नैसर्गिक शेतीविषयीच्या तळमळीतून गोशाळा उभारणारे श्री. राहुल रासने

नैसर्गिक शेतीविषयीच्या तळमळीतून पुणे शहरात गोशाळा उभारणारे बांधकाम व्यावसायिक श्री. राहुल रासने

श्री. राहुल रासने

 

१. जिवामृताचा वापर करून घरच्या घरी भाजीपाला पिकवणे

साधारण ५ वर्षांपूर्वी आदरणीय पद्मश्री सुभाष पाळेकर गुरुजी यांचे कोंढवा, पुणे येथे ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीतंत्र’ या विषयावर शिबिर होते. या शिबिराला मी गेलो होतो. आधीपासूनच निसर्ग आणि प्रदूषणमुक्त वातावरण यांसाठी काहीतरी करावे, अशी मला तळमळ होती. गुरुजींच्या शिबिरानंतर मी अक्षरशः भारावून गेलो. यापूर्वी मी घरातील ओला कचरा घरीच कुंड्यांमध्ये जिरवत होतो; पण गुरुजींच्या शिबिरानंतर मी जीवामृत आणि घन जीवामृत वापरण्यास आरंभ केला. पुष्कळ छान भाजीपाला आणि फळे मिळू लागली. मला बाल्कनीची जागा अल्प पडू लागली. मग मी खिडकीच्या ग्रीलमध्येसुद्धा भाज्या लावणे चालू केले.

 

२. शहरात जीवामृत बनवण्यासाठी गोमय
आणि गोमूत्र मिळावे, यासाठी गोशाळेची स्थापना करणे

त्या वेळी शहरामध्ये गोमय (देशी गायीचे शेण) आणि गोमूत्र मिळणे अवघड जात होते. पुष्कळ प्रयत्न करून पुण्याबाहेरून शेण, गोमूत्र किंवा जीवामृत मागवावे लागत असे. यावर काहीतरी उपाययोजना करायला हवी, असे नेहमी मनात येत होते. माझे एक मित्र श्री. तुषार बाळासाहेब झाड यांची पुण्यातील स्वारगेट भागात लक्ष्मीनारायण थिएटरच्या मागे एक जागा आहे. एक दिवस मी त्यांच्या वडिलांना, म्हणजे श्री. बाळासाहेब झाड यांना त्या जागेत गाय ठेवण्याविषयी विचारले. तेव्हा त्यांनी आनंदाने गाय ठेवण्यास अनुमती दिली. आम्ही लगेच एक गाय घेऊन आलो. काही दिवसांनी तिचा सांभाळ करण्यासाठी एक माणूस ठेवला. नंतर आम्ही अजून काही गायी आणल्या आणि आमची गोशाळा चालू झाली.

 

३. शहरातील लोकांना विषमुक्त भाजीपाला मिळावा,
या उद्देशाने छतशेतीविषयी शिबिरांचे आयोजन करणे

काही दिवसांनी आम्ही गोशाळेतच छतशेती या विषयावर पहिले शिबिर ठेवले. श्रीमती ज्योतीताई शहा यांनी यात मार्गदर्शन केले. त्या वेळी २०० लोकांची उपस्थिती लाभली. पहिल्याच शिबिराला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आम्ही अजून एक शिबिर घ्यायचे ठरवले. यासाठी ८०० लोकांनी नावनोंदणी केली. २०.१०.२०१९ या दिवशी झालेल्या या शिबिरानंतर लोक घरच्याघरी छतशेती करू लागले आणि आमच्या गोकुळ गोशाळेतून नियमितपणे शेण, गोमूत्र, जीवामृत आणि घनजीवामृत घेऊन जाऊ लागले. शहरामध्ये या गोष्टी आपण उपलब्ध करून देऊ शकतो, याचा आम्हाला पुष्कळ आनंद होत होता. दर शनिवारी आम्ही गोशाळेमध्ये श्रमदानही घेऊ लागलो. गोशाळा चालवतांना ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती परिवारा’चे सहकार्य आणि प्रेम मिळत आहे. हे शेतीतंत्र लवकरात लवकर सर्वांना कळो आणि सर्व शहरांतील नागरिकांकडून छतशेती घडून सर्वांना विषमुक्त अन्न मिळो ही प्रार्थना !

– श्री. राहुल रासने, गोकुळ गोशाळा, पुणे (८.११.२०२१)

(संपर्क क्रमांक : 9371011109)

Leave a Comment