अत्यंत कठीण प्रसंगात साधनेच्या बळावर स्थिर रहाण्यास शिकवणार्‍या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे (उजवीकडे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र भेट म्हणून देतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

नवे-पारगाव (वारणानगर) जिल्हा कोल्हापूर – पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतांना उत्तरोत्तर अध्यात्मात प्रगती केली. जाहीर प्रवचन घेणे, विज्ञापने आणणे, प्रसार करणे यांसह अनेक सेवा त्यांनी केल्या. प्रतिथयश स्त्रीरोगतज्ञ असतांनाही त्या मिरज येथील सनातनच्या आश्रमात येऊन राहिल्या आणि त्यांनी आश्रमजीवन आत्मसात् केले. त्यांनी शारीरिक आजारपणातही साधना चालू ठेवली. कुटुंबावर आलेल्या कठीण प्रसंगांत स्वत: सावरून कुटुंबालाही स्थिर ठेवले. कितीही कठीण प्रसंग असला, तरी साधनेच्या बळावर स्थिर राहू शकतो, हे पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांच्या उदाहरणातून शिकण्यासारखे आहे, असे गौरवोद्गार सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी काढले.

२१ ऑगस्ट या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्यात पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे या सनातन संस्थेच्या समष्टी १०९ व्या संतपदी विराजमान झाल्याचे, तर त्यांच्या कन्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्या ऑनलाईन सत्संग सोहळ्यात साधकांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये बोलत होत्या.

 

‘त्याग’, ‘आज्ञापालन’ आणि ‘साधनेची
तीव्र तळमळ’ या गुणांद्वारे सनातनच्या १०९ व्या संतपदावर
विराजमान झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील डॉ. (श्रीमती) शरदिनी सुधाकर कोरे !

परात्पर गुरु डॉ. आठवले

नवे पारगाव (तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) येथील डॉ. (श्रीमती) शरदिनी सुधाकर कोरे यांनी ‘स्त्रीरोगतज्ञ’ म्हणून २० वर्षे व्यवसाय केला. त्यांनी ७ वर्षे इंग्लंडमध्येही वैद्यकीय व्यवसाय केला. वर्ष १९९७ पासून त्या सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करू लागल्या.

सांगली जिल्ह्यात सनातनचे विशेष कार्य नसतांना डॉ. सुधाकर आणि डॉ. शरदिनी कोरे यांच्या मिरज येथील वास्तूत, ‘कोरे हॉस्पिटल’ येथे डिसेंबर १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सांगली-कोल्हापूर आवृत्तीचा शुभारंभ झाला. वर्ष २००६ पर्यंत या वास्तूत दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय विनामूल्य चालू होते. यातूनच कोरे दांपत्याच्या ‘त्याग’ या गुणाचा परिचय होतो.

पहिल्यापासूनच डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांच्यामध्ये साधनेची तीव्र तळमळ आहे. एक प्रथितयश स्त्रीरोगतज्ञ असूनही सनातनमध्ये आल्यावर त्यांनी सर्व प्रकारच्या सेवा पुढाकार घेऊन केल्या. प्रसार करणे, सत्संग घेणे, प्रसंगी खेडेगावांमध्ये जाऊन ‘सनातन प्रभात’च्या अंकांचे वितरण करणे, निधीसंकलन करणे, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने मिळवणे, अशा सर्व सेवा त्यांनी तळमळीने केल्या. त्या अनेक वर्षे सनातन आश्रम, मिरज येथे वास्तव्याला होत्या. त्यांनी तेथील आश्रमजीवन आनंदाने स्वीकारले आणि आश्रमात शक्य त्या सेवाही केल्या.

यातून त्यांच्यातील ‘आज्ञापालन करणे’ आणि ‘अहं न्यून असणे’, हे गुण लक्षात येतात. प्रेमभाव, चिकाटी, शिकण्याची आणि स्वीकारण्याची वृत्ती या सर्व गुणांमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे. आजच्या शुभ दिनी डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून त्या ‘समष्टी संत’ म्हणून सनातनच्या १०९ व्या संतपदावर विराजमान झाल्या आहेत.

डॉ. (श्रीमती) कोरे यांना साधनेत सर्व प्रकारचे साहाय्य करणारे त्यांचे यजमान कै. डॉ. सुधाकर कोरे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली होती. त्यांचे जावई कै. डॉ. नितीन कोठावळे हे सनातनच्या माध्यमातून साधना करत होते. त्यांची कन्या डॉ. शिल्पा कोठावळे याही तळमळीने साधना करून पुढे पुढे जात आहेत. त्यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली असून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या आहेत.

अशा प्रकारे डॉ. (श्रीमती) कोरे यांच्या साधनेच्या तळमळीमुळे त्यांचा परिवारही साधनारत आहे.

‘पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांची पुढील प्रगतीही जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

कठीण प्रसंगात देवानेच शक्ती दिली
आणि त्यामुळेच स्थिर रहाता आले !  – पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे

पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे

स्वतःच्या साधनाप्रवासाविषयी सांगतांना पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे म्हणाल्या, ‘‘मी सप्टेंबर १९९७ मध्ये सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला प्रारंभ केला. नामजपास प्रारंभ केल्यावर कुलदेवी माहिती नसतांनाही काही दिवसांतच कुलदेवीचे नाव समजले आणि तिचा नामजप करू लागले, ही माझी पहिली अनुभूती होती. मिरज येथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची जाहीर सभा होती, तेव्हा मला व्यासपिठाची सेवा मिळाली. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची भेट झाल्यावर माझ्या नामजपात आणखी वाढ झाली. ग्रंथप्रदर्शन लावणे, साप्ताहिक वितरण करणे, प्रवचन घेणे तसेच ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांसाठी विज्ञापन आणणे यांसह अनेक सेवा केल्या. वारणानगर येथे मी आयोजित केलेल्या पहिल्या प्रवचनाला ५०० जिज्ञासूंची उपस्थिती होती.

साधना करतांना मला वेगवेगळ्या अनुभूती आल्या. सनातन संस्थेचे श्रद्धास्थान असणारे प.पू. भक्तराज महाराज यांची भजने मला आपोआप ऐकू यायची. यातील अनेक भजने मला ठाऊकही नव्हती. ही नादाची अनुभूती होती.

पूर्वी माझा स्वभाव एकदम कडक होता. मला नीटनेटकेपणा आणि स्वच्छता आवडत असे. यात हलगर्जीपणा केलेला मला खपत नसे; मात्र साधनेमुळे कडकपणा अल्प झाला.

माझे यजमान डॉ. सुधाकर कोरे आणि जावई डॉ. नितीन कोठावळे आजारी असतांना ‘देवाला जे अपेक्षित आहे, ते होऊ दे. त्यासाठी स्थिर रहाण्याची शक्ती दे’, अशी प्रार्थना मी सतत केली.

साधनेच्या प्रवासात वेळोवेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन लाभले. कठीण प्रसंगात देवानेच शक्ती दिली. त्यामुळे मला स्थिर रहाता आले.’’

 

जे काही झाले ते
परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्यामुळेच ! – पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून भावस्थितीत गेलेल्या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे

संत घोषित झाल्यावर पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे म्हणाल्या, ‘‘मी काहीच केले नाही. सर्वकाही गुरुदेवांच्या कृपेमुळेच झाले. जे काही झाले ते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यामुळेच ! आज सांगण्यासाठी शब्दच नाहीत.’’ साधकांनी कसे प्रयत्न करायला हवेत याविषयी मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले जे काही सांगतील त्याचे आज्ञापालन करा. व्यष्टी साधना चांगली झाली, तरच समष्टी सेवा चांगली होईल.’’

कौटुंबिक दायित्व समर्थपणे सांभाळणार्‍या
पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे आणि न चुकता प्रतिदिन साधनेचा
आढावा देणार्‍या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये पुढे म्हणाल्या, ‘‘आजच्या प्रसंगाची माझ्यासह सर्वजणच वाट पहात होते. पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांनी कौटुंबिक दायित्व समर्थपणे सांभाळले. त्यांच्याकडे कुणीही आले, तरी त्या प्रत्येकाला प्रेमानेच खाऊ घालायच्या. डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांच्याविषयी सांगायचे, तर केवळ अपवादात्मक स्थितीतच त्यांनी आढावा दिला नाही, असे झाले आहे; अन्यथा प्रत्येक दिवशी त्यांनी त्यांच्या साधनेचा आढावा दिलेलाच आहे. सांगितलेले दोष स्वीकारून त्यात पालट करण्यासाठी त्यांनी तळमळीने प्रयत्न केले. त्या व्यष्टी साधना परिपूर्ण करून कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसारकार्यात दायित्वाने सहभागी आहेत. आज त्यांनी अध्यात्मातील महत्त्वाचा असा पहिला टप्पा (६१ टक्के आध्यात्मिक पातळी) गाठला आहे. त्यांच्यातील गुण आपल्या प्रत्येकात येण्यासाठी साधकांनी आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत.’’

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी दिलेले प्रोत्साहन
आणि दृष्टीकोन यांमुळे इथपर्यंत पोचले ! – डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे

सत्काराच्या वेळी मनोगत व्यक्त करतांना डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे म्हणाल्या, ‘‘जे काही होत आहे, ते केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच ! सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी मला प्रत्येक स्थितीतून बाहेर काढले आणि सातत्याने प्रोत्साहन दिले. महाविद्यालय स्तरावर (तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय) असलेल्या अडचणींच्या वेळीही त्यांनी ‘सर्वकाही देवावर सोडा’, असे सांगितले. त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सकारात्मक दृष्टीकोनांमुळेच मी इथपर्यंत पोचू शकले. जे झाले, ते सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्यामुळेच ! यात माझे असे काहीच नाही.’’

प्रेमभावाचे मूर्तीमंत रूप म्हणजे पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे !
– डॉ. हरिष कुलकर्णी, प्राचार्य, तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय, नवे-पारगाव

डॉ. हरिष कुलकर्णी

या प्रसंगी तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिष कुलकर्णी म्हणाले, ‘‘प्रेमभावाचे मूर्तीमंत रूप म्हणजे पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे होय ! त्यांच्या घरी गेल्यावर त्या डाळींब सोलून त्यातील दाणे काढून देतात, तर संत्री किंवा मोसंबी असेल, तर प्रत्येक फोड वेगवेगळी काढून खाण्यासाठी देतात. पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांचे जे प्रेम आहे ते आतून जाणवते. माझ्या आईनंतर माझ्यावर जर कुणी आईइतकेच प्रेम कुणी केले असेल, तर त्या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे आहेत ! डॉ. शिल्पा कोठावळे यांच्यासमवेत मी अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांनी घेतलेले कष्ट मी जवळून पाहिले आहेत. त्यांनी घेतलेल्या कष्टाचे आज चीज झाले. आज गुरुदेवांनी केवळ आनंद दिला नाही, तर आनंद द्विगुणीत केला. आजच्या या सोहळ्याविषयी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्या प्रती कृतज्ञता !

पू. डॉ. (श्रीमती) कोरे यांच्याविषयीचे कुटुंबीय आणि साधक यांचे मनोगत !

१. डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे (पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांची मुलगी)

डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे

माझे यजमान डॉ. नितीन कोठावळे यांचे निधन होण्याच्या पूर्वीपासून आईच्या तोंडवळ्यावरील तेज वाढले होते. घडलेल्या प्रत्येक प्रसंगात आई स्थिर आणि खंबीर होती. ‘गुरुदेव सर्व करून घेणार आहेत’, असे सातत्याने सांगून तिनेच आम्हाला धीर दिला. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या प्रती तिचा अत्युच्च भाव आहे. त्यांचे १०० टक्के आज्ञापालन करण्याचा तिचा प्रयत्न असतो. पूर्वी आईची शिस्त कडक असे. आता काहीही घडले, तरी ती ते स्वीकारते.

२. डॉ. कौशल कोठावळे (पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांचा नातू)

(डॉ.) कौशल नितीन कोठावळे

आजोबा आणि बाबा यांचे निधन झाल्यावर आजी स्थिर होती. तिची त्वचा मऊ आणि पिवळी होत असून त्वचेवरील केस सोनेरी होत आहेत’, असे जाणवले. विशेषकरून गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे प्रकर्षाने जाणवले. गुरुपौर्णिमेनंतर मला ‘आपण एका संतांसमवेत रहात आहोत’, असेच जाणवत होते.

३. त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे

उद्योजक आणि डॉक्टर यांच्याशी संपर्क करतांना पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांच्यात प्रत्येक वेळी नम्रता जाणवत असे. त्या एवढ्या मोठ्या असूनही त्यांना कशाचीही आसक्ती नाही.

 

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या
डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांच्याविषयी व्यक्त केलेले मनोगत

डॉ. कौशल कोठावळे (डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांचा सुपुत्र)

कोणत्या शब्दांत कृतज्ञता व्यक्त करायची, ते कळत नाही. आजी आणि आई यांच्यामुळेच माझी साधना चालू आहे. अनेक कठीण प्रसंगांमध्ये आईवर दायित्व असतांनाही ती स्थिर होती. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या कृपेनेच हा सोहळा मला अनुभवण्यास मिळाला. त्याविषयी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

कु. वैभवी भोवर (६८ टक्के आध्यात्मिक पातळी)

डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनी कधीही त्यांच्या साधनेत खंड पडू दिला नाही. कोणत्याही परिस्थितीत त्यांची व्यष्टी साधना नियमित पूर्ण व्हायची. महाविद्यालयाचा व्याप, तसेच घरचे दायित्व सांभाळून जिल्ह्यातील प्रसार कसा करायचा, सेवा दायित्व घेऊन कशी करायची, ते ताईंकडून शिकायला मिळाले. ताईंमध्ये नियोजनकौशल्य आणि वात्सल्यभाव आहे.

 

पू. डॉ. (श्रीमती) कोरे यांच्या सन्मान सोहळ्यातील भावमोती

१. सभागृहात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे आगमन झाल्यावर वातावरणात हलकेपणा जाणवू लागले. सोहळा जस जसा पुढे जात होता, तस तसा हलकेपणा वाढत गेला आणि एक मंद दैवी सुगंध जाणवू लागला. पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे या संतपदी विराजमान झाल्यावर वातावरणात अत्यंत थंडावा जाणवू लागला आणि शांतता जाणवत होती.

२. पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे या संतपदावर विराजमान झाल्यावर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी वाकून पू. शरदिनी कोरे यांना नमस्कार केला.

३. पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांना सन्मानाचे श्रीफळ दिल्यानंतर त्यांनी अत्यंत भावपूर्णरितीने त्याला नमस्कार केला आणि काही क्षण श्रीफळाला माथा टेकवला. यानंतर परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांची प्रतिमा भेट दिल्यावर त्या भावविभोर झाल्या. कितीतरी काळ त्यांनी परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांची प्रतिमा हातात धरून ठेवली होती आणि त्या गुरुदेवांकडे  पहात होत्या. ही प्रतिमा म्हणजे गुरुदेवांनी दिलेली अलौकीक भेट असून ‘ही प्रतिमा कुठे ठेवू आणि कुठे नको’, असे त्यांना झाले होते, असे जाणवले.

४. पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांना संत घोषित केल्यावर डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांनी भावपूर्णरित्या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांच्या चरणावरती डोके ठेवून नमस्कार केला. यानंतर पू. डॉ. (श्रीमती) कोरे यांनी डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांची अलींगन देऊन भेट घेतली. इथे ‘मुलगी-आई’ या नात्यापलिकडे एका मुलीने संत आईला केलेला नमस्कार आणि संत आईने शिष्यभावाने मुलीला दिलेले अलींगन, अशी ती आध्यात्मिक स्तरावरील दोन जीवांची भेट होती, असे जाणवले.

५. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे यांच्याशी कधी बालकभावाने, तर कधी मैत्रीभावाने संवाद साधत अत्यंत खुबीने मुलाखतीद्वारे त्यांचा जीवनप्रवास उलगडला. या दोघांमधील संवाद अत्युच्य कोटीची भावावस्था दर्शवणारा होता. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्या अत्यंत नम्रपूर्वक देत होत्या.

विशेष

१. सन्मान सोहळ्यात पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे या वेगळ्याच भावविश्वात होत्या. संत घोषित झाल्यावरही त्या अत्यंत स्थिर होत्या. त्यांची कांती चकाकत होती.

२. सोहळ्यात डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे पुष्कळ स्थिर आणि विनम्र अवस्थेत होत्या. अनेक वेळा भावजागृत होऊन त्यांचे डोळे पाणावत होते, तीच अवस्था त्यांचा सुपुत्र डॉ. कौशल कोठावळे यांचीही होती.

३. ऑनलाईन जोडलेल्या अनेक साधकांनी मनोगत व्यक्त करतांना ‘गेल्या वर्षभरात डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांच्यात आम्हाला प्रकर्षाने पालट जाणवत होते’ आणि ‘आम्ही या क्षणाची आतुरतेने वाट पहात होतो’, असे सांगितले.

४. पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे या प्रसिद्ध स्रीरोग तज्ञ आहेत, तर डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे या ‘एम्.डी.’ मेडिसिन आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment