फरार आतंकवादी झाकीर नाईक धोकादायक नाही; पण अध्यात्मप्रसार करणारी सनातन संस्था धोकादायक मानणारी ‘फेसबुक’ हीच हिंदुद्वेषी ! -चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

नुकतीच अमेरिकेमध्ये ‘डिसमेंटलींग ग्लोबल हिंदुत्व कॉन्फरन्स’द्वारे हिंदु धर्माच्या विरोधात गरळ ओकण्यात आली आणि हिंदुत्वालाच आतंकवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला. यातूनच अमेरिकेमध्ये वाढत्या हिंदुत्वाच्या प्रभावाच्या विरोधात षड्यंत्र चालू असल्याचे दिसून येते. याचाच परिणाम म्हणून हिंदु धर्माचा प्रचार करणार्‍या सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेला ‘धोकादायक’ ठरवण्याचा प्रयत्न ‘फेसबुक’सारख्या सामाजिक माध्यमाने केला आहे. प्रत्यक्षात याच ‘फेसबुक’वरून भारताने जिहादी आतंकवादी आणि धोकादायक ठरवलेल्या डॉ. झाकीर नाईक याची 50 हून अधिक अकाऊंट अहोरात्र प्रसार करत आहेत, ती मात्र ‘फेसबुक’ला धोकादायक वाटत नाहीत. यातच ‘फेसबुक’ची हिंदुविरोधी भूमिका स्पष्ट होते.

गेल्या आठवड्यातच ‘फेसबुक’च्या माजी डेटा वैज्ञानिक फ्रान्सिस होगेन यांनी ‘फेसबुक हे लहान मुले आणि लोकशाही यांच्यासाठी धोकादायक आहे’ अशी साक्ष अमेरिकेच्या संसदेत दिली आहे. यापूर्वीही ‘फेसबुक’द्वारे नागरिकांची व्यक्तीगत माहिती ‘लीक’ करण्याच्या आणि नागरिकांवर पाळत ठेवण्याच्या आरोपांवरून ‘फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना अमेरिकेच्या संसदेत उभे करून जाब विचारण्यात आला होता. त्यामुळे अशा लोकशाहीला धोकादायक असणार्‍या ‘फेसबुक’सारख्या कंपनीच्या गोपनीय सूचीत कोणाचे नाव आहे, याला सनातनच्या दृष्टीने काडीमात्र महत्त्व नाही. ‘फेसबुक’ने सनातन संस्थेची एकतरी पोस्ट आक्षेपार्ह किंवा समाजविघातक आहे, असे दाखवून द्यावे, असे आव्हान आम्ही देतो. सनातन संस्था भारतीय संविधान आणि कायदे पाळून धर्मप्रसार करणारी एक आध्यात्मिक संस्था आहे. सनातनवर बंदी घालण्याच्या विरोधकांच्या मागणीवर ‘असा कोणताही प्रस्ताव नाही’, असा खुलासा भारत सरकारने वेळोवेळी केला आहे.

अमेरिकेमध्ये पद्धतशीरपणे हिंदुत्वाच्या विरोधात प्रचार करण्याचे षड्यंत्र चालू आहे. वर्ष २०१४ पूर्वी जवळपास आठ वर्षे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असतांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. वर्ष २०१८ मध्ये ‘सी.आय्.ए.’ या अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या सूचीत बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद यांना ‘मिलीटंट’ धार्मिक संघटना असे वर्गीकृत केले होते. आता ‘फेसबुक’च्या सूचीत सनातन संस्थेचे नाव येणे, हे सनातन संस्था हिंदु धर्माचा प्रभावी प्रचार करते, हेच सिद्ध करते. भारतात आतंकवादी कारवायांत सहभागी असल्याचा आरोप असणारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय्) आणि तिच्या ४२ संलग्न संघटना ‘फेसबुक’ला धोकादायक वाटत नाहीत; पण तेलंगानाचे भाजप आमदार श्री. राजासिंह ठाकूर, हिंदुत्वाचा उघड पुरस्कार करणारे ‘सुदर्शन चॅनल’ आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असणारी हिंदु जनजागृती समिती यांचे ‘फेसबुक’ अकाऊंट धोकादायक वाटतात, हे अत्यंत निषेधार्ह आणि भेदभाव करणारे आहे.

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

Leave a Comment