‘श्री गणेशाचे अध्यात्मशास्त्र आणि सामूहिक नामजप’ या विदर्भातील ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

नागपूर – सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विदर्भस्तरीय ‘श्री गणेशाची अध्यात्मशास्त्रीय विविध माहिती आणि सामूहिक नामजप’ या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या काळात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातून गणेशभक्त, जिज्ञासू आणि भाविक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या वेळी भाविकांना श्री गणेशमूर्ती घरी आणण्यापासून ते श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनापर्यंतची प्रत्येक कृती, त्यामागील शास्त्र, गणेशोत्सवाचा इतिहास, गणेशोत्सव साजरा करण्याची योग्य पद्धत, आरती कशी करावी ? अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात हरतालिका, ऋषिपंचमी, आदर्श सार्वजनिक गणेशोत्सव कसा असावा ? यांविषयीही माहिती देण्यात आली. तसेच प्रतिदिन सामूहिक श्री गणेशाचा नामजपही (‘ऑनलाईन’) करण्यात आला.

या वेळी श्री गणेशाचे समाजात मिळणारे एक चित्र आणि सनातननिर्मित श्री गणेशाचे सात्त्विक चित्र यांच्याकडे पाहून काय जाणवते ? याविषयीचा सूक्ष्म प्रयोग करवून घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रिया बागडदेव यांनी केले.

 

जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

१. सौ. कल्पना सूर्यवंशी, यवतमाळ – सामूहिक नामजप सत्संगात मिळालेल्या शास्त्रोक्त माहितीनुसार श्री गणेशाच्या संदर्भातील कृती केल्याने आनंद मिळाला. तसेच श्री गणेशाची आरती भावपूर्ण केल्यामुळे मूर्तीकडे पाहून मला त्याचे साक्षात् दर्शन झाले.

२. श्री. गोपाल चापके, अचलपूर, अमरावती – सत्संगाद्वारे मिळालेली शास्त्रोक्त माहिती ऐकून आनंद मिळाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment