सतत इतरांचा विचार करणार्‍या रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

अनुक्रमणिका

पू. (श्रीमती) मंगला खेरआजी

१. जन्म आणि बालपण

पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांचा जन्म अक्षय्य तृतीया (८.५.१९३२) या दिवशी तोंडदे (जिल्हा रत्नागिरी) येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव लीलावती होते. पू. आजी त्यांचे आई-वडील ((कै.) रखुमाबाई विठ्ठल फळणीकर आणि (कै.) विठ्ठल फळणीकर)), ४ भावंडे ((कै.) यशवंत विठ्ठल फळणीकर, श्री. शशिकांत विठ्ठल फळणीकर, (कै.) रेवती सरदेसाई आणि (कै.) कलावती अंबर्डेकर)); २ काका-काकू ((कै.) बळवंत सखाराम फळणीकर आणि (कै.) यशोदा फळणीकर अन् (कै.) पुरुषोत्तम सखाराम फळणीकर आणि (कै.) इंदिरा फळणीकर)) अन् त्यांची मुले, अशा मोठ्या एकत्र कुटुंबात वाढल्या.

पू. आजींच्या आई-वडिलांनी सर्वांना शिस्त लावली होती.

सौ. माधुरी प्रकाश दीक्षित

१ अ. पू. आजींमध्ये बालपणापासून असलेले गुण

बालपणापासूनच पू. आजींचे वागणे आणि बोलणे आदर्श होते. ‘इतरांना समजून घेणे आणि इतरांचे गुण पारखून त्यांच्याकडून कामे करवून घेणे’, हे त्यांना चांगले जमायचे. ‘दुसर्‍यांना नावे ठेवणे आणि दोष देणे’, असे त्यांच्याकडून कधी झाले नाही. त्या सर्वांमध्ये मिळूनमिसळून रहायच्या. त्या कुणाच्या मागे त्यांच्याविषयी बोलत नाहीत. ‘सतत दुसर्‍यांचा विचार करणे, परिस्थितीला नावे न ठेवता ‘त्यातून पुढे कसे जायचे ? काटकसरीने कसे वागायचे ?’, असा त्यांचा विचार असायचा.

१ आ. अध्यात्माची आवड असणे

पू. आजींच्या घरातील वातावरण आध्यात्मिक होते आणि त्यांनाही अध्यात्माची आवड होती. त्यांना ‘स्तोत्रे म्हणणे आणि देवळात जाणे’ लहानपणापासून आवडायचे.

सौ. मीनल मिलिंद खेर

 

२. शिक्षण

पू. आजींचे शिक्षण मुंबईत त्यांच्या बहिणीकडे ((कै.) रेवती सरदेसाई यांच्याकडे) झाले. त्यांचे इंग्रजी चांगले होते. त्यांचे शिक्षण जुन्या ‘मॅट्रिक’पर्यंत झाले आहे.

 

३. सात्त्विक राहणीमान

पू. आजींची वेशभूषा भारतीय संस्कृतीनुसार होती. त्या लहानपणी सात्त्विक झगा (‘फ्रॉक’), नंतर परकर-पोलके आणि मोठ्या झाल्यावर साडी नेसायच्या. त्यांना बाहेरील पदार्थ खाण्याची आवड नव्हती. त्या घरातील पदार्थच आवडीने खायच्या.

 

४. विवाह

वर्ष १९५४ मध्ये पू. आजींचा विवाह श्रीधर जगन्नाथ खेर यांच्याशी वयाच्या २२ व्या वर्षी झाला. त्यांना १ मुलगा (श्री. मिलिंद श्रीधर खेर) आणि २ मुली (सौ. माधुरी प्रकाश दीक्षित अन् सौ. रोहिणी रमेश ताम्हनकर) आहेत.

 

५. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी पू. आजींनी केलेली साधना

अ. प्रतिदिन सूर्याेदयानंतर पू. आजी सूर्यदर्शन करून त्याची मानसपूजा करत असत. त्या सूर्याला अर्घ्य देत असत आणि नियमित सूर्याचा नामजप करत असत.

आ. त्या प्रतिदिन सकाळी घरी देवपूजा आणि आरती करायच्या, तसेच त्या उपवासही करायच्या.

इ. प्रतिदिन सायंकाळी ५ वाजता पू. कलावतीआईंच्या भजनाला जायच्या.

ई. तेथून घरी आल्यावर त्या देवाजवळ दिवा लावून दुर्गासप्तशती वाचायच्या आणि व्यंकटेश स्तोत्र, रामरक्षा अन् मारुति स्तोत्र म्हणायच्या.

 

६. पू. आजींनी अनुभवलेली देवाची अपार कृपा !

६ अ. ‘गॅस’ चालू असतांना ‘फिट’ येऊन तोंडावर पडणे; मात्र देवाच्या कृपेने मुलाने वाचवणे

वर्ष १९७२ मध्ये पू. आजींना ‘फिट्स’ (आकड्या) यायच्या. एकदा सकाळी उठल्यावर त्यांनी ‘गॅस’ पेटवला आणि त्याच वेळी ‘फिट’ येऊन त्यांचा तोंडवळा गॅसवर आपटला. तेवढ्यात त्यांच्या मुलाला (श्री. मिलिंद खेर याला) जाग आली आणि तो स्वयंपाक घरात गेला. त्यामुळे त्या वाचल्या. त्यांचा तोंडवळा गॅसवर आपटला असूनही त्यांच्या तोंडवळ्याला कोणतीही ईजा झाली नाही; पण त्यांचे पुढचे केस जळले. त्या करत असलेल्या साधनेमुळेच देवाने त्यांना वाचवले.

६ आ. प्रवास करतांना ‘एस्.टी.’ गतीरोधकावर
आपटल्याने आसनावरून पडल्यामुळे मणका निसटणे, आधुनिक वैद्यांनी
‘त्यावर उपचार करता येणार नाहीत’, असे सांगणे; पण देवाच्या कृपेने त्यातून त्या बर्‍या होणे

एकदा पू. आजी ‘एस्.टी.’ने सातार्‍याला जात असतांना त्यांची ‘एस्.टी.’ गतीरोधकावर आपटली. त्यामुळे पू. आजी आसनावरून खाली पडल्या आणि त्यांच्या पाठीचा मणका निसटला. तेव्हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘त्यांच्यावर कुठलेच उपचार करता येणार नाहीत. हे असेच रहाणार.’’ तेव्हा त्यांना गादीवर झोपवून रत्नागिरीला आणले. घरातील सर्वांनाच ही परिस्थिती कठीण वाटत होती. तेव्हा त्यांचे वय ५२ वर्षे होते; पण देवाच्या कृपेने पू. आजी त्यातून बर्‍या झाल्या आणि आतापर्यंत, म्हणजे वयाच्या ८८ – ८९ व्या वर्षापर्यंत त्या घरकाम करत होत्या.’

 

७. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधना

७ अ. सनातनच्या सत्संगाला जाणे आणि नामजप चालू करणे

‘वर्ष १९९७ मध्ये पू. खेरआजी घराजवळील विठ्ठल मंदिरात होत असलेल्या सनातनच्या सत्संगाला गेल्या. तेथील साधकांनी पू. आजींना ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा लघुग्रंथ दिला. घरी आल्यावर त्यांनी तो ग्रंथ पूर्ण वाचला. त्यात सांगितल्याप्रमाणे पू. आजींनी लगेचच ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करायला आरंभ केला. त्यातून त्यांना आनंद मिळू लागला. पू. आजी सत्संगात सांगितल्याप्रमाणे लगेचच कृती करू लागल्या.

७ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे

पू. आजी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी नियमित प्रयत्न करायच्या. पू. आजींनी ‘मला पालटायचे आहे’, असे मनाशी ठरवले होते. त्यांना शक्य होईल, तेवढे त्या स्वभावदोष-निर्मूलनाचे लिखाण करायच्या आणि त्याविषयीच्या शंका इतरांना विचारायच्या.

७ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून स्थिर राहून साधना चालू ठेवणे

‘पू. आजींना सत्संग मिळावा’, यासाठी त्यांना ‘सनातनचे अन्य कार्यक्रम आणि गुरुपौर्णिमा यांसाठी घेऊन जावे’, असे आम्हाला वाटायचे; पण पू. आजी पूर्वी जुन्या वाड्यात एकत्र कुटुंबात रहायच्या. घरात पूर्वजांच्या त्रासाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे कुटुंबियांमध्ये आपापसांत मतभेद होते. त्याही परिस्थितीत पू. आजी गुरुमाऊलीवर (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर) श्रद्धा ठेवून स्थिर राहून तेथेच साधना करायच्या.

७ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगून प्रत्येक कृती करणे

घरातील कामे आणि स्वयंपाक झाल्यावर पू. आजी दुपारी १२.३० वाजता परात्पर गुरु डॉक्टरांना नैवेद्य दाखवायच्या. त्यांना कधी नैवेद्य दाखवण्यास उशीर झाला, तर त्या गुरुदेवांना सांगायच्या, ‘परम पूज्य, आज मला उशीर झाला. मला क्षमा करा.’ त्या प्रत्येक कृती गुरुमाऊलीला सांगूनच करायच्या. ‘भाव कसा ठेवायचा ?’, हे मला (सौ. मीनल मिलिंद खेर (सून) यांना)) त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

 

८. पू. मंगला खेरआजी यांची गुणवैशिष्ट्ये

८ अ. पू. आजी त्यांची ठरलेली कामे ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या समयमर्यादेत करायच्या.

८ आ. शिकण्याची वृत्ती

पू. आजींचा मुलगा (श्री. मिलिंद खेर) आणि सून (सौ. मीनल मिलिंद खेर) हे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. त्यामुळे त्यांच्या घरी साधक यायचे. पू. आजी साधकांच्या वागण्या-बोलण्यातून शिकून तशी कृती करत असत.

८ इ. पू. आजी घरी आलेल्या साधकांना अल्पाहार किंवा जेवण देत असत.

८ ई. मुलगा आणि सून यांना साधनेत साहाय्य करणे

पू. आजींनी मुलगा आणि सून यांना साधनेसाठी कधी विरोध केला नाही. त्यांना प्रसारासाठी बाहेर जावे लागायचे. तेव्हा पू. आजी ‘घरची कामे करणे’, ही माझी सेवा आणि साधना आहे’, असा भाव ठेवून सर्वकाही न कंटाळता आनंदाने करायच्या. त्या दिवसभर कार्यरत राहूनही कधी थकलेल्या किंवा कंटाळलेल्या दिसायच्या नाहीत.

८ उ. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे

त्यांची प्रतिदिन दुपारची विश्रांती, म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचल्याविना त्यांना चैन पडत नसे. त्या प्रतिदिन सनातनचे ग्रंथही वाचायच्या.

८ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

‘माझी प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) सतत माझ्या समवेत असते. तीच मला शक्ती देते आणि तीच माझ्याकडून सर्व करवून घेते; म्हणून माझ्याकडून सर्व कामे होत आहेत’, असा पू. आजींचा भाव होता आणि त्या तसे अनुभवतही होत्या. त्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक कृती प.पू. गुरुमाऊलीला सांगूनच करायच्या. त्या रात्री झोपतांना प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र अन् दैनिक ‘सनातन प्रभात’ जवळ घेऊन झोपायच्या.

 

९. परात्पर गुरु डॉक्टरांनी पू. आजींना ‘तुमची साधना चांगली चालू आहे’, असे सांगणे

एकदा पू. आजी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्या होत्या. तेव्हा त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. त्या वेळी पू. आजींनी प.पू. गुरुमाऊलीला विचारले, ‘‘मी आणखी काय प्रयत्न करू ?’’ तेव्हा प.पू. गुरुमाऊली त्यांना म्हणाली, ‘‘तुमचे प्रयत्न असेच चालू ठेवा. तुमची साधना चांगली चालू आहे.’’

 

१०. आध्यात्मिक प्रगती

वर्ष २०११ मध्ये पू. आजींची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली आणि १३.९.२०१५ या दिवशी त्या संतपदावर आरूढ झाल्या.’

 

११. ‘पू. आजींची आध्यात्मिक पातळी ६० टक्के होण्यापासून
त्यांचे संतपद घोषित होणे’, या कालावधीत त्यांच्यामध्ये झालेला पालट

११ अ. राग न्यून होणे

‘पू. खेरआजींचा मुलगा श्री. मिलिंद खेर आणि नातू श्री. अनिकेत खेर यांच्याविषयी कुणी काही बोलले, तर पू. आजींना राग यायचा; पण तो व्यक्त होत नसे. ‘या स्वभावदोषामुळे साधनेत स्वतःची हानी होत आहे’, हे पू. आजींच्या लक्षात आले आणि त्यावर त्यांनी मात केली. त्यानंतर ‘आता पू. आजींना राग येत नाही’, असे कुटुंबियांच्या लक्षात आले आहे.

 

१२. डोळ्याच्या शस्त्रकर्माच्या वेळी आणि शस्त्रकर्मानंतर
पू. आजींमधील देव अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव अनुभवायला मिळणे

१२ अ. पू. आजींचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
असल्याने शस्त्रकर्माच्या वेळी त्यांच्या तोंडवळ्यावर कोणताही त्रास किंवा काळजी न दिसणे

वर्ष २०१५ मध्ये पू. आजींच्या डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म करण्याचे ठरले. पू. आजींना शस्त्रकर्म करायला नेले. तेव्हा त्यांचा रक्तदाब सामान्य (Normal) होता. पू. आजींचा गुरुदेवांप्रती भाव असल्याने त्यांच्या तोंडवळ्यावर कोणताही त्रास किंवा काळजी दिसत नव्हती. त्या सारख्या म्हणत होत्या, ‘‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले), तुम्ही माझ्या समवेत आहात. मग मला कसली काळजी ?’’

१२ आ. शस्त्रकर्मानंतर पू. आजींची सेवा करतांना
‘देवाप्रती भाव कसा असायला हवा ?’, हे शिकायला मिळणे

शस्त्रकर्मानंतर घरी आल्यावर पू. आजींची सेवा करत असतांना त्या मला एकेक सूत्र सांगायच्या. ते माझ्या हृदयावर कोरून राहिले आहे. पू. आजी म्हणजे देवाचेच मूर्तीमंत रूप आहेत. या स्थितीतही ‘त्यांचे बोलणे, चालणे, वेळेचे पालन करणे’ आणि ‘देवाप्रती भाव कसा ठेवावा ? देवाचा एकेक गुण कसा आत्मसात करायचा ?’, अशा अनेक गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. त्या जेवायला बसल्यावर देवाला प्रार्थना करायच्या. तेव्हा ‘प्रत्यक्ष भगवंतच समोर आहे आणि त्या त्यालाच प्रार्थना करत आहेत’, असे आम्हाला वाटायचे. संध्याकाळी आमच्या घरातील देव्हाऱ्यावर सूर्यकिरण पडतात. ते पाहून त्यांना पुष्कळ आनंद व्हायचा.

 

१३. पू. आजी संत झाल्यामुळे कुटुंबियांना होत असलेले लाभ

अ. ‘पू. आजींमुळे घराची वास्तू आणि घरातील व्यक्ती यांना चैतन्य मिळत आहे’, असे जाणवते.

आ. त्यांची सेवा करतांना आम्हाला पुष्कळ आनंद मिळतो.

इ. खेर कुटुंबाला तीव्र आध्यात्मिक त्रास आहेत; पण गुरुदेवांच्या कृपेमुळेच पू. आजींच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रसंगातून तरून जात असून त्यासाठी गुरुदेवच आम्हाला शक्ती देत आहेत. त्यामुळे कुटुंबियांचे प्रारब्ध भोगणे सुकर होत आहे.

ई. पू. आजींमुळे आम्हा कुटुंबियांची व्यष्टी आणि समष्टी साधना होत आहे. पू. आजींमुळे त्यांची सर्व मुले आणि नातवंडे, असा सर्व परिवार साधनेत आहे. त्यामुळे साधक, आमचे शेजारी आणि समोरच्या वसाहतीतील लोक, या सर्वांनाच पू. आजींचे कौतुक वाटते.

 

१४. पू. आजींच्या स्थूल देहात झालेले पालट

अ. पू आजींच्या त्वचेची चकाकी वाढली आहे.

आ. त्यांची त्वचा मऊ आणि मुलायम झाली आहे.

इ. त्यांचा तोंडवळा गुलाबी दिसतो.

ई. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूचे काही केस काळे झाले आहेत.

 

१५. पू. आजींमुळे वास्तू आणि परिसर यांमध्ये जाणवलेले पालट

१५ अ. पू. आजींच्या अस्तित्वामुळे घराच्या पायरीजवळ औदुंबराची रोपे आली आहेत.

१५ आ. अंगणातील प्राजक्ताचे झाड नेहमीच बहरलेले असते आणि अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा सडाच पडलेला असतो.

१५ इ. विहिरीचे पाणी खारट न होणे

प्रतिवर्षी मार्च मासात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे पाणी खारट होते आणि जून मासात ते गोड होते; पण या वर्षी मार्च मास संपत आला, तरी विहिरीचे पाणी खारट झाले नाही.

१५ ई. पू. आजींकडे पशू-पक्षी आकर्षित होणे

प्रतिदिन आमच्या दारात बऱ्याच चिमण्या येतात, तसेच भारद्वाज पक्षीही बऱ्याचदा दिसतो. परिसरात कोकिळेचे गायनही चालू असते. शुभ घटना घडायची असेल, तेव्हा गरुड पक्ष्याचे ओरडणे ऐकू येते. आमच्या दारात प्रतिदिन एक गाय येते. तिला दिलेला घास खाऊन ती जाते. पू. आजी गायीशी बोलतात.

१५ उ. पू. आजींजवळ श्रीकृष्णाचे चित्र आहे. ते आता बोलके झाले आहे.

१५ ऊ. त्या जेथे पूजा करायच्या, तेथे ‘ॐ’ उमटला होता.

 

१६. सध्या पू. आजी रुग्णाईत असतांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

१६ अ. नेहमी आनंदी

‘वर्ष २०२० पासून पू. खेरआजी रुणाईत असल्याने अंथरुणाला खिळून आहेत; परंतु त्याविषयी त्यांचे काही गाऱ्हाणे नसते. त्या नेहमी आनंदी असतात.

१६ आ. रुग्णाईत असतांनाही साधकांसाठी नामजप करण्याची सिद्धता असणे

एकदा साधकांनी त्यांना विचारले, ‘‘पू. आजी, काही साधकांना आध्यात्मिक त्रास होत आहे. त्यांच्यासाठी नामजप कराल का ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘या देहाचा उपयोग साधनेसाठीच होऊ दे.’’

१६ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमितपणे वाचन
करणे आणि साधकांची प्रगती झाल्याचे कळल्यावर त्यांचे कौतुक करणे

पू. आजी जेवण झाल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनच्या ग्रंथाची १ – २ पाने नियमितपणे वाचतात. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून कोणा साधकाची आध्यात्मिक प्रगती झाल्याचे कळल्यास पू. आजी आवर्जून त्याविषयी आमच्याशी चर्चा करतात. त्या आम्हाला लगेचच प्रगती झालेल्या साधकाला भ्रमणभाष करायला सांगतात आणि त्याचे कौतुक करतात.’

१६ ई. तोंडवळ्यावर पुष्कळ तेज

‘मी पू. आजींकडे सेवेच्या निमित्ताने जाते. तेव्हा मला त्यांचा सहवास मिळतो. त्यांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ तेज जाणवते.

१६ उ. बालकभाव

बोलतांना त्या काही गमती-जमती सांगतात. तेव्हा त्यांचा बालकभाव जाणवतो.’ – सौ. रोहिणी रमेश ताम्हनकर (धाकटी मुलगी, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), रत्नागिरी

 

१७. पू. आजींवर होत असलेली वाईट शक्तींची आक्रमणे

१७ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई पुन्हा चालू
होण्यासाठी प्रार्थना केल्यावर डोळ्यांनी दिसणे बंद होणे आणि डोळ्यांवरील
वाईट शक्तीचे आवरण काढून आध्यात्मिक उपाय केल्यावर दिसू लागणे

वर्ष २०२० मध्ये कोरोनामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीच्या अंकाची छपाई बंद झाली होती. ती पुन्हा चालू होण्यासाठी पू. आजी नामजप आणि प्रार्थना करत होत्या. एक दिवस सकाळी श्री. मिलिंद खेर (पू. आजींचा मुलगा) पू. आजींच्या समोर बसले, तरी पू. आजींना ते दिसेनात; म्हणून त्यांना नेत्ररोग तज्ञांना दाखवले. त्यांचा चष्मा पालटला, तरी त्यांना दिसेना. तेव्हा ‘पू. आजींवर वाईट शक्तींचे आक्रमण झाले असणार’, असे माझ्या लक्षात आले. नंतर त्यांच्या डोळ्यांवरील आवरण काढून अत्तर आणि कापूर यांचे उपाय करणे वाढवले. त्यानंतर हळूहळू पू. आजींना दिसायला लागले.

१७ आ. सर्व अंग थंड पडणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने हळूहळू बरे वाटणे

२ वर्षांपूर्वी पू. आजी रुग्णाईत झाल्या होत्या. तेव्हा एकदा त्यांचे संपूर्ण अंग थंड पडले होते; म्हणून मी त्यांच्या पायांना आणि डोक्याला अमृतांजन लावले, तरीही त्यांची काही हालचाल होत नव्हती; म्हणून मी वैद्य मंदार भिडे यांना बोलावले. त्यांनी पू. आजींना तपासून सांगितले, ‘‘यांना काही शारिरीक त्रास नाही. तुम्ही सद्गुरु राजेंद्रदादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) यांना उपाय विचारा.’’ सद्गुरु राजेंद्रदादा आम्हाला म्हणाले, ‘‘मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारून नामजप सांगतो.’’ थोड्या वेळाने मला सद्गुरु राजेंद्रदादांचा भ्रमणभाष आला. ते आम्हाला म्हणाले, ‘‘पू. आजींवर पुष्कळ त्रासदायक शक्तीचे आवरण आले होते. ते मी काढले आहे. आता बरे वाटेल.’’ त्यांनी पू. आजींसाठी सांगितलेला नामजप आम्ही केला. नंतर सौ. मंजिरीताईने (सौ. मंजिरी विनायक आगवेकर (पू. आजींची नात (मोठ्या मुलीची मुलगी), आध्यत्मिक पातळी ६३ टक्के) यांनी)) १ घंटा नामजप केला. आम्ही सर्व जण नामजप करत होतो. त्यानंतर हळूहळू पू. आजींना बरे वाटायला लागले. नंतर पू. आजींनीही नामजप केला.

दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतांना पू. (श्रीमती) मंगला खेरआजी

१८. रुग्णाईत असतांना पू. आजींमध्ये जाणवलेले पालट

१८ अ. ऐकू येऊ लागणे

मध्यंतरी पू. आजी रुग्णाईत असतांना त्यांना ऐकू येत नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी मोठ्याने बोलावे लागायचे. आम्ही प्रतिदिन त्यांच्यावरील आवरण काढत होतो. एक दिवस त्यांचा मुलगा (श्री. मिलिंद खेर) पू. आजींना मोठ्याने काहीतरी सांगत होता. तेव्हा त्या त्याला म्हणाल्या, ‘‘हळू बोल. मला ऐकू येते.’’ खरेच त्यांना ऐकू यायला लागले होते. त्यांचा नातू श्री. अनिकेत त्यांच्या जवळ जाऊन हळू आवाजात बोलायचा. ते त्यांना ऐकू यायचे. तेव्हा आमच्या लक्षात आले, ‘पू. आजींना आता ऐकू येत आहे.’

१८ आ. माणसे ओळखता येऊ लागणे

मध्यंतरी त्यांना माणसे ओळखता येत नव्हती. त्यांना विचारावे लागायचे, ‘‘हे कोण आहेत ? ओळखले का ?’’ त्यांना विस्मरण झाले होते. आता त्यांना व्यक्तीचे नाव लक्षात येत नाही; पण ती व्यक्ती आठवते. त्या तिचे सर्व वर्णन करून सांगतात किंवा तिच्या गुणांचे वर्णन करतात.

१८ इ. पू. आजींचे निकामी झालेले अवयव गुरुकृपेने पुन्हा कार्यरत होणे

गुरुचरित्रात वाचले होते, ‘श्री गुरूंच्या कृपेने वाळलेले झाड पुन्हा जिवंत झाले.’ त्याप्रमाणे ‘पू. आजींचे निकामी झालेले अवयव गुरुकृपेने पुन्हा कार्यरत झाले.’ ही श्री गुरूंची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) दिव्य कृपाही आम्हाला अनुभवता आली. आता पू. आजी घरातल्या घरात फिरायला लागल्या आहेत. त्या आता अंघोळ करून देवाची पूजा करू लागल्या आहेत.

गुरुमाऊलीच्या कृपेने पू. आजींमध्ये झालेले हे सर्व पालट आम्हाला पहायला मिळाले.

‘भगवंता, आमची कुलदेवता श्री महालक्ष्मीदेवी आहे. तीच प्रत्यक्ष आमच्याकडे अवतरली असून माझ्याकडून तिची सेवा झाली’, असा भाव ठेवायला तूच मला शिकवलेस. त्यासाठी कोटीशः कृतज्ञता !’

 

१९. पू. आजींकडून शिकायला मिळालेली सूत्रे

अ. ‘माझी मुलगी कु. पूजा एकदा कपडे वाळत घालत होती. तेव्हा पू. आजी तिला म्हणाल्या, ‘‘लहान कपडे मागे वाळत घालावेत आणि मोठे कपडे पुढे घालावेत. कपड्याची दोन्ही टोके जुळवून घ्यायला पाहिजेत. ‘त्यातही भगवंत आहे’, हे जाणले पाहिजे.’’

आ. प्रार्थना करून मगच जेवायला आरंभ करावा. सर्व कृती प्रार्थना करूनच कराव्यात आणि कृती पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करावी.

इ. एकदा मी दुसऱ्याविषयी चालू असलेल्या चर्चेत सहभागी झाले. तेव्हा त्या मला म्हणायच्या, ‘‘व्यक्तीच्या मागून त्याची चर्चा करू नये. त्याचे प्रारब्ध संपते आणि ते क्लेश आपल्याकडे येतात.’’ तेव्हापासून ‘कुणी इतरांच्या माघारी बोलत असेल, तर त्यात सहभागी न होता ‘हो, हो’ करून सोडून द्यायचे’, हे मला जमायला लागले.’

– सौ. वैदेही चिंचळकर (सुनेची भावजय), शिरवळ, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग.

 

२०. पू. आजींना आलेल्या अनुभूती

२० अ. ‘पू. आजींना अंघोळ न घातलेल्या दिवशी त्यांच्याकडे प्रत्यक्ष गंगा आली’, अशी अनुभूती येणे

‘वर्ष २०२१ मध्ये ‘आमच्या घरात आपतत्त्व वाढले आहे’, असे आम्हाला जाणवायचे. घरात लहान बेडक्या पहायला मिळायच्या. पू. आजींच्या जवळ गेल्यावर गारवा जाणवायचा. एक दिवस मला ताप आला होता; म्हणून मी पू. आजींना अंघोळ घातली नाही. दुसऱ्या दिवशी मी त्यांना अंघोळीला नेले. तेव्हा पू. आजी रडत म्हणत होत्या, ‘‘मी आता जाते.’’ तेव्हा मी शेजारील सौ. कीर्ती जोशी यांना बोलावले. त्यांनी पू. आजींना विचारले, ‘‘तू कोण ? कुठे जातेस ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘मी गंगा. मी येथे २ दिवस होते. आता मी जाते.’’ मग मी विचारले, ‘‘तुला काय देऊ ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला हळद-कुंकू दे.’’ मग मी पू. आजींना हळद-कुंकू लावले आणि त्यांच्या डोक्यावर एक फूल वाहिले. तेव्हा आजी शांत झाल्या. तेव्हा आम्हाला कळले, ‘पू. आजींकडे प्रत्यक्ष गंगा आली होती.’

कुणाला बरे नसेल, तर पू. आजी त्यांची आठवण काढतात. नंतर आम्हाला कुणाकडून तरी समजते की, त्या व्यक्तीला बरे नव्हते.

२० आ. भैरीदेवाचा उत्सव असतांना पू. आजींना कुत्र्याच्या रूपात कालभैरवाचे दर्शन होणे

वर्ष २०२२ मध्ये रत्नागिरीत भैरीदेवाचा (कालभैरवदेवाचा) उत्सव होता; म्हणून पू. आजींचा नातू श्री. अनिकेत खेर देवळात पूजेला बसणार होता. आम्ही सर्व सिद्धता केली. माझी मोठी नणंद सौ. माधुरी प्रकाश दीक्षित यांनी दुपारच्या जेवणाची सर्व सिद्धता केली; पण आमच्या एका नातेवाइकाचे निधन झाले. त्यामुळे पूजेला दुसऱ्यांना बसवले. इकडे पू. आजी सारख्या मला सांगत होत्या, ‘‘माझ्या पायाखाली काळा कुत्रा आहे.’’ मग माझ्या लक्षात आले, ‘भैरीदेवाचे वाहन काळा कुत्रा आहे आणि तो आजींना दिसत आहे. पू. आजींना कालभैरवदेव दर्शन देऊन गेला.’

२० इ. श्री शाकंभरीदेवीच्या दर्शनाला गेल्यावर ‘देवीने पू. आजींना मिठीत घेतले आहे’, असे सूक्ष्मातून दिसणे

वर्ष २०२२ मध्ये श्री शाकंभरीदेवीचा उत्सव होता; म्हणून मी आणि माधुरीताई (पू. आजींची मोठी मुलगी) तिची ओटी भरायला गेलो होतो. आम्ही निघतांना पू. आजी आम्हाला म्हणाल्या, ‘‘देवीला माझा नमस्कार सांगा.’’ देवीची ओटी भरल्यावर मी आजींचा निरोप देवीला सांगितला. तेव्हा मी सूक्ष्मातून पू. आजी आणि देवी यांची भेट पाहिली. देवीने पू. आजींना मिठीत घेतले होते. तेव्हा तिथे पुष्कळ चैतन्य जाणवत होते. माधुरीताई मला म्हणाल्या, ‘‘देवीच्या मुखावर किती तेज आले आहे !’’

२० ई. पू. आजींना होत असलेले श्री भगवतीदेवीचे दर्शन !

आमच्या मूळ घरी रत्नागिरी येथे देवी भगवतीचे निशाण येते. देवी भगवती कोल्हापूरहून कोकणात आली. तेव्हा ती खेर-खंडकर यांच्या घरी उतरली होती. अजूनही भगवतीदेवी होळीच्या दिवशी वाजत-गाजत आमच्या घरी येते. पू. आजींना देवी घरी आलेली दिसते. तेव्हा त्या मला सारख्या ‘भगवती, भगवती’, अशा हाका मारतात. देवी त्यांना दर्शन देऊन गेल्यावर त्या मला पुन्हा ‘मीनल’, असे म्हणतात.

२० उ. एकदा देव्हाऱ्यातील दिव्याच्या खाली ‘ॐ’ उमटला होता.

‘भगवंता, गुरुमाऊली, ‘तुम्हीच हे सुचवलेत आणि लिहून घेतलेत’, त्याबद्दल तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. माधुरी प्रकाश दीक्षित, सातारा (मोठी मुलगी, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के (रामनाथी आश्रमातील सौ. मंजिरी विनायक आगवेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्या आई)) आणि सौ. मीनल मिलिंद खेर, रत्नागिरी (सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), रत्नागिरी.

 

पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांची
गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेली अनुभूती

१. प्रेमभाव

‘वर्ष २०२२ मध्ये पू. आजी रुग्णाईत असतांना आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे ‘पू. आजींना सलाईन लावणे आणि इंजेक्शन देणे’, ही सेवा मला मिळाली. पू. आजींचे वागणे लहान मुलाप्रमाणे असे. त्यातून सर्वांना आनंद मिळत असे. त्यांच्यात पुष्कळ प्रेमभाव जाणवतो. त्यांच्या मनात सर्वांप्रती समभाव असतो. मी घरी जातांना ‘निघते’, असे सांगितल्यावर ‘उद्या नक्की ये’, असे त्या मला म्हणायच्या.

२. साधिकेने पू. आजींना साहाय्य केल्यावर
त्यांनी तिच्या हातावरून प्रेमाने हात फिरवत कृतज्ञता व्यक्त करणे

एकदा पू. आजींच्या जवळ घरातील कोणीच नव्हते. तेव्हा देवानेच मला त्यांच्याकडे जाण्याची बुद्धी दिली. आजींना लघुशंकेला जायचे होते. त्या साहाय्यासाठी कोणाची तरी वाट पहात होत्या. मी तेथे गेल्यावर त्यांनी मला ते सांगितले. तेव्हा मी लगेच त्यांना लघवी करण्यासाठी भांडे दिले. तेव्हा त्यांना फार बरे वाटले. त्यांनी माझ्या हातावरून प्रेमाने हात फिरवत कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटून माझा भाव जागृत आला. ‘देव संतांची काळजी कशी घेतो !’, हेही मला अनुभवता आले.

‘भगवंतानेच ही गुरुसेवा करवून घेतली’, त्याबद्दल त्याच्या चरणी कृतज्ञता !’

– सौ. समृद्धी सचिन सनगरे, रत्नागिरी

 

पू. (श्रीमती) मंगला खेर रुग्णाईत असूनही त्यांचा तोंडवळा
प्रसन्न आणि तेजस्वी दिसणे अन् त्यांच्या सहवासात पुष्कळ आनंद होणे

श्री. गोविंद भारद्वाज

‘आमच्या घरी प्रत्येक रविवारी असलेल्या ‘ऑनलाईन साधना सत्संगा’मध्ये मला विषय मांडण्याची सेवा असते. एका रविवारी आमच्या घरी सत्संग घेण्यात अडचण येणार होती. तेव्हा तो सत्संग आमच्या घराजवळच असलेल्या पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांच्या घरी ठरवण्यात आला. मी त्यांच्या घरी सत्संग घेण्यासाठी गेलो. पू. आजी रुग्णाईत असल्याने अनेक दिवसांपासून अंथरुणाला खिळून आहेत, तरीसुद्धा त्यांचा तोंडवळा प्रसन्न आणि तेजस्वी दिसत होता. पू. आजींच्या सहवासात सत्संग घेण्याची सेवा केल्यावर मला पुष्कळ आनंद झाला.’

– श्री. गोविंद शरद भारद्वाज, रत्नागिरी

 

पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांच्या कुटुंबातील
६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेले सदस्य

‘६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेले कुटुंबात असणे, हा पू. आजींमुळेच झालेला एक मोठा चमत्कार आहे ! ’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment