परेच्छेने आणि निरपेक्षभावाने जीवन जगून सर्वांसमोर त्यागाचा आदर्श ठेवणार्‍या फोंडा, गोवा येथील सनातनच्या ११७ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) !

अनुक्रमणिका

पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ

 

१. धार्मिक वृत्ती

१ अ. देवपूजा आणि व्रतवैकल्ये भावपूर्ण अन् तन्मयतेने करणे

‘आईंची (पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ यांची) धार्मिक वृत्ती असल्याने त्या नित्यनेमाने भावपूर्ण आणि तन्मयतेने देवपूजा करतात अन् सोवळे-ओवळेही पाळतात. त्या कितीही रुग्णाईत असल्या, तरीही त्यांनी आतापर्यंत देवपूजा करण्याचा नेम सोडला नाही. त्या व्रतवैकल्येही भावपूर्ण करतात.

१ आ. स्वतःच्या घरातील, तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांच्या घरातील कुलाचार मनापासून करणे

आमच्या घरी परंपरेनुसार वर्षभर कुलाचार, सण आणि उत्सव साजरे केले जातात. आमच्या कुटुंबातील प्रत्येक परिवाराला एक वर्ष अशी ४ वर्षे वाटून दिली आहेत. त्यासाठी या वर्षीचे महालय श्राद्ध ते पुढच्या वर्षी येणार्‍या गणेशोत्सवापर्यंत एक वर्षाचा कालावधी ठरवला जातो. आई यथायोग्य पद्धतीने कुलाचार करायच्या. परिवारातील अन्य सदस्यांच्या वाट्याला आलेल्या वर्षीही त्या त्यांच्या विधींत सहभागी होऊन मन लावून तळमळीने कुलाचार करायच्या. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना त्या जवळच्या वाटतात.

 

२. मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना आधार देणे

आईंनी आमच्यावर (मी आणि माझी बहीण सौ. अनुजा सिद्धार्थ नार्वेकर यांच्यावर) चांगले संस्कार केले. त्यांचा त्याग पाहून मी स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करत असे. त्यांच्या आचरणातून मला ‘योग्य-अयोग्य’ गोष्टींची जाणीव होत असे. त्यांनी माझा अभ्यास घेतला, मला शिस्त लावली आणि माझ्यावर पुष्कळ प्रेमही केले. वेळप्रसंगी त्या आमच्या मैत्रीण व्हायच्या, आम्हाला प्रोत्साहन द्यायच्या आणि काही प्रतिकूल प्रसंगी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असायच्या.

 

३. प्रेमभाव

३ अ. घरी आलेल्या सर्वांचे उत्तम आदरातिथ्य करणे, सर्वांशी प्रेमाने आणि समभावाने वागणे

माझे वडील सरकारी आधुनिक वैद्य होते. त्यांना भेटायला त्यांचे मित्र आणि समाजातील अनेक लोक घरी यायचे, तसेच आईंच्या माहेरचे आणि सासरचे बरेच नातेवाईकही यायचे. पूर्वीच्या काळी दूरभाष किंवा भ्रमणभाष नसल्याने ते पूर्वकल्पना न देता घरी यायचे. ते कोणत्याही वेळी आले, तरीही त्यांना जेवायला वाढणे, वेळप्रसंगी पुन्हा स्वयंपाक करून वाढणे, त्यांचा यथायोग्य पाहुणचार अत्यंत प्रेमाने करणे, असे करून ते संतुष्ट झाल्यावर आई जेवत असत. आमचे घर सर्वांसाठी हक्काचे होते. आमच्याकडे आमची बागायत सांभाळणारे लोक, तसेच काही कामगार येत असत. ते कोणत्याही वेळी आले, तरीही आई त्यांना प्रेमाने चहा-खाऊ देऊन, त्यांना जेवायला वाढून आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांना संतुष्ट करायच्या. त्या सर्वांशी समभावाने वागायच्या. ते सर्व जण अजूनही आईंची आठवण काढतात.

३ आ. गृहकृत्य साहाय्यक मुलींचा सांभाळ स्वतःच्या मुलीप्रमाणे करणे

आमच्याकडे माझ्या बालपणापासून आईला घरकामात साहाय्य करण्यासाठी एक मुलगी (गृहकृत्य साहाय्यक) होती. काही वर्षांनी तिचा विवाह झाल्यावर दुसरी मुलगी साहाय्यासाठी यायची. आईंनी या गृहकृत्य साहाय्यक मुलीचे पालनपोषण स्वतःच्या मुलीप्रमाणे केले. त्यांचा विवाह झाल्यावरही त्या अनेक वर्षे आईंना भेटायला यायच्या.

३ इ. स्थलांतर झाल्यावर नवीन शेजार्‍यांशी जवळीक साधणे

माझ्या वडिलांचे प्रत्येक ३ – ४ वर्षांनी स्थलांतर व्हायचे. एकदा त्यांचे एका वर्षात दोन वेळा स्थलांतर झाले. आईंनी ही परिस्थिती आनंदाने स्वीकारली. त्या ज्या ठिकाणी गेल्या, तेथील शेजार्‍यांना त्यांनी प्रेम दिले. आईंनी त्यांना आपलेसे करून शेजारधर्माचे उत्तम पालन केले. हे सर्व करतांना त्यांच्यात ‘मी एका डॉक्टरची पत्नी आहे’, असा अहंचा लवलेशही नसायचा. आई सर्व शेजार्‍यांना प्रिय असायच्या. आम्ही दुसरीकडे रहायला जातांना आमचे काही शेजारी रडायचे.

३ ई. सासर आणि माहेर यांच्याकडील नातेवाईक जोडून ठेवणे

आमच्या आत्या अधून-मधून आमच्याकडे रहायला यायच्या. माझी चुलतबहीण आणि आतेबहीण काही वर्षे आमच्याकडे शिक्षणासाठी रहात होत्या. आईंनी त्यांच्यावरही स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. त्यांचा विवाह झाल्यावरही त्यांचे आईंशी अत्यंत जवळचे संबंध होते. आईंतील प्रेमभावामुळे त्यांच्या सासरचे आणि माहेरचे नातेवाईकही आमच्याशी जोडले गेले आहेत.

३ उ. साधक भेटल्यावर कृतज्ञता वाटून आनंद होणे

आईंच्या वैद्यकीय तपासणीसाठी किंवा अन्य सेवांच्या निमित्ताने साधक घरी आले की, आईंना आनंद होतो. तेव्हा त्यांना साधकांप्रती कृतज्ञता आणि साधकांच्या वागणुकीचे फार कौतुक वाटते. त्यांची ‘साधकांसाठी किती करू ?’, अशी तळमळ असते. काही दिवसांपूर्वी त्यांनी आश्रमातील त्यांच्या ओळखीच्या साधकांसाठी इडली-भाजी आणि अन्य पदार्थ करून पाठवले होते. मधे-मधे त्या साधकांसाठी असे पदार्थ करून पाठवत असतात.

 

४. परेच्छेने वागून निरपेक्ष आणि त्यागी जीवन जगणे

आईंची रहाणी अत्यंत साधी आहे. माझ्या वडिलांचे सहकारी असलेले सरकारी आधुनिक वैद्य सुटी घेऊन त्यांच्या कुटुंबियांच्या समवेत बाहेरगावी किंवा अन्य राज्यांत फिरायला जात असत; मात्र आईंना अशी इच्छा कधीच झाली नाही. त्यांच्या वागण्यातून परिस्थितीत समाधान मानून सतत परेच्छेने आणि निरपेक्ष जीवन जगण्याचा अन् त्यागाचा आदर्श आम्हाला पहायला मिळाला.

 

५. स्वीकारण्याची वृत्ती

५ अ. सावईवेरे येथील मूळ घरी रहायला गेल्यावर तेथे सुविधांचा अभाव असूनही निरपेक्षपणे रहाणे

वडील सेवानिवृत्त झाल्यावर आम्हाला सरकारी घर सोडून आमच्या गोव्यातील सावईवेरे येथील मूळ घरी रहायला जावे लागले. त्या ठिकाणी आम्हाला रहायला व्यवस्थित खोली नव्हती आणि सामान ठेवायला जागाही नव्हती, तसेच तेथे स्वयंपाकघरही नव्हते. आमच्या खोलीत अनेक वर्षांपासून कुटुंबातील एक वयस्कर आजी रहात होत्या. अनुमाने एक वर्ष आम्हाला आम्ही नेलेले आमचे बांधून नेलेले साहित्य बाहेर काढता आले नव्हते. आई त्याही परिस्थितीत स्थिर राहिल्या आणि निरपेक्षपणे प्रसंगाला सामोरे गेल्या.

५ आ. मुलगा आणि सून यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ
साधना करण्याचे ठरवल्यावर त्यांना पाठिंबा देणे अन् त्यांच्याकडून अपेक्षा नसणे

आम्ही (मी आणि माझी पत्नी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवल्यावर आईंना स्वाभाविकपणे आमच्या भविष्याची काळजी वाटली; पण त्यांचा आम्हाला विरोध नव्हता. त्यांना आमच्याकडून कसलीच अपेक्षा नव्हती आणि अजूनही आम्ही घरी गेल्यावर त्यांची आमच्याकडून कसलीच अपेक्षा नसते. आई ८३ वर्षांच्या आहेत. त्या वयोमानानुसार रुग्णाईत असतात, तरीही ‘सुनेने (‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी) घरी राहून माझी सेवा करावी’, अशी त्यांची अपेक्षा नसते.

५ इ. मुलगा साडेसतरा वर्षे उत्तर भारतात सेवारत असतांना त्याच्याकडूनही कसलीच अपेक्षा न करणे

मी धर्मप्रसाराच्या निमित्ताने साडेसतरा वर्षे उत्तर भारतात आहे. मी तिकडे जातांना मला त्यांचा विरोध नव्हता. आरंभीचा काही काळ सोडला, तर मी वर्षातून एकदा घरी येत असे. तेव्हा त्यांना आनंद व्हायचा. मी परत जातांना त्यांना थोडे वाईट वाटायचे; पण त्या स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवत असत. ‘मी पुन्हा घरी यावे’, असाही हट्ट त्यांनी कधी केला नाही. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आईंकडून या माध्यमातून मनाचा मोठा त्याग करवून घेतला.

५ ई. नातू पूर्णवेळ साधना करत असतांना त्याच्यातील गुण पाहून त्याचे कौतुक करणे

सोहम् ने पूर्णवेळ साधना करायचा निर्णय घेतल्यावर आरंभी आईंना त्याच्या भवितव्याची काळजी वाटली होती; पण काही दिवसांनी त्यांनी ते स्वीकारले. आता सोहम् वर साधनेमुळे झालेले संस्कार, तो सर्वांना देत असलेले प्रेम आणि त्याच्यातील साधकत्व पाहून त्या म्हणतात, ‘‘सोहम् सारखा गुणी मुलगा नाही.’’

५ उ. गंभीर रुग्णाईत स्थितीतही परिस्थिती आनंदाने स्वीकारून कार्यरत असणे

आईंना अनेक गंभीर स्वरूपाच्या आजारांना सामोरे जावे लागले. एकदा चिनीमातीच्या मोठ्या बरण्या फुटून आईंच्या हाताच्या बोटांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. एकदा उकळते पाणी त्यांच्यावर पडून त्यांचा कमरेखालचा बराचसा भाग भाजला होता. त्यांनी अनेक वर्षे ‘ॲपेंडिक्स’चा (आंत्रपुच्छाचा) त्रास सहन केला. नंतर त्यांचे शस्त्रकर्म झाले. त्यांना पाठीच्या मणक्यांचा (स्पायनल कॉर्ड) त्रास झाल्याने त्यांना पायांत संवेदना जाणवत नव्हत्या. त्यामुळे पुणे येथे त्यांच्या मणक्याचे मोठे शस्त्रकर्म करण्यात आले. त्यांचे दोन्ही गुडघे झिजल्याने त्यांना चालणेही कठीण झाले होते. त्यांचे उतारवयात ‘नी (गुडघे) ट्रान्स्प्लांन्ट’चे शस्त्रकर्म झाले. त्यांना अन्य व्याधीही आहेत. याविषयी त्यांचे कसलेच गार्‍हाणे नाही. त्यांनी देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून सर्व सहन केले. अशा स्थितीतही त्यांनी घरातील दायित्व पार पाडले. ‘परिस्थिती आनंदाने स्वीकारून सतत कार्यरत रहाणे’, हा त्यांचा गुण आहे.

 

६. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे

आई नियमितपणे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतात. त्यातील साधकांच्या येणार्‍या लिखाणाविषयी त्यांना प्रश्न असल्यास त्या जिज्ञासेने विचारतात.

 

७. गुरुतत्त्वाने आईंना अनुसंधानात ठेवणे

माझ्या वडिलांच्या निधनानंतर आई आमच्या समवेत फोंडा येथे रहायला आल्या. आई प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राशी सूक्ष्मातून बोलायच्या आणि त्यांना मनातील सांगायच्या. त्यातून त्यांना आनंद मिळायचा. आईंचा प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रती भाव वाढला. गुरुतत्त्वाने या माध्यमातून आईंना अनुसंधानात ठेवले.

 

८. वर्ष २०१५ मध्ये आध्यात्मिक पातळी ६१ टक्के

वर्ष २०१५ मध्ये आईंची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित होऊन त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘त्यांचा फार मोठा त्याग आहे आणि त्यागामुळेच त्यांची प्रगती झाली.’’

 

९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव आणि श्रद्धा

९ अ. ‘परात्पर गुरु डॉक्टर देवच आहेत’, असे वाटणे

त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित झाल्यानंतर त्यांच्यात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव निर्माण होऊ लागला. त्या परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना आणि आत्मनिवेदन करतात. एकदा त्यांनी आर्ततेने प्रार्थना केल्यावर परात्पर गुरु डॉक्टर त्यांना सूक्ष्मातून ‘माझे सर्वत्र लक्ष आहे. काही काळजी करू नका’, असे म्हणाल्याचे जाणवले. त्यानंतर आई मला म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे कोण ?’, हे मला आता समजले आहे.’’ ‘परात्पर गुरु डॉक्टर देवच आहेत’, असे त्यांना सांगायचे होते’, असे मला वाटले. तेव्हा मी कृतज्ञता व्यक्त केली.

९ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘सर्व सामर्थ्यवान आहेत’, याची जाणीव होणे

अलीकडेच एका कठीण प्रसंगानंतर आईंनी देव्हार्‍यातील परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला आत्मनिवेदन केले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांच्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल झाल्याचे त्यांना जाणवले आणि त्यांचा भाव जागृत झाला. ‘त्यांना काहीतरी गवसले आहे’, असे समजून त्या मला त्याविषयी उत्साहाने आणि आनंदाने सांगत होत्या. ‘प.पू भक्तराज महाराज यांनी अलगदपणे आईंना परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी ठेवले आहे आणि त्याचा आनंद आईंना अनुभवता येत आहे’, असे मला वाटते. आता त्यांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती श्रद्धा निर्माण झाली आहे. आई सांगतात, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर सामर्थ्यवान आहेत.’’

 

१०. आईंमध्ये जाणवलेले पालट

अ. आईंचे पांढरे केस आता काही प्रमाणात काळे झाले आहेत.

आ. त्यांचा तोंडवळा तेजस्वी दिसतो. त्यांचा तोंडवळा लहान मुलांसारखा आणि निर्मळ वाटतो.

इ. त्या सतत आनंदी आणि उत्साही असतात.

ई. त्यांची त्वचा थंड आणि लहान बाळाप्रमाणे मऊ लागते.

उ. त्या स्थिर असतात.

‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने आईंची प्रगती चांगली चालू आहे’, असे आम्हाला जाणवते.

 

११. कृतज्ञता आणि प्रार्थना !

आम्हाला गुरुकृपेने स्वतःच्या आचरणातून साधनेसाठी पूरक संस्कार करणारी आई लाभली, त्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. ‘आईची पुढील आध्यात्मिक प्रगती जलद गतीने व्हावी’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना आहे.’

– (पू.) श्री. नीलेश सिंगबाळ (मुलगा)

Leave a Comment