श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी आचार्य धर्मेंद्र यांचा देहत्याग

पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

आचार्य धर्मेंद्र

जयपूर (राजस्थान) – श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील अग्रणी संत आणि हिंदु नेते आचार्य धर्मेंद्र यांनी १९ सप्टेंबर या दिवशी देहत्याग केला. त्यांच्या देहत्यागानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आचार्य धर्मेंद्र आजारी होते. येथील एस्.एम्.एस्. रुग्णालयातील अतीदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते. पंतप्रधान मोदी त्यांची सतत माहिती घेत होते. राजस्थानमधील भाजपचे अध्यक्ष आणि अन्य नेते यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूसही केली होती.

१. श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील सक्रीय सहभाग

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी आंदोलनात आचार्य धर्मेंद्र सक्रीय होते. बाबरी ढाचा पाडल्याच्या प्रकरणात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासहित आचार्य धर्मेंद्रही आरोपी होते. जेव्हा या प्रकरणावर निर्णय येणार होता, तेव्हा ते म्हणाले होते, ‘मी या प्रकरणातील पहिल्या क्रमांकाचा आरोपी आहे. शिक्षेपासून घाबरायला कशाला हवे ? जे केले, ते सर्वांच्या समोर केले.’ विश्‍व हिंदु परिषदेशी ते अनेक वर्षांपासून जोडले होते. हिंदूंच्या संदर्भातील समस्यांविषयी ते स्पष्ट आणि परखडपणे मत मांडत असत.

 

२. आचार्य धर्मेंद्र यांचा परिचय

आचार्य धर्मेंद्र यांचा जन्म ९ जानेवारी १९४२ या दिवशी गुजरातच्या मालवाडा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महात्मा रामचंद्र वीर महाराज होते. आचार्य धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या वडिलांच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव होता. आचार्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी ‘वज्रांग’ नावाचे एक दैनिक चालू केले होते. सध्या ते जयपूरच्या विराटनगर मठात रहात होते. तेथेच ते त्यांची साधना करत होते. काही वर्षांपूर्वी आचार्य धर्मेंद्र यांनी सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट दिली होती.

Leave a Comment