गीता जयंतीनिमित्त हरियाणा सरकारच्या वतीने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

फरिदाबाद (हरियाणा) – गीता जयंतीच्या निमित्ताने हरियाणा सरकारच्या वतीने १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत येथील ‘एच्.एस्.व्ही.पी. कन्व्हेंशन सभागृहा’मध्ये ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये भगवद्गीतेवर आधारित व्याख्यान आयोजित केले होते. त्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘भगवद्गीता’ या विषयावर सनातनच्या साधिका सौ. संदीप कौर मुंजाल यांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचा २०० हून  अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. या वेळी हरियाणा सरकारच्या वतीने सनातन संस्थेला भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

सौ. संदीप कौर मुंजाल

केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुज्जर यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट

गीता जयंतीच्या निमित्ताने आयोजित आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुज्जर यांनी तिलपतचे भाजप आमदार राजेश नागर आणि भाजपचे फरिदाबाद जिल्हाध्यक्ष गोपाल शर्मा यांच्या समवेत भेट दिली अन् संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे

१. ग्रंथ प्रदर्शनाच्या ठिकाणी सनातनचे आचारधर्माविषयी फ्लेक्स लावण्यात आले होते. ते पाहून एका सामाजिक संस्थेचा कार्यकर्ता म्हणाला की, तुम्ही लावलेल्या या फ्लेक्सप्रमाणे लोकांनी आचरण करणे आवश्यक आहे.

२. ‘इस्कॉन’च्या (‘आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघा’च्या) एका साधिकेने वर्ष २०१९ मध्ये सनातननिर्मित भगवान श्रीकृष्णाचे मोठे चित्र फ्रेमसह खरेदी केले होते. त्या साधिकेने या वेळी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली असता त्यांनी सांगितले, ‘मी हे भगवान श्रीकृष्णाचे चित्र घरी लावले. त्यानंतर ते पाहिल्यावर श्रीकृष्णाचे चित्र सजीव झाले असून ते श्वास घेत आहे, तसेच त्याचे सुदर्शनचक्र फिरत आहे’, असे वाटते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment