केरळ येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने भक्तीमय वातावरणात ‘ऑनलाईन नामजप यज्ञ’ (सामूहिक नामजप) पार पडला !

कोची (केरळ) – सनातन संस्थेच्या वतीने येथील जिज्ञासूंसाठी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने केरळमध्ये ‘ऑनलाईन नामजप यज्ञा’चे (सामूहिक नामजपाचे) आयोजन करण्यात आले होते. याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या नामजप यज्ञाच्या प्रारंभी सनातनच्या साधिका कु. प्रणिता सुखठणकर यांनी श्रीकृष्णाची भावार्चना सांगितली. त्यानंतर श्रीकृष्णाचा नामजप ऑनलाईन लावण्यात आला आणि सर्व जिज्ञासूंनी तसा नामजप केला. नामजप झाल्यानंतर उपस्थित सर्वांनी ‘कार्यक्रम पुष्कळ आवडला आणि नामजप केल्याने पुष्कळ शांत वाटून आनंद जाणवला अन् कृतज्ञता वाटली’, असे अभिप्राय कळवले.

 

जिज्ञासूंचे अभिप्राय

१. श्री. राकेश नेल्लित्ताया – मला देवलोकात असल्यासारखे वाटले. तिथे सर्व देवदेवता जन्माष्टमी साजरा करत होते आणि ते स्वतः त्यात सहभागी असल्यासारखे वाटले. साक्षात् श्रीकृष्णाच्या समोर बसून मी नामजप करत आहे, असे मला वाटले.

२. सौ. नीना उदयकुमार – नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण करता आला. या आधी असे कधीही जाणवले नव्हते.

३. सौ. मिनी राजेश – एवढ्या वर्षांत घरी कधीही जन्माष्टमी साजरी केली नव्हती; पण या वेळी ती कशा पद्धतीने करायची, हे कळल्यावर सकाळपासून श्रीकृष्णाचा नामजप केला, सायंकाळी पूजेची सिद्धता केली आणि नैवेद्य दाखवला. एरव्ही मी एकटी घरातील ध्यानमंदिरात बसून नामजप करते; पण आज घरातील सर्व सदस्यांनी मिळून पूजेची सर्व सिद्धता केली, नैवेद्य दाखवला आणि मग नामजप यज्ञात सहभागी झालो. त्यामुळे पुष्कळ छान वाटत आहे. माझी मुलगी कु. आर्यानंदा (वय ८ वर्षे) हिलाही पुष्कळ चांगले वाटले.

 

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूर्वी ‘श्रीकृष्ण’ या विषयावर घेण्यात आले प्रवचन !

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने २७ ऑगस्ट या दिवशी ‘श्रीकृष्ण’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. सनातनच्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. रश्मी परमेश्वरन् यांनी प्रवचनात उपस्थित जिज्ञासूंना ‘जन्माष्टमीचे महत्त्व’, ‘जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा कशी करतात ?’ याविषयी माहिती सांगितली, तसेच सध्या समाजात श्रीकृष्णाविषयी जो अपप्रचार केला जातो, उदा. श्रीकृष्ण-अर्जुनाचे चित्र घरी लावू नये, श्रीकृष्ण आणि राधा यांच्या नात्याविषयी करण्यात येत असलेला अपप्रचार आदींचे खंडणही करण्यात आले. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment