सर्वांवर अपार प्रीती करणार्‍या सोलापूर येथील सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकरआजी (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग !

सोलापूर – गुरूंच्या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या, सर्वांवर अपार प्रीती करणार्‍या, तसेच सतत आनंदावस्था अनुभवणार्‍या सोलापूर येथील सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकरआजी (वय ८४ वर्षे) यांनी २२ नोव्हेंबरला सकाळी ९.४८ वाजता त्यांच्या घरी देहत्याग केला.

२१ फेब्रुवारी २०१७ या दिवशी त्या संतपदी विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात् १ मुलगा, ३ सुना, १ मुलगी, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे.

या प्रसंगी सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांच्यासह अन्य साधकांनीही पू. आजींच्या पार्थिवाचे भावपूर्ण दर्शन घेतले. पू. आजींच्या पार्थिवावर २२ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा मुलगा आणि सनातनचे साधक श्री. राजेश मंगळवेढेकर यांनी अंत्यसंस्कार केले.

 

आनंदाने सेवा करणार्‍या पू. मंगळवेढेकरआजी !

पू. आजींचे यजमान कै. नारायण मंगळवेढेकर यांच्यासह पू. आजींनी वर्ष २००० पासून साधनेला प्रारंभ केला. (कै.) नारायण मंगळवेढेकर दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, वर्गणीदार करणे, ग्रंथ वितरण करणे, सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, सत्संगांचे आयोजन करणे, अशा विविध सेवा करत होते.

(कै.) नारायण मंगळवेढेकर आणि पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकरआजी यांनी २० वर्षांपूर्वी सनातन संस्थेला त्यांची सदनिका वापरण्यासाठी दिली होती. तेथे जिल्ह्यातील अनेक साधक सेवेसाठी येत होते. तेथे येणार्‍या प्रत्येक साधकाची पू. आजी अत्यंत प्रेमाने विचारपूस करत असत, तसेच त्यांना अल्पाहार, चहा देणे अशा विविध सेवा पू. आजी आनंदाने करत असत. पू. आजी समष्टी सेवेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी नामजप आणि प्रार्थनाही करत होत्या.

 

दु:खद प्रसंगांनाही स्थिर राहून सामोर्‍या गेलेल्या पू. (श्रीमती) मंगळवेढेकरआजी !

काही वर्षांपूर्वी पू. आजींच्या एका मुलाचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांत पती नारायण मंगळवेढेकर यांचे निधन झाले. पुढे त्यांच्या दुसर्‍या मुलाचेही निधन झाले. कुटुंबियांच्या निधनाचे इतके आघात होऊनही पू. आजी अत्यंत स्थिर होत्या. त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा होती. पू. आजी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अखंड स्मरण करत असत आणि त्यांना आत्मनिवेदन करत असत.

 

पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकरआजींच्या अंत्यदर्शनाच्या
वेळी पू. (कु.) दीपाली मतकर यांना आलेल्या अनुभूती आणि अनुभव

पू. (कु.) दीपाली मतकर

१. पू. मंगळवेढेकरआजींच्या देहत्यागानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता ‘पू. आजींच्या देहातून वातावरणात पुष्कळ तेज प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले. त्यांची संपूर्ण खोली दिव्य तेजाने भारित झाली होती. खोलीत पुष्कळ गारवा जाणवत होता.

२. पू. आजींचा देह पुष्कळ तेजस्वी आणि पिवळा झाला होता. त्यांच्या देहाचा स्पर्श लोण्यासारखा मऊ जाणवत होता. त्यांना साडी नेसवल्यानंतर त्यांच्या देहातील तेज अधिकच वाढले, तसेच वातावरणातील गारवाही वाढला.

३. पू. आजींनी देहत्याग केलेल्या खोलीत मंद सुंगध येत होता.

४. पू. आजींना भेटण्यासाठी गेल्यावर त्या नेहमी कुशीत घेऊन डोक्यावरून पुष्कळ प्रेमाने हात फिरवत. आज पू. आजींनी देहत्याग केलेला असला, तरी ‘त्या सूक्ष्मातून सर्व साधकांवर त्यांच्या प्रीतीचा वर्षाव करत आहेत’, असे जाणवले. ‘त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला भेटून त्यांना आनंद होत आहे आणि त्यांच्या देहाची हालचाल होत आहे’,  असे जाणवत होते.

५. पू. आजी मागील २ वर्षे झोपून होत्या. घरामध्ये त्यांना सतत दृष्टीस पडेल, अशा पद्धतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहून त्या अखंड आत्मनिवेदन करत असत. आत्मनिवेदन करतांना त्यांच्या तोंडवळ्यावर वेगळाच आनंद जाणवायचा. देहत्यागानंतरच्या त्यांच्या तोंडवळ्यावरील आनंद पाहून ‘त्या आताही गुरुदेवांना आत्मनिवेदन करत आहेत’, असेच जाणवत होते.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या प्रसादाचे खोके पू. आजींनी अजूनही जपून ठेवले आहे.

७. दोन दिवसांपूर्वी पू. आजींची सेवाशुश्रूषा करणार्‍या साधिकेला त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या देहातील चैतन्य आता संपत आले आहे, मी आता जाणार आहे.’’ यावरून ‘पू. आजींना त्यांच्या देहत्यागाची पूर्वसूचना मिळाली होती’, हे लक्षात येते.

– पू. (कु.) दीपाली मतकर

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment