प्रेमभावाने साधकांना साहाय्य करणाऱ्या सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचा आनंदमय संतसन्मान सोहळा !

शांत, स्थिर स्वभावाच्या आणि साधनेची तीव्र तळमळ असल्याने कुटुंबीय अन् नातेवाईक
यांची साधना व्हावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या वर्धा येथील श्रीमती मंदाकिनी विजय डगवार !

परात्पर गुरु डॉ. आठवले

वर्धा येथील श्रीमती मंदाकिनी विजय डगवार वर्ष १९९८ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. साधनेचे महत्त्व लक्षात आल्यावर ‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे ।’, या उक्तीनुसार श्रीमती डगवार यांनी त्यांचे कुटुंबीय, तसेच बहिणी, भाऊ आणि अन्य नातेवाईक यांना साधनेचे महत्त्व सांगितले. नुसती साधना सांगूनच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी या सर्वांना साधना करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केले. आज त्यांचे सर्व नातेवाईक चांगल्या प्रकारे साधना करत असून त्यांची दोन्ही मुले श्री. अमित आणि कु. मयुरी हे रामनाथी आश्रमात राहून पूर्ण वेळ साधना करत आहेत. आरंभी त्यांच्या यजमानांचा, कै. विजय डगवार यांचा साधनेला विरोध होता; पण श्रीमती डगवार यांनी त्यांची सेवा अन् साधना चालूच ठेवली. कौटुंबिक कर्तव्ये आणि सेवा यांची योग्य सांगड घालून त्यांनी प्रेमाने अन् परेच्छेने वागून यजमानांनाही साधनेकडे वळवले. त्यांच्या संपर्कात येणारे नवीन साधक आणि वाचक यांनाही त्या साधना करण्यासाठी प्रोत्साहन देतात.

या सगळ्यांतून श्रीमती डगवार यांची साधनेची तीव्र तळमळ दिसून येते.

श्रीमती डगवार यांच्यात सेवेची पुष्कळ तळमळ असल्याने त्या कोणतीही सेवा परिपूर्ण आणि मन लावून करतात. विदर्भातील तीव्र उन्हाळ्यातही त्या झोकून देऊन आणि भावपूर्ण प्रसारसेवा करायच्या.

जून २०२१ मध्ये त्यांच्या यजमानांचे आकस्मिक निधन झाले. देवावर दृढ श्रद्धा असल्याने पतीच्या निधनानंतरही श्रीमती डगवार अतिशय, शांत, स्थिर आणि देवाच्या अनुसंधानात होत्या. ‘आपला प्रत्येक क्षण साधनेसाठी कसा वापरला
जाईल ?’, याकडे त्यांचे लक्ष होते. जीवनातील सुख-दुःखाकडे समत्व दृष्टीने पहाणे आणि कठीण काळाला स्थिरतेने तोंड देणे, हे त्यांची साधना चांगली चालू असल्याचेच द्योतक आहे.

साधनेची तळमळ, प्रेमभाव, परेच्छेने वागणे आणि सतत कृतज्ञताभावात रहाणे या गुणांमुळे श्रीमती मंदाकिनी डगवार यांनी वर्ष २०१४ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली. त्यानंतर त्यांची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होत राहिली. वर्ष २०२१ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के होती आणि आजच्या शुभदिनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘समष्टी संत’ म्हणून त्या सनातनच्या ११९ व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांची, श्री. अमित आणि कु. मयुरी यांची साधनाही चांगल्या प्रकारे चालू असून त्यांचीही आध्यात्मिक उन्नती होत आहे.

यापुढेही पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांची आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होईल, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (डावीकडे)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार सनातनचे साधक हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांना केवळ बाह्य हिंदु राष्ट्र अपेक्षित नसून साधकांच्या अंतरंगातही रामराज्य स्थापन होणे अपेक्षित आहे. म्हणजेच साधकांमध्ये आंतरिक पालट होऊन त्यांची साधनावृद्धी होणे गुरुदेवांना अपेक्षित आहे. श्रीगुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे तळमळीने प्रयत्न करून अंतरंगात रामराज्य स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वर्धा येथील पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांचे संतत्व उघड करून श्रीरामस्वरूप गुरुदेवांनी श्रीरामनवमीच्या दिवशी साधकांना आनंद दिला.

साधकांची प्रगती व्हावी, यासाठी त्यांना प्रेमाने साधनेत साहाय्य करणाऱ्या, परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणाऱ्या मूळच्या वर्धा येथील; मात्र सध्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात रहाणाऱ्या पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून त्या ‘समष्टी संत’ म्हणून सनातनच्या ११९ व्या संतपदी विराजमान झाल्याची घोषणा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी १० एप्रिल २०२२ या दिवशी केली. अनेक दिवसांपासून याची वाट पहाणाऱ्या साधकांचा आनंद या घोषणेमुळे द्विगुणित झाला. याप्रसंगी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांना पुष्पहार घालून आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पू. (श्रीमती) डगवार यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला, तेव्हा पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांनीही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांवर डोके ठेवून भावपूर्ण नमस्कार केला. साधकांनी हा अनोखा भावसंगम मनोमन अनुभवला.

या सोहळ्याला पू. (श्रीमती) डगवार यांचा मुलगा श्री. अमित आणि कन्या कु. मयुरी हेही उपस्थित होते. सोहळ्याला सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ, एस्.एस्.आर्.एफ.च्या संत पू. (सौ.) शिल्पा कुरतडकर, त्यांचे पती श्री. राजीव कुरतडकर यांची वंदनीय उपस्थिती होती, तसेच सनातनचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकर हेही दूरभाषद्वारे सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या सूक्ष्म-ज्ञान प्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले आणि श्री. राम होनप यांनी केले, तर ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी भावपूर्ण सूत्रसंचालन केले.

 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
यांनी पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

प्रेमभावाने साधकांना समजून घेणाऱ्या आणि तळमळीने प्रयत्न
करून यजमानांना साधनेविषयी सकारात्मक करणाऱ्या पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार !

१. पू. डगवारकाकू या बालिकेप्रमाणे निर्मळ आहे.

२. वर्धा येथे पू. डगवारकाकू यांच्या घरी एखादा साधक आल्यावर त्या प्रथम  ‘तुम्ही जेवलात का ?’, ‘तुम्ही थकला असाल, तर सरबत देऊ का ?’ ‘नामजपादी उपाय पूर्ण झाले आहेत का ?’, आदी विचारपूस करायच्या. त्यानंतरच सेवेविषयी त्याच्याशी बोलत असत. प्रेमभाव असल्याने त्या साधकांना समजून घेऊन साहाय्य करतात, हे पू. काकूंकडून शिकण्यासारखे आहे. आश्रमातीलही लहान-मोठ्या सर्व साधकांशी त्या प्रेमाने बोलतात.

३. वर्ष २०१२ मध्ये पू. काकू रामनाथी आश्रमात प्रथमच आल्यावर त्यांना परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते की, तुमच्यात एवढी तळमळ आहे की, त्यामुळे यजमान (कै. डगवारकाका) चांगले साधक बनतील. प्रत्यक्षातही डगवारकाकांच्या मृत्यूत्तर विधींच्या वेळीही साधकांना ‘एखाद्या उच्च पातळीच्या जिवासाठी विधी चालू आहेत’, अशी अनुभूती आली होती. ‘गुरुदेवच सर्व करणार आहेत’, या काकूंच्या श्रद्धेमुळे देवाने कै. डगवारकाका यांच्यात पालट घडवून आणला होता. गुरुदेवांची सर्वज्ञता, संकल्प आणि पू. काकूंची तळमळ यांमुळे खरेच वर्ष २०१२ मधील गुरूंचे वाक्य सत्यात उतरले. आरंभी साधनेला विरोध करणारे डगवारकाका कालांतराने चांगल्या प्रकारे साधना करू लागले.

 

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांनी व्यक्त केलेले मनोगत !

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आहे !

‘श्रीरामनवमीला गुरुदेवांनी मला ‘संत’ म्हणून घोषित करून आनंद दिला. सर्वकाही गुरुदेवांची कृपा आहे. माझे काही नाही. साधकांनी केलेले साहाय्य आणि संतांचे मार्गदर्शन यांमुळेच हे झाले. देवाने आजपर्यंत मला सांभाळले आहे. पुढेही तोच सांभाळणार आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी मला पुष्कळ प्रेम दिले. आता मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यासारखे बनायचे आहे. मला काही येत नाही; पण जे येते, ते समर्पित करायचे आहे. गुरुदेवच करवून घेणार आहेत. माझ्यात स्वभावदोष-अहं असतांनाही गुरुदेवांनी मला जवळ घेतले. याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता !’

१. अशी झाली घोषणा !….

‘आध्यात्मिक उन्नतांच्या आवाजातील भावार्चना ऐकल्यामुळे मनाला काय जाणवते ?’, हे अभ्यासण्यासाठी केलेल्या संशोधनात्मक प्रयोगासाठी काही साधक एकत्र आले होते. या प्रयोगांतर्गत प्रथम श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आवाजातील प्रभु श्रीरामाच्या जन्माविषयीची भावार्चना साधकांना ऐकवण्यात आली. त्यानंतर एका साधिकेने बालिका बनून श्रीकृष्णाची केलेली भावार्चना ऐकवण्यात आली. भावार्चना संपल्यानंतरही पुढील ५ मिनिटे साधक डोळे मिटून भावावस्था अनुभवत होते.

भावार्चना ऐकतांना आलेल्या अनुभूतींचे कथन साधकांनी केले. श्रीकृष्णाची भावार्चना करतांना ‘स्वतः कृष्णलोकात असल्याचे जाणवणे’, ‘कृष्णभेटीची तीव्र तळमळ अनुभवणे’, ‘संतांची वाणी ऐकत असल्याचे वाटणे’, ‘साधिकेचा आवाज ऐकतांना मध्ये मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आवाज ऐकू येणे’, ‘भावावस्थेतून बाहेर येऊ नये’, आदी अनुभव आणि अनुभूती आल्याचे साधकांनी सांगितले. श्रीकृष्णाची ही आर्त भावार्चना ज्या साधिकेने केली होती, ‘ती साधिका कोण आहे ?’ याचा उलगडा केला. भावार्चना करणारी साधिका म्हणजेच श्रीमती मंदाकिनी डगवार यांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी व्यासपिठावर बोलवले. त्यांच्याशी सहज संवाद साधत त्यांच्यातील साक्षीभाव, प्रेमभाव, अहं अल्प असणे, श्रीकृष्णाविषयीचा आर्त भाव आदी संतत्वाचे पैलू साधकांसमोर उलगडले. श्रीमती मंदाकिनी डगवार यांनी सांगितलेल्या भावार्चनेत ‘लहान बालिका श्रीकृष्णाला तुळशीची माळ अर्पण करायला जाते, तेव्हा तिचा हात पोचत नसल्याने श्रीकृष्णच वाकून ती माळ स्वीकारतो आणि नंतर श्रीकृष्ण ती माळ बालिकेच्याच गळ्यात घालतो’, असे त्यांनी सांगितले. ‘त्या भावार्चनेप्रमाणे आज खरोखरच श्रीकृष्ण काकूंच्या गळ्यात हार घालणार आहे’, असे सांगून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सोहळ्याचे गुपित उगलडले !

२. स्वतःच्या आवाजातील भावार्चना साक्षीभावाने ऐकणाऱ्या पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार !

‘स्वत:च्या आवाजातील भावार्चना ऐकून तुम्हाला काय वाटले ?’ असा प्रश्न श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती डगवारकाकू यांना विचारला. तेव्हा काकू म्हणाल्या, ‘‘आरंभी हा आवाज कुणाचा आहे, हे मला कळलेच नाही. नंतर ‘हा आवाज कुठेतरी ऐकला आहे’, असे वाटले आणि ध्यान लागले. कृष्णाच्या स्मरणात कुठलीही चिंता रहात नाही, केवळ आनंदच होतो. आज त्रयस्थपणे स्वतःच्या आवाजातील भावार्चना ऐकतांना मी आनंद आणि शांती अनुभवली. हे शब्द माझे नाहीत, गुरुदेवांचीच वाणी आहे. त्यामुळे ऐकतांना आनंद होत होता.’’

‘पू. डगवारकाकू स्वत:कडे त्रयस्थपणे म्हणजे साक्षीभावाने बघतात. त्यामुळे स्वतःच्या आवाजातील भावार्चना ऐकतांनाही त्यांचे ध्यान लागले’, असे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले.

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !
अध्यात्मात पुढे पुढे जाण्यासाठी ‘मला प्रयत्न करायचेच आहेत’, अशी तळमळ हवी !

१. दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मध्ये संतांच्या मार्गदर्शनपर चौकटी येतात. त्यानुसार साधकांनी प्रयत्न केल्यास साधकांची प्रगती होऊ शकते. सद्गुरु सत्यवानदादा यांच्या एका मार्गदर्शनात त्यांनी म्हटले होते, ‘एक दिवस जरी साधना झाली नाही, तरी रडू यायला हवे.’ ‘गुरुदेवांचे वैकुंठ असलेल्या आश्रमात साधनेसाठी सर्व प्रकारची अनुकूलता आहे. कशाचीही न्यूनता नाही, तर त्यासाठी मी देवाच्या चरणी किती कृतज्ञ राहू’, असे साधकांना वाटले पाहिजे. कृतज्ञताभावात रहाण्यासाठी प्रयत्न केले, तर साधकांची प्रगती निश्चित होईल.

२. स्वभावदोष आणि अहं निमूर्लन प्रक्रिया राबवतांना साधकांना ताण येतो. प्रक्रिया कठीण वाटते. आपल्यात स्वभावदोष असतात; परंतु त्याचा ताण घ्यायचा नाही. साधक आणि आढावासेवक आपल्याला जाणीव करून देतात, तेव्हा सकारात्मक राहून प्रयत्न करायचे. प्रतिदिन साधनेचे प्रयत्न करायचे. ‘वेळ नाही; म्हणून केले नाही’, असे नको. ‘मला प्रयत्न करायचेच आहेत’, अशी तळमळ हवी.

 

कुटुंबियांनी कथन केलेली पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांची गुणवैशिष्ट्ये !

लहानपणापासून आईने ‘साधनाच आनंद देणार आहे’,
असे शिकवले ! – श्री. अमित डगवार (पू. (श्रीमती) डगवार यांचा मुलगा)

श्री. अमित डगवार

पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मी काही काळ आश्रमात राहिलो होतो. आश्रमातील वातावरण आणि साधकांचा प्रेमभाव पाहून मी प्रभावित झालो. पूर्णवेळ साधना करण्याचा मनातील विचार आईला सांगितला. ती ‘हो’ म्हणाली. आतापर्यंत एकदाही ‘पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय चुकला’, असे मला वाटले नाही. ‘शिक्षण घेतांनाही ते साधनेसाठीच घ्यायचे आहे’, असे मला वाटायचे. ते केवळ आईने दिलेल्या संस्कारांमुळे ! लहानपणापासून आईने ‘साधनाच आनंद देणार आहे’, असे शिकवले. आध्यात्मिक त्रास किंवा साधनेला वडिलांचा पाठिंबा नसणे, अशा परिस्थितीतही गुरुदेव सूक्ष्मातून सतत माझ्या समवेत होते, याची अनुभूती घेता आली. याचे सर्व श्रेय पू. आईला आहे. तिच्यामुळे मी वैकुंठात राहून साधना करू शकत आहे. त्यासाठी तिच्या चरणी कृतज्ञता !

‘हिंदु राष्ट्रासाठी संत व्हायचे आहे’, या ध्येयाने प्रयत्न
करून आईने संतपद प्राप्त केले ! – कु. मयुरी डगवार (पू. (श्रीमती) डगवार यांची कन्या)

कु. मयुरी डगवार

‘दोन दिवसांपासून मला होणारा आध्यात्मिक त्रास वाढला होता. ‘त्रास कशामुळे होत आहे’, ते हे लक्षात येत नव्हते; पण त्रासाच्या स्थितीत आनंदही होत होता. अशी संमिश्र स्थिती का होती ? त्याचे उत्तर आज देवाने दिले. आई काही मासांपूर्वी आश्रमात आली, तेव्हा काही साधक ‘आई संत आहे का ?’, असे मला विचारत असत, तर काही साधक ‘आई संतच आहे, केवळ घोषणा व्हायची आहे’, असे म्हणत. यावरून ‘आईतील संतत्व समष्टीच्याही लक्षात येऊ लागले होते’, हे दिसून येते.

आम्ही सर्व साधना करू लागल्यानंतर सनातनचे परात्पर गुरु कालिदास देशपांडेकाका आईला म्हणाले होते, ‘‘तुम्हाला संतच व्हायचे आहे; म्हणजे तुमच्या साधनेला कुठल्याही प्रकारचा विरोध होणार नाही.’’ तेव्हा आईने संत होण्याचे ध्येय घेतले. ‘मला हिंदु राष्ट्रासाठी संत व्हायचे आहे’, असे आई नेहमी सांगत असे. आज श्रीरामनवमीच्या दिवशीच तिला हा आनंद मिळाला. ‘रामराज्यासम असलेले हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठीच देवाने आईला संत बनवले’, असे मला वाटते. आई प्रत्येक क्षणी आनंदी असते. ती स्वतः सतत साधनारत रहाते आणि इतरांनाही साधनेत ठेवते.’

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक 

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

Leave a Comment