संभाजीनगर येथील सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्ता) सुरेश मधुसूदन कुलकर्णी यांचा साधनाप्रवास (भाग ३)

अनुक्रमणिका

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांना साधनेत येण्यापूर्वी अनेक कठीण प्रसंगांतून जावे लागले; पण घरातील धार्मिक वातावरण आणि बालपणापासून देवावर असलेली दृढ श्रद्धा यांमुळे ते निर्भयतेने या प्रसंगांना सामोरे गेले. वर्ष १९९७ मध्ये ते साधनेत आले. गुरूंवरील अपार श्रद्धा अन् कृतज्ञताभाव यांमुळे त्यांच्यावर गुरुकृपा होऊन ३.६.२०१९ या दिवशी ते संतपदावर विराजमान झाले. गुरुकृपेने तीव्र प्रारब्धही न्यून होते, याचीही त्यांनी अनुभूती घेतली. ‘गुरुकृपा होण्यासाठी सातत्याने साधनारत राहून चिकाटीने कसे प्रयत्न करायचे ?’, याचा वस्तूपाठच त्यांनी त्यांच्या जीवनपटातून साधकांसमोर ठेवला आहे. त्यांचा हा साधनाप्रवास साधकांना साधनेसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. मागील भागात ‘पू. कुलकर्णीकाका यांचे कौटुंबिक जीवन आणि देवावरील श्रद्धेमुळे दुर्धर संकटांना ते निर्भयतेने कसे सामोरे गेले ?’ हा भाग पाहिला. आताच्या या तिसर्‍या भागात ‘सनातन संस्थेशी परिचय झाल्यावर त्यांच्या दृष्टीकोनात झालेले पालट आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा त्यांचा भाव’ यांविषयी पहाणार आहोत.

या लेखाचा भाग २ वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://www.sanatan.org/mr/a/89619.html

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

 

१३. सनातन संस्थेशी परिचय

१३ अ. सात्त्विक उत्पादने घेतांना मनात ‘संस्थेला साहाय्य करत आहे’,
असा अहं असणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पैशांची उणीव
नसून साधकांची साधना होण्यासाठी ते ही संधी देत असल्याचे लक्षात येणे

वर्ष १९९६ मध्ये माझा सात्त्विक उत्पादने घेण्याच्या निमित्ताने सनातन संस्थेशी संबंध आला. वर्ष १९९६ – ९७ मध्ये श्रीमती जयश्री मुळेआजी माझ्याकडे येऊन मला सनातनची सात्त्विक उत्पादने द्यायच्या. मी व्यस्त असलो, तरी वेळ काढून त्यांच्याकडून ५० ते १०० रुपयांच्या वस्तू घ्यायचो. त्या वेळी ‘मी एका धार्मिक संघटनेला साहाय्य करत आहे’, असा माझ्या मनात पुसटसा अहंकार होता. आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक आणि साक्षात् श्रीराम अन् श्रीकृष्ण यांचा अंशावतार असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पैशांची काय उणीव असणार ? केवळ ‘आमच्यासारख्या जिवांची साधना व्हावी’; म्हणून ते मला ही संधी देत होते. हे नंतर माझ्या लक्षात आले.

१३ आ. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने सनातन संस्थेशी जोडला जाणे

श्रीमती मुळेआजी यांच्यामुळे मला सत्संगात रहाता आले. त्या काळात सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या समवेत मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा अंकही घेत होतो. दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यावर मी दैनिकाचा वर्गणीदार झालो. अशा प्रकारे मी ‘सनातन प्रभात’चा वाचक आणि सनातनचा समर्थक झालो अन् ‘एक हिंदु धर्माभिमानी’ या नात्याने मी सनातनशी जोडला गेलो.

१३ इ. सनातन संस्थेत आढळलेले हिंदुत्व आणि साधकांचे आदर्श वर्तन यांमुळे संस्थेकडे आकर्षित होणे

सनातन संस्थेच्या प्रत्येक साधकाचे वर्तन उच्च आध्यात्मिक स्तरावरचे असते. गुरुकृपेने साधकांचे हे वेगळेपण माझ्या लक्षात यायचे. प.पू. गुरुमाऊलींच्या कृपेमुळे माझे विचार सुस्पष्ट झाले. मी स्वतःला हिंदु धर्माभिमानी समजत होतो; मात्र मला सनातन संस्थेमध्ये जे तेजस्वी हिंदुत्व बघायला मिळाले, त्याने माझ्या मनात धर्म आणि राष्ट्र यांबद्दलची एक वेगळीच ओळख निर्माण झाली. साधकांची त्यागी वृत्ती, नम्रपणा, वक्तशीरपणा, नियोजनबद्ध आणि झोकून देऊन निःस्वार्थपणे सेवा करणे, या सर्व गोष्टींचा माझ्या मनावर सकारात्मक परिणाम होत होता. त्यामुळे मी सनातन संस्थेकडे आकर्षित झालो; मात्र मला कळत नव्हते की, ‘मी साधक म्हणून जोडला जात आहे कि हिंदुत्वनिष्ठ म्हणून तिकडे ओढला जात आहे ?’ हे केवळ त्या त्रिकालज्ञानी श्री गुरूंनाच ठाऊक ! त्यांचाच तो संकल्प होता.

 

१४. सनातन संस्थेत आल्यावर योग्य साधना कळणे

१४ अ. साधनेत आल्यावरच भक्ती, तीर्थक्षेत्रांचे चैतन्य आणि सूक्ष्मातून ईश्वराला जाणणे यांविषयी कळणे

घरातील धार्मिक वातावरणामुळे मी आई-वडील आणि आजी यांच्या समवेत चारधाम यात्रा, बारा ज्योतिर्लिंगे अन् देशभरातील अनेक धार्मिक स्थळे यांचे दर्शन घेतले होते. मला त्या तीर्थक्षेत्रांच्या स्थान माहात्म्याचे चैतन्य ग्रहण करायचा योग आला होता; परंतु साधनेत आल्यावर माझ्या लक्षात आले की, मी केवळ शरिराने तिथे होतो. तेव्हा मला ईश्वराला मनाने, भक्तीने किंवा सूक्ष्मातून जाणणे इत्यादींचा गंधही नव्हता.

१४ आ. ‘भद्रामारुति’ या जागृत देवस्थानी जातांना जाणवलेला पालट

१४ आ १. सनातन संस्थेत येण्यापूर्वी ‘भद्रामारुति’ या जागृत स्थानी पायी जातांना नामजप न करता संपूर्ण वेळ इतरांची निंदा करण्यात किंवा अनावश्यक बोलण्यात वेळ वाया घालवणे

संभाजीनगरहून २३ किलोमीटर अंतरावर ‘भद्रामारुति’ हे जागृत देवस्थान आहे. मी तिथे १५ वर्षांपासून प्रत्येक शनिवारी पायी जात होतो; परंतु त्या संपूर्ण ४ – ५ घंट्यांच्या मार्गात मी इतर अधिवक्ते आणि न्यायमूर्ती यांची निंदा करणे, मित्रांच्या दोषांविषयी चर्चा करणे किंवा चित्रपटातील नट-नट्या अथवा क्रिकेटमधील गोलंदाज आणि फलंदाज यांच्याविषयी नसता काथ्याकूट करणे, यांत वेळ वाया घालवत होतो. त्यामुळे तिथे जाऊनही माझी साधना होत नव्हती.

१४ आ २. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर नामजप करत मंदिरात जाणे आणि समष्टीसाठी प्रार्थना करणे

मी सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर ‘साधक’ म्हणून मंदिरात जात असे. मी पायी चालत जातांना ५ घंट्यांपैकी ३ घंट्यांहून अधिक वेळ नामजप करत जायचो. त्या वेळी मी सूक्ष्मातून मंदिरात जाऊन देवाला साष्टांग दंडवत घालायचो. मंदिरात गेल्यानंतर मी तिथल्या इष्ट देवतेला माझ्या श्री गुरूंच्या रूपात पहात होतो आणि अजूनही पहातो. तिथे गुरुदेवांना अपेक्षित अशा समष्टीसाठीच्या प्रार्थना करायचो. त्यातील एकही प्रार्थना मी माझी वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती किंवा कुटुंबीय यांसाठी कधी केली नाही. मी गुरुदेवांचा निस्सीम भक्त होण्याचा प्रयत्न केला.

 

१५. तलावात पोहतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विष्णुरूपाविषयी आलेली अनुभूती

१५ अ. पूर्वी बाराही मास पोहायला जाणे आणि तेथे मित्रांशी गप्पा अन् विनोद करण्यात वेळ घालवणे

शिक्षण घेत असतांना किंवा वकिली करत असतांना मला व्यायामाची, विशेषतः पोहण्याची पुष्कळ आवड होती. मी बाराही मास, म्हणजे तिन्ही ऋतूंमध्ये पोहायला जायचो. हिवाळ्यात थंडीमुळे सकाळी ९ वाजेपर्यंत लोक अंगात स्वेटर घालून असायचे, त्या वेळी आम्ही मित्र सकाळी ६ वाजता थंडगार पाण्यात पोहायचो. तेव्हाही मी समविचारी सवंगड्यांशी गप्पा आणि विनोद यांत वेळ वाया घालवत असे.

१५ आ. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर
पोहतांना सूक्ष्मातून दूरवर शेषशय्येवर विराजमान श्रीमहाविष्णूच्या
रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले दिसणे; परंतु शेषनागाने जवळ येऊ न देणे

सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर साधक म्हणून माझी प्रगती होऊ लागली. तेव्हा पोहत असतांना मला दूरवर श्रीमहाविष्णूच्या रूपात साक्षात् गुरुमाऊली शेषशय्येवर विराजमान झालेली दिसायची; मात्र तो शेषनाग माझ्या गुरुमाऊलीला माझ्यापासून दूर न्यायचा आणि मी प्रयत्नपूर्वक त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास तो त्याच्या एका फुत्कारानेच मला काही योजने दूर फेकायचा.

१५ इ. स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांमुळे
गुरुदेवांपासून दूर जात असल्याचे लक्षात येणे अन् ते दूर करण्यासाठी
गुरुदेवांना कळवळून प्रार्थना केल्यावर गुरुमाऊलीने जवळ येऊ देणे

मी विचार करायला लागलो, ‘गुरुमाऊली मला जवळ का येऊ देत नाहीत ?’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘माझ्यात स्वभावदोष आणि अहं असून मी त्यांत गुरफटलो आहे.’ मी गुरुमाऊलींना कळवळून विनंती करायचो, ‘गुरुमाऊली, माझे हे स्वभावदोष माझ्या प्रयत्नांनी जाणार नाहीत. त्यासाठी तुमचा संकल्पच व्हायला पाहिजे. तुम्हीच माझ्याकडून प्रयत्न करून घ्या.’ नंतर मी २ – ४ वेळा थोडेसे पोहण्याचा प्रयत्न केल्यावर (पाण्यात हात मारले की,) शेषशय्येवर विराजमान झालेली माझी गुरुमाऊली प्रसन्न होऊन लगेच मला जवळ येऊ द्यायची. मी त्यांना प्रार्थना करून वचन द्यायचो, ‘मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करीन अन् तुमच्या चरणी शरणागतभावाने लीन होईन.’ तेव्हाच मला गुरुदेवांचे दर्शन व्हायचे.

१५ ई. गुरुदेवांच्या समवेत श्री महालक्ष्मीदेवी, अनेक सद्गुरु आणि संत यांचे दर्शन होणे

मला गुरुदेवांच्या समवेत केवळ श्री महालक्ष्मीदेवीच नव्हे, तर अनेक सद्गुरु आणि संत बसलेले दिसायचे. मला सर्वांचे दर्शन घेण्याचा योग यायचा. अशा रीतीने जवळजवळ ३ – ४ वर्षे तलावात पोहत असतांना मला तिथे गुरुदेवच दिसायचे. तेव्हा ४० ते ४५ मिनिटे मी माझ्या गुरुमाऊलीला, म्हणजे शेषशय्येवर विराजमान असलेल्या साक्षात् श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांना बघायचो. त्यांचे दर्शन होण्यासाठी मी पुष्कळ वेळ पोहत असायचो.

१५ उ. सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून गुरुदेव श्रीविष्णु
असल्याचे सांगण्यापूर्वी त्यांचे शेषशायी श्रीविष्णुरूपात दर्शन झाल्याने कृतज्ञता वाटणे

महर्षींच्या आज्ञेवरून सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या वाचनातून पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी ‘गुरुमाऊली म्हणजे साक्षात् श्रीविष्णु आहेत’, असे आपल्याला सांगितले; परंतु सप्तर्षींनी हे सांगण्याच्या ४ – ५ वर्षे आधीपासूनच गुरुमाऊली मला या रूपात दर्शन द्यायची. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. माझा गुरुमाऊलीच्या चरणी विश्वास दृढ होत होता आणि गुरुमाऊली माझ्यात साधकत्व निर्माण करून तो वाढवत होती.

 

१६. ‘कुटुंबियांनी साधनेत यावे’,
यांसाठी प्रयत्न करूनही कुटुंबीय सनातन संस्थेशी जोडले न जाणे

कुटुंबियांनी साधनेत यावे, यासाठी मी आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांचे मार्गदर्शन असलेल्या ५५ ध्वनीचकत्या विकत घेतल्या आणि त्या भाऊ, वहिनी, मुले, पुतणे अन् अन्य नातेवाईक यांच्यासह ऐकल्या; मात्र इतके करूनही ‘कुटुंबीय सनातन संस्थेशी जोडले जातील’, असे काही चिन्ह दिसत नव्हते. मी मात्र सर्व साधकांमुळे साधनेत टिकून राहिलो.’

-(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संभाजीनगर (३१.३.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
या लेखाचा भाग ४ वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://www.sanatan.org/mr/a/89721.html

Leave a Comment