तंजावर येथील वेदप्रचाररत्न वेदकुलपती जी.के. सीतारामन्गुरुजी यांनी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांपैकी ४ दिव्य अंश सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी केले अर्पण !
सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या ४ दिव्य अंशांचे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात आगमन !

रामनाथी (गोवा) – ४ मे २०२६ या पवित्र दिनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या ४ दिव्य अंशांचे रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आगमन झाले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी आणलेल्या ४ शिवलिंगांचे साधकांनी केलेल्या भोलेनाथाच्या जयघोषात आणि वेदमंत्रोच्चारात भावपूर्ण आगमन झाले.
या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी शिवलिंगांचे पूजन आणि औक्षण केले. यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे ४ दिव्य अंश श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडे सुपुर्द केले. ज्योतिर्लिंगांचे पूजन झाल्यानंतर त्यामध्ये जडत्व, म्हणजेच चैतन्य आल्याचे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना जाणवले, तर त्या वेळी उन्हाळा असूनही वातावरणात प्रत्यक्षात थंडावा जाणवत होता. यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या निवासाच्या खोलीतच सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या ४ दिव्य अंशांचे दर्शन घेतले.
सनातनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणारा एक अद्वितीय क्षण !
हनुमान जयंतीच्या पावन दिनी सीतारामन् यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे ४ दिव्य अंश कायमस्वरूपी देणे

हनुमान जयंतीच्या पावन दिनी (२ एप्रिल २०२६ या दिवशी) तमिळनाडूतील तंजावर येथे श्री. सीतारामन्गुरुजी यांच्याकडे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे ४ दिव्य अंश घेण्यासाठी पोचल्या. गुरुजींनी त्यांच्या घरी वेदमंत्रोच्चाराने देवघरात पूजा करून श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ज्योतिर्लिंग दिले. या वेळी त्यांचा मुलगा वेदमूर्ती नरसिंहन् सीतारामन् हेही उपस्थित होते.
२ एप्रिल २०२६ या दिवसाचे एक वेगळे महत्त्व !
मूर्तीभंजक महंमद गझनी हा सोमनाथ ज्योतिर्लिंग तोडून अनेक दिवस प्रवास करत गझनीला पोचला तो दिवस म्हणजे १ एप्रिल १०२६. बरोबर १००० वर्षांनी, म्हणजे २ एप्रिल २०२६ या दिवशी सनातन संस्थेला सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश लाभले. शिवशंकरानेच हा दिवस निवडला होता, यात संशय नाही !
– श्री. विनायक शानभाग
तंजावरहून कांचीपूरम्ला शिवलिंग नेतांना घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडी

१. २ एप्रिल २०२६, म्हणजे हनुमान जयंती या दिवशी पौर्णिमा होती. चारचाकी वाहनांतून सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश नेतांना ‘पौर्णिमेचा चंद्र हळूवारपणे गाडीत डोकावून पहात आहे’, असे दृश्य दिसत होते.
२. शिवलिंग नेत असलेल्या गाडीला मोठा अपघात होता होता सर्व जण वाचले. आमच्या आतापर्यंतच्या दौर्याच्या कालावधीत या आधी असे कधीच झाले नव्हते. श्रीगुरूंनी आणि सोमनाथाने आमचे रक्षण केले.
३. कांचीपूरम् हे भूकैलास आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अंश १ मास भूकैलासात राहिले जणू काही शिव त्याच्या स्वस्थानाला आला होता.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, कांचीपूरम्, तमिळनाडू.
भगवान सोमनाथ महादेवाच्या उदयाची कथा

‘दक्ष प्रजापतीला अश्विनीसह २७ कन्या होत्या. त्यांचा विवाह अत्री आणि अनसूया यांचा पुत्र सोम (चंद्र) याच्याशी झाला. त्या २७ कन्यांपैकी रोहिणी सर्वांत सुंदर होती. सोमचा तिच्यावर विशेष जीव होता. त्याचा हेवा वाटून इतर सवतींनी (सपत्नींनी) सोमविषयी त्यांचे वडील दक्ष यांच्याकडे तक्रार केली. दक्षाने सोमला समजावण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा लाभ झाला नाही. वारंवार तक्रारी ऐकून संतप्त झालेल्या दक्षाने सोमला क्षयरोगाचा शाप दिला. परिणामी सोमची प्रकृती खालावू लागली. संपूर्ण निसर्गात त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. त्यामुळे सर्व देवांनी सोमला शापातून मुक्त करण्याची विनंती केली. दक्षाने त्यांची विनंती नाकारून सुचवले, ‘प्रभास येथे सरस्वतीनदीचा समुद्राशी संगम झाला आहे. तेथे जाऊन सोमने भगवान शिवाची आराधना आणि तप:श्चर्या करावी.’ त्याप्रमाणे सोमने प्रभास येथे बराच काळ शिवाची आराधना केली. त्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी सोमला एक वरदान दिले, ‘शुक्ल पक्षात सोमची वृद्धी होईल आणि तो प्रकाशमान राहील.’ अशा प्रकारे प्रभास येथे सोमला त्याचे तेज (भास) परत मिळाले. त्यामुळे ते ठिकाण ‘प्रभास’ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी सोम याने एक मंदिर बांधून ज्योतिर्मय लिंगाची स्थापना केली.
स्कंद पुराणातील प्रभास खंडातील माहितीनुसार सोम याला स्पर्शलिंग समुद्रातून प्राप्त झाले होते. स्पर्शलिंगाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.’
सूर्यबिम्बसमप्राख्यं सर्पमेखलमण्डितम् ।
कुक्कुटाण्डसमानं तद् भूमिमध्ये व्यवस्थितम् ।। – स्कन्दपुराण, प्रभासखण्ड, अध्याय २१, श्लोक ८२
अर्थ : हे लिंग सर्व बाजूंनी सर्पांनी वेढलेले आणि सूर्यबिंबाप्रमाणे अत्यंत तेजस्वी होते. ते कोंबडीच्या अंड्याच्या आकाराचे होते आणि भूमीच्या मध्यभागी स्थित होते.’ (साभार : ‘प्रभासतीर्थ दर्शन सोमनाथ’ या ग्रंथातून)
१. महंमद गझनीने तुकडे केलेल्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अंश श्रद्धावान पुजार्यांनी १ सहस्र वर्षांपर्यंत जपणे
भारतातील पवित्र अशा १२ ज्योतिर्लिंगांमधील गुजरात येथील सोमनाथ ज्योतिर्लिंग हे पहिले शिवलिंग मानले जाते. चंद्राने स्थापित केलेल्या या दैवी शिवलिंगाचे वैशिष्ट्य, म्हणजे ते भूमीपासून काही उंचीवर अधांतरी होते. त्याच्यात प्रचंड सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जा असून त्याचा लाभ शिवभक्तांना होत असे. वर्ष १०२६ मध्ये क्रूर आक्रमणकर्ता महंमद गझनी याने या सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले. त्याने मंदिर उद्ध्वस्त करून त्यातील या शिवलिंगाचे तुकडे केले. काही श्रद्धावान पुजार्यांनी त्या भग्नावस्थेतील शिवलिंगाच्या अवशेषांतील काही अंश अत्यंत गुप्ततेने सुरक्षित ठेवले. ते शिवलिंगाच्या भग्नावस्थेतील या अंशांना तुकड्यांच्या स्वरूपात पाहू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या अंशांना साधारणतः शिवपिंडीसारखे दिसणारे लंबगोल आकार दिले. याच श्रद्धावान पुजार्यांनी १ सहस्र वर्षांपर्यंत समस्त भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या शिवलिंगाचे दिव्य अंश एका गुप्त स्थानी सुरक्षित ठेवले. त्यांनी प्रसंगी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊनही त्यांचे रक्षण केले. पुढे त्यांच्या प्रत्येक पिढीने ते जतन केले आणि हे रहस्यही कायम जपले.
२. कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी १०० वर्षे ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश जपून ठेवण्यास सांगणे
वर्ष १९२४ मध्ये कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे जतन करणार्या पुजार्यांना ‘हे दिव्य अंश १०० वर्षे बाहेर (समाजात) आणू नका आणि कुणालाही याविषयी सांगू नका’, असे सांगितले होते. त्यानंतरचे कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांनी ‘पवित्र ज्योतिर्लिंगाच्या या साकारलेल्या दैवी अंशांविषयी अयोध्येचे श्रीराममंदिर साकार झाल्यावर विचार करूया’, असे सांगितले.
३. जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी शिवलिंगाचे अंश श्री श्री रविशंकर यांच्याकडे देण्यास सांगणे आणि अयोध्येत श्रीराममंदिर उभारल्यानंतर ते दर्शनासाठी उपलब्ध होणे
आताचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी ‘शिवलिंगाचे हे अंश गुरुदेव श्री श्री रविशंकर (‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे संस्थापक) यांच्याकडे द्या’, असे सांगितले. त्याप्रमाणे श्रद्धावान पुजार्यांच्या कुटुंबातील अग्निहोत्री श्री. सीतारामन्गुरुजी यांनी या ज्योतिर्लिंगापैकी काही दैवी अंश गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याकडे दिले. जगद्गुरु शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या संकल्पानुसार बरोबर १०० वर्षांनी त्यांनी सांगितल्यानुसार घडले. ज्योतिर्लिंगांच्या या अंशांमध्ये पुष्कळ ऊर्जा असून त्यामुळे सभोवताली सर्वत्र चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले आहे. श्री श्री रविशंकर यांनी ज्योतिर्लिंगाच्या या दिव्य अंशांचे आध्यात्मिक महत्त्व आणि सामर्थ्य ओळखले. त्यांनी वर्ष २०२५ मध्ये महाशिवरात्रीला या दिव्य अंशांना अभिषेक करून भक्तांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून ते दिले.
– श्री. विनायक शानभाग, कांचीपूरम्, चेन्नई. (१२.५.२०२६)
श्री सोमनाथ मंदिराच्या शिखरावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पूजन केलेल्या धर्मध्वजाचे आरोहण
- दिव्य अंशांसाठी सोमनाथ येथील त्रिवेणी संगमावरील वाळू आणली !
- सनातन संस्थेला मिळाला श्री सोमनाथ मंदिराच्या शिखरावरील धर्मध्वज !

‘२ एप्रिल २०२६ ला हनुमान जयंतीच्या दिवशी सोमनाथ शिवलिंगाचे दिव्य अंशांचे आगमन भूकैलास कांचीपूरम्ला झाले. २९ एप्रिल २०२६ ला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ कांचीपूरम् येथे आले. त्याच दिवशी संध्याकाळी सोमनाथ शिवलिंगाच्या दिव्य अंशांचा अभिषेक चालू असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना शिव सोरटी सोमनाथहून वाळू आणण्याची प्रेरणा देत होता. त्यांना त्याचे कारण प्रारंभी कळत नव्हते. नंतर त्यांच्या लक्षात आले की, वाळू हे पृथ्वीतत्त्व आणि शिव म्हणजे आकाशतत्त्व ! म्हणजे वाळू ही शिवाची शक्ति आहे. शिव हा शक्तिविना अपुरा आणि शक्ति शिवाविना अपुरी आहे. त्यामुळे सनातन संस्थेला शिव आणि त्रिवेणी संगमाची वाळू अशा दोन्हीही ऊर्जा देण्यासाठी ते सनातनच्या आश्रमात रहावेत, अशी शिवाची इच्छा होती. सोमलिंग जेथे साक्षात् प्रगट झाले होते, त्याचा अंश त्या वाळूमध्ये होता. दुसर्या दिवशी रात्री आम्ही (श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ, सद्गुरु डॉ. गाडगीळ आणि श्री. विनायक शानभाग) सोमनाथला विमानाने पोचलो.

सोमनाथ या ठिकाणी सतीचे उदर (पोट) पडले आहे. त्यामुळे ते पण तिथे एक जागृत शक्तिपीठ आहे. तशी देवीची शक्ती त्या वाळूमध्ये आहे. त्या शक्तिपीठाचे चंद्रभागा शक्तिपीठ असे नाव आहे. जेव्हा आपण शिवपिंडीला अभिषेक करतो, तेव्हा त्याच्या खाली पिंडिका असते. शिव मला सुचवत होता की, जेव्हा पिंडिका नसेल, तेव्हा शिवलिंगाला या चैतन्यमय वाळूमध्ये ठेवा. म्हणजे शिव आणि शक्ती एकत्रित रहातील. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

रात्रीच सोमनाथ मंदिरात शिवाचे दर्शन घेतले. ‘सकाळी वाळूसाठी त्रिवेणी संगमाला जावे’, असे तेथील ज्येष्ठ पुजार्यांनी सुचवले. सोमनाथमध्ये सरस्वती, हिरण्या आणि कपिला, अशा ३ नद्यांचा संगम आहे. सोमनाथला जात असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना विचार आला, ‘सोमनाथ मंदिराच्या शिखरावर फडकवण्यात येणारा धर्मध्वज आपल्याला मिळू शकतो का ?’ मंदिराचे माजी विश्वस्त श्री. पियुष पोफांडी यांना याविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘सकाळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी एकत्रित बसून नवीन धर्मध्वजाचे पूजन करावे आणि नवीन ध्वज मंदिराला अर्पण करावा. असे केल्याने नवीन ध्वज मंदिरावर लावून आधीचा ध्वज यजमान दांपत्यांना दिला जातो.’’ त्याप्रमाणे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १ मे २०२६ या दिवशी सोमनाथ मंदिरात नवीन धर्मध्वजाचे पूजन केले. लगेच मंदिर व्यवस्थापनाने तो ध्वज मंदिराच्या शिखरावर लावला आणि आधीचा ध्वज त्यांनी आम्हाला दिला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने केवळ काही घंट्यांत कांचीपूरम् येथून सोमनाथला जाऊन धर्मध्वजाचे पूजन आणि वाळू आणणे करता आले.
– श्री. विनायक शानभाग, कांचीपूरम्, तमिळनाडू. (१२.५.२०२६)

श्री गणेशतत्त्व आकृष्ट करणार्या आणि सात्त्विक सौंदर्याचा आविष्कार असलेल्या सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या मनोहारी दीपरचना...
वाराणसी आश्रमातील बुद्धीअगम्य पालट
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची चैतन्यमय वातावरणात प्रतिष्ठापना !
वाराणसी येथील सेवाकेंद्राच्या प्रांगणात उगवलेले वैशिष्ट्यपूर्ण पेरूचे झाड !
सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात पिवळ्या रंगाच्या चिमणीने येऊन प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांच्या खोक्यावर बसण्यामागील...
‘कोरोना महामारी’च्या काळामध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रम परिसरात औदुंबराची अनेक रोपे आपोआप उगवण्यामागील कारणमीमांसा