गोवा येथील रामनाथी आश्रम म्हणजे चैतन्याचे स्फुल्लिंग देणारे एक अनोखे तीर्थक्षेत्र ! (भाग २)

पंढरपूर येथील दैनिक ‘पंढरी संचार’चे संपादक आणि संचालक श्री. बाळासाहेब बडवे यांनी पौष शुक्ल पक्ष ५, कलियुग वर्ष ५११४, दिनांक १६.१.२०१३ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी रामनाथी आश्रमातील स्वच्छता आणि स्वयंशिस्त यांमुळे ते भारावून गेले. त्यांना तेथे आत्मियता, भौतिकता अन् नैतिकता यांचा त्रिवेणी संगम पहायला मिळाला. रामनाथी आश्रमाविषयीची प्रतिक्रिया व्यक्त करतांना ते म्हणाले, ‘‘मी देशभरातील ३५० पेक्षा अधिक आश्रम पाहिले; पण रामनाथी आश्रम पाहून मी मंत्रमुग्ध झालो.’’

या लेखाचा पहिला भाग वाचण्यावाठी येथे क्लिक करा.

या लेखाचा पुढील भाग आपण येथे पाहूयात.

 

५. रामनाथी आश्रमाची जाणवलेली वैशिष्ट्ये

सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
सनातन आश्रम, रामनाथी, गोवा

५ उ. स्वयंशिस्त असणारा रामनाथी आश्रम
म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातला एक चमत्कार असणे

प्रत्येक साधकाच्या अंगावरील कपडे स्वच्छ होते, तसेच त्यांच्या चेहर्‍यावर तेजही जाणवत होते. भव्य असलेल्या भोजनकक्षात सर्व साधक अत्यंत शिस्तीने अन्न प्रसाद सेवन करतांना दिसतात. प्रसाद घेण्यापूर्वी प्रार्थना करण्याची त्यांची अनोखी पद्धत आहे. साधकांची प्रचंड संख्या असूनही त्या कक्षात यत्किंचितही गडबड किंवा गोंधळ जाणवत नाही. भांड्याला भांडे लागल्याचा आवाजही येत नाही. साधक गरजेपुरते अन्न घेतात. कोणत्याही प्रकारे अन्न वाया जाणार नाही, याची दक्षता साधकांकडून घेतली जाते. जेवण झाल्यानंतर ताट-वाटी धुण्याचीही एक वेगळी पद्धत इथे अवलंबली जाते. शिस्तीचा चमत्कार आणि अविष्कार पहायचा असेल, तर प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी रामनाथी आश्रमाचे दर्शन घेऊन यावे, असे वाटते. रामनाथी आश्रम म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातला एक चमत्कार आहे.

५ ऊ. श्री. आणि सौ. गाडगीळ यांची वैशिष्ट्ये

डॉ. मुकुल गाडगीळ हे ‘रसायनशास्त्र’ या विषयात ‘डॉक्टरेट’ आहेत. त्यांच्या पत्नी सौ. अंजली गाडगीळ या ‘एम्.एस्सी.’ (बॉटनी) आहेत. असे हे शिक्षणसंपन्न आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झालेले गाडगीळ कुटुंब प.पू. डॉ. आठवले यांच्या छत्रछायेखाली साधना करत आहे. अध्यात्मशास्त्रात जे ऋषीमुनींना अवगत होते, ते सूक्ष्म ज्ञान अभ्यासाने, गुरूंच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या कृपेने सूक्ष्म ज्ञान म्हणून ज्या काही मोजक्या साधकांना प्राप्त झाले आहे. त्यापैकी सौ. अंजली गाडगीळ एक आहेत. भारतातील अनेक प्राचीन मूर्तींवर संशोधन करून त्यातील सूक्ष्माचा विचार करून त्यांनी काढलेले निष्कर्ष हे आश्चर्यचकित करणारे आहेत. तसेच ते आध्यात्मिक सत्याची ग्वाही देणारे आहेत. सौ. अंजली गाडगीळ या एखाद्या योग्याप्रमाणे भूतकाळात जाऊन काही सत्ये उलगडून सांगतात, तेव्हा अंगावर रोमांच येते. त्यांच्या मुखावर साक्षात् लक्ष्मी आणि उपासना यांचे तेज पाहिले. कोणालाही त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे दर्शन घ्यावेसे वाटेल.

५ ए. चांगली साधना करणारे अनेक साधक
धार्मिक कार्य अलौकिक आणि अखंडपणे करत असणे

रामनाथी आश्रमात अनेक साधक परमोच्च पदावर पोचलेले दिसतात. उपासना, आध्यात्मिक चिंतन, त्याची प्रचीती इतर साधकांना येणे या प्रक्रियेतून जाणारा साधक ७० टक्के सक्षम झाला की, त्याला प.पू. डॉ. आठवले यांच्याकडून सन्मानाची ‘संत’ ही पदवी बहाल केली जाते. या आश्रमात असे संतपदाला पोचलेले अनेक श्रेष्ठ साधक आहेत. त्यांचे हे धार्मिक कार्य अलौकिक आणि अखंडपणे चालू आहे.

५ ऐ. सनातन कोणाला ‘संत’ ही पदवी देत नाही, तर एखादा संत
झालेला असला, तर इतरांना ते कळावे म्हणून त्याचे संतस्वरूप उघड करते !

‘त्रिगुणातीत ईश्वराची, म्हणजे मोक्षाला गेलेल्या संतांची पातळी १०० टक्के धरल्यास सर्वसाधारण व्यक्तीची पातळी २० टक्के असते, म्हणजे ती फक्त २० टक्के सात्त्विक असते. ६० टक्के पातळीला व्यक्ती ६० टक्के सात्त्विक असते. ७० टक्के पातळीला व्यक्ती ७० टक्के सात्त्विक असते. ही स्थिती सूक्ष्मातून कळणार्‍यांना जाणवते; म्हणूनच संतांना दुसरे कोणी संत असल्यास किंवा झाल्यावर ते ओळखता येते. सनातनच्या अनेक साधकांनाही हे ओळखता येते. याला ते ‘संत झाल्याची पूर्वसूचना मिळाली’, असे म्हणतात. म्हणजेच सनातनमध्ये ‘संत’ ही पदवी बहाल केली जात नसून साधक ‘संत’ झाल्याचे केवळ इतरांच्या माहितीसाठी उघड केले जाते. उघड करण्याचा उद्देश हा असतो की, साधकांनी संतसहवासाचा लाभ घ्यावा. सनातनमध्ये नसलेलेही संतपदाचे अधिकारी असले, तर तेही घोषित केले जाते. पुढील तक्त्यावरून सूक्ष्मातील कळणार्‍यांना एखाद्याची पातळी कशी ओळखता येते, हे लक्षात येईल.

पातळी (टक्के)

सूक्ष्मातील कळणार्‍यांना काय जाणवते ?

६० भाव
७० चैतन्य
८० आनंद
९० ते १०० शांती

ही जाणवण्याची सर्वसाधारण लक्षणे झाली. योगमार्गानुसार त्यांत थोडाफार भेद असतो’. – डॉ. आठवले

५ आे. रामनाथी आश्रम हे विश्वाच्या कल्याणासाठी आणि
धर्मरक्षणासाठी प्रयत्नांच्या समिधा टाकण्यासाठीचे महाकायी यज्ञकुंड असणे

आश्रमात अनेक अद्भुत चमत्कारही पहायला मिळाले. आश्रम पहातांना अनेक ठिकाणी ॐ प्रगट झाल्याचे दिसून आले. असे अक्षर दिसले की, साधक त्यावर पाय पडू नये; म्हणून त्याच्या बाजूला एक गोल कडे ठेवतात. अनेक प्राणी आश्रमात येतात. आश्रम पाहून नतमस्तक होतात आणि पुन्हा निघून जातात. रामनाथी आश्रम हे विश्वाच्या कल्याणासाठी आणि धर्मरक्षणाच्या प्रयत्नांच्या समिधा टाकण्यासाठीचे महाकायी यज्ञकुंड आहे. श्रध्देच्या, उपासनेच्या आणि निष्ठेच्या समिधा टाकून इथल्या यशातील या समिधांच्या ज्वाला गगनाशी भिडण्याची जणुकाही स्पर्धा करतात असे वाटते.

५ आै. रामनाथी आश्रम म्हणजे चैतन्याचे स्फुल्लिंग देणारे एक अनोखे तीर्थक्षेत्र

तीर्थक्षेत्राच्या ठिकाणातून श्रद्धेची अभिव्यक्ती प्रस्थापित होत असते. तीर्थक्षेत्रातील मृत्तिकाकणांनी देहाला चैतन्याचे स्फुल्लिंग प्राप्त होत असते, तसेच तीर्थक्षेत्रातील वास्तव्याने धर्माचरणाची ऊर्जा मिळत असते. या तिन्ही गोष्टी रामनाथी आश्रमात अनुभवायला मिळतात. त्यामुळे रामनाथी आश्रम हे एक अनोखे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.

५ अं. जगातल्या कोणत्याही तीर्थक्षेत्रात न
घेतलेली आध्यात्मिक अनुभूती रामनाथी आश्रमात येणे

सनातन संस्थेचे कार्य वाढत गेले; म्हणून त्यांनी गोव्यातील फोंडा शहराजवळ असलेल्या शांतादुर्गादेवीच्या मंदिराजवळ आश्रमाची स्थापना केली. रामनाथी आश्रम पाहिल्यावर एखाद्या तीर्थक्षेत्रात यावी, तशी अनुभूतीयेते. तेथील स्वच्छता, स्वयंशिस्त आणि सर्वांनी घेतलेला समाज परिवर्तनाच्या संकल्पाचा ध्यास पाहिला. ‘प्रत्येक सणाला रामनाथी आश्रमाच्या द्वारापाशी बसून वंदन करून जीवनाचे सार्थक करून घ्यावे’, असे वाटते. मी साडेतीनशेच्या वर पाहिलेल्या आश्रमांत जे दिसले नाही, ते रामनाथी आश्रमात पहायला मिळाले. जगातल्या कोणत्याही तीर्थक्षेत्रापेक्षा रामनाथी आश्रमात घेतलेली आध्यात्मिक अनुभूती आजपर्यंत मला कुठेही सापडली नाही. ‘रामनाथी आश्रम हे २१ व्या शतकातले एकमेव तीर्थक्षेत्र असावे’, असे वाटते.

 

६. संस्थेचे कार्य आणि तिला नाहक त्रास देणार्‍या अपप्रवृत्ती

६ अ. संस्थेच्या कार्याला सहस्रो साधू, संत
आणि विविध पिठांचे जगद्गुरु यांचे कृपाशीर्वाद लाभणे

विविध राज्यांतील सहस्रो साधक प.पू. डॉ. आठवले यांना गुरुस्थानी मानतात आणि श्रद्धेने धर्मकार्याला वाहून घेत आहेत. ‘सनातन संस्थे’चे एक केंद्र त्यागमूर्ती डॉ. पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अलाहाबाद येथील कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेत कार्यदक्ष आहे. कुंभमेळ्यासाठी आलेले शेकडो साधू, संत आणि विविध पिठांचे जगद्गुरु यांनी या केंद्राला भेट देत ‘सनातन संस्थे’ला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिलेली आहे.

६ आ. सनातनची पत्रकारिता खंड-दोन

या ग्रंथात भारतातील वृत्तपत्र व्यवसायातील संशोधनात्मक सखोल अशी माहिती देण्यात आली आहे. ‘समाजमन घडवण्यात मोलाचा हातभार लावू शकणार्‍या या माध्यमाची क्षमता योग्यप्रकारे पुनर्स्थापित करणे, ही एकूण समाजव्यवस्था सुस्थित करण्याला धर्म मानणार्‍या साधकाचे प्रथम उद्दिष्ट ठरते.’ अशा प्रकारची अनेक मार्गदर्शक तत्त्वे अनेक उदाहरणांसह दिल्याने वृत्तपत्रीय क्षेत्रात वावरणार्‍या प्रत्येकाने हा ग्रंथ वाचलाच पाहिजे असे आग्रहाने सांगावेसे वाटते.

६ इ. ‘आश्रमाचा कारभार कसा चालतो ?’, याविषयी मनात प्रश्न निर्माण होणे

वास्तविक आश्रम पहातांना सतत विचार येत असे की, ही एवढी मोठी प्रचंड वास्तू करोडो रुपये खर्च करून, अद्ययावत पद्धतीची सर्व साधने, ग्रंथाच्या रूपाने प्रचंड खर्चिक असलेले ग्रंथ प्रकाशन, विज्ञापनांविना चालणारे दैनिक ‘सनातन प्रभात’, आश्रमाच्या समोर उभी असलेली वाहने, सकस, रूचकर आणि पवित्र अशी भोजनव्यवस्था, अगदी साबणापासून ते तेलाच्या बाटलीपर्यंत पुरवण्यात येणार्‍या सुविधा पाहिल्यावर आश्चर्य वाटते. या संपूर्ण आश्रमात ‘देणगी द्या’ किंवा ‘येथे देणगी स्वीकारली जाते’, असा एकही फलक नाही. देणगीचे पावती पुस्तक नाही आणि आश्रमातला एकही साधक कोणाकडे देणगीची मागणी करतांना दिसत नाही. मग ‘या आश्रमाचा कारभार चालतो कसा ?’, हे आजही माझ्यासारख्याला पडलेले कोडे आहे. गेल्या काही दिवसांपासून वाटत होते, या आश्रमाचा सर्व खर्च आणि उत्तरदायित्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडे असेल; पण हा अंदाज ज्येष्ठ साधकांशी झालेल्या चर्चेवरून साफ धुऊन निघाला. (‘साधक आणि हितचिंतक यांच्या अर्पणातून आश्रमाचा खर्च भागतो. देवाचे कार्य करणार्‍याला देव काही न्यून (कमी) पडू देत नाही, हे यावरून सिद्ध होते.’ – संकलक)

६ र्इ. संस्थेविषयी अपसमज पसरवणार्‍यांमुळे प.पू.
डॉ. आठवले आणि संस्थेतील सहस्रो साधक यांना नाहक त्रास होणे

समाजात सध्या बळावत चाललेल्या रज-तम गुणांनी युक्त असलेल्या जीवनप्रणालीला बदलून सत्त्वगुण प्रधान, धर्माधिष्ठीत शाश्वत विचारांचे वातावरण निर्माण करण्यासाठी ‘सनातन संस्थे’ची निर्मिती झाली आहे. संस्थेचे उद्दिष्ट आध्यात्मिक परिवर्तन असले, तरी चिरंतन स्थैर्य निर्माण करणार्‍या राष्ट्रनिर्मितीचे उद्दिष्टही डोळ्यांसमोर ठेवणारे आहे. दुष्ट बुद्धीच्या हेतूने या संस्थेच्या संदर्भात जो अपसमज पसरवण्यात येत आहे, त्याचा महाभयंकर त्रास प.पू. डॉ. आठवले, त्यांचे सहस्रो साधक आणि हितचिंतक यांना सहन करावा लागत आहे.

– श्री. बाळासाहेब बडवे (दैनिक ‘पंढरी संचार’चे संपादक), पंढरपूर, सोलापूर. (५.२.२०१३)

तीर्थक्षेत्रांची दुःस्थिती आणि तिचा परिणाम

‘असंख्य तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरांतून भाविकांना लुबाडण्याचे प्रकार होत असतात. येणारा भाविक त्या मंदिरातील देवतेपुढे नम्र होऊन आध्यात्मिक ऊर्जा मिळण्यासाठी आलेला असतो. त्याच्या साधनेत त्याची कोणी आर्थिक पिळवणूक करणार असेल, तर त्याच्या पुढच्या पिढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.’ – सौ. अंजली गाडगीळ

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment