मुलुंड, मुंबई येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे साधक मंदार गाडगीळ यांचा ‘एल्.टी.आय.’ आस्थापनाकडून ‘स्पार्टन’ (‘योद्धा’) ही उपाधी देऊन गौरव !

श्री. मंदार गाडगीळ

फोंडा (गोवा) – ‘एल्.टी.आय.’ (लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक) या आस्थापनाकडून घेण्यात आलेल्या ‘एक्स् स्केल’ या उपक्रमामध्ये सनातनचे मुंबई येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. मंदार माधव गाडगीळ यांना ‘स्पार्टन’ (‘योद्धा’) ही उपाधी असलेले प्रशस्तीपत्रक आणि चषक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. श्री. मंदार गाडगीळ हे ‘एल् अँड टी. (लार्सन अँड टुब्रो) इन्फोटेक’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनामध्ये ‘महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर)’ या पदावर चाकरीला आहेत.

श्री. मंदार गाडगीळ यांना पारितोषिक देतांना ‘एल्.टी.आय.’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नचिकेत देशपांडे

‘एल्.टी.आय.’ या आस्थापनाने व्यवस्थापकीय कर्मचार्‍यांसाठी ‘एक्स् स्केल’ हा उपक्रम सप्टेंबर २०२१ मध्ये चालू केला होता. या उपक्रमासाठी पूर्ण आस्थापनातील १९ जणांची निवड करण्यात आली होती. या उपक्रमाद्वारे आस्थापनातील विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी देण्यात येऊन त्यांतील कामगिरीचा आढावा कंपनीचे मुख्य आणि इतर अधिकारी घेतात. ‘विविध क्षेत्रांतील ग्राहकांच्या मागण्यांना समर्थपणे तोंड देता येते का ?’, हे यामध्ये पाहिले जाते. या उपक्रमातील कामगिरीचा आढावा घेऊन त्यात उत्तीर्ण झाल्यावर आस्थापनाकडून ‘स्पार्टन’ (‘योद्धा’) ही उपाधी असलेले प्रशस्तीपत्रक आणि चषक देण्यात येतो.

श्री. मंदार गाडगीळ यांना जानेवारी २०२२ मध्ये ‘एल्.टी.आय.’ आस्थापनाने ‘तुम्ही करत असलेले काम कौतुकास्पद आहे आणि तुमच्या प्रयत्नांमुळे आस्थापनाचा व्यवसाय जलद गतीने वाढत आहे’, अशा आशयाचे ‘प्रशंसापत्र’ही दिले होते.

 

श्री. मंदार गाडगीळ करत असलेली साधना

श्री. मंदार गाडगीळ हे सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात, तसेच ते सनातन संस्थेच्या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाची सेवा करतात. या अंतर्गत भाषांतर करणे, इंग्रजी लेखांचे संकलन करणे, भाषांतर पडताळणे आणि सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या इंग्रजी भाषेच्या ग्रंथातील लिखाणावर आधारित लेख सिद्ध करून ते संकेतस्थळावर ‘अपलोड’ करणे अशा विविध सेवा ते करतात.

 

श्री. मंदार गाडगीळ यांचे आध्यात्मिक कुटुंब

श्री. मंदार गाडगीळ हे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. माधव गाडगीळ यांचे धाकटे चिरंजीव आहेत. श्री. मंदार यांच्या आई सौ. माधुरी गाडगीळ यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के आहे, तर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे ते लहान बंधू आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे ते दीर आहेत. त्यांची बडोदा, गुजरात येथे रहाणारी मोठी बहीण सौ. मनीषा सुशील गोडबोले याही सनातनच्या क्रियाशील साधिका आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment