आक्रमकांच्या कह्यातील मंदिरे सोडवण्यासाठी सिद्ध व्हा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

व्यासपिठावर उपस्थित वक्ते आणि वेदमंत्र पठण करतांना पुरोहित

सोलापूर – आज ‘काशीविश्वेश्वर कॉरीडॉर’ बनले असले, तरी तेथील नंदी आजही भगवान काशी विश्वेश्वराकडे नाही, तर ज्ञानव्यापी मशिदीकडे तोंड करून मूळ मंदिराचे भग्नावशेष पहातो आहे. केवळ काशी, मथुरा नाही, तर ‘कुतुबमिनार म्हणजे विष्णुस्तंभ’, धार येथील ‘भोजशाळा’ अजमेर येथील ‘अढाई दिन का झोपडा म्हणजे श्री सरस्वती मंदिर’ अशा १ सहस्र ५६० हिंदु मंदिरांचा प्रश्न आहे. आजही काही प्राचीन मंदिरांवरील अतिक्रमण त्याच स्थितीत आहे. यासंदर्भात काही अधिवक्ते आणि संघटना यांनी न्यायालयीन लढा आरंभला असून आक्रमकांच्या कह्यातील प्रत्येक मंदिर सोडवण्यासाठी सिद्ध व्हा !, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे १ जून या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता भवानी पेठेतील अथर्व गार्डन या ठिकाणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी उपस्थित धर्मप्रेमींना संबोधित केले.

सद्गुरु स्वाती खाडये

सभेमध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, तसेच रणरागिणी शाखेच्या श्रीमती अलका व्हनमारे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी सनातनच्या संत पू. दीपाली मतकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते भाजपच्या नगरसेविका सौ. राधिका दत्तात्रय पोसा आणि सोलापूर येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. सुरेश बिद्री यांच्यासह शहरातील १ सहस्र धर्माभिमानी हिंदू  उपस्थित होते.

 

विशेष

सभेला ८ स्थानिक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र यांचे संपादक अन् वार्ताहर उपस्थित होते. सोलापूर येथील ‘राष्ट्रतेज मराठी न्यूज’ या यु ट्यूब चॅनलचे श्री. हनुमंत श्रीराम यांनी सभेच्या ठिकाणी येऊन वार्तांकन केले, तसेच सभेतील भाषणांसह अनेक क्षणचित्रे त्यांनी बातमीच्या माध्यमातून दाखवली.

 

हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !

सद्गुरु स्वाती खाडये यांनी भाषणाच्या वेळी उपस्थितांना ‘हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होणार का ?’, असे विचारल्यावर धर्मप्रेमींनी दोन्ही हात वर करून मोठ्या आवाजात होकारार्थी अनुमोदन दिले.
अशी झाली सभा…

सभेच्या प्रारंभी शंखनाद करून सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. पुरोहित श्री. वेणु गोपाल जिला आणि त्यांचे सहकारी यांनी केलेल्या वेदमंत्रपठणाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे यांनी मांडला. वक्त्यांच्या भाषणांनंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली, तर सभास्थळी बालचमूने क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या वेषभूषेत धर्माचरण करण्याविषयी हिंदूंचे प्रबोधन केले. सभेच्या समारोप प्रसंगी समितीचे श्री. विक्रम घोडके यांच्यासह उपस्थित धर्मप्रेमींनी ‘हिंदु राष्ट्र स्थापने’ची प्रतिज्ञा केली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कु. वर्षा जेवळे आणि श्री. ऋतुराज अरसिद यांनी केले.

या वेळी सद्गुरु स्वाती खाडये पुढे म्हणाल्या ‘‘सध्या गड, दुर्ग, शासकीय कार्यालये, शासकीय भूमी आदी सर्वत्र ठिकाणी इस्लामी अतिक्रमण करून दर्गे किंवा मजार बांधण्याचे षड्यंत्र चालू आहे. ठिकठिकाणचे हिंदुत्वनिष्ठ संत आणि संघटना यांनी याविद्ध लढा पुकारला आहे. आपणही या लढ्यात सहभागी होऊन इस्लामी अतिक्रमण रोखायला हवे.’’

श्री. राजन बुणगे

 

सर्वांना समान न्याय देणार्‍या हिंदु राष्ट्र स्थापनेची
आवश्यकता ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

मुसलमान राष्ट्रांमध्ये धर्मांतर होत नाही; कारण ते गरीब असले तरी स्वत:च्या पंथाचा त्यांना अभिमान आहे. हिंदु धर्म हा मोक्ष देणारा धर्म आहे; मात्र हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते धर्मांतर करतात. भारतात अल्पसंख्यांकांच्या विरुद्ध काही झाल्यास त्यांना ‘अल्पसंख्यांक आयोग’ असतो; मात्र बहुसंख्यांक हिंदूंना कुठलेही संरक्षण दिले जात नाही किंवा त्यांच्यासाठी ‘बहुसंख्यांक आयोग’ नाही. हिंदूंच्या हिंदुस्थानात शाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते; पण ‘भगवद्गीता’ आणि ‘हिंदु धर्मग्रंथ’ शिकवले जाऊ शकत नाहीत, त्यामुळे सर्वांना समान न्याय देणार्‍या हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी या वेळी केले.

श्रीमती अलका व्हनमारे

 

हिंदु महिलांनी धर्माचरण आणि साधना
करणे आवश्यक ! – श्रीमती अलका व्हनमारे, रणरागिणी शाखा

महिलांवरील वाढते अत्याचार पहाता ते रोखण्यासाठी हिंदु महिलांनी धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षणासाठी ‘स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग’ घेण्यात येतात. त्यामध्ये अवश्य सहभागी व्हा !, असे आवाहन रणरागिणी शाखेच्या श्रीमती अलका व्हनमारे यांनी या वेळी केले.

अन्य विशेष

१. काही धर्मप्रेमींनी सभास्थळी आल्यानंतर त्यांना सभेला येण्यासाठी संपर्क केलेल्या संबंधित समितीच्या कार्यकर्त्यांना ‘सभेला आलो आहोत’, हे कळवण्यासाठी स्वतःचे मैदानावरील छायाचित्र त्यांच्या ‘व्हॉट्सअप’वर पाठवले, तसेच दूरभाष करून कल्पना दिली.

२. सभेच्या प्रसारानिमित्त झालेल्या महिलांच्या बैठकांमधील सर्व महिला उत्स्फूर्तपणे सभेला उपस्थित राहिल्या.

३. एक अपंग व्यक्ती सभेला संपूर्ण वेळ उपस्थित होती.

सभेला उपस्थित धर्मप्रेमी

क्षणचित्रे

१. ८० वर्षांच्या २ आजी सभेला उपस्थित होत्या, त्यांनी वक्त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला प्रतिसाद देत घोषणाही दिल्या.

२. भाजपचे विद्यमान नगरसेवक श्री. सुरेश पाटील यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला विशेष सहकार्य केले. त्यांची शारीरिक स्थिती ठीक नसतांनाही दोन सहकार्‍यांसह प्रत्यक्ष सभेला उपस्थित राहिले.

३. सोलापूर येथील श्री. सुरेश बिद्री या धर्मप्रेमींनी सभेला आलेल्या सर्व धर्मप्रेमींना भगव्या टोप्या विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. सर्वांनी भगव्या टोप्या घातल्यामुळे सभास्थळाचे संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते.

४. सभेला एक रिक्शाचालक आले होते. सभेतील एका वक्त्याचे भाषण झाल्यानंतर प्रभावित होऊन त्यांनी घरी जाऊन त्वरित कुटुंबियांसह १५ जणांना सभेला आणले. ‘कुटुंबियांनाही सभा पहाता यावी’, अशी त्यांची तळमळ होती.

Leave a Comment