‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’, असे जीवन जगलेल्या आणि दुर्धर व्याधीतही तळमळीने साधना करून आध्यात्मिक प्रगती करणार्‍या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांचा साधनाप्रवास !

अनुक्रमणिका

कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांचे १८.१०.२०२१ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात कर्करोगाने देहावसान झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६६ वर्षे होते. सौ. केसरकर यांनी साधना समजल्यापासूनच जलद प्रगतीसाठी कठोर प्रयत्न करण्याचा निर्धार केला. त्यांनी अध्यात्मशास्त्राच्या तात्त्विक भागाचा अभ्यास करून व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी तळमळीने प्रयत्न केले. कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीतही तळमळीने साधना करून प्रगती करण्याचा आदर्श त्यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांचे पती अधिवक्ता रामदास धोंडू केसरकर (वय ६९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी पत्नी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे.

कै. (सौ.) प्रमिला केसरकर

 

१. विवाहापूर्वीचे जीवन

१ अ. सुसंस्कारित कुटुंबात जन्म होणे
आणि चाकरी करत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणे

‘माझी पत्नी सौ. प्रमिला केसरकर यांचा जन्म सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग (तेव्हाचा रत्नागिरी जिल्हा) येथे एका गरीब; परंतु सुसंस्कारित कुटुंबात झाला. त्यांचे वडील (कै. वसंत विष्णु मोंडकर) प्राथमिक शिक्षक होते. सौ. प्रमिला यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याची तळमळ असल्याने त्यांनी सावंतवाडी येथील टपाल खात्यात (पोस्ट ऑफिसमध्ये) नोकरी करून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

 

२. विवाहानंतर

२ अ. विवाहानंतर सासरच्या एकत्र कुटुंबात रहातांना त्रास सहन करून सर्वांशी जुळवून घेणे

वर्ष १९८१ मध्ये आमचा विवाह झाल्यानंतर सौ. प्रमिला ठाणे शहरात सासरी रहायला आल्या. आमचे एकत्र कुटुंब होते. आमच्या एकत्र कुटुंबात एकूण १० सदस्य होते. त्यामुळे मी माझ्या मालकीची स्वतंत्र सदनिका घेईपर्यंत आमच्या घरी त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. तो त्यांनी शांतपणे सहन केला. त्याबद्दल त्यांनी माझ्याकडे कधीही गार्‍हाणे केले नाही. त्यांनी माझे आई-वडील (आई कै. (सौ.) यमुनाबाई धोंडू केसरकर, वडील कै. धोंडू अर्जुन केसरकर), बहिणी (सौ. शारदा अजित कुर्ले (वय ६० वर्षे), सौ. शशिकला दीपक जामसंडेकर (वय ५५ वर्षे), सौ. जयश्री दीपक कोयंडे (वय ५३ वर्षे), आणि भाऊ (श्री. अशोक धोंडू केसरकर (वय ७१ वर्षे), कै. विश्वनाथ धोंडू केसरकर, कै. जयप्रकाश धोंडू केसरकर) (सर्वजण रहाणार ठाणे) या सर्वांशी जुळवून घेतले.

२ आ. नोकरी सांभाळून एकटीने घराचे दायित्व घेऊन मुलींना सांभाळणे

आम्ही साधनेत येण्याआधी कुणाचेही साहाय्य नसतांना सौ. केसरकर यांनी आमचा संसार चांगल्या प्रकारे केला. मी माझ्या वकिली व्यवसायात व्यस्त असल्याने रविवार सोडून अन्य दिवशी मला घरच्या कामांसाठी वेळ देता येत नसे. त्यांनी हे समजून घेऊन स्वतःची नोकरी सांभाळून ‘जेवण करणे, घराची स्वच्छता इत्यादी घरातील सर्व कामे, तसेच दोन्ही मुलींचे (मोठी मुलगी – सौ. साक्षी समीर नाईक (वय ३८ वर्षे), फोंडा (पूर्वाश्रमीची नीलम रामदास केसरकर) आणि धाकटी मुलगी कु. उमा रामदास केसरकर (वय ३३ वर्षे), ठाणे) यांचे शिक्षण आणि अभ्यास घेणे’, असा संसाराचा भार देवाच्या कृपेने समर्थपणे सांभाळला.

२ इ. मुलीला होणार्‍या आध्यात्मिक त्रासाच्या निवारणासाठी नामजप आणि अनेक विधी करणे

आमची मोठी मुलगी (सौ. साक्षी समीर नाईक) जन्मल्यापासून ६ वर्षांपर्यंत सतत आजारी पडत असे. तिच्या आजारपणात सौ. केसरकर यांनी कित्येक रात्री जागून काढल्या. त्या वेळी आम्हा उभयतांना साधना आणि साधनेचे आपल्या जीवनातील महत्त्व ठाऊक नव्हते. वर्ष १९९४ मध्ये गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने आम्ही साधनेत आल्यानंतर आम्हाला कळले की, मोठ्या मुलीचा त्रास आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. त्यासाठी आम्ही संतांनी वेळोवेळी सांगितलेले नामजपादी उपाय आणि अनेक आध्यात्मिक विधी केले.

 

३. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधनेस प्रारंभ !

३ अ. ठाणे येथील सत्संग आणि अभ्यासवर्ग यांना
उपस्थित रहाणे अन् शिकायला मिळालेल्या सूत्रांनुसार साधना चालू करणे

आम्हाला साधना आणि साधनेचे महत्त्व ठाऊक नव्हते. सनातन संस्थेच्या माध्यमातून ते कळल्यावर वर्ष १९९४ मध्ये गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) आज्ञेने मी ठाणे येथील माझ्या वकिली व्यवसायाच्या कार्यालयात सत्संग चालू केला. सौ. केसरकर पहिल्या सत्संगापासून शेवटपर्यंत दोन्ही लहान मुलींना सत्संगात घेऊन यायच्या. पहिल्या सत्संगात सांगितल्याप्रमाणे त्यांनी कुलदेवता आणि दत्तगुरु यांचे नामस्मरण चालू केले.

३ आ. जिज्ञासूपणे सनातनच्या सगळ्या ग्रंथांचे वाचन करणे

सौ. केसरकर यांना मुळातच वाचनाची आवड असल्याने त्या कोणताही विषय समजून घेण्यासाठी जिज्ञासू वृत्तीने अनेक पुस्तकांचे वाचन करत. साधनेत आल्यानंतर त्यांनी गुरुदेवांनी वेळोवेळी प्रकाशित केलेले सगळेच ग्रंथ वाचून काढले.

३ इ. सनातनच्या ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील महत्त्वाची सूत्रे लिहून ठेवणे

त्यांच्यातील जिज्ञासू वृत्तीमुळे त्यांनी सत्संगात अध्यात्म विषय समजून घेतला. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे सत्संगात घेतलेल्या विषयाची सूत्रे त्या लिहून घेत. सनातनचे नवीन प्रकाशन आले की, मी तो ग्रंथ विकत घेत असे. तो ग्रंथ त्या अभ्यासत आणि त्या ग्रंथातील साधनेसाठी उपयुक्त सूत्रे टिपून ठेवत असत. पुढे ठाणे येथील अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासवर्गांनाही त्या न चुकता उपस्थित रहात असत. त्या अभ्यासवर्गात शिकवलेल्या विषयांची सूत्रे लिहून घेत आणि शंकानिरसन करून घेत.

३ ई. पतीला पूर्णवेळ साधना करण्यासाठी
साहाय्य करून स्वतःही पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय करणे

३ ई १. पतीला पूर्णवेळ साधना करण्यासाठी साहाय्य करणे

मी घेतलेल्या कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाला सौ. केसरकर यांनी कधीही विरोध केला नाही, उदा. मी ठाणे येथील वकिली व्यवसाय बंद करून स्थलांतरित झालो. त्यालाही त्यांनी सहमती दर्शवली. (त्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.) त्यांनी मला आरंभापासूनच पूर्णवेळ साधना करण्यासाठी पूर्णपणे साहाय्य केले. त्यामुळे मी साधनारत राहू शकलो.

३ ई २. ‘ईश्वरप्राप्ती करणे’, हेच जीवनाचे ध्येय ठरवून पूर्णवेळ साधना करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेणे

गुरुदेवांच्या कृपेने वर्ष १९९४ मध्ये साधना चालू केल्यावर सौ. केसरकर यांना जीवनातील साधनेचे महत्त्व लक्षात आले. त्यांनी गुरुदेवांनी वेळोवेळी सांगितलेली सेवा करून ‘ईश्वरप्राप्ती करणे’, हेच जीवनाचे ध्येय ठरवले. टपाल कार्यालयात २० वर्षे नोकरी केल्यानंतर साधनेसाठी पूर्ण वेळ देता यावा, यासाठी त्यांनी १९९८ या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्या काळात मी पूर्णकालीन साधक असल्याने अध्यात्मप्रसारानिमित्त बाहेरगावी जात असे. त्यामुळे त्यांनी मुलींची शाळा आणि घर या सगळ्याचे दायित्व घेतले. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून चिकाटीने साधनेचे प्रयत्न केले.

 

४. कै. (सौ.) केसरकर यांनी केलेल्या समष्टी सेवा

अधिवक्ता रामदास केसरकर

४ अ. अध्यात्म प्रसार आणि सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे

वर्ष १९९४ ते १९९८ या कालावधीत सौ. केसरकर यांनी ठाणे येथे ठिकठिकाणी ‘प्रवचने घेणे, साप्ताहिक सत्संग घेणे, ‘सनातन प्रभात’ साप्ताहिकासाठी वर्गणीदार करणे, जिज्ञासूंना संपर्क करून साधना सांगणे, सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे’, अशा अनेक सेवा केल्या.

४ आ. कुडाळ येथे अध्यात्म प्रसार, वृत्तांकन करणे आणि सेवाकेंद्रातील सेवा करणे

वर्ष १९९८ मध्ये आम्ही ठाणे येथून कुडाळला स्थलांतरित झालो. तेथे सौ. केसरकर यांनी अध्यात्म प्रसार, ‘सनातन प्रभात’साठी वृत्तांकन करणे, तसेच कुडाळ सेवाकेंद्रातील सेवा केल्या. त्या सकाळी लवकर उठून दिवसभर सेवा करत.

४ इ. रामनाथी आश्रमात ग्रंथविभाग आणि स्वागतकक्ष येथे सेवा करणे

वर्ष २००७ मध्ये सौ. केसरकर कुडाळहून रामनाथी आश्रमात आल्या. त्या कालावधीत त्यांनी रामनाथी आश्रमात स्वागतकक्षावर सेवा केली. त्यांनी अनेक वर्षे रामनाथी आश्रमातील ग्रंथ विभागात संकलनाची सेवा केली. कर्करोगाचे (मल्टीपल मायलोमाचे) निदान होण्याआधी सौ. केसरकरांना सेवेची तळमळ असल्याने पाठीच्या कण्यात असह्य वेदना होत असतांनाही त्या संकलनाची सेवा करत.

 

५. कै. (सौ.) केसरकर यांची ठळक गुणवैशिष्ट्ये

५ अ. काटकसरीपणा

सौ. केसरकर यांच्या अंगी मुळातच काटकसर हा गुण होता. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’, असे त्यांचे जीवन होते. साधनेत येण्यापूर्वी आणि त्यानंतरही स्वतःला कितीही कष्ट करावे लागले, तरी त्यांचे गार्‍हाणे नसायचे. त्यांनी शेवटपर्यंत स्वत:साठी भ्रमणभाष संचही विकत घेतला नाही. (त्यांना कुडाळ येथील त्यांचा मोठा भाऊ (श्री. रामचंद्र वसंत मोंडकर, वय ७३ वर्षे) किंवा ठाणे येथील बहीण (सौ. पूजा प्रदीप नागावेकर, वय ६२ वर्षे) यांच्याशी कधी बोलायचे असल्यास त्या माझ्या भ्रमणभाषवरून बोलत. त्यांचे संभाषण अगदी थोडक्यात आणि तेसुद्धा केवळ साधनेच्या संदर्भात असे.)

५ आ. आसक्ती नसणे

आमच्या विवाहानंतर सौ. केसरकर ठाणे येथील मुख्य टपाल कार्यालय येथे ‘वरिष्ठ लिपिक’ या पदावर नोकरी करत होत्या. त्यांना मिळालेल्या मासिक वेतनाचे सर्व पैसे त्या माझ्याकडे देत असत. त्यानंतर मी त्यांना त्यांच्या वेतनातील काही पैसे वैयक्तिक व्ययासाठी देत असे; परंतु त्या ते व्यय न करता साठवून ठेवत आणि प्रसंगी आवश्यकता भासल्यास मला परत देत असत. त्यांना दाग-दागिने, पैसे अथवा मिळकत यांपैकी कसलीच आसक्ती नव्हती. आम्ही ठाणे शहरातील आमच्या मालकीच्या सदनिकेत रहात असतांना त्यांनी हौसमौज, साड्या, दाग-दागिने यांसाठी माझ्याकडे कधीही हट्ट केला नाही.

५ इ. मितभाषी आणि नम्र

त्या मितभाषी होत्या. त्या प्रत्येकाशी अगदी अत्यल्प शब्दांत आणि नम्रपणे बोलायच्या. त्या कधीही कोणालाही रागावून बोलल्याचे मी पाहिले नाही. काही प्रसंगी आवश्यक वाटल्यास त्या साधिकांना शांतपणे आणि नम्रतेने चुका सांगायच्या.

५ ई. नीटनेटकेपणा

त्या खोली आणि कपाट यांतील साहित्य व्यवस्थित ठेवायच्या. त्यांना स्वच्छतेची आवड असल्याने त्या वेळच्या वेळी वस्तू जागेवर ठेवत असत.

५ उ. प्रामाणिकपणा

त्यांच्यामध्ये मुळातच प्रामाणिकपणा असल्याने साधनेत आल्यापासून त्यांनी साधनेचे प्रयत्न प्रामाणिकपणे केले.

५ ऊ. आवड-नावड नसणे

त्यांनी आवड-नावड कधीच जोपासली नाही.

५ ए. प्रेमभाव

त्यांना साधकांविषयी प्रेमभाव होता. त्यामुळे त्यांना साधक भेटल्यास त्या स्वत: पुढाकार घेऊन त्यांच्याशी बोलत आणि त्यांची आत्मीयतेने विचारपूस करत.

५ ऐ. तत्त्वनिष्ठता

त्या तत्त्वनिष्ठ असल्याने माझ्या चुका सहजपणे सांगत. त्याचा मला साधनेत लाभ झाला.

५ ओ. चिकाटी आणि तळमळ

५ ओ १. स्वतःच्या आध्यात्मिक त्रासाच्या निवारणार्थ प्रतिदिन ४ – ५ घंटे नामजपादी उपाय चिकाटीने करणे : रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांना ‘आध्यात्मिक त्रास आहे’, असे गुरुदेवांनी सांगितले. त्यांनी काही वर्षे आध्यात्मिक त्रासाच्या निवारणार्थ संतांनी वेळोवेळी सांगितलेले नामजपादी उपाय प्रतिदिन ४ – ५ घंटे चिकाटीने आणि न कंटाळता केले.  त्या रामनाथी आश्रमात आल्यापासून आश्रमजीवनाशी एकरूप झाल्या आणि त्यांनी आश्रमातील कार्यपद्धतींचे काटेकोरपणे पालन केले.

५ ओ २. तळमळीने समष्टी सेवा करणे : ‘साधकाने व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधना केल्यास जलद प्रगती होते’, हे सौ. केसरकर यांना कळल्यापासून गुरुदेवांच्या कृपेमुळे आरंभापासून त्यांच्यात समष्टी साधनेची तीव्र तळमळ निर्माण झाली. त्यांनी अनेक समष्टी सेवा तहान-भुकेची पर्वा न करता केल्या. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न असायचा.

५ ओ ३. सौ. केसरकर शरीरस्वास्थ्यासाठी नियमित चालणे, योगासने आणि प्राणायाम करत असत.

५ औ. इतरांचा विचार करणे

आपल्या कोणत्याही कृतीमुळे अन्य कोणालाही त्रास होऊ नये, याबद्दल त्या नेहमी सतर्क असत. त्या इतरांच्या वेळेचा विचार करत. ‘आपल्यासाठी साधकांच्या समष्टी सेवेचा वेळ जाऊ नये’, याचा त्या नेहमी विचार करत असत.

 

६. कर्करोगासारखा असाध्य आजाराशी
साधनेच्या बळावर लढणार्‍या कै. (सौ.) प्रमिला केसरकर !

६ अ. कर्करोगाचे निदान झाल्याने
गोवा येथील रुग्णालयात भरती करणे; परंतु गोव्यात
कर्करोगावरील उपचार करण्यासाठी पुरेशा सोयी उपलब्ध नसणे

वर्ष २०१६ मध्ये त्यांच्या वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर त्यांना कर्करोग (मल्टीपल मायलोमा) झाल्याचे निदान झाले; म्हणून उपचारासाठी त्यांना पणजी येथील सरकारी रुग्णालयात एक आठवडाभर भरती केले. त्या वेळी नियमित औषधे आणि एक ‘बायोप्सी’ (शरिरातील पेशींचा छेद घेऊन तपासणी करणे) करण्यात आली. त्यानंतर त्यांना पणजी येथील मणिपाल रुग्णालयात भरती केले. तिथेही त्यांच्यावर ‘औषधे, २ वेळा ‘एम्.आर्.आय.’ (Magnetic Resonance Imaging) (चुंबकीय क्षेत्र आणि रेडिओ लहरींचा वापर करून शरिरांतर्गत भागातील कापचित्र/छेदचित्र, तसेच त्रिमितीय चित्र मिळवणे) आणि १ ‘बायोप्सी’, असे उपचार करण्यात आले.

मणिपाल रुग्णालयात एक आठवडाभर उपचार केल्यानंतर कळले की, कर्करोगावर उपचार करण्यासाठी पुरेशा सोयी उपलब्ध नव्हत्या.

६ आ. ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात भरती करणे
आणि त्यानंतर दीड वर्ष अनेक वैद्यकीय उपचार घेतांना
उपचाराच्या कालावधीत भ्रमणसंगणकावर संकलनाची सेवा करणे

सौ. केसरकर यांचा कर्करोग बळावल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर अधूनमधून त्यांच्यावर दीड वर्ष वैद्यकीय उपचार चालू होते. प्रतिदिन औषधे घेण्यासह त्यांची ३ वेळा ‘बायोप्सी’, ४ वेळा ‘एम्.आर्.आय्’., २४ ‘केमोथेरपी’, १२ ‘रेडियेशन’ आणि रक्ताचे ‘ट्रान्सप्लान्ट’ करण्यासाठी लागणारे शस्त्रकर्म करण्यात आले. हे उपचार केल्यानंतर गुरुदेवांच्या कृपेने त्यांना बरे वाटू लागले. त्या चालू फिरू लागल्या; म्हणून आम्ही पुन्हा रामनाथी आश्रमात आलो. त्यानंतर प्रत्येक ३-४ मासांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात घेऊन जावे लागे. तिथे रक्ताच्या तपासण्या कराव्या लागत. त्यामुळे आम्हाला अनुमाने ८ ते १० दिवस ठाण्याला थांबावे लागत असे. असे असले, तरी त्या कालावधीत त्यांनी भ्रमणसंगणकावर जमेल तशी संकलनाची सेवा केली.

६ इ. पाठीच्या कण्यात पुन्हा असह्य वेदना होणे; परंतु
दळणवळणबंदीमुळे ठाणे येथे जाणे अशक्य असल्याने पणजी येथेच कर्करोगावर उपचार घेणे

सप्टेंबर २०२१ मध्ये सौ. केसरकर यांना पूर्वीप्रमाणे पाठीच्या कण्यात असह्य वेदना होऊ लागल्या. त्या वेळी कोरोना महामारीच्या दळणवळणबंदीमुळे उपचारासाठी ठाण्याला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना पुन्हा पणजी येथील मणिपाल रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी भरती केले. त्यांच्या सगळ्या वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर त्यांना पुन्हा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यामुळे पुन्हा उद्भवलेल्या कर्करोगावर (रिलॅप्स म्हणून) पणजी येथील मणिपाल रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. या उपचारांतर्गत त्यांनी पुन्हा २ वेळा ‘एम्.आर्.आय्’., १७ ‘केमोथेरपी’ आणि १० ‘रेडिएशन्स’ सायकल्स सहन केल्या.

६ ई. सतत ५ वर्षे शारीरिक त्रास, असह्य वेदना आणि
औषधांमुळे झालेले गंभीर परिणाम गुरुकृपेमुळे सहन करणे

सौ. केसरकर यांनी वर्ष २०१६ पासून ॲलोपॅथीची, आयुर्वेदीय आणि होमिओपॅथीची औषधे सतत घेतली. औषधांचे अनेकविध गंभीर परिणाम त्यांच्या शरिरावर झाले आणि ते त्यांनी सहन केले. या आजारपणातही त्यांनी अनेक शारीरिक त्रास आणि असह्य वेदना गुरुकृपेमुळे सहन केल्या. काही वेळा तर ‘त्या आता जिवंत रहातील कि नाही ?’, अशी परिस्थिती निर्माण होत असे.

 

७. कै. (सौ.) केसरकर यांच्याकडून गंभीर आजारपणात शिकायला मिळालेली सूत्रे

७ अ. शरीरस्वास्थ्यासाठी प्राणायाम करणे

कर्करोगाने आजारी पडल्यापासून त्यांना योगासने करणे अशक्य झाले, तरीही त्या जमेल तसे प्राणायाम करत असत.

७ आ. गुरुदेवांप्रती असलेल्या दृढ श्रद्धेच्या बळावर परिस्थिती स्वीकारून स्थिर रहाणे

त्यांनी गुरुदेवांप्रती असलेल्या दृढ श्रद्धेच्या बळावर सगळी परिस्थिती स्वीकारली आणि शेवटपर्यंत त्या स्थिर राहिल्या अन् आजाराच्या तीव्र वेदनाही त्यांनी सहन केल्या. तसेच या कालावधीत त्यांनी शक्य तेवढी सेवाही केली.

७ इ. तळमळीने सेवा करणे

शारीरिक वेदना होत असतांनाही स्वागतकक्ष आणि ग्रंथ-संकलन या सेवा त्या तळमळीने करत असत.

७ ई. दुर्धर आजारपणातही व्यष्टी साधना आणि भावजागृतीसाठीचे प्रयत्न करणे

‘आपल्या जीवनात साधनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे’, हे सौ. केसरकर यांना गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने समजले. तेव्हापासून त्यांनी गुरुदेवांनी सांगितलेली साधना गांभीर्याने आणि तळमळीने केली. त्यांनी कर्करोगाच्या आजारपणातही व्यष्टी साधना आणि भावजागृतीसाठीचे प्रयत्न तळमळीने केले.

७ ई १. प्रवासातील वेळेत नामजप करणे

सौ. केसरकर यांच्यामध्ये पूर्वीपासून ‘वेळ वाया न घालवणे आणि वेळेचे काटेकोर पालन करणे’, हा गुण होता. त्या गुणाचा त्यांनी साधनेसाठी उपयोग केला. त्यांना प्रत्येक ३ – ४ मासांनी वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात जावे लागे. तेव्हा त्या प्रवासातील वेळ नामजपासाठी वापरत. रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर तेथेही उपलब्ध असलेल्या वेळेत त्या नामजप करत असत.

७ ई २. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्याशी सूक्ष्मातून संवाद साधणे

त्या नामजपादी उपाय करतांना, तसेच इतर वेळीही नामजप करतांना भावपूर्ण प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यास प्राधान्य देत. अधून-मधून त्या कधी भगवान श्रीकृष्णाशी, तर कधी गुरुदेवांशी सूक्ष्मातून संवाद साधत असत. त्यांना काही प्रश्न पडल्यास त्यांची उत्तरे त्या संवादातून मिळवत आणि मग त्याविषयी मला सांगत असत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने पुष्कळ साधकत्व असलेल्या कै. (सौ.) प्रमिला केसरकर मला धर्मपत्नी म्हणून लाभल्या. गुरुदेवांनी मला पत्नीच्या कर्करोगाच्या गंभीर आजारपणात सेवा करण्यासाठी प्रेरणा आणि शक्ती दिली, तसेच त्यांनी आम्हा दोघांकडून साधना करवून घेतली. त्यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी शरणागत भावाने कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– अधिवक्ता रामदास धोंडू केसरकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२२)

 

आध्यात्मिक त्रास

याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्म

व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

 

Leave a Comment