सात्त्विक मराठी भाषा टिकवण्याचे उपाय

 

संस्कृतनंतर सर्व भाषांत मराठी भाषा अधिक सात्त्विक आहे. प्रायोगिक स्तरावर प्रत्येकाने तिचे वैभव टिकवण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत, यावर प्रस्तुत लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘माय मराठी’ला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मराठी भाषिकांनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करून दृढ निश्चय करूया आणि संघटितपणे ‘मराठी’चे रक्षण तसेच संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करूया !

 

१. स्वाक्षरी मराठीतून करा !

२. ‘गुड मॉर्निंग’च्या ठिकाणी ‘शुभ प्रभात’ म्हणा !

३. मुलांना ‘मम्मी-डॅडी’ नको, तर ‘आई-बाबा’ म्हणायला शिकवा !

४. दूरभाषवर बोलतांना ‘हॅलो’ म्हणण्यापेक्षा ‘नमस्कार’ म्हणून बोलण्यास प्रारंभ करा !

५. सणाच्या शुभेच्छा मराठीत द्या, उदा. ‘हॅपी दिवाली’च्या ठिकाणी ‘शुभ दीपावली’ म्हणा !

६. मुलांना ‘हॅरी पॉटर’ वाचायला न देता ‘पंचतंत्रा’तील कथा वाचायला द्या !

७. दारावर पाटी मराठीत लावा !

८. ‘नावात इंग्रजी अक्षरांनी आद्याक्षरे न लिहिता, मराठी (मातृभाषेतील) आद्याक्षरे वापरा, उदा. श्री. भूषण विश्वनाथ पाटील, यांचे नाव ‘श्री. बी.व्ही. पाटील’, असे न लिहिता ‘श्री. भू.वि. पाटील’, असे लिहा !

नाव लिहिण्याची योग्य पद्धत
नाव लिहिण्याची योग्य पद्धत

 

९. संभाषण, नोंदी आणि लेखन यांसाठी मराठीचा वापर करा !

९ अ. संभाषण

‘अनेक मराठी भाषिक मराठी आणि हिंदी भाषा येत असतांनाही एकमेकांशी इंग्रजीतून बोलतात. जेथे मराठी किंवा हिंदी भाषा समजत नसेल, येत नसेल आणि त्यामुळे संवाद साधतांना अडचण येत असेल, तेथेच इंग्रजीचा वापर करावा. जेथे अशी अडचण नसेल, तेथे स्वभाषेचा अभिमान जागृत ठेवण्यासाठी मराठीतच संवाद साधावा.’ – कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

९ आ. नोंदी

‘दूरध्वनी केल्याची नोंद करतांना किंवा कार्यालयातून बाहेर जातांना नोंद करतांना संबंधित नोंदवहीत स्वतःच्या नावासह अन्य माहिती भरतांना प्रयत्नपूर्वक मराठीतून लिखाण करावे.

१. हल्ली इंग्रजी लेखनाच्या सवयीमुळे मराठीत लिहितांनाही इंग्रजीप्रमाणे म्हणजे रेषेच्या वर लिहिले जाते. ते अयोग्य आहे. मराठी लेखन किंवा नोंदी कागदावर असलेल्या रेषेखाली कराव्यात. त्याचप्रमाणे प्रत्येक शब्दावर शीर्षरेषाही द्यावी. रेषेखाली लिहिलेल्या अक्षरांना रेषेचा आधार मिळतो.

२. निधर्मीवाद्यांच्या शिकवणुकीमुळे सध्या स्वतःच्या वा अन्य कोणाच्या नावामागे ‘श्री.’ लावायची पद्धत बंद पडली आहे. ‘श्री’ने युक्त तो ‘श्रीयुत’, असा त्याचा अर्थ आहे. दारावरील पाटी, गणवेशावरील नामपट्टीका, वर्तमानपत्रांतील नावे, लेटरहेड, व्हिजीटींग कार्ड, पत्रे, आवेदने (अर्ज), निवेदने इत्यादी ठिकाणी आपल्या नावामागे ‘श्री., कु., सौ. किंवा श्रीमती’ लावावे. मुलांच्या नावामागे ‘चि. / कु.’ लावावे.’

– श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी.

 

१०. स्वतःच्या आणि दुसर्‍यांच्या नावाचा आदर करण्यास शिका आणि त्यांचा योग्य उच्चार करा !

‘भारतीय आणि विशेषतः हिंदू एकमेकांचा उल्लेख करतांना नावाचा अपभ्रंश करतात, उदा. एखाद्याचे नाव ‘व्यंकटेश’ असल्यास त्याला ‘वेंकी’ म्हणणे, ‘नारायण’ असल्यास ‘नार्‍या’ म्हणणे इत्यादी. हिंदू त्यांच्या मुलांची नावे ठेवतांना बहुतेक वेळा देवतांची नावे ठेवतात. नावांचा अशा प्रकारे अपभ्रंश केल्याने संबंधित देवतेचा अपमान होतो आणि नावाच्या उच्चारातून सात्त्विक स्पंदनांची निर्मिती होण्याच्या ठिकाणी त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होते. अयोग्य नामोच्चारातून देवतांचा होणारा अनादर टाळण्यासाठी आणि योग्य नावाच्या उच्चारातून सात्त्विकतेचा लाभ घेण्यासाठी स्वतःच्या आणि दुसर्‍यांच्या नावाचा आदर करण्यास शिका आणि त्यांचा योग्य उच्चार करा.’ – कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

११. इंग्रजी भाषेचा परिणाम मराठी भाषेतील लिखाणाच्या पद्धतीवर होणे टाळा !

संस्कृत भाषा ही देववाणी असल्याने तिच्यात सर्वांत जास्त चैतन्य आहे. संस्कृतनंतर सर्व भाषांत मराठी भाषा जास्त सात्त्विक आहे. सध्या शिक्षण आणि शासकीय कामकाज यांमध्ये जास्त करून इंग्रजी भाषाच वापरली जात असल्याने मराठी बोलतांना आपण इंग्रजी भाषेतील शब्द कळत-नकळत बोलून जातो. मराठी बोलतांना जसे आपण इंग्रजी शब्द वापरतो, तसे मराठी लिहितांनाही इंग्रजी लिखाणाची पद्धत वापरतो. मराठी भाषा अशुद्ध व्हायला तेही एक कारण आहे. भाषाशुद्धीची चळवळ मराठी माणसाने मराठीत बोलावे आणि मराठी बोलतांना इंग्रजी शब्द वापरू नयेत इथपर्यंतच मर्यादित ठेवून चालणार नाही, तर ‘मराठी लिहितांना इंग्रजी पद्धतीने वाक्यरचनाही करू नये’, असेही सांगायला हवे.

 

१२. दिनांक लिहितांना मराठी कालगणनेचा वापर करा !

‘आपल्यावर इंग्रजी कालगणनेचा इतका प्रभाव पडला आहे की, कोणी सध्या मराठी मास कोणता आहे, हे विचारले, तर आपल्याला पटकन सांगता येत नाही. काही हिंदूंची तर मराठी मास ओळीने आणि पूर्ण सांगता येतील कि नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे तिथी आणि पक्ष सांगणे तर दूरच राहिले. विज्ञानानुसार परीपूर्ण अशा आपल्या कालगणनेचा वापर आपण केवळ वाढदिवस तिथीनुसार साजरे करण्यासाठी न करता जीवनाच्या प्रत्येक अंगात केला पाहिजे. त्याचा प्रारंभ करण्यासाठी आणि आपल्यात हिंदु संस्कृतीचा अभिमान निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रथम मराठी कालगणनेप्रमाणे दिनांक लिहायचा प्रयत्न केला पाहिजे. फारतर इतरांना कळावे म्हणून कंसात इंग्रजी दिनांक लिहावा आणि एकदा मराठी कालगणना रुळली की, तेही लिहू नये.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘मराठीला जिवंत ठेवा !’

१३. मराठीत अर्थहीन शब्द वापरू नका !

अ. ‘टेलिफोन’ला मराठीत ‘दूरध्वनी’ म्हणतात; टेलिफोनमधून केवळ दूरचा ध्वनी ऐकू येणे, एवढेच नसते, तर संभाषण ऐकू येते. या संदर्भात हिंदीतील ‘दूरभाष’ हा शब्द जास्त योग्य आहे; कारण टेलिफोनद्वारे दूरचे भाषण, संभाषण ऐकू येते.

आ. मराठीत ‘भावगीत’ हा शब्द प्रचलित आहे. त्या गीतांत भक्तीभाव इत्यादी काही नसून केवळ भावना असतात. त्यामुळे त्यांना ‘भावगीत’पेक्षा ‘भावनागीत’, म्हणणे जास्त योग्य ठरेल.

इ. मराठीत ‘शस्त्रक्रिया’ हा शब्द प्रचलित आहे. क्रिया आपोआप होतात. शस्त्रक्रिया आपोआप होत नाही, तर ती करावी लागते, म्हणजे ते कर्म असते; म्हणून ‘शस्त्रक्रिया’पेक्षा ‘शस्त्रकर्म’ म्हणणे योग्य आहे.

ई. प्रत्येक शब्द हा मंत्राच्या क्षमतेचा असल्याने त्याचा वापर योग्य प्रकारेच करणे आवश्यक आहे.’

– प.पू. डॉ. जयंत आठवले

 

१४. भाषा जवळीकता साधण्यास साहाय्य करते !

‘मातृभाषेद्वारे मिळालेल्या ज्ञानाद्वारे माणसाला जग, समाज आणि राष्ट्र यांचे ज्ञान मिळते. ऋषीमुनींनी दिलेल्या अमृतमय ज्ञानाला घेऊन ‘मी कोण, कशा रीतीने दीर्घायुष्य घालवले पाहिजे आणि त्याचा उपयोग कसा समर्थतेने करून घेतला पाहिजे’, हे समजून घ्यावे. यामुळे तो स्वतः समृद्ध होऊन समाज आणि राष्ट्र यांना समर्थ होण्यास हातभार लावू शकतो अन् आपले जीवन आनंदात घालवू शकतो. माणसाला आईकडून मातृभाषा सहज मिळालेली असते. तो आपले विचार आणि मनन मातृभाषेत चांगल्या रीतीने करून आपली प्रगती करू शकतो. भाषा एकात्मभाव आणि जवळीकता साधण्यास साहाय्य करते.’

– प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment