परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणार्‍या पारतखेडा (जिल्हा जळगाव) येथील सनातनच्या ६८ व्या संत पू. (सौ.) केवळबाई पाटील (वय ७९ वर्षे) !

अनुक्रमणिका

आज आपण सनातनच्या ६८ व्या संत पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांचा साधनाप्रवास आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे पाहूया.

जन्मदिनांक : १.१०.१९४३

वाढदिवस : आश्विन शुक्ल पक्ष द्वितीया (८.१०.२०२१)

संतपदी विराजमान : २ जुलै २०१७

 

पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांचा परिचय

पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांनी साधनेला आरंभ केल्यानंतर त्यांच्या गावात पारतखेडा (जिल्हा जळगाव) येथे त्यांनी सनातनच्या सत्संगाचा प्रसार केला. तसेच त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने यांचेही वितरण केले. जळगाव सेवाकेंद्रात जाऊन त्या सेवाही करायच्या. आता त्या समष्टीसाठी नामजप करतात.

पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांचा साधनाप्रवास पहाता ‘लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये संतत्वाचे गुण होतेच’, असे लक्षात येते, उदा. कुणी कसेही वागले, तरी मनात राग न रहाणे, प्रतिक्रिया न येणे, सर्वांविषयी प्रेम अन् आदरभाव असणे इत्यादी. या लेखावरून त्यांची उतारवयातही साधनेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेला अपार भाव लक्षात येतो. पू. आजींचा साधनाप्रवास आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. वनिता पाटील

 

१. जन्म

‘पू. (सौ.) आईंचा (सासूबाईंचा) जन्म पारतखेडा (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे अत्यंत सधन कुटुंबात झाला. त्यांचे नाव ‘केवळबाई’ असून त्यांना सासरी आणि माहेरी ‘आक्काबाई’ या नावाने संबोधतात. त्यांच्या वडिलांचे नाव ‘विठ्ठल’ आणि आईचे नाव ‘लक्ष्मी’ होते.

 

२. वैवाहिक जीवन

२ अ. सासरच्या व्यक्तींची मने सांभाळणे

पू. आईंचे सासू-सासरे प्रेमळ होते; मात्र त्यांच्या २ नणंदा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायच्या. त्या पू. आजींनी माहेरून आणलेल्या नवीन साड्या आणि पादत्राणे घेऊन जायच्या. पू. आजी नणंदांना स्वतःची पादत्राणे देऊन स्वतः शेतात अनवाणी जायच्या; पण तरी त्यांच्या मनात कुणाविषयीही राग नसे. त्या नातेवाइकांची मने सांभाळून रहात असत. कुणी कितीही वाईट वागले, तरी त्या प्रतिक्रिया व्यक्त करत नसत.

२ आ. मुलांवर चांगले संस्कार करणे

पू. आई नेहमी देवाला नैवेद्य दाखवल्यावरच जेवतात. त्या प्रत्येक शनिवारी मारुतीला तेल वहायच्या. त्या मुलांना देवपूजा करायला आणि शाळेत जातांना देवाला नमस्कार करून जायला सांगायच्या. गावातील कीर्तन सप्ताहात त्या मुलांना त्यांच्या समवेत घेऊन जायच्या, तसेच त्यांना गावातील मंदिरांची स्वच्छता करायला सांगायच्या. त्या मुलांना गोसेवा आणि प्राणिमात्रांवर प्रेम करायला सांगायच्या.

२ आ १. पू. आजींनी मुलांना दिलेली शिकवण

अ. खोटे बोलू नये. चोरी करू नये. तसे केल्यास देव शिक्षा करील. देवाला सर्व कळते. तो सर्व पहातो. कुणी कितीही वाईट वागले, तरी आपण तसे वागू नये. देव त्यांना शिक्षा करील. आपण शांत रहावे.

आ. आपल्या दाराशी कुणी आले, तर त्याला रिकाम्या हाती पाठवू नये.

इ. काही विपरीत घडले, तरी देवाला कधीही दोष देऊ नये.

 

३. पू. आजींची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

३ अ. भूतदया

त्यांचे पशू, पक्षी आणि प्राणी यांच्यावर पुष्कळ प्रेम आहे. त्या शेतात चिमण्या आणि पाखरे यांच्यासाठी दाणे अन् पाणी ठेवायच्या.

३ अ १. पू. आजींमधील प्रेमभावामुळे प्राण्यांनी दिलेला प्रतिसाद

अ. आमच्याकडे मोठा नंदी (बैल) होता. तो पुष्कळ रागीट होता. तो कुणालाही जवळ येऊ देत नसे; मात्र पू. आजी त्याच्याजवळ गेल्यावर तो मान खाली घालायचा. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटायचे.

आ. आमच्याकडे ८ – १० गायी होत्या. पू. आईंनी गायींना हाक मारल्यानंतर त्या पू. आईंजवळ येत असत. पू. आई गावाला गेल्यावर एक गाय सतत हंबरत असे आणि चारा खात नसे. ती पू. आईंची वाट पहात असे. पू. आई लांबून येतांना दिसल्यावर ती लगेच पळत त्यांच्याजवळ जात असे.

इ. आमच्या शेतात जाण्याच्या मार्गावर एक कुत्रा होता. तो कुत्रा त्या मार्गाने कुणालाही जाऊ देत नसे. तो शेळी आणि लहान पिल्ले यांना पकडायचा, तसेच लहान मुलांना चावायचा; मात्र पू. आई तेथून जातांना तो दूर झाडाखाली जाऊन बसायचा. तो त्यांच्यावर कधीच भुंकला नाही किंवा त्यांना चावला नाही.

३ आ. सात्त्विक वृत्ती

१. पू. आई अग्निदेवतेला त्यांनी केलेल्या पहिल्या भाकरीचा नैवेद्य दाखवायच्या. त्या साधूंना शिधा द्यायच्या. त्या गायीची पूजा करून तिला भाकरी द्यायच्या.

२. त्या गावातील हरिनाम कीर्तन सप्ताहाला सर्व दिवस उपस्थित रहायच्या. त्या अशिक्षित होत्या; पण भजन, कीर्तन, पोथी इत्यादी ऐकून रामायण, महाभारत यांतील, तसेच संत तुकाराम, संत जनाबाई, संत मीराबाई, भक्त प्रल्हाद यांच्या गोष्टी सांगायच्या.

३. त्यांना पूर्वीपासूनच संत आणि साधक यांच्याप्रती अपार प्रेम वाटायचे.

३ इ. आज्ञापालन

वयाच्या ७० व्या वर्षापासून त्यांनी श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) आज्ञापालनाला प्रारंभ केला. त्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘साधकांसाठीच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करतात. त्या नियमितपणे मीठ-पाण्याचे उपाय आणि बसून ७ – ८ घंटे नामजप करतात.

३ ई. सेवेची तळमळ

पू. आईंचे वय ७९ वर्षे आहे. या वयातही त्या नेहमी उत्साही असतात. आम्ही त्यांना सांगतो, ‘‘तुम्ही आमच्याकडे नंदुरबारलाच रहा.’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आम्ही गावात राहिल्यामुळे येथील लोकांना सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करू शकतो. अंगात शक्ती असेपर्यंत सेवा करत रहायची.’’

३ उ. श्रद्धा

३ उ १. देवावरील श्रद्धा

वर्ष १९७२ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. शेतात काहीच पिकत नव्हते. भाकरीबरोबर खायला केवळ कोरडी मिरची पूड असायची; पण त्यांनी देवाला कधीच दोष दिला नाही. ‘कृष्ण माझी काळजी घेईल. तो मला एक दिवस या संकटातून बाहेर काढील’, असा त्यांची श्रद्धा होती.

३ उ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा

हिंदु राष्ट्र-जागृती सभा निर्विघ्नपणे पार पडावी’ आणि त्या ठिकाणी त्रास होत असलेल्या साधकांसाठी पू. आई नामजप करतात. त्या साधकांना सांगतात, ‘‘गुरुदेव सर्व करवून घेतील. काळजी करू नका. ते साक्षात् ईश्वर आहेत.’’

३ ऊ. भाव

१. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या कालावधीत ‘सभा निर्विघ्नपणे पार पडावी’, यासाठी त्या ८ – ९ घंटे नामजप करतात. तेव्हा त्यांचे पाय सुजतात, तरी त्यांना त्रास होत नाही. पायांना विभूती लावून घेतल्यावर ‘गुरुदेवांनी मला भले मोठे ‘टॉनिक’ दिले’, असे त्यांना वाटते.

२. आम्ही त्यांना विचारतो, ‘‘तुम्हाला साधनेत येऊन १४ वर्षे होत आहेत. ‘गुरुदेवांना भेटावे’, असे तुम्हाला वाटत नाही का ?’’ त्यावर त्या भावपूर्ण स्मितहास्य करून सांगतात, ‘‘ते (प.पू. गुरुदेव) सूक्ष्मातून सतत माझ्या समवेतच असतात, म्हणजे मीही त्यांच्याजवळच असते. आम्ही सतत भेटतो.’’

३. पू. आई पुष्पहार करून तो प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेला घालतात.

४. त्या सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात. त्या सर्व कृती गुरुदेवांना सूक्ष्मातून विचारून करतात.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले रुग्णाईत असतांना पू. आई त्यांच्यासाठी देवतांचा धावा करतात. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना बरे वाटावे’, यासाठी त्या ७ – ८ घंटे नामजप करतात.

६. ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने साधकांची साधना वाढावी’, यासाठी त्या देवाला सतत प्रार्थना करतात.

– सौ. वनिता पाटील (पू. आजींची सून), चाळीसगाव (जुलै २०१८)
‘देव भक्ताच्या हाकेला धावून येतो’, याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. त्याविषयीच्या कथाही आपण ऐकल्या आहेत. संत सखूबाई, संत जनाबाई, संत गोरा कुंभार अशी अनेक उदाहरणे पूर्वी होऊन गेली आणि आजही पहायला मिळतात. त्यांतील एक उदाहरण म्हणजे जळगाव येथील सनातनच्या ६८ व्या संत पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी ! ‘देवावर दृढ श्रद्धा असेल, तर देव भक्ताचे बोल खरे करतोच’, याची अनुभूती पू. आजींच्या संदर्भात त्यांच्या गावातल्या लोकांना आली.

१५.५.२०१८ या दिवशी पू. (सौ.) पाटीलआजी त्यांच्या कुटुंबियांच्या समवेत रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्यांच्या समवेत पू. आजींचे यजमान श्री. जामराव पाटील, मुलगा श्री. वसंत पाटील, सून सौ. वनिता पाटील आणि नातू कु. जयेश पाटील आले होते. त्या वेळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी पू. (सौ.) पाटीलआजींची मुलाखत घेतली. तेव्हा त्यांच्याशी झालेल्या संवादातून पू. आजींची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असलेली अपार श्रद्धा जाणवते.

पू. आजींची परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्यावर दृढ श्रद्धा असल्यामुळे गावातल्या लोकांना त्यांच्याविषयी पुष्कळ चांगल्या अनुभूती आल्या. ‘पू. (सौ.) पाटीलआजींच्या श्रद्धेमुळे देव कसा धावून आला ?’, हे आता पाहूया.

डावीकडून मुलाखत घेतांना ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर, श्री. वसंत पाटील (पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजींचा मुलगा), पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजींचे यजमान श्री. जामराव पाटील, पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी, सून सौ. वनिता पाटील आणि नातू कु. जयेश पाटील

 

४. पू. आजींनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने गावातील लोकांना आलेल्या अनुभूती

४ अ. गरीब परिस्थितीमुळे शस्त्रकर्म करू न शकणार्‍या महिलेला
पू. (सौ.) पाटीलआजींनी नामजपादी उपाय करायला सांगणे आणि ते केल्यावर एका मासात तिला बरे वाटणे

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, तुम्हाला काही अनुभूती सांगायच्या आहेत का ?

पू. (सौ.) पाटीलआजी : एक गरीब महिला होती. ती रुग्णालयात गेल्यावर तिच्याकडे पैसे नसल्याने आधुनिक वैद्यांनी ‘तुमची शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही’, असे सांगून तिला परत पाठवले. ती घरी आल्यावर रडायला लागली. तेव्हा तेथील एका दुकानातील बाईने तिला सांगितले, ‘‘तू पाटीलआजींकडे जा. त्यांच्याकडे देवाचे काहीतरी औषध आहे. ते घेतल्याने तुला पालट जाणवेल.’’ मग ती महिला मला भेटायला आली आणि तिने मला विचारले, ‘‘आमच्याजवळ पैसे नाहीत. मग काय करायचे ?’’ त्यावर मी तिला म्हणाले, ‘‘नामजप करशील का ? मी माझ्या गुरूंचे औषध देते. ते घेऊन जा. त्याबरोबर इतर वैद्यकीय उपायही कर.’’ मी तिला गोमूत्रात विभूती घालून दिली आणि दत्त अन् कुलदेवता यांचा नामजप करायला सांगितला. ‘तुला पालट जाणवला, तर माझ्याकडे येऊन हे औषध घेऊन जा’, असे सांगितले. तिने ते औषध (विभूती) लावली आणि मला म्हणाली, ‘‘मला आताच ते औषध द्या. मी घेऊन जाते. इतक्यातच मला बरे वाटले.’’ मग ती माझ्याकडून उदबत्तीचा पुडा, गोमूत्र आणि कापराची डबी घेऊन गेली. मी तिला सांगितले, ‘‘देवासमोर बसून उदबत्ती लाव.’’ त्यानंतर तिला हा उपाय करायची ओढ लागली आणि ती एका मासात बरी झाली.

४ अ १. बरी झालेली महिला आणि तिचे यजमान यांनी पू. आजींना भेटणे आणि महिलेच्या यजमानांनी ‘तुम्ही माझ्या बायकोला जीवदान दिले’, असे पू. आजींना म्हटल्यावर पू. आजींनी कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणे

त्यानंतर ती आणि तिचे यजमान मला भेटायला आले. तिचे यजमान मला म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्या बायकोला जीवदान दिले.’’ ते मला नमस्कार करायला लागले. मी त्यांना म्हणाले, ‘‘मला नमस्कार करू नका. मी काय केले ? (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवून) यांनीच केले. यांना नमस्कार करा. हे डॉक्टर आहेत. त्यांनी हे औषध दिले. ते मी तुम्हाला दिले. मी काहीच केले नाही. माझ्या डॉक्टरांच्या औषधाने तुम्हाला पालट जाणवला आणि तुम्ही जिवंत राहिलात. मी नव्हे, तर त्यांनीच तुम्हाला जीवदान दिले.’’

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, तुमच्या श्रद्धेमुळे झाले ना !

पू. (सौ.) पाटीलआजी : परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सुचवले.

४ आ. त्वचेला खाज येणार्‍या लोकांनी पू. आजींनी
सांगितल्याप्रमाणे सनातनचा तुलसी आणि नीम साबण वापरल्यावर त्यांना पालट जाणवणे

पू. (सौ.) पाटीलआजी : गावातील पुष्कळ जणांच्या त्वचेला खाज यायची. मी त्यांना सनातनचा तुलसी आणि नीम साबण वापरून पहाण्यास सांगितले. तेव्हा त्यांना पुष्कळ पालट जाणवला. मग ते माझ्याकडे यायचे आणि २ – ३ साबण घेऊन जायचे. त्यांना वाटायचे, ‘आपण रुग्णालयात पैसे घालवले. त्यापेक्षा आता आजींकडून साबण घेऊया.’ त्यामुळे साबण कधी शिल्लक रहात नसत.

श्री. वसंत पाटील (पू. (सौ.) पाटीलआजींचा मुलगा) : ‘पू. आजींकडे गेल्यावर सात्त्विक उत्पादने मिळतात’, असे गावातील सर्व लोकांना समजले. पू. आजी प.पू. गुरुदेवांना भावपूर्ण प्रार्थना करूनच सात्त्विक उत्पादने देतात. त्यांच्या भावामुळे देवाला सगळे करावे लागते. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात सनातनचा प्रसार होऊ लागला.

कु. प्रियांका लोटलीकर : एरव्ही साधकांना घरोघरी जाऊन प्रसार करावा लागतो; पण इथे सगळे जण स्वतःहूनच पू. आजींकडे उत्पादने घ्यायला येतात.

४ इ. एका गावकर्‍याच्या शेतात आलेला नाग त्यांना
शेतात येऊ देत नसणे आणि पू. (सौ.) आजींनी सांगितलेले उपाय केल्यावर तो शेतातून निघून जाणे

पू. (सौ.) पाटीलआजी : एकदा एका गावकर्‍याच्या शेतात एक मोठा नाग आला होता. तो त्यांना शेतात येऊ देत नसे. त्यावर उपाय म्हणून त्यांनी ‘नारायण नागबळी’ हा विधी केला. त्यांना एका ज्योतिषाने सांगितले, ‘‘जेव्हा तुमच्या घरातून एक जीव (एकाचा प्राण) जाईल, तेव्हाच तो नाग तुमच्या शेतातून जाईल.’’

कु. प्रियांका लोटलीकर : म्हणजे त्यांच्या घरातील कुणीतरी वारल्यानंतरच तो शेतातून जाईल !

पू. (सौ.) पाटीलआजी : त्यांनी एक दिवस १० ते १२ जणांना बोलावले आणि नागाला मारायला सांगितले; पण ते लोक त्यांना म्हणाले, ‘‘आम्ही कशाला मारू ? आम्ही मारणार नाही आणि याला कोण मारेल ? हा तर एवढे वेटोळे करून बसला आहे. तो कुणाला जिवंत ठेवील का ?’’ त्याला कुणीही हात लावला नाही. मग ते आमच्याकडे आले. आमच्या घरी येऊन बसल्यावर त्यांना पुष्कळ रडू आले. ते म्हणाले, ‘‘तो नाग माझ्या म्हशीला चावला. ती मेली. माझी ५० ते ६० सहस्र रुपयांची हानी झाली. आता काय करायचे ? तो माझ्या घरातील एक जीव घेणार.’’ मी म्हणाले, ‘‘काही जीव घेणार नाही. तुम्ही बसा.’’ मी त्यांना सरबत करून दिले आणि नंतर माझ्याकडील शिवाची ३ पदके त्यांना दिली आणि ती गळ्यात घालायला सांगितली. आपल्या गुरुदेवांचे औषध म्हणून विभूती दिली आणि सांगितले, ‘‘तुम्ही शिवाचा नामजप करत ही विभूती सगळ्या शेतात टाका.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘तो नाग आम्हाला शेतात येऊ देत नाही.’’ मी म्हणाले, ‘‘तुम्ही ही पदके गळ्यात घाला आणि शेतात जा. तुम्हाला तो नाग दिसतो का, ते पहा.’’ दुसर्‍या दिवशी त्यांनी ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करत शेतात विभूती फुंकरली. त्या दिवसापासून त्यांना तो नाग दिसला नाही. त्यानंतर दुसर्‍या दिवशी ते आनंदाने आमच्या घरी आले आणि म्हणाले, ‘‘मी आधीच तुमच्याकडे आलो असतो, तर माझी हानी झाली नसती.’’ प.पू. गुरुदेव किती महान आहेत ना !

४ ई. साधकांना त्रास झाल्यास पू. आजींनी
श्री गुरूंचे औषध म्हणून त्यांना विभूती देणे आणि साधकांना त्या संदर्भात अनुभूती येणे

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजींच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील अपार श्रद्धेमुळे सनातनच्या कुठल्याही उत्पादनाच्या संदर्भात, म्हणजे उदबत्ती, पदक किंवा साबण यांच्या संदर्भात इतरांना अनुभूती येते.

श्री. वसंत पाटील (पू. आजींचा मुलगा) : हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या किंवा प्रसाराच्या वेळी जळगाव सेवाकेंद्रात साधकांना थोडा त्रास जाणवायला लागला की, पू. आजी श्री गुरूंचे औषध म्हणून साधकांना विभूती द्यायच्या. बर्‍याच साधकांना त्या संदर्भात अनुभूती आली. पू. आजी प्रत्येक वेळी श्रद्धापूर्वक विभूती द्यायच्या आणि कर्तेपण स्वतःकडे घ्यायच्या नाहीत. ‘श्री गुरूंनीच सगळे केले’, असा त्यांचा भाव असायचा.

४ उ. गावातील मुलीला प्राणी चावल्याने आधुनिक वैद्यांनी ‘ती जगणार नाही’,
असे सांगणे, पू. आजींनी सांगितलेले उपाय केल्यावर एका मासाने ती मुलगी पूर्णपणे
बरी होणे आणि त्यामुळे गावातील लोक पू. आजींना ‘सनातनच्या डॉक्टर’ म्हणू लागणे

कु. जयेश पाटील (पू. आजींचा नातू) : आमच्या घराजवळ एक मुलगी होती. खेळतांना तिला कोणतातरी प्राणी चावला. घरातील लोक तिला आधुनिक वैद्यांकडे घेऊन गेले; पण त्यांनी स्पष्ट सांगितले, ‘‘आता काही उपयोग नाही. मुलगी असेपर्यंत तिचा सांभाळ करा. ती जगणार नाही.’’ त्या मुलीची आई पुष्कळ रडायला लागली. ती पू. आजींकडे आली. पू. आजींनी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही काळजी करू नका.’’ पू. आजींनी विभूती, गोमूत्र आणि कापूर एकत्र करून त्यांचा लेप त्या मुलीला जेथे प्राणी चावला होता, तेथे लावला. त्यानंतर पू. आजींनी त्यांना सांगितले, ‘‘मुलगी लहान आहे. तिच्या डोक्यावर हात ठेवून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि तुमची कुलदेवता यांचा नामजप करा.’’ असे केल्यावर एका मासाने त्या मुलीची जखम पूर्णपणे बरी झाली. तेव्हा आधुनिक वैद्यांनाही आश्‍चर्य वाटले. ते म्हणाले, ‘‘हे कसे शक्य झाले ?’’ पू. आजींच्या या औषधामुळे गावात सगळे त्यांना ‘सनातनच्या डॉक्टर’ म्हणायला लागले.

४ ऊ. मुलगा लहान असतांना त्याला ताप आल्यावर
पू. आजींनी श्रीकृष्णाला प्रार्थना करून चुलीतली राख लावल्यावर मुलाला बरे वाटणे

श्री. वसंत पाटील (पू. आजींचा मुलगा) : मला अजूनही आठवते, ‘मी लहान असतांना मला ताप आला की, पू. आजी चुलीतली चिमूटभर राख घ्यायच्या आणि ती हातात घेऊन देवाशी काहीतरी बोलायच्या. त्यानंतर मला ती लावून झोपायला सांगायच्या. त्यानंतर तापही उतरायचा आणि मला बरे वाटायचे.’

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, त्या वेळी राख हातात घेऊन तुम्ही काय बोलायचात ?

पू. (सौ.) पाटीलआजी : मी कृष्णाला हाक मारून सांगायचे, ‘कृष्णा, तू आहेस. मी तुझेच औषध लावते’ आणि मी चुलीतली राख मुलाला लावायला सांगायचे. मी आधीपासून असाच भाव ठेवायचे.’

 

५. रामनाथी आश्रमात आल्यावर पू. आजी
आणि त्यांचे कुटुंबीय यांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आधी सूक्ष्मातून
आणि नंतर स्थुलातून भेटतांना पू. आजींना सारखेच वाटणे

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, तुम्हाला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले दिसायचे. आता तुम्ही रामनाथी आश्रमात आलात आणि तुम्हाला प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉ. आठवले भेटले. ‘त्यांचे सूक्ष्मातून भेटणे अन् स्थुलातून भेटणे’ या दोन्हींमध्ये तुम्हाला काय भेद जाणवला ?

पू. (सौ.) पाटीलआजी : दोन्हींमध्ये मला काहीच भेद वाटला नाही. त्यांना स्थुलातून बघून मला पुष्कळ छान वाटले. आधी ते सूक्ष्मातून माझ्या समवेत असायचे. तेव्हा ‘ते आपल्या जवळच आहेत’, असे मला वाटायचे. मी आता इथे आले आणि डोळ्यांनी त्यांचे रूप बघितले. तेव्हा मला वाटले, ‘गुरुदेवा, तुम्ही किती महान आहात ! तुम्ही सर्वांची किती काळजी घेता !’ गुरुदेवांना आणि येथील सगळ्या साधकांना बघून मला वाटले, ‘इथे (आश्रमात) रहातात, त्यांचे पुष्कळ भाग्य आहे.’

५ आ. ‘गुरुदेवच भगवंत आहेत’, अशी पू. आजींची श्रद्धा असणे

पू. (सौ.) पाटीलआजी : मी गुरुदेवांना हाक मारायचे आणि त्यांनाच ‘आता काय करायचे ?’, असे विचारायचे. तेच माझ्याकडून सर्व करवून घेत आहेत. आपल्याकडून काही होत नाही. त्यांनीच माझ्याकडून सेवा करवून घेतली. त्यांनीच मला साधनेत आणले. भगवंतानेच मला त्याच्याकडे बोलावून घेतले. ‘गुरुदेव माझे भगवंतच आहेत’, अशी माझी श्रद्धा आहे.

५ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विष्णुरूपात पूर्वीच दर्शन दिल्याचे पू. आजींनी सांगणे

पू. (सौ.) पाटीलआजी : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी साधकांना विष्णुरूपात दर्शन दिले. त्यांनी मला या रूपात आधीच दर्शन दिले होते.

५ ई. गुरुदेवांना भेटल्यावर पू. आजींच्या यजमानांना देव भेटल्याचे समाधान मिळणे

कु. प्रियांका लोटलीकर : आजोबा (पू. पाटीलआजींचे यजमान), तुम्हीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटलात. त्या वेळी तुम्हाला काय वाटले ?

श्री. जामराव पाटील (पू. (सौ.) पाटीलआजींचे यजमान) : मला देवच भेटला. ‘मला गुरुदेवांना भेटायचे आहे’, असा मी देवाचा धावाही केला होता. त्यांना भेटून माझ्या मनाला पुष्कळ समाधान मिळाले. ‘त्यांच्याशी आणखी २ घंटे बोलणे व्हायला पाहिजे होते’, असे मला वाटले.

५ उ. रामनाथी आश्रमात आल्यावर पू. आजींना पंढरपूरच्या
विठ्ठल मंदिरात आल्याप्रमाणे प्रसन्न वाटणे आणि त्यांना आश्रमात गुरुदेवांचे सूक्ष्म अस्तित्व जाणवणे

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, पूर्वी तुम्ही पंढरपूरला जात होता आणि आता रामनाथी आश्रमात आलात. तुम्हाला काय वाटले ?

पू. (सौ.) पाटीलआजी : मला पंढरपूरच्या मंदिरात आल्यासारखे वाटले. पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यावर तेथे प्रसन्न वाटायचे, तसेच गुरुदेवांच्या आश्रमात आल्यावर प्रसन्न वाटले. मी रामनाथीचे मंदिर आणि कळस बघितला. आश्रमातील खोल्यांमध्ये फिरले. त्या वेळी ‘इथे गुरुदेव आहेत’, असे मला वाटायचे.

कु. प्रियांका लोटलीकर : तुम्हाला आश्रमात प्रत्येक ठिकाणी गुरुदेवांचे अस्तित्व जाणवले ना ?

पू. (सौ.) पाटीलआजी : आश्रमात फिरतांना २ – ४ ठिकाणी तरी मला ते सूक्ष्मातून दिसले.

५ ऊ. पू. आजी आणि त्यांची सून यांना आश्रमातील प्रत्येक साधकात कृष्ण अन् गुरुदेव यांचे दर्शन होणे

सौ. वनिता पाटील (पू. (सौ.) पाटीलआजींची सून) : पू. आजींना आम्ही आश्रम पहाण्यासाठी घेऊन जात होतो. तेव्हा त्या प्रत्येक साधकाकडे बघत उभ्या रहायच्या. त्या वेळी मी त्यांना म्हणायचे, ‘‘चला.’’ त्यावर त्या म्हणायच्या, ‘‘प्रत्येक साधकात मला कृष्ण आणि गुरुदेव दिसतात. मला पुष्कळ वेगळे वाटत आहे.’’

आश्रमात आल्यावर मलाही सगळ्या साधकांमध्ये गुरुदेवांचे दर्शन झाले. मला श्रीकृष्णाचेही दर्शन झाले आणि पुष्कळ छान वाटले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट झाली. त्या वेळी मला पुष्कळ आनंद वाटत होता.

 

६. रामनाथी आश्रमात आल्यावर
आश्रमातील चैतन्य अनुभवण्याची पू. (सौ.) पाटीलआजींची तळमळ !

सौ. वनिता पाटील (पू. (सौ.) पाटीलआजींची सून) : एका ताईने आम्हाला ‘सकाळी ८ वाजता ध्यानमंदिरात आरती असते’, असे सांगितले. पू. आजींना त्या आरतीला जाता आले नाही. त्या वेळी पू. आजींना त्याची पुष्कळ खंत वाटत होती. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी पटकन आवरले. मग आम्ही आरतीला गेलो.

पू. (सौ.) पाटीलआजी : जळगावला गेल्यावर एक दिवसही आरती चुकली नाही. आरती झाली की, मी नामजपाला बसायचे.

सौ. वनिता पाटील (पू. (सौ.) पाटीलआजींची सून) : पू. आजी सारख्या ध्यानमंदिरात जातात. त्या मला म्हणाल्या, ‘‘आपल्याला इथे किती दिवस रहायला मिळणार ? आपण इथे आहोत, तोपर्यंत मला ध्यानमंदिरात बसायचे आहे. इथले सर्व अनुभवायचे आहे.’’

पू. (सौ.) पाटीलआजी : ‘ध्यानमंदिरातून उठावे’, असे वाटतच नाही. गुरुदेव किती महान आहेत ! त्यांनी किती केले आहे !

 

७. प.पू. गुरुदेवांच्या भेटीच्या वेळी ‘पू. आजींचे देवाशी
अनुसंधान चालू असून त्यांची दृष्टी केवळ ईश्वरालाच बघत आहे’, अशी अनुभूती
साधकांना येणे आणि त्या वेळी साधकांच्या मनात केवळ देवाविषयीचे विचार येणे

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, तुमची प.पू. गुरुदेवांशी भेट झाली. त्या वेळी तेथे काही साधक होते. तेव्हा ‘तुमचे देवाशी अनुसंधान चालू असून तुमची दृष्टी केवळ ईश्वरालाच बघत आहे’, अशी अनुभूती त्या साधकांना आली. त्यामुळे साधकांना स्वतःचा विसर पडला. त्यांच्या मनात स्वतःविषयीचे विचार न येता केवळ देवाविषयीचे विचार आले. बिंब-प्रतिबिंब असते, तसे झाले. ‘पू. आजी सतत देवाच्या विचारात असल्याने साधकांनाही त्यांचा लाभ होत होता’, अशा अनुभूती साधकांनी सांगितल्या.

 

८. आजी संत होण्याच्या संदर्भात साधकांना मिळालेली पूर्वसूचना

अ. पू. आजी परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या वेळी कार्यक्रम चालू झाल्यापासून
शेवटपर्यंत तेथून न हालणे आणि तेव्हा ‘त्या संत झाल्या आहेत’, असे साधकांना जाणवणे

सौ. वनिता पाटील (पू. (सौ.) पाटीलआजींची सून) : गेल्या वर्षी परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला पू. आजी आल्या होत्या. तो कार्यक्रम चालू झाल्यापासून शेवटपर्यंत पू. आजी तेथून हलल्या नाहीत. तेव्हा ‘आजी संत झाल्या आहेत’, असे साधकांच्या लक्षात आले. त्या वेळी साधकांना पू. आजींविषयी अनुभूतीही आल्या.

 

९. ‘गुरुदेवांचे चरण दिसले, तरच जेवायला बसणार’, असे पू. आजींनी ठरवणे,
पुष्कळ प्रार्थना केल्यावर गुरुदेवांच्या चरणांचे दर्शन होणे आणि नंतरच त्यांनी जेवण करणे

जळगावला हिंदु राष्ट्र-जागृती सभा होती. तेथील सेवाकेंद्रात मी सकाळी मानसपूजा केली. त्यानंतर ‘गुरुदेवा, मला तुमचे चरण पाहिजेत’, असे त्यांना सांगितले. मला चरण दिसले नाहीत; म्हणून मी ‘चरण दिसले, तरच मी जेवायला बसणार’, असे ठरवले. पू. अशोक पात्रीकरकाका मला जेवण्यासाठी बोलवायला आले; पण मी गेले नाही. नंतर मी गुरुदेवांना पुष्कळ प्रार्थना केल्या. तेव्हा मला गुरुदेवांच्या श्री चरणांचे दर्शन झाले. नंतर मी जेवायला गेले.

 

१०. पू. आजींना ‘वाईट शक्ती साधकांना त्रास देत आहेत’, असे दृश्य दिसणे

कु. प्रियांका लोटलीकर : ‘आता आपत्काळात साधकांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे ? कशा प्रकारे देवावर श्रद्धा ठेवायला पाहिजे किंवा या स्थितीत कसा काळ असेल ?’, असे तुम्हाला वाटते.

पू. (सौ.) पाटीलआजी : आपत्काळात साधकांनी साधना आणि नामजप पुष्कळ वाढवायला पाहिजे.

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, तुम्हाला कधी आपत्काळाविषयीची दृश्ये दिसली का ?

पू. (सौ.) पाटीलआजी : मी कधीतरी सभेसाठी जायचे. तेव्हा ‘वाईट शक्ती आली आणि आडवी झाली’, असे दृश्य मला दिसायचे. मी साधकांना विनंती करून सांगायचे, ‘‘दादांनो, व्यवस्थित रहा. तुम्ही काही न करता तुमच्यावर काही आपत्ती येईल. काहीही घडेल. आपण सांभाळून रहायचे. पुष्कळ नामजप आणि प्रार्थना करा.’’ त्यांनाही ते पटायचे.

 

११. हिंदु राष्ट्र-जागृती जागृती सभेसाठी नामजप करतांना
‘सभेत पावसाचा अडथळा येईल’, असे पू. आजींना वाटणे,
त्यांनी ‘सभा निर्विघ्नपणे पार पडावी’, यासाठी पुष्कळ नामजप
करणे आणि त्यानंतर पावसाचे संकट दूर होऊन सभा व्यवस्थित पार पडणे

पू. (सौ.) पाटीलआजी : सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आजी, नामजप करा. मालेगावला हिंदु राष्ट्र-जागृती सभा आहे.’’ त्या वेळी नामजपाला बसल्यावर ‘या सभेत वादळ येईल किंवा पाऊस पडेल’, असे मला वाटले; म्हणून मी अधिकाधिक नामजप करायला लागले. मग मी वायुदेव, निसर्गदेव आणि देवीमाता यांचा नामजप अन् आराधना करायला आरंभ केला. त्या वेळी सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांचा मला भ्रमणभाष आला, ‘‘आजी, थोडा नामजप वाढवा. वातावरण थोडे खराब दिसत आहे.’’ मी त्यांना म्हणाले, ‘‘काहीतरी घडणार आहे’, असे मला कळले आहे.’’ पावसाचे वातावरण होते; पण नामजप वाढवल्यावर एका घंट्यात ढगांचे आवाज बंद झाले. पाऊस येण्याची लक्षणे दूर झाली.

निसर्गदेवतांनी साहाय्य केले. वायुदेवाने वादळ येऊ दिले नाही. देवीमातेनेही साहाय्य केले. त्यानंतर श्री. वाघुळदेकाकांचा भ्रमणभाष आला, ‘‘आजी, सभा व्यवस्थित पार पडली.’’

कु. प्रियांका लोटलीकर : ‘संतांनी केलेली प्रार्थना किंवा त्यांची देवावरची श्रद्धा’, यांमुळेच आज आपण जिवंत आहोत.

 

१२. पू. (सौ.) पाटीलआजींनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, ‘साधकांनी आणखी काय प्रयत्न करायला पाहिजेत ? कसा भाव ठेवायला पाहिजे ?’, त्याविषयी थोडे सांगा.

पू. (सौ.) पाटीलआजी :

अ. ‘हे मी केले, हे माझ्यामुळे झाले’, असे कधी म्हणायचे नाही. ‘सगळे गुरुदेवांनी केले. त्यांनीच करवून घेतले. आमच्याकडून काहीच होत नाही’, असा भाव असला पाहिजे.

आ. प्रेमभाव वाढवायला पाहिजे.

इ. साधकांनी साधना करतांना दिवसभर गुरुमाऊलीला, म्हणजेच कृष्णाला ‘कृष्णा, आता पुढे काय करू ?’, असे विचारायला पाहिजे. गुरुमाऊलीला विचारून केले की, साधना आपोआप वाढते, आपला नामजप भावपूर्ण होतो, आणि प्रेमभाव पुष्कळ वाढतो.

ई. साधकांनी परिपूर्ण सेवा करायला पाहिजे.

उ. हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी पुष्कळ प्रार्थना करायला हव्यात. हिंदु राष्ट्र यायला पाहिजे. सगळ्या साधकांची साधना व्हायला पाहिजे आणि साधकांभोवती संरक्षक कवच निर्माण व्हायला पाहिजे.

कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजींनी आता जे सांगितले, ते साधकांनी शरणागतभावाने केले पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीत ‘मी केले’, असे न म्हणता आणि कर्तेपणा आपल्याकडे न घेता तो देवाच्या चरणी अर्पण केला पाहिजे.

‘पू. आजी रामनाथी आश्रमात आल्या. ‘त्यांची ईश्वराप्रती दृढ श्रद्धा आणि भाव आहे’, हे त्यांच्या मुलाखतीतून लक्षात आले. त्यातून सर्व साधकांना पुष्कळ शिकायला मिळाले’, यासाठी आम्ही पू. आजींप्रती कृतज्ञ आहोत. श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !’  (जुलै २०१८)

पू. आजींची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

‘माझी परीक्षा चालू असतांना ‘पू. आजींशी बोलायला हवे’, असे मला वाटायचे आणि त्याच क्षणी पू. आजी भ्रमणभाष करून मला विचारायच्या, ‘‘तुझा अभ्यास कसा चालू आहे ? पेपर कसे गेले ?’’ तेव्हा मला आश्‍चर्य वाटायचेे, ‘मी तर आता भ्रमणभाष करणार होतो; पण पू. आजींचाच भ्रमणभाष कसा काय आला ?’ त्या संत होण्यापूर्वी ३ – ४ वेळा आणि संत झाल्यानंतर २ वेळा मला अशी अनुभूती आली आहे.’ – कु. जयेश पाटील (नातू), चाळीसगाव (जुलै २०१८)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment