‘भावबळे आणा प्रभूला’, या उक्तीप्रमाणे आचरण करून जीवनात पदोपदी गुरुकृपेची अनुभूती घेणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील !

अनुक्रमणिका

आज आपण सनातनच्या ८५ व्या समष्टी संत पू. (सौ.) संगीता पाटील (वय ६२ वर्षे) यांचा साधनाप्रवास पाहूया.

पू. (सौ.) संगीता पाटील
‘अतिशय खडतर बालपण असूनही साधनेवर श्रद्धा ठेवून साधना करणारे कुणी असू शकते, यावर विश्वास बसणे कठीण आहे ! पू. (सौ.) संगीता पाटील यांचे कौतुक करावे तेवढे अल्प !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जन्मदिनांक : २९.६.१९५९

वाढदिवस : आषाढ पौर्णिमा (२३ जुलै २०२१) या दिवशी आहे.

संतपदी विराजमान : ३० मार्च २०१९

बालपणापासूनच कष्टप्रद जीवन जगणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील यांना त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, तरीही त्यांची देवावरील श्रद्धा मुळीच ढळली नाही. लहानपणी अनेक मंदिरांत भावपूर्ण सेवा केल्याने त्यांची श्रद्धा वृद्धींगत झाली आणि देवावरील त्यांच्या अतूट श्रद्धेमुळे श्री गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या कृपाप्रसादे त्यांना अनेक अनुभूतीही आल्या. नंतर सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावरही त्यांना पदोपदी गुरुकृपा अनुभवता आली. त्यांच्या भावबळामुळेच जीवनातील अत्यंत खडतर प्रसंगी, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातही प्रभूला त्यांच्या समवेत यावे लागले. त्यांना डोळ्यांनी स्पष्ट दिसत नसूनही गुरुकार्याची तळमळ, भाव आणि गुरूंवरील अढळ श्रद्धा या गुणांच्या बळावर त्यांनी ‘संतपद’ प्राप्त केले. त्यांची गुरूंवरील अपार श्रद्धा आणि गुरुकार्याची तळमळ सर्वच साधकांना साधनेत प्रोत्साहन देणारी आहे.

 

१. बालपण

१ अ. जन्मानंतर काही दिवसांतच आई-वडिलांचे छत्र हरपणे

‘माझ्या जन्मानंतर ४ दिवसांतच माझ्या आईचे बाळंतपणातील आजारामुळे निधन झाले. नंतर लगेचच ३ मासांनी सकाळी तुळशीला पाणी घालत असतांना अकस्मात् माझ्या वडिलांचे निधन झाले.

१ आ. आजोबांच्या परिचयातील ब्राह्मण कुटुंबाने सांभाळ करणे

१ आ १. वडिलांनी मृत्यूपूर्वी ३० एकर भूमी एका ब्राह्मणाला देऊन त्यांना मुलीचा सांभाळ करण्यास सांगणे

माझ्या आजोबांचे गावातील एका ब्राह्मण व्यक्तीशी घरगुती संबंध होते. निधनापूर्वी वडिलांनी त्या ब्राह्मण व्यक्तीला सांगितले होते, ‘‘तुम्ही आमची ३० एकर भूमी घ्या आणि माझ्या मुलीला सांभाळा. मी पंढरपूरला जातो.’’ वडिलांच्या मृत्यूनंतर त्या ब्राह्मणाने माझा सांभाळ केला.

१ आ २. त्या ब्राह्मण कुटुंबालाच स्वतःचे कुटुंबीय मानणे

त्या ब्राह्मण कुटुंबातील व्यक्तींना मी नातेवाइकांसमान मानत असे. मी त्या उभयतांनाच माझे आई-वडील मानत होते. त्यांना २ मुली आणि २ मुलगे होते.

माझ्या वयाच्या एक वर्षापर्यंत त्या ब्राह्मणाने (मी त्यांना ‘बाबा’च म्हणत असे.) माझे संगोपन करण्यासाठी घराजवळील मातंग समाजाच्या एका शेजार्‍याजवळ ठेवले होते आणि नंतर २ वर्षे मला बाल-आश्रमात (अनाथ आश्रमात) ठेवले.

१ आ ३. आईच्या जाचामुळे घरातील सर्व कामे करावी लागत असल्याने शाळेत जायला उशीर होणे

३ वर्षांनंतर बाबांनी (त्या ब्राह्मण गृहस्थांनी) मला घरी आणले आणि मला शाळेतही घातले. मला माझी ती आई पुष्कळ त्रास द्यायची. मला सकाळी उठल्यावर घरातील केर काढणे, सडा घालणे, गोवर्‍या थापणे, सकाळ-दुपारची भांडी घासणे, कपडे धुणे इत्यादी कामे प्रतिदिन करावी लागत. मला ही सर्व कामे करून शाळेत जायला उशीर होत असे. शाळेची वेळ सकाळी ११ वाजताची असतांना मी मात्र दुपारी १.३० वाजता शाळेत जात असे.

१ आ ४. काही वेळा दिवसातून एकदाच जेवायला मिळणे आणि कधी कधी पुष्कळ भूक लागल्यास जवळच्या मंदिरातील देवीसमोर ठेवलेला प्रसाद खाणे

मी एवढी सर्व कामे करूनही आई मला कधीच वेळेवर जेवायला देत नसे. ती मला अनेकदा जेवण म्हणून भावंडाचे उरलेले उष्टे अन्न द्यायची. मला कधी कधी दिवसातून एकदाच तेही थोडेसेच खायला मिळत असे. मला पुष्कळ भूक लागल्यास मी जवळच्या दुर्गादेवीच्या मंदिरात देवीसमोर ठेवलेला प्रसाद (केळे, नारळ, नैवेद्य इत्यादी) खाऊन भूक भागवत असे.

अशा स्थितीतही माझे सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले.

 

२. बाबांची शेगावच्या श्री गजानन महाराज मंदिरात पुजारी म्हणून नियुक्ती होणे

२ अ. घरकामामुळे आणि मंदिरात सेवा करावी लागत असल्याने शाळेत जाणे बंद होणे

नंतर माझ्या बाबांची शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या मंदिरात पुजारी म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे ते कुटुंबीय पांढरकवडा या आमच्या गावातून शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या मंदिराच्या परिसरात रहायला आले. त्यांनी मलाही त्यांच्या समवेत शेगावला नेले. ते त्या मंदिरात ६ वर्षे पुजारी होते. तेथे मी घरकाम, तसेच मंदिरातील स्वच्छता करणे, पूजेची उपकरणे धुणे आदी सेवा करत असे. तेव्हापासून माझी शाळा सुटली.

२ आ. श्री गजानन महाराजांच्या मंदिरात सेवा करतांना आलेल्या अनुभूती

२ आ १. गाभार्‍यात गेल्यावर ‘श्री गजानन महाराज चालत येत आहेत’, असे जाणवणे

मी तेथेच रहात असल्यामुळे मला मंदिरात गाभार्‍यापर्यंत जाण्याची मुभा होती. मी पूजेची उपकरणे धुऊन महाराजांच्या मूर्तीजवळ जात असतांना ‘श्री गजानन महाराज चालत येत आहेत’, असे मला जाणवायचे.

२ आ २. शिक्षा म्हणून दिवसभर आईने खायला न देणे, रात्री उपाशी झोपल्यावर श्री गजानन महाराजांनी हाका मारून उठवणे आणि ताटात नैवेद्य ठेवलेला दिसणे

एके दिवशी मी सकाळची भांडी घासली नाहीत; म्हणून आईने मला पुष्कळ मारले. तिने मला दिवसभर काही खायला दिले नाही. त्या रात्री मी उपाशी झोपले होते. ‘श्री गजानन महाराजांनी मला ३ वेळा हाक मारली आणि ‘तेथे नैवेद्य ठेवला आहे. उठून खा’, असे सांगितल्याचे जाणवले. मी उठून पाहिल्यावर मला तेथे ताटात जेवण आणि लाडू असे पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवलेले दिसले.

२ आ ३. आईने रागावून घराजवळच्या विहिरीत ढकलून देणे, त्या वेळी श्री गजानन महाराजांनी मुलाच्या रूपात येऊन विहिरीतून बाहेर काढणे

एके दिवशी मी आईला बाजारातून गूळ आणून दिला नाही; म्हणून आईने रागावून मला घराजवळच्या विहिरीत ढकलून दिले. तेव्हा अकस्मात् तेथे ७ वर्षांचा एक मुलगा आला. त्याने मला ओढून वर काढले. नंतर मी त्या मुलाला शोधण्याचे पुष्कळ प्रयत्न करूनही तो सापडला नाही. (त्या वेळी ‘श्री गजानन महाराजच त्या मुलाच्या रूपात मला वाचवण्यासाठी आले होते’, असे मला जाणवले.)

अशा प्रकारे देवाने मला कठीण प्रसंगांत पुष्कळ साहाय्य केले. त्यामुळे माझा देवावरील विश्वास दृढ झाला. त्यामुळे ‘माझे चांगलेच होणार आहे’, या श्रद्धेने मी आतापर्यंत जीवन जगले.

२ आ ४. मंदिराच्या भिंतीतून ‘पुढे तुला महान माऊली मिळणार आहे’, असा आवाज ऐकू येणे आणि प्रत्यक्षातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखी महान आणि दयाळू गुरुमाऊली भेटणे

मला बर्‍याच वेळा मंदिराच्या भिंतीतून ‘पुढे तुला एक महान माऊली मिळणार आहे’, असा आवाज ऐकू येत असे. त्याप्रमाणे मला आता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखी महान आणि दयाळू गुरुमाऊली भेटली आहे.

 

३. बाबांची शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात पुजारी म्हणून नियुक्ती होणे

नंतर बाबांची शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात पुजारी म्हणून नियुक्ती झाली. आम्ही शिर्डी येथे रहायला आलो. या मंदिरातही मी स्वच्छता करणे, पूजेची उपकरणे धुणे इत्यादी सेवा करत होते. मी घरातील सर्व कामे पूर्वीप्रमाणे करायचे. आईचे मला त्रास देणे चालूच होते.

३ अ. शिर्डी येथील श्री साईबाबांच्या मंदिरात सेवा करतांना आलेल्या अनुभूती

३ अ १. बाबांनी सांभाळण्याची असमर्थता दर्शवल्यावर साईबाबांनी एका व्यक्तीच्या रूपात येऊन त्यांना ‘तू हिचे शेत घेतले आहेस, तर तू हिला सांभाळायला हवे’, असे सांगणे

आम्ही शिर्डी येथे रहायला आल्यावर बाबांनी मला सांभाळण्यास असमर्थता दर्शवली. तेव्हा अकस्मात् एक व्यक्ती आली. तिने बाबांना विचारले, ‘‘या मुलीच्या वडिलांच्या शेताचे तुम्ही काय केले ? तुम्ही हिचे सर्व घेऊन बसलात. आता तुम्हाला या मुलीला सांभाळता येत नाही ? मी हिच्या आई-बाबांना ओळखत होतो. तुम्ही आता तिचा सांभाळ करायला हवा.’’ नंतर ती व्यक्ती दिसेनाशी झाली. तेव्हा ‘साईबाबाच त्या व्यक्तीच्या रूपात तिथे आले होते’, असे मला जाणवले.

३ अ २. साईबाबांचे दर्शन होऊन त्यांनी मस्तकावर हात ठेवल्यामुळे चैतन्य मिळाल्याचे जाणवणे

एकदा साईबाबांच्या पादुकांची पालखी निघाली असता मला तेथे साईबाबा दिसले. ‘त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि मला चैतन्य दिले’, असे मला जाणवले.

३ अ ३. मुसळधार पाऊस चालू झाल्यावर एका महिलेसह झाडाखाली थांबून साईबाबांचा धावा करणे, तेव्हा अर्ध्या झाडावर वीज पडून झाडाचा तो भाग आणि ती महिला जळून खाक होणे; मात्र स्वतः वाचणे

एकदा पावसाळ्याच्या दिवसांत आईने मला बाजारातून २० किलो फुले आणायला सांगितली होती. त्या दिवशी सकाळी ११ वाजता मुसळधार पाऊस पडत होता. मी आणि ३० ते ४० वर्षे वय असलेली एक महिला फुले आणायला जात होतो. तेव्हा अकस्मात् विजा चमकायला लागल्यामुळे आम्ही दोघी एका झाडाखाली थांबलो. मी झाडाला पकडून ठेवले होते आणि साईबाबांचा धावा करत होते. तिही साईबाबांचा धावा करत होती. मी ज्या ठिकाणी थांबले होते, तो भाग सोडून उर्वरित अर्ध्या झाडावर वीज पडली. वीज पडलेल्या झाडाचा भाग आणि माझ्या समवेत असलेली ती महिला जळून खाक झाली अन् मी वाचले.

 

३ आ. बाबांनी सांभाळण्याची असमर्थता दर्शवत शेगावच्या मंदिराच्या तत्कालीन अध्यक्षाकडे सुपुर्द करणे

कालांतराने बाबांनी मला सांभाळण्याची असमर्थतता दर्शवली. त्यांनी मला शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिराचे तत्कालीन अध्यक्ष श्री. शंकर पाटील यांच्याकडे सुपुर्द केले.

 

४. वैवाहिक जीवन

४ अ. चांगले सासर लाभणे

श्री. शंकर पाटील यांनी माझ्या वयाच्या २६ व्या वर्षी माझे लग्न करून दिले. आमचे लग्न मंदिरातच झाले. माझ्या सासूबाई चांगल्या होत्या. माझे केस लांब होते. त्या माझे केस विंचरून द्यायच्या. सासरे वारकरी संप्रदायानुसार साधना करत. ते प्रतिदिन शिवलीलामृत वाचायचे. ते ‘शिवलीलामृत’ पोथी वाचत असतांनाच त्यांचा प्राण गेला.

४ आ. अल्पशा आजाराने लहान वयातच मुलगा निधन पावणे

एक वर्षाने मी यजमानांसमवेत पुण्याला रहायला आले. मला लग्नानंतर ३ – ४ वर्षांनी मुलगा झाला. तो ७ वर्षांचा असतांना अल्पशा आजाराने मरण पावला.

माझ्या जीवनात एवढे प्रतिकूल घडत असूनही माझ्या मनात देवाप्रती असलेला आदर आणि भाव मुळीच न्यून झाला नाही.

४ इ. विषमज्वर आणि न्यूमोनिया होणे, त्या आजारपणात
दृष्टी जाणे आणि आधुनिक वैद्यांनी ‘शस्त्रकर्म करूनही दृष्टी येणार नाही’, असे सांगणे

मला विषमज्वर झाला आणि नंतर न्यूमोनिया झाला. या आजारपणात माझी दृष्टी गेली. मी पुण्यातील बर्‍याच आधुनिक वैद्यांकडे गेले. सर्वांनी ‘शस्त्रकर्म करूनही दृष्टी येणार नाही’, असे सांगितले. नंतर आम्ही दोघांनीही (मी आणि यजमान यांनीही) दृष्टी परत येण्याची आशा सोडली होती.

 

५. सनातन संस्थेशी संपर्क

५ अ. अर्पण मागण्यासाठी घरी आलेल्या सनातनच्या साधिकेला जवळ असलेला एक रुपया देणे

वर्ष २००० मध्ये एक दिवस सनातनची एक साधिका आमच्याकडे अर्पण मागायला आली होती. आमची आर्थिक स्थिती बिकटच होती. तेव्हा मी त्यांना माझ्याकडे असलेला एक रुपया दिला. त्या साधिकेने आम्हाला सत्संगात येण्यास सांगितले.

५ आ. कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करण्यास आरंभ करणे

मी सत्संगात जायला लागल्यापासून तिथे सांगितल्याप्रमाणे कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करणे चालू केले. आरंभी मी सत्संगात खाली मान घालून बसून केवळ श्रवणभक्ती करायचे.

५ इ. नामजपामुळे आतून आनंद मिळणे आणि डोळ्यांसमोर
एका व्यक्तीची प्रतिमा दिसणे अन् नंतर ते परात्पर गुरुदेव डॉ. आठवले असल्याचे लक्षात येणे

सत्संगात गेल्यामुळे माझा नामजप चांगला होऊ लागला. तो करतांना मला आतून पुष्कळ आनंद मिळत होता. ‘मी पुष्कळ काहीतरी मिळवले’, असे मला वाटू लागले. त्या वेळी मला माझ्या डोळ्यांसमोर एका व्यक्तीची प्रतिमा दिसायची. नंतर माझ्या लक्षात आले, ‘ते गुरुदेव होते.’ नंतर मी हळूहळू कुणाचाही आधार न घेता एकटीच सत्संगाला जाऊ लागले.

५ ई. नामजप करू लागल्यावर गुरुदेवांच्या कृपेमुळे मला दृष्टी मिळणे

मी नामजप चालू केल्यापासून ३ मासांतच मला थोडे दिसायला लागले. प्रथम मला घरात लख्ख प्रकाश पडल्याचे दिसले आणि हळूहळू दिसू लागले. आधुनिक वैद्यांनी मला दृष्टी येणार नाही, असे सांगितले होते; परंतु गुरूंची कृपा आणि नामजप यांमुळे मला ही अनुभूती आली. तेव्हापासून मी नाम सोडलेच नाही. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला दृष्टी मिळाली.

५ उ. प्रतिदिन सकाळी रांगोळी काढतांना
‘परात्पर गुरुदेव आणि श्रीकृष्ण घरी येणार आहेत’, असा भाव असणे

आमचे घर चौथ्या मजल्यावर आहे. मी प्रतिदिन सकाळी तिसर्‍या माळ्याच्या पायर्‍यांपासून वर घराच्या दारापर्यंत रांगोळी काढते. रांगोळी काढतांना ‘प्रतिदिन आपल्या घरी परात्पर गुरुदेव आणि श्रीकृष्ण येतात. त्यांना चांगले वाटायला हवे’, असा माझा भाव असतो.

५ ऊ. गुरुदेवांच्या कृपेमुळे चालत जाऊन सेवा करू शकणे

गुरुदेवांनी माझ्याकडून सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ५५ वर्गणीदार करणे, अशा सेवा करून घेतल्या. परिसरातील सगळ्या मंदिरांत ‘सनातन प्रभात’ नियतकालिक चालू झाले. त्यामुळे अनेक जण ते वाचू लागले. मी चालत जाऊन प्रत्येक व्यक्तीला अंक देत असे. मी घरातून निघण्यापूर्वीच देवाला प्रार्थना करते. त्यामुळे मला चालतांना अडचण येत नाही. मला डोळ्यांनी नीट दिसत नाही; परंतु वाटेत खड्डा असल्यास किंवा मागून गाडी येत असल्यास ‘बाजूला हो. इकडून जा’, असे मला कुणीतरी सांगत असल्याप्रमाणे आवाज ऐकू येतात. त्या वेळी गुरुदेवच माझी काळजी घेत असतात, असे मला जाणवते.

 

६. यजमानांना कंपनीत अपघात होणे

६ अ. अपघातामुळे यजमानांना घरीच थांबावे लागणे
आणि उदरनिर्वाहासाठी स्वतः दुसर्‍यांच्या घरी पोळ्या अन् धुणी-भांडी करणे

१७ वर्षांपूर्वी म्हणजे अनुमाने वर्ष २००२ मध्ये माझ्या यजमानांचा आस्थापनात अपघात होऊन त्यांच्या दोन्ही हातांची बोटे गेली. त्यांच्या पायावर मोठी लोखंडी वस्तू पडल्याने पायाची नसही तुटली. तेव्हापासून यजमान घरीच असतात. मी उदरनिर्वाहासाठी दुसर्‍यांच्या घरी पोळ्या आणि धुणी-भांडी करत असे.

६ आ. यजमानांना रुग्णालयात शस्त्रकर्म करण्यासाठी भरती केल्यावर आलेल्या अनुभूती

यजमानांना पुण्यातील वानवडी येथील एका रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथील आधुनिक वैद्यांनी ‘यजमानांचे मोठे शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगितले.

६ आ १. रात्री यजमानांना कापूर आणि अत्तर लावून दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक त्यांच्या अंगावर ठेवणे आणि सकाळी श्रीकृष्णाला त्यांची काळजी घ्यायला सांगून कामाला जाणे

मी रात्रभर यजमानांजवळ थांबत असे. दिवसा यजमानांच्या शेजारी श्रीकृष्णाचे चित्र ठेवून श्रीकृष्णाला त्यांना सांभाळायला सांगून मी कामाला जायचे. मी रात्री यजमानांना कापूर आणि अत्तर लावत असे, तसेच मी दैनिक ‘सनातन प्रभात’ त्यांच्या अंगावर ठेवत असे. हे पाहून तेथील आधुनिक वैद्य मला ओरडत असत, तरीही मी नेटाने हे उपाय करत असे.

६ आ २. आधुनिक वैद्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक वाचणे, नंतर त्यांच्या मुलीचे लग्न जुळत नसल्याचे सांगितल्यावर त्यांना कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करायला सांगणे आणि त्यांनी नामजप चालू केल्यानंतर ८ दिवसांतच त्यांच्या मुलीचे लग्न जुळणे

एकदा एका दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकात कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करण्याचे महत्त्व छापून आले होते. मी तो विशेषांक यजमानांच्या जवळ ठेवला होता. आधुनिक वैद्यांनी माझ्या नकळत तो अंक नेऊन वाचला. नंतर त्या आधुनिक वैद्यांनी मला त्यांची कौटुंबिक अडचण सांगितली. त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे लग्न जुळत नव्हते. मी त्यांना कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करायला सांगितला. त्या आधुनिक वैद्यांनी आणि त्यांच्या पत्नीने श्रद्धेने नामजप केला. त्यांनी नामजप चालू केल्यानंतर आठ दिवसांतच त्यांच्या मुलीचे लग्न जुळले.

६ आ ३. आधुनिक वैद्यांनी मला घरी नेऊन माझे आदरातिथ्य केले. त्यांनी आम्हा दोघांना ८ दिवस जेवणाचा डबा दिला.
६ आ ४. आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्माचे नाममात्र पैसे घेणे

त्या वेळी रुग्णालयातील उपचारांचे ५५ सहस्र रुपये इतके देयक झाले होते; पण त्या आधुनिक वैद्यांनी आमच्याकडून केवळ ३०० रुपये घेतले.

६ आ ५. आता ते आधुनिक वैद्य गुरुकार्यासाठी अर्पण देतात आणि सनातनची सात्त्विक उत्पादनेही घेतात.

 

७. आस्थापनात काम करतांना आलेली अनुभूती !

७ अ. सेवेमुळे आस्थापनात जाता न आले, तरी त्या मासाचेही पूर्ण वेतन मिळणे

मी मला दृष्टी आल्यानंतर १२ – १३ वर्षांपासून एका लहान आस्थापनात ‘हेल्पर’ म्हणून कामाला जाते. मला सेवेमुळे बर्‍याच वेळा आस्थापनात जायला उशीर होतो. कधी सनातनचे काही उपक्रम किंवा सत्संग असल्यास मला आस्थापनात जाताही येत नाही, तरीही मला त्या मासाचे पूर्ण वेतन मिळते. आस्थापनाचे मालक सांगतात, ‘‘तुम्ही देवाचे करता ना ! मग तुम्ही कधीही आस्थापनात या. तुम्हाला तुमचे पूर्ण वेतन मिळेल.’’

 

८. प.पू. भक्तराज महाराजांच्या संदर्भात आलेली अनुभूती

एकदा मी कामावरून घरी येत होते. मार्गात असतांना अचानक वीज खंडित झाली. मला जवळजवळ ४ कि.मी अंतर पायी जावे लागते. वीज गेल्यावर ‘आता अंधारात कसे जायचे ?’, असा मला प्रश्न पडला. मी गुरुदेवांना आळवीत जात होते. त्याच वेळी काळा कोट, धोतर आणि हातात काठी घेतलेले एक गृहस्थ काठी वाजवत माझ्यापर्यंत आले. त्यांनी मला ‘कुठे जायचे आहे ?’, असे विचारले आणि म्हणाले, ‘मलाही तिथेच जायचे आहे. चला माझ्यासमवेत.’ असे म्हणून त्यांनी मला घरापर्यंत पोचवले. तितक्यात वीज आली. मी त्यांना ‘घरी चला’, असे म्हणत मागे वळून पाहिले, तर मला मागे कुणीच दिसले नाही. ‘ते प.पू. भक्तराज महाराजच होते’, याची मला निश्चिती झाली.

हे सर्व गुरुमाऊलींच्या कृपेनेच घडले. अशा पुष्कळ प्रसंगांतून गुरुमाऊलींनी मला तारून नेले आहे. अनेक अनुभूती दिल्या आहेत. त्यासाठी ईश्वरचरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.’

 

९. गुरुदेवांच्या कृपेने समाजातील व्यक्तींकडून लाभलेला प्रतिसाद !

९ अ. समाजातील व्यक्तींकडे संपर्कासाठी जातांना
गुरुदेवांना प्रार्थना केल्यामुळे कुठल्याही घरात प्रवेश केल्यावर तिथे चैतन्य जाणवणे

मी समाजातील व्यक्तींकडे संपर्कासाठी जातांना गुरुदेवांना प्रार्थना करते, ‘गुरुदेवा, मला व्यवस्थित बोलता येत नाही. मला रंगरूप नाही. जो आहे, तो सगळा तुमचाच गंध आहे. तुम्ही समवेत असाल, तरच माझी साधना होते. मला स्वतःला काही येत नाही.’ अशी प्रार्थना करत असल्यामुळे मी कुठल्याही घराचा उंबरठा ओलांडल्यावर त्या घरात चैतन्य निर्माण होत असल्याचे मला आणि इतरांनाही जाणवते.

९ आ. पोलिसांना प्रेमाने सांगितल्यावर ते सात्त्विक
उत्पादने घेऊ लागणे आणि ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदारही होणे

एकदा मी एका पोलीस अधिकार्‍यांकडे गेले होते. मी त्यांना माझ्याकडील ‘सनातन प्रभात’चे अंक वाचायला दिले. त्यानंतर मी पोलिसांच्या वसाहतीत जाऊन २ – ३ ठिकाणी माझ्याकडील अंक दिले. (आरंभी मला तेथील लोकांनी ‘पोलीस अधिकार्‍यांकडे जाऊ नका. काही लाभ होणार नाही’, असे सांगितले होते; परंतु मला मात्र तेथे चांगला अनुभव आला.) मी त्यांना साधना सांगितली. तेव्हापासून ते सनातनची सात्त्विक उत्पादने घेऊ लागले. त्यांनी रविवारचे दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंकही चालू केले. तेथील पोलीस मला त्यांच्या घरातील अडचणी सांगायचे. तेव्हा मी त्यांना सांगायचे, ‘‘तुम्ही क्षमायाचना करा. काही चुकत असल्यास देवाची क्षमा मागा. चांगल्या मार्गाने पैसे मिळवा. कुलदेव आणि दत्त यांचा नामजप करा.’’ नंतर ते ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदारही झाले.

९ इ. एका राजकारण्यांकडे गेल्यावर आलेली अनुभूती

एका राजकारण्यांनी सनातनची २ पंचांगे घेतली होती. त्यांनी १ पंचांग घरी ठेवून दुसरे मंदिरात लावण्यासाठी ते घेऊन जात होते. त्याच वेळी त्यांच्यावर आक्रमण झाले; परंतु पंचांग हातात असल्यामुळे ते वाचले होते, असा त्यांना वाटत होते त्यामुळे त्यांचा सनातनवर पुष्कळ विश्वास बसला. तेव्हापासून ते मला ‘आई’ म्हणतात. मी त्यांच्याकडे गेले, तर तेथे त्यांच्याकडे आलेल्या लोकांच्या समक्षच ते माझ्या पाया पडतात. मी त्यांना थांबवते; पण ते ऐकत नाहीत. ते सनातनची उत्पादने आणि गोमूत्रअर्काच्या ५० ते १०० बाटल्या घेतात. गुरुपौर्णिमेचे अर्पण देतांनाही ‘किती हवे ?’, असे विचारतात.

९ ई. गुरुदेवांना प्रार्थना करताच एका घरातील भांडण थांबणे

एकदा मी एका घरात गेले. तेव्हा त्या घरात भांडण चालू होते. समजावूनही कुणी ऐकत नव्हते. प्रकरण हमरीतुमरीवर आले होते. मी गुरुदेवांना प्रार्थना केली आणि थोड्याच वेळात ते भांडण थांबले. अशा अनुभूती मला पुष्कळ वेळा येतात.

 

१०. अनिष्ट शक्तींचा झालेला त्रास

‘वर्ष २००९ मध्ये एकदा मी कामावरून आले. तेव्हा ‘मला काहीतरी होत आहे’, असे रात्री १० वाजेपर्यंत मला जाणवत होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास माझे डोके पुष्कळ दुखायला लागले आणि मला झटके (फीट येऊन बेशुद्ध होणे) येऊ लागले. तेव्हा माझ्या यजमानांनी आमच्या खालच्या माळ्यावर रहाणार्‍या एका काकांना बोलावले. त्या वेळी लोकांना वाटले, ‘‘या गेल्या.’’ त्या काकांनी यजमानांना सनातनच्या साधकांना बोलावण्यास सांगितले. तेव्हा रात्र झाली असूनही सनातनचे साधक श्री. ढोबळेकाका यांनी घरी येऊन अत्तर आणि कापूर लावणे, सात्त्विक उदबत्ती लावणे, खोके लावणे, आवरण काढणे, यांसारखे आध्यात्मिक उपाय केले. नंतर मी ‘कृष्ण, कृष्ण’, असे म्हणत शुद्धीवर आले.

रात्री मला रुग्णालयात नेले. श्री. ढोबळेकाकांनी रुग्णालयातही माझ्यावर नामजपादी उपाय केले. नंतर माझे ‘सीटी स्कॅन’ करण्यात आले. त्याचा अहवाल पाहून आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘यांना काहीच झाले नाही. यांना घरी न्या.’’ हा अनिष्ट शक्तींचा त्रासच होता.

 

११. रामनाथी आश्रमात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी भावस्पर्शी भेट !

मी रामनाथी आश्रमात आल्यावर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ (आताच्या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले. त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्हाला कधी भेटते ?’, असे मला वाटत होते.’’ त्यांनी अत्यंत आपुलकीने माझ्या घरच्या परिस्थितीविषयी विचारले. त्या म्हणाल्या, ‘‘गुरुदेव सर्व बघतील.’’

तेव्हा मला वाटले, ‘जीवनात १०० धागे दुःखाचे असले, तरी एक धागा सुखाचा असतोच’, हे मला आज अनुभवायला मिळाले.’

 

१२. रामनाथी आश्रमात आल्यावर आलेली अनुभूती

अ. मला रामनाथी आश्रमात आल्यावर श्री लक्ष्मी-नारायण यांचे अस्तित्व जाणवले. ‘श्री लक्ष्मी-नारायण यांच्यावर अभिषेक होत आहे. सगळे जण त्यांच्या चरणांना स्पर्श करत आहेत.’ हे मला आधीही जाणवले होते.

आ. मला गुरुदेवांची खोली ठाऊक नव्हती; परंतु मला स्वप्नात त्यांची खोली दिसली होती. मी रामनाथी आश्रमात आल्यावर माझ्या लक्षात आले, ‘मला स्वप्नात दिसलेल्या जागीच गुरुदेवांची खोली आहे.

इ. लागवडीतील वृक्ष पाहून मला आनंद झाला. ती झाडे म्हणजे पूर्वजन्मातील साधक आहेत. त्या वृक्षांचीही साधना आहे.

 

१३. साधनेत आल्यावर जाणवलेले पालट

पूर्वी मला ‘माझा रंग काळा आहे’, याचे वाईट वाटायचे. लोक मला टोचून बोलायचे, ‘‘तुम्ही ब्राह्मणाच्या घरी वाढलात. मग तुमचे रंग-रूप असे कसे आहे ?’’

आता मला वाटते, ‘ते अज्ञानी होते. त्या वेळी मीही अज्ञानी असल्याने लोकांचे बोलणे ऐकून मला राग यायचा; परंतु आता ‘कृष्णाने माझ्याकडून साधना करवून घेऊन मला सुंदर घडवले आहे’, या विचाराने मी आनंदात आहे.

– (पू.) सौ. संगीता पाटील, भोसरी, पुणे.

१४. ओघवत्या वाणीतून साधकांना भावविश्वात डुंबवणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील !

‘पू. (सौ.) संगीता पाटील यांनी रामनाथी आश्रमात आल्यानंतर केलेल्या मार्गदर्शनातून पुढील सूत्रे जाणवली.

१. ‘पू. (सौ.) संगीता पाटील यांनी सुंदर मार्गदर्शन केले आहे. त्या संत जनाबाई, संत सखूबाई यांच्याप्रमाणे देवाची भक्ती करत आहेत. या संतांप्रमाणेच त्यांनी कठीण परिस्थितीत देवाचे साहाय्य घेऊन आध्यात्मिक उन्नती केली.

२. त्यांनी ओघवत्या वाणीतून गुरूंचे गुणवर्णन आणि त्यांचे अनुभव सांगितले. ते ऐकून आम्ही सर्व भगवंताच्या चैतन्यात न्हाऊन निघालो. ‘त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे आम्हाला वाटत होते. त्यांनी आम्हाला भावविश्वात (गुरुदेवांच्या विश्वात) डुंबवले.

३. त्यांनी सांगितलेली सूत्रे साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी निश्चितच मार्गदर्शक आहेत.’

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

१५. (पू.) सौ. संगीता पाटील यांनी साधकांसाठी दिलेला संदेश

अ. ईश्वर एका क्षणात काहीही घडवू शकतो. आपण अपेक्षा करायची नाही. आपण केवळ गुरुदेवांच्या चरणांवर लीन रहायचे.

आ. जीवनात कितीही बिकट प्रसंग आला, तरीही साधना सोडायची नाही.

इ. साधकांनी स्वतःची चूक मान्य करावी आणि तिच्यातून शिकून स्वतःत पालट घडवण्यासाठी प्रयत्न करावेत. मनात अपराधी भाव ठेवावा. गुरुदेवांचे सतत स्मरण करावे.

ई. ज्यांना गुरुप्राप्ती झाली नसेल, त्यांना सांभाळणारे गुरुदेवच आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment