संभाजीनगर येथील पू. (अधिवक्ता) सुरेश मधुसूदन कुलकर्णी यांचा साधनाप्रवास (भाग १)

अनुक्रमणिका

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा
अन् कृतज्ञताभाव असणारे सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे)

परात्पर गुरु डॉ. आठवले

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांना साधनेत येण्यापूर्वी अनेक कठीण प्रसंगांतून जावे लागले. सर्वसाधारण व्यक्ती अशा प्रसंगांत मनाने कधीच खचून गेली असती; पण घरातील धार्मिक वातावरण आणि बालपणापासून देवावर असलेली दृढ श्रद्धा यांमुळे ते निर्भयतेने या प्रसंगांना सामोरे गेले. देवाने त्यांच्यावर भरभरून केलेल्या कृपेच्या जाणिवेमुळे त्यांच्या मनात देवाविषयी पुष्कळ कृतज्ञता होती. वर्ष १९९७ मध्ये ते साधनेत आले. मनाचा प्रांजळपणा, साधनेतील चिकाटी, शिकण्याची वृत्ती, स्वभावदोष अन् अहं निर्मूलन यांसाठी केलेले प्रयत्न आणि गुरूंवरील अपार श्रद्धा अन् कृतज्ञताभाव यांमुळे त्यांच्यावर गुरुकृपा होऊन ३.६.२०१९ या दिवशी ते संतपदावर विराजमान झाले. ‘गुरुकृपेने तीव्र प्रारब्धही न्यून होते’, याचीही त्यांनी अनुभूती घेतली. ‘गुरुकृपा होण्यासाठी सातत्याने साधनारत राहून चिकाटीने कसे प्रयत्न करायचे ?’, याचा वस्तूपाठच त्यांनी त्यांच्या जीवनपटातून साधकांसमोर ठेवला आहे. त्यांचा हा साधनाप्रवास साधकांना साधनेसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

 

पू. (अधिवक्ता) सुरेश मधुसूदन कुलकर्णी

१. जन्म आणि बालपण

‘माझा जन्म २९.८.१९५८ या दिवशी, श्रावण पौर्णिमेला (नारळी पौर्णिमेला) संभाजीनगर (पूर्वीचे नाव औरंगाबाद) येथे झाला. माझ्या जन्माच्या वेळी आणि त्यानंतरही जवळजवळ १५ वर्षे घरात अनेक वयस्कर नातेवाईक होते. त्याच समवेत आमच्या घरी आई-वडिलांच्या (आई मालतीबाई मधुसूदन कुलकर्णी आणि वडील श्री. मधुसूदन बापूराव कुलकर्णी यांच्या) काही नातेवाइकांचेही अधून-मधून आमच्या घरी येणे-जाणे असायचे. माझ्या जन्मानंतर आम्ही आमच्या पैठण तालुक्यातील विहामांडवा या गावी रहायला गेलो. तिथे आमची वडिलोपार्जित शेती होती. माझे पणजोबा, आजोबा आणि वडील गड्यांकडून किंवा बटाईने (म्हणजे वाटणीने) शेती करून घ्यायचे.

 

२. घरातील धार्मिक वातावरण !

२ अ. घरातील धार्मिक वातावरणामुळे लहानपणापासून साधनेची गोडी लागणे

माझे कुटुंब अतिशय धार्मिक असल्याने घरात सणवार आणि व्रते नियमितपणे केली जायची. माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती अनुग्रहित होती. त्यामुळे घरातील सर्वजण त्यांच्या गुरूंनी दिलेला नामजप करत असत. त्याच समवेत ते धार्मिक पुस्तके, पोथ्या किंवा पुराणे वाचत असत. आमच्या घरी अधून-मधून ‘श्रीमद्भागवत’, ‘रामायण’ किंवा पौराणिक कथा यांचे वाचन आणि सप्ताह व्हायचे. अशा प्रकारे मला माझे कुटुंबीय आणि वडीलधारी मंडळी यांच्याकडून धार्मिक वारसा लाभला होता. त्यामुळे माझी व्यष्टी साधना बालपणापासूनच चालू होती. मला माझ्या अडचणी देवाला सांगण्याची सवय होती.’

२ आ. आजीने वयाच्या ८० व्या वर्षानंतर तीर्थयात्रा करणे

वर्ष १९९६ मध्ये माझ्या आजीचे (श्रीमती दुर्गाबाई बापूराव कुलकर्णी) वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. ती जिवंत असेपर्यंत तिची सर्व कामे ती स्वतःच करायची. ती काटक होती. ‘देवधर्म, पोथी वाचन आणि नामजप करणे’, हे सर्व ती सतत आणि नेमाने करायची. ती अतिशय सकारात्मक होती. तिने वयाच्या ८० व्या वर्षानंतर सर्व तीर्थयात्रा केल्या. तीर्थयात्रांच्या वेळी आजीच्या समवेत माझे आई-वडील आणि आम्हा भावंडांपैकी कुणीतरी असायचे.

२ इ. वडील पापभिरू वृत्तीचे असणे

वर्ष १९७२ मध्ये माझ्या आजोबांचे (श्री. बापूराव रंगनाथराव कुलकर्णी) निधन झाले. त्यानंतर कुटुंबाचे सर्व दायित्व माझ्या वडिलांकडे आले. माझे वडील अतिशय पापभिरू वृत्तीचे असून कुणाच्याही अध्यात-मध्यात नसत; मात्र त्यांना व्यवहाराचा अनुभव नसल्याने दायित्व सांभाळणे कठीण जात होते. काही वेळा ते आम्हाला आर्थिकदृष्ट्या हानीकारकही ठरत होते. त्यामुळे आम्ही भावंडे त्यांना साहाय्य करायचो. वर्ष २००५ मध्ये माझ्या वडिलांचे आणि वर्ष २०१८ मध्ये आईचे निधन झाले.

 

३. वर्ष १९७२ चा अनुभवलेला भीषण दुष्काळ !

३ अ. दुष्काळामुळे खाण्यासाठी निकृष्ट अन्नधान्य मिळणे

वर्ष १९७२ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्या वेळी तत्कालीन अमेरिका सरकारने जनावरांना, विशेषतः घोड्याला खाऊ घातला जाणारा मिलो गहू आणि लाल ज्वारी अशा प्रकारची निकृष्ट प्रतीची अन्नधान्ये भारतात पाठवली होती. लोकांना ती खाण्याविना पर्यायच नव्हता.

३ आ. पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असणे

अन्नाप्रमाणेच सगळीकडे पाण्याचेही भीषण दुर्भिक्ष होते. लोकांना पाणी मिळवण्यासाठी दिवसातील ४ – ५ घंटे व्यय करावे लागायचे. शहरापेक्षाही ग्रामीण भागातील स्थिती फारच विदारक होती.

३ इ. दुष्काळामुळे आर्थिक स्थिती खालावणे

आमच्या आजोबांनी मुलांना चांगले शिक्षण देता यावे, यासाठी वर्ष १९७० मध्ये आम्हाला शहरात म्हणजे संभाजीनगर येथे आणले होते. वर्ष १९७२ च्या दुष्काळामुळे आमची आर्थिक स्थिती पुष्कळ कठीण झाली. त्यामुळे आमची पुढची ८ ते १० वर्षे हलाखीची गेली.

 

४. ‘भक्ती कशी असावी ?’, याविषयी आईने दिलेले दृष्टीकोन !

४ अ. शहरात भाडेकरूंनी दिलेल्या त्रासाविषयी
देवाला सांगूनही त्याचे निराकरण न झाल्यामुळे देवाला दूषणे देणे

मी मनाने भक्तीमार्गी होतो. माझी देवावर पुष्कळ श्रद्धा होती. त्यामुळे मी देवाला सर्वकाही सांगायचो. शहरात आमच्या भाडेकरूंनी आम्हाला दिलेला त्रास आणि मारामार्‍या यांमुळे आम्हाला कोर्ट-कचेर्‍या कराव्या लागल्या. पोलीस ठाण्यात जावे लागले. या आणि अन्य त्रासांविषयी मी देवाला सांगत होतो; मात्र त्रासांचे निराकरण होत नसल्यामुळे मी देवाला दूषणे देत होतो. ‘ते चुकीचे होते’, हे नंतर माझ्या लक्षात आले.

४ आ. ‘त्रास आणि कठीण परिस्थिती सहन करण्यासाठी देवाकडे शक्ती मागावी’, असे आईने सांगणे

आई मला म्हणायची, ‘‘जीवनातील प्रत्येक गोष्ट आपले प्रारब्ध आणि कर्म यांमुळे घडत असते. आपल्याला होणार्‍या त्रासासाठी देवाला दोष द्यायला नको. तू  तुझ्या समोर दुष्ट प्रवृत्तींचे हिरण्यकश्यपू, रावण आणि कंस इत्यादींचा आदर्श ठेवत असशील, तर ते चुकीचे आहे. त्यांच्यामध्ये अनेक वर्षे जप-तप करायचे सामर्थ्य होते. त्यांनी काही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चुकीचे वर्तन केले होते. आपण मात्र अशा प्रकारची भक्ती करू नये. जीवनात जे घडेल, ते सहन करण्यासाठी देवाकडे शक्ती मागावी आणि धैर्याने समोर आलेल्या परिस्थितीशी सामना करावा.’’ त्या वेळी गुरु देतात, तसे दृष्टीकोन आई मला द्यायची. तिचे दृष्टीकोन पूर्णतः योग्य आणि पटणारे असायचे.

४ इ. आईने आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी
प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करणे आणि त्या माध्यमातून
‘परात्पर गुरु डॉ. आठवले घरी वास करत होते’, असे आता जाणवून पुष्कळ कृतज्ञता वाटणे

दुष्काळात आमची आर्थिक स्थिती हलाखीची झाली होती. तेव्हा ‘आमची आर्थिक स्थिती सुधारावी’, यासाठी आई प्रत्येक मासाच्या पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करायची. या निमित्ताने (श्रीमन्नारायणाच्या रूपात) प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्या घरी वास करत होती’, असे आता माझ्या लक्षात येते. (कालांतराने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीमन्नारायण आहेत’, हे महर्षि आणि सप्तर्षि यांनी आपल्याला सांगितले.) सध्या आमचे देवघरातील देव माझा धाकटा भाऊ श्री. उमेश कुलकर्णी (संभाजीनगर) याच्याकडे असून आजही त्याच्याकडे प्रत्येक मासाला सत्यनारायणाची पूजा होते. ‘गेल्या अनेक जन्मांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले आमचे रक्षण करत आहेत’, हे मी कृतज्ञतेने आणि नम्रतेने मान्य करतो.

 

५. शिक्षण

५ अ. इयत्ता ७ वी पर्यंतचे शिक्षण गावी होऊन पुढचे सर्व शिक्षण संभाजीनगरला होणे

वर्ष १९७० पर्यंत सातवीपर्यंतचे शिक्षण मी आमच्या पैठण तालुक्यातील विहामांडवा या गावीच घेतले. त्यानंतर आजोबांनी आम्हाला संभाजीनगर येथे आणले. तेथेच मी माझे आठवीपासून पुढचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अन् कायद्याची पदवी घेतली. तेव्हा मी केवळ उत्तीर्ण होण्यापुरताच अभ्यास करायचो; मात्र पुढे वकिलीचा अभ्यास आणि व्यवसाय करतांना मला या सवयी पालटाव्या लागल्या. मी शाळेत आणि महाविद्यालयात शिकत असतांना व्यायाम करायचो. मला पोहण्याची फार आवड होती.

५ आ. विधीची (कायद्याची) पदवी परीक्षा देणे

माझ्या लहानपणापासून माझे आजोबा माझ्या आई-वडिलांना सांगायचे, ‘याला अधिवक्ता (वकील) करा.’ तो जणू त्यांचा संकल्पच होता. मी वाणिज्य शाखेत पदवी परीक्षा उत्तीर्ण झालो आणि त्यानंतर विधीचा (वकिलीचा) अभ्यास करायला लागलो. त्या वेळी न्यायालयात प्रत्येक प्रकरण हाताळण्यासाठी (खटला चालवण्यासाठी) मला पुष्कळ परिश्रम घ्यावे लागले. तेव्हापासूनच मला प्रत्येक गोष्टीसाठी पुष्कळ प्रयत्न करण्याची सवय लागली.

 

६. नोकरी

मी विधीचा पदवीधर झाल्यानंतर आर्थिक अडचणीमुळे सुमारे ३ वर्षे नोकरी केली. यांपैकी १ वर्ष मी कारखान्यात काम केले आणि २ वर्षे उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात कारकुनाची नोकरी केली. त्या वेळी माझ्या २ लहान भावांपैकी एकाने कारखान्यात आणि दुसर्‍याने दुकानात नोकरी केली.’

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संभाजीनगर (३१.३.२०२२)
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.sanatan.org/mr/a/89619.html

Leave a Comment