मृत्यू हे एक अपरिहार्य सत्य असून आज ना उद्या प्रत्येक जीवाला त्याच्या प्रारब्धकर्मानुसार तो येतोच ! जीवाचा मृत्यू होतांना मुखात नाम असण्याचे महत्त्व काय आहे याविषयीचे विवेचन या लेखात केले आहे. याबरोबरच मरणासन्न व्यक्तीचे प्राण जात नसतील, तर तिच्या हातून मिठाचे दान करवावे किंवा मीठ-भाकरीचा उतारा द्यावा असे म्हणतात यामागील शास्त्र काय हे पण या लेखातून कळेल. यांतून साधनेचे जीवनातील महत्त्वही लक्षात येईल.
१. मरतांना मुखात नाम असण्याचे महत्त्व
‘ज्या वेळी एखादा जीव मरतो, त्या वेळी त्याच्या देहात असणारी सूक्ष्म ऊर्जा ही सूक्ष्म वायूंच्या रूपात त्याच्या देहात कार्यरत असते. या वायूंच्या आधारावर त्याला पुढची गती प्राप्त होत असते.
१ अ. नामसाधना न करणारा
अ. नामसाधना न करणार्या जिवाला कोणतीही आंतरिक ऊर्जा (नामजपाने निर्माण झालेली सूक्ष्म ऊर्जा) किंवा बाह्यात्मक ऊर्जा (गुरु किंवा देवता यांचे आशीर्वादात्मक बळ) न मिळाल्याने असा जीव वर्षानुवर्षे एकाच योनीत स्वतःच्या आशा-आकांक्षा घेऊन भटकत रहातो.
आ. या लिंगदेहाला कसलेच संरक्षण नसल्याने तो वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाण्याची आणि वर्षानुवर्षे त्यांच्या हाताखाली काम करत रहाण्याची शक्यताही असते.
अशा लिंगदेहाला पुढची गती मिळण्यासाठी श्राद्धकर्मातून बाह्यात्मक बळ पुरवणे आवश्यक ठरते.
१ आ. मरतांना मुखात नाम असलेला
मरतांना जिवाच्या मुखात नाम असेल, तर त्याच्या देहात सात्त्विक ऊर्जेचा प्रवाह संक्रमित होत राहिल्याने तो भूलोकात, भुवलोकात (टीप १) किंवा अन्य ठिकाणी न भटकता पटकन त्याच्या कर्माप्रमाणे पुढच्या गतीला प्राप्त होतो.’
– श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.३.२००५, दुपारी १२.३६)
टीप १ – भुवलोक : ‘भूलोक’ म्हणजे पृथ्वी. भूलोक आणि स्वर्गलोक यांच्यामध्ये ‘भुवलोक’ आहे.
२. मरणासन्न व्यक्तीच्या संदर्भात करायच्या कृती
२ अ. व्यक्तीचे प्राणोत्क्रमण होण्याची वेळ जवळ आली असल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी करायच्या कृती
२ अ १. व्यक्तीला शुद्ध केलेल्या भूमीवर दक्षिणेकडे डोके करून झोपवावे ! : त्या व्यक्तीला भूमीवर ज्या ठिकाणी ठेवणार, तेथे तिला व्यवस्थित ठेवता येईल आणि आजूबाजूला थोडी जागा उरेल, एवढ्या आकाराची भूमी गायीच्या शेणाने सारवून घ्यावी. ते शक्य नसल्यास भूमीवर गोमय (गायीचे शेण) किंवा यज्ञाची विभूती यांचे पाणी शिंपडावे. घराला लादी असेल, तर ती जागा गोमूत्रमिश्रित पाण्याने (किंवा गोमूत्र-अर्कमिश्रित पाण्याने) पुसून घ्यावी. नंतर त्या भूमीवर काळे तीळ घालून त्यांवर दर्भ (उपलब्ध असल्यास) दक्षिणेकडे अग्र करून पसरावेत. त्यांवर गवती चटई, घोंगडी, रग किंवा धाबळी अंथरावी. तिच्यावर त्या व्यक्तीला दक्षिणेकडे डोके करून झोपवावे.
२ अ २. शक्य असल्यास व्यक्तीच्या मुखात गंगाजल घालावे !
२ अ ३. व्यक्तीभोवती दत्ताच्या सात्त्विक नामजप-पट्ट्यांचे मंडल घालावे ! : व्यक्तीचे मस्तक आणि पावले यांच्या जवळ (बाजूला) ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाची एकेक पट्टी अन् डाव्या आणि उजव्या अंगाला २ – २ नामजप-पट्ट्या ठेवाव्यात. या नामजप-पट्ट्या अंथरलेल्या चटईबाहेर किंवा चटईखाली सोयीनुसार ठेवाव्यात.

३. मरणासन्न व्यक्तीचे प्राण जात नसतील, तर काय करावे ?
इहलोकी (पृथ्वीवर) जीवन जगत असतांना काही जणांच्या व्यावहारिक इच्छा पुष्कळशा अतृप्त रहातात, तसेच त्यांनी आयुष्यात साधनाही केलेली नसते. त्यामुळे अशा व्यक्ती रज-तमप्रधान बनतात. सूक्ष्म जगातील वाईट शक्तींना अशा व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या लिंगदेहांना स्वतःच्या कह्यात घेणे आणि त्यांना आपला दास (गुलाम) बनवणे सोपे असते. त्यामुळे अशा व्यक्तींच्या मृत्यूसमयी त्यांच्या लिंगदेहांवर नियंत्रण मिळवणे आणि पुढे त्यांच्याकडून वाईट कर्मे करवून घेणे यांसाठी वाईट शक्ती एकमेकींशी स्पर्धा करतात. व्यक्ती साधना करणारी असली, तर काही वेळा तिच्या साधनेचे फळ खेचून घेण्यासाठीही वाईट शक्ती अशी धडपड करतात. वाईट शक्तींच्या एकमेकींशी स्पर्धा करण्याचा परिणाम म्हणून मरणासन्न व्यक्तीचे प्राण सहजतेने न जाता देहात अडकून रहातात.
प्राण देहात अडकल्यामुळे मरणासन्न व्यक्तीला भरपूर यातना होतात. त्यांतून त्या व्यक्तीची सुटका करण्यासाठी करायच्या उपाययोजना पुढे दिल्या आहेत.
३ अ. मरणासन्न व्यक्तीसाठी मीठ-भाकरीचा किंवा मीठ-मांसाचा शिजवलेला तुकडा यांचा उतारा देणे
३ आ. ‘उतारा देणे’ म्हणजे काय ? : ‘काही वस्तू वाईट शक्तींना अर्पण करून त्या माध्यमातून वाईट शक्तींच्या इच्छांची तृप्ती घडवून आणणे’, या प्रक्रियेला ‘उतारा देणे’ असे म्हणतात.
३ इ. मीठ-भाकरीचा किंवा मीठ-मांसाचा शिजवलेला तुकडा यांचा उतारा देण्यामागील अध्यात्मशास्त्र : ‘मिठातून प्रक्षेपित होणारा रज-तमात्मक लहरींयुक्त सूक्ष्म वायू वाईट शक्तींना ग्रहण करणे लगेच शक्य होते. याचे कारण म्हणजे हा वायू अतिशय हलका असल्याने तो उतार्याभोवती असलेल्या वायूकोशाकडून वाईट शक्तींना ग्रहण करणे सोपे जाते. यासाठी मरणासन्न व्यक्तीसाठी मीठ-भाकरीचा किंवा मीठ-मांसाचा शिजवलेला तुकडा यांचा उतारा दिला असता, मर्यादित काळापुरती त्या व्यक्तीवरची वाईट शक्तींची पकड सैल होते अन् त्या व्यक्तीचा प्राण देहाच्या कुडीतून सुलभतेने बाहेर पडतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २१.३.२००५, रात्री ९.५५ आणि २५.१२.२००६, रात्री ९.५५)
३ ई. मरणासन्न व्यक्तीला प्रार्थना करण्यास सांगणे
मरणासन्न व्यक्ती प्रार्थना करण्याच्या स्थितीत असल्यास तिला उपास्यदेवता किंवा दत्तात्रेय यांना पुढील प्रार्थना करण्यास सांगावी,
‘हे देवा, मृत्यूच्या वेळी होणार्या वेदना सोसण्याचे मला बळ दे. तुझ्या कृपेने माझा मृत्यू सुलभ होऊ दे. मला नामजपाचे सतत स्मरण राहू दे. तुझ्या कृपेने मला सद्गती लाभू दे.’
मरणासन्न व्यक्ती प्रार्थना करण्याच्या स्थितीत नसल्यास तिच्या कानात अन्य व्यक्तीने वरील प्रार्थना सांगावी.
३ उ. कुटुंबियांनी प्रार्थना करणे : कुटुंबियांनीही मरणासन्न व्यक्तीसाठी तिचे नाव घेऊन वर दिलेल्या प्रार्थनेसारखी प्रार्थना करावी.
३ ऊ. मरणासन्न व्यक्ती आणि कुटुंबीय यांनी नामजप करणे : मरणासन्न व्यक्ती नामजप करण्याच्या स्थितीत असल्यास तिला उपास्यदेवतेचा किंवा दत्तात्रेयाचा नामजप करण्यास सांगावा. कुटुंबियांनीही शक्य असल्यास मरणासन्न व्यक्तीसाठी हा नामजप करावा.
संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘मृत्यू आणि मृत्यूनंतरचे क्रियाकर्म’
मृत्यूनंतर काही जणांच्या तोंडवळा किंवा शरीर यांच्यावर हळदीप्रमाणे पिवळसर रंगाची छटा दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र
‘कोरोना’ महामारीच्या कालावधीत, तसेच भीषण आपत्काळात मृत व्यक्तीवर अग्निसंस्कार करण्याच्या संदर्भात पुढील सूत्रे लक्षात घ्या...
पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मृत्यूच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !
सद्यःस्थितीत ‘कोरोना विषाणू’मुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अग्नीसंस्कार करता येत नसल्यास धर्मशास्त्रानुसार करावयाचा ‘पालाशविधी’ !
मृत्यूनंतरच्या जीवनाचा विदेशातील काही रुग्णांनी घेतलेला प्रत्यक्ष अनुभव
देवघरात मृत व्यक्तीचे छायाचित्र लावून त्याचे पूजन का करू नये ?