्या अनेक संकल्पना साकारण्यात आल्या आहेत. एका महाविद्यालयात नसतील, संगणकीय शिक्षण देणार्‍या संस्थेत नसतील, असे अनेक संगणक रामनाथी आश्रमात पहायला मिळाले. नवीन पद्धतीचे छायाचित्रक (कॅमेरे) आणि त्यांना लागणारी यंत्रणा इथे सज्ज आहे. साधकांनी तयार केलेले लाकडी सामान (र्फिनचर) दिसले. स्वयंपाकघरात अनेक यंत्रे दिसली.

 

लेखाचा दुसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

 

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment